Friday, December 31, 2010

मन विश्वरंगी रंगले ........

मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने …
मन विश्वरंगी रंगले ........

मन हो रामरंगी रंगले ... ‘संगीत तुलसीदास’ या नाटकातील श्री गोविंद सदाशिव टेंबे यांचे पहाडी रागावर आधारित हे पद स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली रचना. या विषयी मी पुढे लिहणार आहेच. पण त्यातील "मन विश्वरंगी रंगले .... ही माझ्या ब्लॉगच्या नामकरणा मागील प्रेरणा . मनाच्या विचार तरंगातून उठणाऱ्या लहरी. ज्यावर उमटणार आहेत मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने …जिथे साकारणार आहेत शब्दचित्रे .वर लिहिलेला छोटासा परिच्छेद हि माझ्या ब्लॉग लिखाणाची सुरवात. त्यात मी ‘मन हो राम रंगी रंगले’…या रचनेविषयी पुढे लिहिणार आहे, असे म्हटले होते तर तेंव्हा पासून मनात घोळणाऱ्या चित्राचे हे शब्द चित्र.
एखादे गाणे डोक्यात जाते म्हणजे काय होते दिवस सुरु होतो.कुठे तरी दूरवर एखादी सुरावट थिरकत असते. कधी एखादा शब्द, तरी कधी एखादि धून कानात शिरते. शिरते मात्र आणि पुरा दिवस बदलून जातो. पंडित भिमसेनजींचा भक्ती रचना गाताना लागणारा आवाज हा माझा सर्वात प्रिय क्षण आहे. अर्थात पंडितजी म्हटले कि, भक्ती रचना आणि विठ्ठल गीते यांचे समीकरण इतके पक्के मनात असते कि, पंडितजी म्हणजे,'इंद्रायणी काठी.... किंवा पंडितजी म्हणजे,
'देह विठ्ठल तीर्थ विठ्ठल' ..... यांची आठवण प्रकर्षाने येते.
पण असे का घडते? मन सतत अशी ओढ घेत त्याच त्याच सुराववटींकडे धाव का घेते ? या भोवती माझी विचारांची गुंफण चालली होती. आणि मन,मना भोवतीच रुंजी घालू लागले. त्या दिवशी पण असेच काहीसे घडले. दूरवरून कानावर त्या ओळी पडल्या ...
मन हो राम रंगी रंगले.....
दिवसभर ते शब्द ती सुरावट यांनी पाठ सोडली नाही. सायंकाळी घरी आलो. आज बैठक मारून, निवांत आणि समजून घेवून हि रचना ऐकायची असे ठरवून गाणे ऐकले. गाणे ऐकले मात्र आणि मन अधिकच सैर भैर झाले कारण त्या गाण्यात होते एकूण फक्त सतरा शब्द .पहा ना तो अभंग असा आहे.
मन हो राम रंगी रंगले
आत्मरंगी रंगले
मन विश्वरंगी रंगले
चरणी नेत्र गुंतले
भृंग अंबूजातले
भवतरंगी रंगले ....
पण किती मोठा आणि गर्भित अर्थ उलगडून दाखवण्याची ताकद या शब्दांमध्ये आहे. खरच एकदम मला, मन आणि त्याचे विविध पदर यांची मालिका व असे अनेक विचारांचे कल्लोळ यांनी चक्रावून टाकले. मन आकार हीन आहे अशरीरेय आहे, असा एक मत प्रवाह आहे तर मन हे अव्यक्त शरीर आहे असा एक प्रवाह आहे. मनाचे एकूण तीन स्तर मानले तर ते पुढील तीन प्रकारात मोडतात असे मानले जाते. पहिला मनाचा स्तर म्हणजे बाह्यमन , दुसरा स्तर म्हणजे अंतर्मन , आणि तिसरा म्हणजे वैश्विक मन होय. राम म्हणजे माझ्या दृष्टीने कोणी व्यक्ती अथवा दैवी शक्ती नसून ती प्रवृत्ती आहे. आणि म्हणून ती चराचर व्यापून राहीली आहे. जर माणसाचे एखाद्या गोष्टीतील स्वारस्य संपले कि तो पटकन म्हणतो, यात काही राम नाही. आणि जेंव्हा एखादी अशक्यप्राय,अवघड गोष्ट देखील करण्याची इच्छा तीव्र झाली कि, त्याची सुरवात करताना जय राम , श्रीराम, जय रामजी कि असे म्हणत सहजतेने केली जाते.जुन्या परंपरेतील बायका स्वयंपाकात फोडणी टाकून पदार्थ करण्यास सुरु करताना 'श्रीराम' म्हणून सुरवात करताना आम्ही लहानपणी अनुभवले आहे. हे सर्व म्हणजेच परिसराकडे बघण्याची माणसाची मनोवृत्ती होय. म्हणजेज आपले बाह्यमन होय.
मनोवृत्ती निरक्षण परिसराचे करते.त्यातून स्वतः नियोजन केलेले कार्य पूर्ण करण्यासाठी मी कायकेले पाहिजे हा प्रश्न माणूस स्व संवादातून मनास विचारतो. त्याचे उत्तर म्हणजे मेंदूने परिसराचे आकलन करून शरीरास कार्यरत होण्यासाठी दिलेली प्रेरणा होय. आणि म्हणून स्वयं प्रेरणेने केलेले काम कितीही कष्टप्रद असले तरी त्याच्या पुर्तातेतून आनंदच मिळतो. हि अन्तः प्रेरणा कार्यरत करण्याची प्रक्रिया ज्यातून निर्माण होते ते आपले अंतर्मन होय.
मग जर बाह्यमन आणि अंतर्मन हि दोन प्रेरणा स्थाने आहेत तर मग आता तिसऱ्या शक्तीची दखल का म्हणून घ्यायची. तर इथे सुरु होते वैश्विक मनाची संकल्पना. म्हणजे परिसर आणि आपण याचा दुवा बनलेले अवकाश आणि त्यातील घडामोडी यांचा कार्यकारण भाव लावताना होणारी मनाची अवस्था म्हणजे वैश्विक मन होय. हे असे का ? या प्रश्नास शास्त्रीय आधारावर उत्तरे आहेत. शास्त्रज्ञ त्याची उत्तरे देतात. ग्रह, परग्रह पृथ्वीची गतिशीलता यांच्या कार्यकारण भावाचा शोध घेण्यासाठी कोपर्निकस, गॅलिलिओ , यांच्या पासून ते अलीकडील डॉ. जयंत नारळीकर, स्टीफन हॉकिंग यांची संसोधाने पाहिली तर आजही हे असे का ? या प्रश्नाचे उत्तरात ज्ञातापेक्षा अज्ञाताचा हिस्सा अजूनहि अधिक आहे.अभ्यासातून लागलेल्या शोधांपेक्षा अपघाताने लागलेले शोध अधिक आहेत. इथे विश्वाच्या पसाऱ्यातील माणूस नगण्य का माणसाच्या अंतरंगातील विश्वाचा पसारा अगम्य हा माझ्या समोर असलेला प्रश्न आहे.त्यावर विचार करताना मन जिथे फिरते तो भव ताल. कदाचित भोवताली काय घडतेय ते जरा उघड्या डोळ्यांनी पाहण्यास शिका. या आपल्या आधीच्या पिढीतील करारी बापाच्या तोंडी असणाऱ्या वाक्यातील भोवताल हा या भव तालातूनच आला असेल का ? असा जेंव्हा मला प्रश्न पडतो तेंव्हा माझे मन खरोखरच भव तरंगात रंगलेले असते.
अशा अनेक विषयांवर स्वतःशी बोलत विचारांची साखळी मन जेंव्हा गुंफू लागते तेंव्हा खरोखरच मनाची अवस्था मन विश्वरंगी रंगले अशी होते. विचारांची शब्द चित्रे साकारू लागतात.कधी कधी ती मनाच्या कँनव्हासवरील रेखाटने ठरतात , तर कधी फुलात लपलेल्या भुंग्या सारखी अडकून पडतात.
माझ्या ब्लॉगवरील सर्वात पाहिली नोंद लिहताना मनात हीच भावना होती. विचार अनेक दिवस घोळत होते. शब्द रूप आज दिले. या बरोबरच संपणाऱ्या या वर्षास निरोप देत व सर्व ब्लॉग वाचकांना येणाऱ्या नाव वर्षाच्या शुभेच्छा देत या वर्षीचे माझे ब्लॉग लिखाण आटोपते घेतो.

Monday, December 20, 2010

एक आदरांजली जनकवीस .... त्यांच्याच सुरेल गीतांमधून.

.....आणि या नंतरच्या गीताचे शब्द आहेत श्री.निवृत्ती रावजी पाटील यांचे.असे म्हणून जर निवेदकांनी निवेदन थांबवले, तर काय होईल ?काही नाही जे काय असेल ते ऐकु.काय करणार असे मनात म्हणत तुम्ही गप्प बसाल.पण काही क्षणच कारण त्यानंतर तुम्हाला अशी सुरावट कानी पडेल कि बस्स फक्त ऐकतच राहावे.कारण तुमच्या कानावर पडत असेल हि सुरावट ....

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा,दिल्या घरी तू सुखी रहा …......काय ओळखलेत ना ? श्री. निवृत्ती रावजी पाटील म्हणजेच आपले पी.सावळाराम.

हो !मी म्हणालो,कि आपले पी.सावळाराम.आणि का नाही म्हणायचे आपले म्हणून?कारण त्यांनी दिलेल्या रचना सर्वथा त्यांच्याच प्रतिभेचे देणे आहे,पण मन कोणाचे जाणलेय त्यांनी?या प्रश्नाचे उत्तर आहे,आपले अगदी आपल्या सर्वांचे.त्यात कोण नाही ?मुलगी,आई ,प्रेयसी, शेतकरी, कामकरी,भक्त, चित्रकार कोणतेही व्यक्तिमत्व घ्या मनोगतासाठी शब्द आहेत आपल्या लाडक्या शब्द प्रभूचे.तर हे पी. सावळाराम जे काही थोडेफार मला समजलेत ते मी आपणासमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या भावना ,त्यांच्या विषयीचा आदर याबद्दल बोलताना मनापासून लिहणार आहे, त्याच्या स्मृतीदिनी त्यांचा चाहता म्हणून त्यांना वाहिलेली हि एक आदरांजली आहे. जे सुचतेय ते लिहिणार आहे. पण त्यासाठी सर्वाधिक मदत घेणार आहे त्यांच्याच सुमधुर गीतांची. माझा हा प्रयत्न थोडा धाडसी मानून घेत त्यांच्या आजच्या सृम्तीदिनी मी त्यांना वंदन करून त्याचे आशीर्वादच मागत आहे.
मी पी. सावळाराम यांना शब्दप्रभू म्हटले आणि तेही कसे तर अगदी 'दिलसे' कारण मराठी आणि तिचा पुरेसा वापर याबाबत आपण नेहमीच 'दिलसे' आणि 'मनसे' जागरूक आहोत असे म्हणत असतो. आणि आपल्याच मातृ भाषेसाठी असा अभिमान बाळगणे हे सर्वार्थाने बरोबर देखील आहे. पण हि माझी भाषा मला किती आणि कशी समजते यासाठी भाषेचा वापर, त्यातील गद्य आणि पद्य, त्यातील सौंदर्य स्थळे यांचे आकलन होणे तितकेच जरुरीचे आहे. पी. सावळाराम यांना आपली भाषा आणि तिचे महत्व इतके पराकोटीचे समजले होते कि, त्यांनी भगवत गीतेचे निरुपण आणि सहज सुंदर शब्दात तिचे विवेचन करण्याचे जे कार्य संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहून केले.त्या महत कार्याकडे बघताना एका वेगळ्याच दृष्टीकोनातून बघितले आहे.
ते स्वतः कवी मनाने, त्या ज्ञानेश्वरी निर्मितीच्या शुभारंभाचे क्षणा पाशी पोहचले आहेत आणि ज्ञानेश्वर जे बालकच आहेत,या बालकाचे अंगी नव निर्मितीच्या सृजन क्षणी सृजनत्वाचे बळ यावे म्हणून मराठी भाषा हि स्वतःच परमेश्वरास विनवते आहे,
हे भगवंत हि ज्ञानेश्वारीची निर्मिती हा बालक तुझ्यासाठीच करीत आहे. या बालकाचा हा जगावेगळा प्रयास मार्गी लावण्याचे बळ तूच दे. आता मला सांगा मुळात भगवत गीता किती अवघड, पण ती सोपी करून जन सामान्यांना ज्ञानेश्वरी रुपात देण्याचे काम,नुसत्या कल्पनेने थरकाप होतो मग ते निरुपण सुलभ आणि अचूक असावे असे कोणासही वाटेल.संत ज्ञानेश्वरांनी ते केले, नव्हे ते केले म्हणूनच ते संत झाले. पण हे भाषाविष्काराचे काम अतुलनीय म्हणूनच भाषाच परमेश्वराकडे धावली असे पी. सावळारामजींना कवी कल्पनेतून वाटले आणि अवतरले हे सुरेल काव्य

1.ज्ञानदेव बाळ माझा,सांगे गीता,भगवंता
लक्ष द्या हो विनविते,मराठी मी त्याची माता
पी.सावळाराम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी या गावी झाला. गाव परिसर तसा अस्सल ग्रामीण.कदाचित त्यांच्या लहानपणी त्यांनी वर्णाश्रमाचा पगडा पहिला असेल.उच्च वर्गाचे चुकीचे वागणे अनुभवले पण असेल. त्यावर त्यांनी कोणतीही कडवट टीका केली नाही पण जाती भेद दूर करून जगायचे कसे याचा संदेश देताना ते म्हणतात ..

2. खरा ब्राह्मण नाथची झाला
जो महारा घरी जेवला ...

आत्ता आपण ऐकलेल्या गीतातील अखेरच्या कडव्यातील ओळी होत्या,

धूप घालता सुवास सुटला
मागे पुढती पाट मांडिला
नाथाने मुखी घास घातला
पुंडलिक वरदा हरी बोलला ....
म्हणजे ज्याक्षणी नाथांनी सम विषमतेच्या मर्यादा मोडून ,गरीबाघरी पहिला घास घेतला,तेंव्हा त्यांची ती कृती अशा उंचीची होती कि,त्यातून जातीभेद टाळून सर्व प्राणीमात्र एकच आहेत हि शिकवण त्यांनी कृतीतून दिली. आणि ह्या पद्धतीने जगू इच्छिणारा माणूस हाच खरा श्रेष्ठ माणूस आहे.देवाला देखील हे वागणे पूर्णतः ग्राह्य आहे आणि इतका मोठा आणि अचूक संदेश या कवींनी फक्त एका सांकेतिक कृतीच्या वर्णनातून दिला आहे आणि त्यासाठी ते म्हणतात - पुंडलिक वरदा हरी बोलला.

एकूणच काय तर पी. सावळाराम हे सश्रद्ध, डोळस भक्ती करणारे आणि परमेश्वरी ताकद मानणारे कवी होते. गुरुत्वाकर्षण, कृष्णविवर, आकाशगंगेतील आपले स्थान यावर सान थोरांपासून ते आगदी नासा पर्यंत कोणी काहीही म्हणो पण हा डोलारा शास्त्रीय मुलभूत तत्वांवर जसा उभा आहे तसा, या सर्वामागे एक ईश्वरी ताकद कार्यरत आहे आणि हे वास्तव गीतबद्ध करताना पी.सावळाराम,सांगतात कि परमेश्वर अद्भुत आहे. सर्व जग चालवण्याची माया ज्याचे अंगी आहे तो मातेच्या माया, ममतेसाठी अजाणत्या रुपात प्रकटतो.आणि हे त्रिकालाबाधीत जपलेले ईश्वराचे अधिष्ठान आपणासाठी सहज सोप्या रुपात गीतबद्ध करताना ते म्हणतात ..

3.सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी
पी. सावळाराम हे जनकवी म्हणून ओळखले जातात पण मला मात्र ते सृजन कवी वाटतात.शहरी आणि अतर्क्य कविता मांडत पुढे न जाता, ज्यांनी आपली कविता शेतावरून गावात नेली. पण या कवीचे मन इतके संवेदनशील राहिले कि त्यांच्या हातून सर्वाधिक सुंदर रचना ह्या स्त्री मनाची आंदोलने टिपणाऱ्या झाल्या. प्रत्येक स्त्रीचे भाव विश्व विवाह बंधनाने आणि सासर माहेरच्या नात्याने इतके बदलते कि, त्यामुळे स्त्री अंतर्बाह्य बदलून जाते. त्यांनी प्रेम गीते लिहलीतच.पण त्याच बरोबर विवाह निश्चिती, विवाह सोहळा,पाठवणी, ते मधुचंद्राची रात्र यावर काव्य रचना केल्या आहेत. तसेच त्यांनी पुराणातील अमर प्रेम कथांवर देखील सुरेल रचना करताना शंकर पार्वती, राधा कृष्ण सीता राम यांचा नातेसंबंध सुरेख उलगडला आहे.
पण या स्त्री मनाचा पट उलगडताना,त्यांनी प्रेमालाच प्रश्न विचारणारी स्त्री उभी करून केलेली सुंदर रचना मला सर्वाधिक भावली आहे. कारण हा प्रश्न विचारताना ती प्रेमाला म्हणते, काय देवू मी तुला ? पण त्या प्रश्न मागे साशंकता नसून अर्पण भाव आहे.प्रेमातून मिळालेला सौख्याचा काळ तिला कृत कृत्य करीत आहे आणि त्यामुळे तिच्या ओठी शब्द येतात...

४.प्रेमा काय देवू तुला ?
भाग्य दिले तू मला...
पी.सावळाराम हे ठाणेकर म्हणूनच परिचित.पण बालपणी पश्चिम महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध आणि कलाक्षेत्राशी असलेल्या संबंधातून जुळलेली ग्रामीण परिसराची नाळ,यामुळे शेती,शेतकरी म्हणजे काय ?याची त्यांना पूर्णता जाणीव होती. शेतकरी कामाच्या रगाड्यात जरी थकून जात असला,तरी त्याची काळ्या मातीची ओढ तिच्यावरील माया कधीच कमी होत नाही. त्यामुळे पीक दाणापाणी जेंव्हा पूर्ण तयार होते तेंव्हा प्राणी,पक्षी यांच्या तडाख्यातून ते वाचवण्याचे काम करताना सुद्धा शेतकरी ते ममत्वाने करतो. त्यातील काव्य काय किंवा निसर्गाने भरभरून दिल्यावर त्या शेतीच्या उत्पन्नाची तुलना थेट स्वर्गातील खजिन्याशी करण्याची कल्पना हा ग्रामीण कवीच करू शकतो. मग त्याला शेतच देवाचा अवतार वाटले,तर त्यात काय नवल आणि आपोआप ओठावर शब्द येतात ....

५.देवावाणी शेत माझ नवसाला पावलं
कुबेराच धन माझ्या शेतात घावल...
प्रेम, विरह, मानसिक आंदोलने हि जशी कवी मनाची हळवी ठिकाणे,त्याप्रमाणे कवीच्या मनास भावणारा विषय म्हणजे निसर्ग. कवी मनाने निसर्गाच्या विविध रुपांकडे नजर टाकली कि, मग उन हसरे होते,थंडी गुलाबी रंग घेते,वारा गाणे गाऊ
लागतो.याप्रमाणेच कवीस नेहमीच भावणारा निसर्गाचा चमत्कार म्हणजे पाऊस.त्याचे आणि पावसाचे नाते इतके घट्ट आहे कि, कवी मन आहे आणि पावसावर गाणे नाही हे घडणेच अशक्य. पी.सावळाराम देखील यास अपवाद नाहीत.पण त्याची पावसाकडे बघण्याची नजर म्हणजे प्रेम, चुटपूट, मनाची दोलायमान होणारी अवस्था, हळवे स्त्री मन या सगळ्याचा अनोखा संगम आहे. स्त्री मन, राधेचे अव्यक्त प्रेम, आणि पाऊस असा त्रिवेणी संगम ज्या पावसात घडून आला आहे त्या या पावसाच्या तरल गाण्याने आनंद तर होतोच पण पावसाची रिमझिम आपल्याला फक्त भिजवत नाही तर पुरती चिंब करते आणि राधेला कृष्ण भेटीने होणारा मिलनाचा आनंद आपल्याही मनात द्विगुणीत होतो. चला तर या गोकुळातील पावसात भिजायला...

६. रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे ...
कवी, त्याच्या रचना, त्यातून दिलेला संदेश यासारखा विषय जेंव्हा निखळ आनंद घेण्याकडून अभ्यासाकडे वळतो तेंव्हा समीक्षक टीकाकार कवीने काल्पनिक जगात न वावरता सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे, त्याचा कविता ह्या स्वप्नमय जगातून बाहेर येवून त्यात सामाजिक जाणिवेची स्पंदने असली पाहिजेत, असा सूर लावताना दिसतात. खरे तर कवी प्रथम माणूस असतो. तुमच्या आमच्या सारखं त्यालाही मन असते. फक्त एक व्यक्त होण्याची अव्यक्त नजर त्याच्या मनात दडलेली असते. त्यामुळे कवीची समाज त्यातील भोंदुगिरी, अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची चीड हि तुम्हा आम्हा सामान्य माणसापेक्षा कितीतरीपटीने तीव्र असते. तेथे त्याची लेखणी तलवार बनते. श्वास- उच्छवास अंगार बनतात.
पण असा अन्याय अशी लढाई लढताना ती परमेश्वराचे नजरेतून लढणे,अन्यायाविरुध्द लढताना सुरवात घरापासून करणे याची जाणीव ठेवत केलीली रचना हे सामाजिक जाणिवेचे खरे खुरे प्रतिक आहे. आज आपण समाजात वावरताना परस्परांची गरज म्हणून, बदलते संदर्भ स्वीकारून जातीभेदापासून दूर जाण्यास सुरवात केली आहे. पण तीन चारशे वर्षापूर्वी त्याची तीव्रता इतकी प्रखर होती कि, स्वतंत्र पाणवठे, स्वतंत्र विहरी, देवळात प्रवेशास बंदी,असे हीन प्रकार चालत असत. त्याचे पडसाद संत कवींच्या रचनेत सुद्धा दिसून येतात. काळाच्या ओघात प्रथा बदलल्या, 'एक गाव एक पाणवठा' अशा घोषणा करीत पुढाऱ्याकडून या प्रथेस पायबंद घालण्याचे प्रयत्न झाले. तरीही अश्या गोष्टीचे उच्चाटन सार्वजनिक झाले तरी मनापासून होणे हि खरी गरज ठरते.
याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात माजलेली बडवेगिरी व त्यातून पैसा खावून दर्शन देण्याची प्रथा, कागदोपत्री मंदिर प्रवेश सर्वांसाठी खुला झाल्यावर देखील मागील दाराने टिकून होती. याचा तिटकारा येवून पी. सावळाराम यांनी लिहिलेले काव्य इतके अप्रतिम आहे कि बस्स! रुखमाई स्वतःच जर देव दर्शन सर्वांना खुले नसेल तर येथे काय पावित्र्य राहिले ? असा प्रश्न करून विठ्ठलास म्हणते कि हे अमंगल ठिकाणच सोडून आपण दूर निघून जावू. आणि इतके म्हणून न थांबता,पुढे ती म्हणते कि आताच्या या परिस्थितीत अन्याय सहन करत इथेच राहणे हा आपल्या नावाला कलंक आहे म्हणून चला.आणि अश्या अन्याया विरुध्द लढण्याची तिची तळमळ दर्शवणारी मनस्थिती गीताचे अखेरच्या ओळीत इतकी सुंदर टिपली आहे कि ती तुम्ही जरूर अनुभवाच.

७. पंढरिनाथा झडकरी आता,
पंढरी सोडून चला विनवते रुखमाई विठ्ठला...
चित्रपट सृष्टी जिला मायानगरी म्हणून ओळखले जाते तिथे काम करताना,यश अपयश,लढा झगडा,सुख दुखः,या चढ उतारांवरून होणारा प्रवास कोणालाच चुकत नाही.त्यामुळे अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रांतील कलाकारांची आत्मचरित्रे वास्तव दाहकतेने सजलेली दिसतात. काम करताना काही मने इतकी जुळतात कि त्यातून नंतर नंतर फक्त अप्रतिम तेच येत राहते. जसे मुकेश आणि राजकपूर, लता दीदी आणि मदन मोहन , गदिमा आणि सुधीर फडके,किती नावे घ्यायची.पी. सावळाराम हे देखील यास अपवाद नाहीत. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कशी बहरली याचा पुरेशा तपशील जरी मला ठावूक नसला तरी वसंत प्रभू आणि पी सावळाराम यांनी आपणास नेहमीच निखळ आनंद दिला आहे.
त्यांच्या आजच्या दिनांक २१ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना वंदन करून मी माझ्या या आपणासाठी केलेल्या कार्यक्रमाची पूर्तता करू इच्छितो. अखेरीस या कवीने इतके सर्व समाजाला देत, आगदी लोकाग्रहास्तव ठाण्याचे नगराध्यक्षपद पण भूषवले होते.तरीही या सर्व यशानंतर आपण ध्येय पुर्ती केली का ? असे मनास विचारात जनकवी पी.सावळाराम यांनी पुढील रचना लिहिली असावी असे मला वाटते.पहा बरे माझे म्हणणे तुम्हाला पटते का?

८. हरवले ते गवसले का ?
गवसले ते हरवले का ?

Sunday, December 19, 2010

वाहिली धुंद आज सरिता

सोडूनी बंध, फोडुनी बांध, वाहिली धुंद आज सरिता
ओढ हि तिला कशाची कळेना, झुगारली बंधने कोणा  करिता ?

ओसरता पूर, धपापला उर, तुटले नुपूर, सारे निशब्द क्षणाकरिता !
थांबला खेळ, बसेना मेळ का अशी धावली कशा करिता ?

कुठे गेले तिचे संयमी पात्र, मर्यादेत राहणे , गतिशील वाहणे न पाही किनारा,
होता दूरवर माझाच पसारा, गतीशिलतेचा असे ठावूक दरारा !

आता वाटते तुजला कि,मी झाले बेधुंद, मला न दिसे किनारा,
कोणाची मर्यादा कोणी मोडली ? उत्तरात आहे प्रश्नाचा पसारा.

न बंध मानिले, न साहिले अकारा,उरे मागे एक केवळ दीर्घ सुस्कारा!!!

ओसरता पूर, आशेचा सूर
इथे होते मंदिर इथे होता पार

खुणा शोधीत धावे रस्ताच दूर
न सापडे गाव , न दिसे भाव

प्रत्येक नजर घेई काळजाचा ठाव
शोधण्या आधार उचलता नजर

नजरेस दिसेना काहीच आरपार ....

Saturday, December 18, 2010

या कातरवेळी........

विसरायचे ठरवता मन तिला आठवते
आठवायचे ठरवता का म्हणून विसरते,


आज अचानक आली तिची मूर्त डोळ्यासमोर
अश्रूंचा पूर थोपवला पापण्यांवर!

वाहु दे! म्हटले तरी वाहत नाहीत आता डोळे
नजरे समोर साकारतात फक्त तिचे भाव भोळे,

का म्हणून काळीज गलबलले या सांजवेळी
देवा समोर ज्योत लावून काय मागत असेल अशावेळी!

काय असतील तिच्या भावना आता अशा अवेळी
अंतःकरणी राहतो सल, पण सुकलेले डोळे म्हणती,

आठवांनी फुटू दे बांध, तुटू दे काळीज या काजळ काळी,
पण रड कोरडाच या कातरवेळी........

Thursday, December 16, 2010

ओळख मला आवडलेल्या पुस्तकांची -

आपण ब्लॉगवर आपल्या आवडीची पुस्तके त्यातून येणारे भारावलेपण यावर नेहमीच वाचत असतो. काही जण आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगतात, काही जण त्यातील एखादा उतारा देतात. काही जण परीक्षण मांडतात.या सर्व प्रकारातून आपली पुस्तक वाचण्याची जिज्ञासा वाढीस लागते . माझे अमराठी वाचन तसे मर्यादित आहे. किंवा खरे म्हणाल तर बैठक मारून संपवलीत अशी इंग्लिश पुस्तके हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. पण त्यातील- THE FREEDOM WRITERS DIARY.हे पुस्तक मला खूपच आवडले. आपणास हि त्या पुस्तकाबाबत उत्सुकता वाटावी म्हणून, त्या पुस्तकाची प्रस्तावना(अंशतः) मी     भाषांतरित करून आपणासाठी देत आहे.मला वाटतेय कि या प्रस्तावनेच्या वाचनानंतर आपण हे पुस्तक नक्कीच वाचाल.

प्रस्तावना-झेल्ता फिलीपोविक
जेंव्हा मला "दि फ्रीडम रायटर्स डायरी" या पुस्तकासाठी प्रस्तावना लिह्ण्याबाबत विचारण्यात आले, तेंव्हा प्रथम हे मला सांगितले पाहिजे कि,मला तो असा गौरव वाटला कि ज्याचा मला अभिमान आहे,परंतु त्याच वेळी मी भारावून जावून विचार करू लागले कि इतक्या अल्पावधीत किती आश्चर्यकारक घटना घडत आहेत.
१९९६ च्या मार्चमध्ये मी विल्सन हायस्कूलच्या शाळकरी मुलांना (विद्यार्थ्यांना) त्यांची भविष्यावरील श्रद्धा, समर्पणवृत्ती,आणि प्रयत्नवाद याकरिता त्यांचे आभार मानण्यासाठी भेटले. माझ्या बरोबर त्यांनी माझे पालक,माझी मैत्रीण मिरना ( जी बोस्नियात असल्यापासून माझी मैत्रीण आहे, आतासुद्धा जी माझ्या बरोबर आहे ) यांना लाँग बीच , कॅलिफोर्निया येथे आमंत्रित केले होते. मी जेंव्हा त्यांना प्रथम भेटले तेंव्हा त्यांच्या कनवाळूपणा व मायेने मी भारावून गेले. ते सर्वजण माझ्याच बरोबरीचे नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले होते, जगभरातील असंख्य तरुणांसारखेच ते हि होते,त्यांच्या मध्ये खऱ्या अर्थाने मोठे होण्याची नेतृत्व करण्याची ताकद होती, जी इतरांना प्रेरणा देईल.
हे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका एरीन ग्रुवेल यांनी अॅन  फ्रंन्क हिची- " दि डायरी ऑफ यंग गर्ल ,माझे पुस्तक - झेल्ताज डायरी : ए चाइल्ड लाइफ इन साराजेवो आणि इतर अनेक पुस्तके यांचे वाचन केले ज्यामधून त्यांना त्यांची रोजनिशी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वतःला ऑरगनाइज्ड करत काहीतरी वेगळे करण्याची, काहीतरी चिरस्मरणीय करण्याची काहीतरी ताकदीचे व मानवतावादी काम करण्याचे ठरवले.त्यासाठी त्यांनी सहजतेने पुढे जाण्याचा मार्ग निवडण्याचे ठरवले, त्याप्रमाणे त्यांनी केले लिखाणातून भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यातून त्यांनी प्रस्थापिता विरुद्ध लढाई पुकारली आणि खऱ्या अर्थाने स्वतःचे "फ्रीडम रायटर्स" हे नाव सार्थ केले.
मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान तर आहेच पण त्याच बरोबर आणखी एका गोष्टीचा आनंद देखील आहे तो म्हणजे त्यांच्या जडण घडणीच्या प्रगतीमध्ये माझा खारीचा वाटा आहे.
मी माझी रोजनिशी लिहिण्यास सुरवात बोस्नियाचे युद्ध सुरु होण्यापूर्वी केली होती, कारण मला माझ्या बालपणीच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी व मागे वळून पाहत रममाण होण्यासाठी त्यांची गरज होती. मला माझी रोजनिशी वाचताना जुन्या आठवणीत रंगून जाताना हसायचे होते,रडायचे होते, सदगतीत व्हायचे होते. मला माझ्या डायरी बरोबर मी कशी वाढले ते अनुभवायचे होते. माझ्या काही मोठ्या मैत्रिणी डायरी लिहित आणि वाचनात आलेल्या अन फ्रांक ,अदरिअन मोल यांच्या डायऱ्या यामुळे माझी खात्रीच झाली होती कि डायरी लिहिणे हि योग्यच गोष्ट आहे. मी कधीही कल्पनादेखील केली नव्हती कि माझी डायरी प्रकाशित होईल, आणि माझी डायरी एका युद्धाची रोजनिशी व्हावी अशी तर बिलकुल इच्छा नव्हती. माझे बालपण अचानक थांबेल असे कधी स्वप्नात देखील वाटले नाही. मात्र या घटनांनी अघटीत घटनांबद्दल विचार करण्याची सवय लावली. कारण मनुष्य स्वभाव असा असतो कि दुर्घटना/संकटे हि इतरांवर येतात अशी त्याची धारणा असते. पण जेंव्हा प्रत्यक्षात दुर्देवाचा घाला पडतो तेंव्हा तो स्वतः घाबरलेला,दुखी:, गोंधळलेला रागावलेला असा बनतो.
जेंव्हा बोस्नियाच्या महाभयंकर युद्धाला प्रत्यक्षात सुरवात झाली तेंव्हा माझे आनंदी आणि सुरक्षित बालपण संपुष्टात आले, आणि माझी डायरी हि रोजच्या घटना नोंदवण्याच्या पलीकडली बाब झाली. ती माझी खरीखुरी मैत्रीण झाली. मी जे काही बोलेन ते ऐकण्यासाठी,माझे प्रश्न समजून घेण्यासाठी, माझी भीती,माझे दुखः स्वीकारण्यासाठी ती कायम तयार होती.मला माझ्या लिखाणातील आनंद उमजला---

Tuesday, December 14, 2010

माझी 'कविता'

तिने यावे वाटते तेंव्हा ती रुसते
तिची आठवण होता मन खुदकन हसते,

ती इथेच तर आहे मीच मला समजावतो
सहवासाने तिच्या मनोमन सुखावतो!

कधी कधी ती धावून येते
आषाढ मेघापरी पुरेपूर बरसते,

कधी कधी ती सहज येते
श्रावण सरीसारखी हुलकावणी देते!

तिचे येणे तिचे जाणे
जणू चांदणीचे गूढ आभाळी लपणे,

तिच्या आगमनाने चैत्र पालवी बहरते
तिच्या स्पर्शाने ती वैशाख वणवा विझवते!

येणे जाणे तिचे असुनी इतके अनिश्चित
मन मंदिरी तेवते आठवाची ज्योत सदोदित,

कोणाची हि कोणासाठी चाललीय प्रार्थना ?
प्रवेशिता गाभाऱ्यात कोण थांबावी स्पंदना ?

कोण बरे हि प्रतिभा कि कल्पना
का 'कविता' माझी आहे हि नुसतीच वल्गना!!

Friday, December 10, 2010

आठवणींचे शिंपले.

आज काय करावे सुचत नाही. वाचायला पुस्तक घेतले तर डोळे नुसतेच अक्षरावरून फिरतात. शब्द दिसतो पण शब्दार्थ हरवतो. टी. व्ही. लावला तर मनासारखा कार्यक्रम नसतो. काहीच न करता शांतपणे बसावे तर आपण शहरी गोंगाटाचे केंद्रस्थानी आहोत याची पुरती जाणीव कर्णेन्द्रीये देतात. आणि मन आणि शरीर हतबुद्ध होते. असा अनुभव आपण कधीतरी घेतलाच असेल. हि सैर भैर मनस्थिती पटकन जात नाही आणि बघणाऱ्याला वाटत असते. काय हा वेडा, जणू काही सुख दुखतेय.कोणी काही म्हणो पण कधी कधी माझी हि अवस्था होते हे मात्र खरे. आजही माझे मन असे अस्वस्थ झाले कि मी मागे जातो आणि अशा मनस्थिती तून बाहेर येण्यासाठी जुने पण निसर्गाने दिलेले शिंपल्यातील मोती उघडून पाहतो.आज ते शिंपले तुमच्यासाठी उघडून त्या अनुभवाची  अनुभूती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मला आठवतेय १९९४ सालची दिवाळी. त्यावर्षी माझे सासरे श्री. विनायक भा.देव यांचे नुकतेच निधन झाले होते. घरी दिवाळी करणार नव्हतोच. म्हणून दिवाळीचे पहिल्याच दिवशी पुण्यातून बाहेर पडलो. आणि वाई मार्गे पुढे धोम धरणाच्या बाजूस एक जोर नावाचे एक नितांत सुंदर खेडे आहे तिथे एक आश्रम होता तिथे गेलो. रस्त्या पासून थोडे आत एका छोट्या डोंगर उतारावर लहानसे पठार तेथे ते चौसोपी कौलारू घर पुढे स्वच्छ सोपा असा तो नेटका आश्रम होतो. कसलेही विशिष्ठ नियम कि उपासना असे न करता फक्त निसर्गात राहा, मनस्वास्थ जपा एवढेच सांगणे असणारा तो एक नैसर्गिक ठेवा होता. त्याठिकाणी दुपारी २.३० वाजता आम्ही पोहचलो. तिथल्या शेतातील ताजी भेंडीची भाजी आणि भाकरी असे जेवण घेतले. वातावरणामुळे म्हणा किंवा मनस्थितीमुळे म्हणा पण त्या चवीची भेंडी पुन्हा कधी खाल्ली नाही.जेवणानंतर समोरचा डोंगर चढून शब्दशः कडेकपारीतून फिरलो. सुमारे ३ तासाचे भटकंती नंतर परत आलो. पुन्हा एकदा सपाटून लागलेली भूक साध्याशा मेनुने शमवली. आणि आश्रमा समोरच्या स्वच्छ अंगणात सतरंज्या टाकून निवांत गप्पा हा एक कलमी कार्यक्रम सुरु केला. दोन तास मजेत गेले आणि त्यानंतर त्याच बैठकीवर आडवे झालो.त्यावेळी माझी नजर आकाशाकडे गेली आणि समोरच्या दृश्याने मी अक्षरशः रोमांचित झालो. मुळात तो आश्रम दोन उंच डोंगरांच्या मधल्या छोट्या डोंगरावर होता. संपूर्ण परिसरात कोणताही कृत्रिम उजेड नाही.
दिवाळीची पहिली रात्र म्हणजे आमवस्या. त्यामुळे ब्रह्मदेवाची संस्कार भारती- रांगोळी आसमंतात रेखाटली होती. निरव शांतता, टिपूर चांदण्याचा ओसंडून वाहणारा उजेड मंद अल्हाददायक अशी थंडी, खरेतर त्या क्षणाचे वर्णन करताना आज देखील रोमांच उभे राहतात.अवकाश, विश्व, आकाशगंगा टिपूर चांदणे यांची ओढ कोणास नसते. त्याची मोहक वर्णने मी त्या दिवसापर्यंत फक्त वाचली होती पण त्या दिवशी ती अनुभवली. मग त्या अनोख्या रांगोळीतील ठिपके व परिचित अकार शोधण्याची आमची धडपड सुरु झाली. आमचे ते सगळे अप्रूप बघून तेथील स्थानिक शेतकरी जवळ आला आणि म्हणाला, "पावण, अजून एक दोन तास थांबा, अन मग बघा तारे कसे तुटतात ते" प्रथम काही उलगडा होईना पण इतक्यात एक उल्का कोसळताना त्याच्या सह आम्ही सर्वांनी पहिली आणि तो म्हणाला,"ते बघा,आता तारे कसे तुटतात ते." आणि उत्तररात्री चांदणे, ताऱ्यांचा लुकलुकाट , नाही खरे तर लखलखाट आणि उल्कापात असा त्रिवेणी सोहळाच आम्ही अनुभवला.
घरी, कृत्रिम उजेड आणि गर्दी यातून बाहेर पडून त्या दिवाळीला आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि देवाने आम्हाला देव दिवाळीचाच अनुभव दिला. आज इतक्या वर्षांनतर देखील दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी मनात स्मरते ती निरव शांतातेतील निसर्ग दिवाळी. म्हणूनच आपणा सर्वांना एकच सांगणे आहे, जर कधी मनस्थिती बिघडली तर अशावेळी काय करावे तर उठून निसर्गाचे जवळ जावे तो तुम्हाला सगळ्या पलीकडे नेवून सोडतो.

Wednesday, December 8, 2010

खरच एखादा दिवस असा का सुरु होतो ?

काही प्रश्नचिन्हे ? .... काही अनुत्तरीत प्रश्न ???
खरच एखादा दिवस असा का सुरु होतो ?
त्या दिवशी असेच अचानक जे घडले ते जसेच्या तसे
कधी कधी दिवस सुरूच मुळी अस्वस्थतेत होतो. चहाची तल्लफ असते पण पहिल्या घोटानंतर तरतरी ऐवजी पुढच्या घोटला चहा नको वाटतो, तसेच झाले. दिनक्रम पुढे सरकू लागला घरून निघालो दार कुलुपबंद केले आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला घरातच राहिला म्हणून बंद दार पुन्हा उघडले. बस थांब्यावर आलो तर टोकन एकच शिल्लक , म्हणजे पुन्हा रात्री परतताना ५० सेंट जास्ती टाका किंवा ५/१० टोकन आजच विकत घ्या. तर एकूण काय तर दिवस वर येवू लागला तसे आडथळे वाढू लागले. शेवटी बस पकडून सर्वच अस्वस्थतेकडे कानाडोळा करीत पुस्तक उघडून वाचन सुरु केले श्री. रा. द. पेंडसे यांचे 'मी पाहिलेले जेआरडी ' वाचत होतो, पण त्यातही मन रमेना अखेर 'एअर इंडियातून निष्कांचन' हे प्रकरण सुरु केले. तेथेही जेआरडी सारख्या कर्मयोग्यास आलेले अस्वस्थतेचे कटू अनुभवच नमूद झालेले. बसवर प्रवाशांची येजा सुरूच होती शेवटी सरळ पुस्तक बाजूला ठेवले आणि डोळे चोळून स्वस्थ चित्ताने बसावे म्हटले, सहज आजूबाजूस नजर टाकली आणि डोळे मिटले तर डाव्या बाजूने नुकत्याच येवून बसलेल्या एका आडदांड बहुदा आफ्रिकन माणसाचे बडबडणे कानावर आले.तो प्रवासी उगाचच चेकाळला होता. शब्द कानार येत होते पण आर्थ लागत नव्हता पण पुन्हा एकदा तो माझ्यासाठीच बडबडतो आहे हे लक्षात आले. Do not observe , mind your……….. तत्सम काही म्हणत राहिला पुन्हा शांतता पुन्हा बडबड*******असंबद्ध शब्द I will punch your face xxxx I will call police. कानात शिरले ........ मग मात्र राग अनावर झाला. असेल सुदृढ,असेल आडदांड, असेल आफ्रिकन म्हणून मी गप्प का बसायचे? मन म्हणाले, आणि मी त्याच्या दुप्पट आवाजात सह प्रवाशांना देखील समजेल अश्या स्वच्छ शब्दात त्याला म्हणालो You try this and then see what happen, you …………..मग मात्र तो जागेवरून उठला I will call police असे बडबडत बस ड्रायव्हर पर्यंत गेला परत बडबडत आला. मी पुस्तक पुन्हा एकदा उघडून वाचन सुरु केले. पण ओळींवरून नुसतेच डोळे फिरत राहिले तो मध्येच कोठे तरी आला तसाच बडबडत उतरून देखील गेला, पण मनस्वास्थ्य बिघडवून.मी सरळ पुस्तक बाजूला ठेवले आणि विचार करीत राहिलो.

खरच एखादा दिवस असा का सुरु होतो ?

Tuesday, December 7, 2010

काहूर .

प्रथम तुझा हात घेतला हाती
थरारली दवात भिजलेली गवतांची पाती.
ओठांचा कोपरा दुमडून झालीस दूर
पण पाहून तुझी सलज्ज   हालचाल
दव बिंदुंच्या मनात उठले काहूर .

Sunday, December 5, 2010

उचलले पेन लावले कागदाला ....

पूर्वी म्हणजे अगदी पूर्वी नाही ……फार तर तीस चाळीस वर्षांपूर्वी,मी तेंव्हा आजोळी राहत होतो तेंव्हाची गोष्ट. घरी दारी , शेती वाडीवर बोलणाऱ्या लोकांच्यात म्हणींचा वापर आगदी सहजतेने होत असे.माझी आजी देखील त्याला अपवाद नव्हती. आणि फक्त आजीच नाही आसपास राहणारे, कष्टकरी शेतकरी संपर्कात येणारा प्रत्येक जण आपले मत आपला विचार मांडताना समृद्ध भाषेचा वापर करीत असे.

आमच्या लहानपणी आम्ही तालुक्याचे गावी राहून शिकलो गावाचे नाव उरूण-इस्लामपूर ह्या गावाचे आणखी एक विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणची सर्व कार्यालये, म्हणजे तहसीलदार कार्यालय, गट विकास कार्यालय,पोलीस स्टेशन,कोर्ट हे उरूण -इस्लामपूर येथे आहे पण तालुक्याचे नाव मात्र आहे वाळवा तालुका.आणि मला वाटते कि तालुक्याचे गाव एका ठिकाणी आणि नाव एका ठिकाणी असे असणारा हा एकमेव तालुका असावा. थोडे विषयांतर झाले पण सांगण्याचा मुद्दा काय तर शेती प्रगत परिसरात राहताना भाषा जपण्याचे बाबत मात्र जुनी पिढी जागरूक होती. घरात जेवणाची वेळ झाली आणि आम्ही मित्र परिवारात भटकत( खरे तर उंडारत) असलो तर आजी मामास सांगे , जारे! "त्याला बोलवून आण" मग मामाने विचारले कि पण तो गेलाय कुठे तर आजी कधीही मी कोणत्या मित्राचे घरी असेन हे न सांगता मामास म्हणे 'चुकला पीर मशिदीत. कि,त्यानंतर मामा मला बोलवण्यासाठी माझ्या मित्राचे घरी हजर.त्या काळी महिनाअखेरीस शेजारी पाजारी तात्पुरती मदत मागणे हा नित्याचा प्रकार असे. पण ते काम आम्हा मुलांना सागितले कि,त्याचे खूप दडपण येत असे. असेच एकदा मला आजीने समोरच्या घरातून साखर आणण्यास जा म्हणून सांगितले आणि हातात वाटी दिली.मला ती वाटी हातात घेवून जाण्याची खूप लाज वाटत होती. मग मी ती वाटी मी चड्डीच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो ते पाहून,आजी म्हणाली,"जारे हातात घेवून-' ताकाला जाताना भांडे काय लपवतोस'?" माझी मात्र विकेट उडालेली ??? ? आणायची आहे साखर आणि आजी म्हणते ताकाला जाताना भांडे काय लपवतोस?

अर्थात घरी आणि परिसरात तेंव्हा अशा खूप सुंदर म्हणी किंवा सुविचार कानी पडत, गल्लीतील काही घरे हि खणात मोजली जाणारी ,खणखणीत होती. त्याची सर्व साधारण रचना सारखीच म्हणजे प्रथम अंगण, मग ओसरी, त्यापुढे सोपा नंतर माजघर ..
अशा घरांच्या तुळईवर खडूनी सुविचार लिहिण्याची प्रथा असे त्यातील --' यत्न तो देव जाणावा ' प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे 'हे नेहमी दिसणारे सुविचार तर काही ठिकाणी संस्कृत सुभाषिते लिहिलेली असत. एका ठिकाणी - 'उगीचच मध्ये बोलून अपमान करून घेवू नका.'अशी पुणेरी वळणाची पाटी पाहिल्याचे आठवते तर हेच एका ठिकाणी ' जाणत्या समोर आपले गुण सांगू नयेत, कारण तो ते स्वतःच जाणतो. मुर्खासमोर आपले गुण सांगू नयेत कारण त्याचा उपयोग नसतो. असे भले मोठे वाक्य लिहून तुम्ही गप्प बसणे हिताचे हे सांगितले होते.

आता माझ्या शाळे विषयी म्हणाल तर, शाळा तिची परंपरा आमच्या गुरुजनानांनी आम्ही घडण्यासाठी घेतलेले कष्ट यांचे महत्व त्या काळी पुरेसे उमगलेच नाही असे आता म्हणावे वाटते. कारण १९६७/६८ साली इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला तेंव्हा आमच्या शाळेचे सुवर्ण मोह्त्सवी वर्ष होते.आणि आमच्या शाळेतील मुख्याद्यापक श्री. सांगलीकर सर आणि त्यांचे अनेक सहकारी अक्षरशः दारोदार फिरून शाळेच्या भविष्यातील विविध प्रकल्पांचे पूर्तीसाठी निधी संकलन करीत होते.

त्या काळी त्यात त्यांना किती यश आले किंवा कसे यांची आकडेवारी कधीच समजली नाही पण समृद्ध विचारधन विद्यार्थ्यांना दिले पाहिजे हे जाणून तसा प्रयत्न आमच्या त्या शाळेने नक्कीच केला असे मी आज मनपूर्वक आणि खात्रीने सांगेन. या वाक्याची प्रचीती आपणास यावी यासाठी मी शाळेत असताना वार्षिक स्नेह संमेलनासाठी शाळेने बोलावलेले प्रमुख पाहुणे कोण होते यांची माझ्या आठवणीतली नावे तुम्हास सांगतो, त्यात होते श्री. गं.बा. सरदार, अँडमिरल आवटी , श्रीमती शांता शेळके, श्रीमती इंदिरा संत. आणि तरीही आणखी तीन नावे आता विस्मृतीत गेली आहेत.पण एक खात्री आहे कि पाहुणे कोण होते हे आठवत नसले तरी त्यांनी स्नेह संमेलनाचे निमित्ताने दिलेले विचारधन कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात नक्कीच कोरलेले आहे. आजच्या संगणकीय जगताचे भाषेत सांगायचे झाले तर ते हार्ड डिस्कवर (नव्हे हार्ट डिस्कवर ) आहे.

त्या काळातील शिक्षक किंवा मास्तर यांना काय किंमत होती ते सांगायचे झाले तर माझे आजोबा श्री गणेश रघुनाथ कुलकर्णी हे बहे नावाच्या माझ्या आजोळचे गावी शाळेचे मुख्याद्यापक होते.त्यांना सर्वजण “बाबा मास्तर” म्हणत. त्यांचे निधन १९६४ साली झाले. आज पंचेचाळीस वर्षांनतर मी आजोळी गेलो तर,तेथील जुने जाणते लोक मला ओळखतात ते बाबा मास्तरांचा नातू म्हणून. त्यांची हि ओळख टिकली ती त्यांनी ज्ञान दानासाठी जे कष्ट त्याकाळी घेतले त्यामुळे.

आमच्या हि शाळेबाबत मला नेहमी असेच वाटत आले आहे कि, कदाचित आमच्या आधीच पन्नास वर्षे शाळेने त्या परिसरात असे अनेक विद्यार्थी घडवल्या मुळेच आमच्या कानावर समृद्ध भाषा पडत राहिली असेल का ? माहित नाही पण वयाचे भान न ठेवता जर आजी समोर कधी फुशारकी मारली तर मात्र आजी पटकन म्हणत असे तुझे हे नेहमीचेच आहे " उचलली जीभ लावली टाळूला "
पुढे जेंव्हा त्या म्हणीचा उलगडा झाला तेंव्हा पासून आपोआपच नको तेंव्हा नको ते इतरांना ऐकवण्याची सवय आपोआप मोडली. पण हि आठवण सांगण्यासाठी मात्र आज मी काय केले माहित आहे का ? नाही ना , काही नाही जेंव्हा हे सर्व आठवले तेंव्हा उचलले पेन आणि लावले कागदाला.

Friday, December 3, 2010

मागणे सरणावरील.

आजच का तुझे असणे उसने वाटे,
गुलाब कोमेजतोय, पण फुललेत काटे

आजच का तुझा गंध भासे उपरा,
पारिजातकाच्या आसवांनी भिजातोय डोळ्याचा कोपरा

तुझे रुसणे आणि हसणे तेंव्हा होते सोनसळी
मग आजच का चंद्र किरणात भाजून निघतेय मासोळी

नको होवूस आरक्त , सांज अवतरेल आभाळी
सलज्ज मोहक हसू तुझे , गालावरती  थरथरेल खळी

मागणे आता एकच या कलत्या सांजवेळी
नकोत शपथा, नकोत आठवणी, या बकुल तरुतळी ....

नको मांडूस नवा खेळ,असता मी या सरणावरी
चिमुटभर राख भांगात भर, माझी चिता विझल्यावरी

Thursday, December 2, 2010

शिल्प.

हृदयाच्या गर्भातून उठली एक कळ
चमकली मूर्त तिची जणू पाषाणातील काळा कातळ

गळून पडले छिन्नी हातोडे थरारले मन वेडे
मूर्च्छित कलाकाराभोवती नुसतेच गर्दीचे कडे....

कोण म्हणे उन्हाचा झटका, कोण म्हणे भुकेचा फटका
खरच कुणा उमगेल कलाकाराच्या मनीचा खटका.

घडत असता मूर्त जडले नाते अमूर्त
पाषाणातून प्रकटता शिल्प,झडले मनीचे विकल्प

तो नव्हता मंदिराचा जिर्णोधार किंवा परिसराचा कायाकल्प
जणू साकारला होता त्याच्या अंतरीचा संकल्प

ते नव्हते छिन्नी हातोड्याचे घाव
फिरले होते पाषाणावरून जणू त्याच्या मनीचे भाव

हे तरी खरे कसे मानावे? .......बोलले अंतर्मन

घाव पहिला बसता कडाडली होती वीज
निमिषार्धात प्रकाशले भरदुपारी आकाशदीप
तरीही मनाने अंतरी आठविला नंदादीप

स्मरून तिला लावली होती मी शुभ्र सांजवात
तरीही आकारले होते वावटळातून झंजावात

शिंपडून पाणी केले बसते गर्दीतून कोणीतरी
भाकर तुकडा समोर धरीत

कोणी बोलले थांब जरा
कमी होवू दे उन्हाची तिरीप.

डोळ्यातून सांडत आपलेपणा त्याने गर्दीचे मानले आभार
लोटी आणि भाकर तुकडा घेतला त्याने साभार

न मोडला भाकर तुकडा, न जाणवली उन्हाची झळ
घडलेल्या मूर्तीने नजरेतूनच दिले घाव सोसण्याचे बळ

'मैफिल एका रात्रीची'

तिची माझी पहिली भेट माझ्या मित्राच्या घरी झाली. मी नुकतेच कॉलेज सुरु केले होते. ती तिच्या बहिणी बरोबर आलेली. गोरी गोरी गोबरे गाल छानसा ड्रेस अंगावर .डोळे इतके बोलके कि, जणू सतत हसून काहीतरी सांगत आहेत. तेंव्हा वाटले हीच ती सोनपरी ! जिचा आपण शोध घेत आहोत. पण सगळे मनातल्या मनात, कोणास सांगणार कि हि आवडली आहे. आणि जिथे घर न दार, शिक्षण नातेवाईकांचे मेहरबानीने चाललेले. आई पुण्यात कष्ट काढती आहे, म्हणजे जबाबदारी हि की शिकून घराला हातभार लावण्याची गरज प्रथम पूर्ण करणे जरुरीचे.

दोन दिवस आठवणीत गेले.मन उदास झाले. आणि आपोआप दिनचक्र सुरु झाले.सोनेरी दिवस उडून गेले. पुण्यात येवून पुढील जीवनक्रम सुरु झाला. वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाई बागडताना दिसली कि मन उडत उडत मित्राचे घरी पोहचत असे, सोनपरीला आठवून परत येत असे. पण एक दिवस अघटीत घडले. माझ्या मित्राने काही कारणाने तिच्या बहिणीचा पुण्यातील पत्ता दिला.आणि तिला काही निरोप देण्यास सांगितले.मध्ये काळ गेला होता दीड तपाचा. मी मित्राचा निरोप घेवून तिच्या बहिणीचे घरी गेलो. भेटीने ती ही आनंदली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निघता निघता सहजच तिला “तुझी घाकटी बहिण काय करतेय ? “ म्हणून विचारले आणि तिने सांगितले कि, “अरे आता ती खूप काही करते आम्हा बहिणीतील ती एकमेव आहे जी जणू मुलगा होवून बाबा गेल्यावर आईला सांभाळते आहे”. गाणे शिकून सूर पकडला आहे. उच्च पदवी तीही अर्थशास्त्रातील घेवून बँकेत नोकरी करते आहे. सर्व ऐकून मी सर्दच झालो. अरे गोबऱ्या गालाची सोनपरी सोनसळी कधी झाली. खरच एकदा भेटलेच पाहिजे असे मानस बजावत निघणार इतक्यात थोरली सहज म्हणून गेली आज ती पुण्यास येणार आहे. तिची गाडी स्वारगेटला सहा वाजता येईल. मी ऐकून न ऐकल्यासारखे केले. आणि निघतो म्हणून बाहेर पडलो. घड्याळात बघितले ५.१५ वाजत आले होते. मोटारसायकलला किक मारली आणि थेट स्वारगेट गाठले. मन म्हणाले काय वेडेपणा करतोयस? पंधरा वर्षांपूर्वीची भेट. आता ती एक सुरेख गायिका, नोकरीत स्थिरावलेली. काय म्हणून तुला ओळख देईल. पण अंतर्मन म्हणत होते अरे तू तिला ओळखतोस ते सोनपरी म्हणून भेटून तर बघ.

गाडीने प्रवेश केला. गर्दी ओसरू लागली आणि तिला ओळखण्याचा प्रश्नच उरला नाही. तेच बोलके डोळे तेच गोबरे गाल, छे छे ते गोबरे गाल आता आरक्त झाले होते. तिला पाहताच अंगावरून एक लाट गेली. मी पुढे झालो. आणि आणि काय आश्चर्य तिने पहिले आणि तिने जिंकले. इतकी गोड हसली म्हणून सांगू , जणू पंधरा वर्षे नाही तर पंधरा दिवसानीच भेटतो आहोत. मला विचारले “अरे! तू इथे कसा काय? “ मी खरे तर तिच्या बहिणीकडे ती येणार हे कळले म्हणून आलो होतो पण मी तिच्याशी चक्क खोटे बोललो. म्हटले,”अग घरी पाहुणे आले होते त्यांना निरोप देवून परत चाललो होतो आणि तू अचानक दिसलीस.” माझ्या बोलण्यातील खोटेपणाचा जरासुद्धा वास तिला आला नाही. उलट ती तर इतकी खुश दिसली कि जणू मी तिलाच उतरवून घ्यायला आलो आहे. मी विचारले मी सोडू का तुला बहिणी कडे तर ती सहजच हो म्हणाली. मग काय मला तर स्वर्ग दोन बोटे उरला. तिची बँग गाडीवर मागे बांधली. आणि मोटारसायकलला किक मारली. माझी सोनपरी माझ्या मागे मला खेटून ( जागाच कमी असल्याने) बसली होती. मी तिला प्रवास कसा झाला ? विचारले ती “ छान ” म्हणाली. मन म्हणाले कोणता प्रवास विचारतोयस पंधरा मिनिटांपूर्वी संपलेला कि पंधरा वर्षांपूर्वी सुरु झालेला. तिच्या बहिणीचे घर आले पटकन उतरून ती घरात गेली आणि बहिणीला म्हणाली, “ अग ताई ! कोणी सोडले मला बघ. मला पाहून बहिण म्हणाली, “तुझी कोठे भेट झाली?”मी म्हणालो, “ अग!स्वारगेटला हि अचानक भेटली.” त्यावर ती म्हणाली, “ बरे झाले “ आणि माझी खूप काही गणिते मांडून तिला गाडीवरून आणण्याची धावपळ इतरांना 'अचानक' वाटली. पण मला माझी सोनपरी पुन्हा भेटली, तो योग मात्र असा अचानक आला होतो. तिला अच्छा ! म्हणून बाहेर पडलो.पण मानस वाटले कि, माझ्या मित्राने तिच्या बहिणीचा पत्ता देवून जणू माझ्या हाती जादूच्या पेटीची चावीच दिली आहे.

असेच दिवस चालले होते. नियतीच्या मनात काय होते कोणास ठाऊक? पण त्या बहिणीकडे जाणे येणे कमी होत गेले. संपर्कच राहिला नाही. बघता बघता चार/पाच वर्षे गेली. घरून असणारा सततचा तगादा,आईचे कष्ट पाहता लग्नास उभे राहणे हि कर्तव्याची बाब झाली आणि त्यातून माझे लग्न झाले सोनपरीला भेटण्याचे स्वप्न तसेच राहिले. जणू सागर किनाऱ्यावर शोधून शोधून हाती आलेला परीस कधी निसटून गेला तेच समजले नाही.

माझ्या लग्न नंतरची गोष्ट. एक दिवस ध्यानी मनी नसताना,पुन्हा तिच्या बहिणीची भेट घडून आली. जुने दिवस, जुन्या आठवणींचे मोहळच उठले. मला आठवतेय जवळ जवळ सहा तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आठवणीचा वारू चौखूर उधळला होता.त्याने तिचे माहेर, माझ्या मित्राचे गाव,माझे आजोळ असा खूप खूप प्रवास आम्हाला सहा तासात घडवून आणला होता. गप्पा निघता निघता माझ्या सोनपरीपाशी आल्या . एक मन म्हणत होते कशाला पुन्हा पुन्हा खपली काढून रक्त बंबाळ होतोस तर एक मन म्हणत होते अरे निदान डोकावून तरी येना सोनपरीच्या राज्यातून. “कशी आहे ग ती?”मी अगदी सहजतेने विचारले. “अरे!ती न” असे म्हणून बहिण गप्प झाली. जणू तिचे शब्द नव्हे, श्वासच थांबले होते. मी हि भांबावलो. आपले काही चुकले का? असे वाटले. मग मी सावरत म्हटले,”अग बरेच दिवस काहीच कळले नाही म्हणून विचारले. ”आता कोठे असते. आनंदात आहे ना तिचा संसार? मग मात्र डोळ्यात पाणी आणून बहिण बोलती झाली म्हणाली,”अरे ! फार मनस्वी आहे ती. कोणाशी म्हणून बोलत नाही.लग्नच करणार नाही म्हणते.”

काय करू ? तू तरी सांगशील का तिला काही समजावून ! २७/२८ म्हणजे अजूनही फार उशीर नाही झालेला पण दिवस काय थांबतात का रे कोणासाठी? बोलशील ना एकदा तिच्याशी.” “माझ्यासाठी एवढे करच”. जणू तिने हुकुमच सोडला. जणू काही मी तिला नाही म्हणूच नये. माझ्या मनात चर्र झाले. जिची इच्छा मनात धरली, पण भावना कोठेच उलगडली नाही, त्या माझ्या सोनपरीचे इतके नाजूक मर्मबंध पुन्हा एकदा उसळून आले.मी गुंतून तर जाणार नाही ना ? पण दुसरे मन म्हणाले अरे खरेच आवडली होती ना मनापासून. केले होतेस न अबोल प्रेम तिजवर. मग आता निदान तिचे सुख शोधण्याची तिच्या बहिणीची इच्छा तरी पुरी कर.

माझी संभ्रमित अवस्था पाहून तिची बहिण म्हणाली, “ तुला अवघड वाटणार असेल तर राहू दे. उगाच मी बोलले. “ त्यावर मी पटकन म्हणालो,” अस काय म्हणतेस मी नक्कीच बोलेन तिच्याशी.” आणि माझ्या त्या होकाराने बहिणीच्या डोळ्यात समाधानाचे आनंदाश्रू आले. मग सोनपरीला पुण्यातच बहिणीने बोलवायचे आणि मग तिला घेवून मी बाहेर जायचे आणि आम्ही बोलून यायचे, असे ठरवून आम्ही परस्परांचा निरोप घेतला. बहिणीच्या दृष्टीने तिने अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माझा आधार घेतला होता तर मी मात्र आठवणीच्या गर्तेत गटांगळ्या खात होतो.

त्या काळात माझ्या मनाची अवस्था अशी काही होती कि, घरात सुद्धा दोन तीन वेळा “हल्ली काय तुझे मन थाऱ्यावर नसते का? काही विचारले कि लक्ष नसते. जेवताना काही पाहिजे का म्हटले कि हो नाही, नको नाही. काय झालेय तुला ?”असे प्रश्न येवू लागले.मग मात्र ठरवले जावू दे, आपण तटस्थ राहून, मगच खरी मदत सोनपरीला करू शकतो. आणि निग्रहाने शांत होण्याचे ठरवले. अवघड गेले ते अमलात आणताना. पण अखेर यश आले चित्त स्थिरावले. दैनंदिनी पुढे सरकू लागली. आणि एक दिवस तो दिवस उजाडला तिच्या बहिणीचा फोन आला कि, ती आली आहे एकदा येवून जा.त्याच दिवशी संध्याकाळी मोटारसायकल काढली तिच्या बहिणीचे घरी गेलो. तर सोनपरी गावाहून आलेली. तेच हसरे आणि बोलके डोळे.पण यावेळी थोडी अंतर्मुख वाटली. तिला म्हटले,”चल!इतके वेळा पुण्यात ताईकडे येतेस पण घरी कधीच आलेली नाहीस आज जावून येवू” ती सहजतेने हो!म्हणाली. बहिणीचा तर काही प्रश्नच नव्हता. तिला मोटारसायकल वर घेतले. पण आज तो शहारा नव्हता. तिला म्हटले घरी कोणीच नाही तेंव्हा आपण बाहेरच काहीतरी खावून मग घरी जावून येवू. चालेल का ? ती लगेचच तयार झाली. मला आठवतेय पुण्याबाहेर कोथरूड/ कर्वेनगर उपनगरात कोठेतरी 'योगी' नावाचे हॉटेलात आम्ही आलो. जणू काही माझ्या अंगी पण तीच स्थितप्रज्ञता हवी होती जी योगी टिकवून ठेवतो.काय खाणार विचारले तर खास काहीच उत्तर नाही. शेवटी मीच प्रथम सूप घेवू म्हणत,हॉट अॅन्ड सोअर सूपची ऑर्डर दिली.तिचे लक्ष न खाण्यात न बोलण्यात भिर भिर अवस्थाच झालेली.

शेवटी मनाचा हिय्या करून विषयाला हात घातला आणि सरळ सरळ विचारले,” तू लग्न का करत नाहीस?”.तिने खाणे थांबवले आणि म्हणाली, “जेंव्हा तुझी वाट पहिली तेंव्हा कुठे होतास? “आणि आता स्वतःचे घर संसार झाल्यावर मला विचारतोस कि, लग्न का करत नाहीस? तुला माहित आहे ,मी गाणे शिकले ते गाण्यासाठी नाही रे ते शिकले जीवनाचे सूर समजावेत म्हणून, पण ज्याच्या साठी मैफिल रंगवावी वाटले, त्याने कधी ताल मागितलाच नाही. मग आता काय करू? “कोणासाठी गावू? “आज ताई म्हणाली, “तू येणार आहेस,त्याच्या बरोबर जा. काय सांगतो ते ऐक. थोडे फार जग पाहिलेय त्याने,म्हणून तुला त्याच्या बरोबर पाठवीत आहे.जरा समजुतीने घे उगीच काहीबाही बोलून त्याला दुखवू नकोस” तेंव्हा वाटले कि तिला सांगावे अग त्याचीच तर वाट पाहत राहिले.पण तो कधी निघून गेला ते कळलेच नाही ग म्हटले आता काय सांगणार आहे हा. “ तूच सांग कुठे होतास इतके दिवस? “

आणि आणि आता मला प्रश्न पडला कि, जर हिचे प्रश्नचिन्हच मी आहे तर आता मी काय गणित सोडवणार.शेवटी तिला म्हटले, ऐकायला आणि कृतीत आणायला थोडे अवघड आहे पण झाले गेले विसरून जा आणि आईसाठीतरी लग्न कर” तर मला म्हणाली, “अरे! खर सांगू तू आला नाहीस तेव्हांच ठरवले होते कि, आता आई साठीच लग्न करायचे नाही म्हणजे तिच्या सोबत राहून निदान बिनलग्नाचे तरी राहता येईल. आणि जगाला सांगू कि आईसह मला सांभाळणारा कोणी मिळत नाही म्हणून मी लग्न करीत नाही. काय बोलणार मी त्यावर, पण शेवटी तिला म्हणालो ,”हे बघ.! होते न तुझे माझ्यावर प्रेम, मग त्या प्रेमाची शप्पथ घालून तुला सांगतो कि, आज तू इतकी सुंदर गातेस, त्यातून मिळवती उच्च शिक्षित, तू घालशील त्या अटीवर कोणीही माळ घालेल तुझ्या गळ्यात. तेंव्हा तू माझ्या प्रेम खातर लग्नाला हो! म्हण,”मला वाटले असतात प्रेमाच्या आठवणी काढत झुरण्याचे थोडे दिवस.काही काळ गेला कि,गाडी येते रुळावर त्यानुसार ती हो म्हणेल. आणि आपले प्रेम खरे सुखी झालेले मला पाहायला मिळेल. त्यावर ती म्हणाली “जर तू प्रेमाची शप्पथ घालून म्हणत असशील तर मी आहे लग्नाला तयार ,पण मग ऐक!हि तडजोड अशी राहील,जे गाणे मी फक्त तुझ्याच साठी शिकले, ते माझ्या गळ्यातून कधीही येणार नाही. आणि जर मी पुन्हा मैफिलीत गावे, अशी तुझी इच्छा असेल, तर एक रात्र जेंव्हा तुझी नि माझी मैफिल रंगेल तेंव्हाच मी पुन्हा सतार हातात घेईन.आता तू ठरव मी कोणती मैफिल आधी रंगवू ते”.मी सुन्न होवून बसलो .गेली वीस वर्षे रियाज करून जपलेला सूर ,हि फक्त माझ्यासाठी कायमचा सोडणार ?काय उत्तर देवू तेच कळत नव्हते. शेवटी मी विचार केला आजन्म कुमारिका राहून संसाराची मैफिल उधळून सूर जपण्यापेक्षा संसार सुखात रंगून हिला प्रथम जीवनाची मैफिल सजवू दे. आणि तिला शेवटी मी एक खोटे वचन दिले तू लग्न कर, आणि रियाज चालू ठेव तुझी गाण्याची मैफिल यशस्वी होण्यासाठी आपली एका रात्रीची मैफिल नक्की रंगेल ! तु वाट पाहत रहा ! मी नक्की येईन. ती आनंदली तिने उठून मला चक्क मिठीच मारली आणि तिच्या तोंडी शब्द आले,” तू येई पर्यंत माझा रियाज सुरु राहील,आणि ताईला सांग मी लग्नास तयार आहे.”

घड्याळात पाहिले रात्रीचे नऊ वाजत आले होते. दोन तास संपले होते पण तिच्या बहिणीचा प्रश्न मी सोडवला होता स्वतःच प्रश्न बनून.

पुढे तिचे लग्न झाले. तिने हवा तसा नवरा मिळवला कि नाही हे आजही सांगता येणार नाही पण स्वतःच्या जिद्दीने तिने एक वचन मात्र पदरात पाडून घेतले ते म्हणजे 'मैफिल एका रात्रीची'. आणि मी मात्र एक केले गाणे ऐकणेच सोडून दिले. मैफिलीच्या सुरांची ओढ नको म्हणून मैफिलीची रात्र सुरूच होवू द्यायची नाही असे ठरवून टाकले. आणि म्हणूनच सरळ पुणे, पुण्यातील स्थिर नोकरी, घरदार सर्व सोडून एकटाच, सातासमुद्रापार अमेरिकेस येवून राहिलो. अजूनही वाटते आहे कि, सोनपारीने तिचा रियाज आणि गळा दोन्ही जपावे. आणि वचनभंग करीत तिने पुन्हा गावे. एक दिवस नक्कीच ते सूर सातासमुद्रापार येवून माझ्या कानावर पडतील आणि मैफिलीची खरीखुरी सांगता होईल.

Saturday, November 20, 2010

आठवणी आत्याच्या …..

आठवणी आत्याच्या …..


बहिणाबाई हे नाव आठवले कि अरे संसार संसार ... ह्या गाण्याचे सूर आपोआप मनात फेर धरतात. पण या जेष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्रीच्या गाण्यांबाबत माझ्या आठवणी खूपच वेगळ्या आहेत अनन्वय फाउंडेशन पुणे यांनी एक अतीशय सुंदर कॅसेट सन २००० मध्ये काढली होती.त्यातील या कावियत्रीची जगण्याकडे बघण्याची डोळस वृत्ती दर्शवणारी कविता

आला सास गेला सास

जीवा तुझे रे तंतर

जगन मरन एका सासाचे अंतर ………

हि मनात घर करून राहिली. माणूस आहे आणि माणूस नाही यात फक्त एका श्वासाचे अंतर असते, हे प्रखर सत्य किती अचूकतेने शब्दबद्ध केले आहे ते वाचून मन अंतर्मुख झाले. पुढे एका आत्म चरित्राला " एका श्वासाचे अंतर " हे नाव देखील पाहण्यात आले. त्यानंतर या कवियत्रीच्या कविता सूर ताल या करीतच फक्त न ऐकता त्या पलीकडे जावून जीवनाचा संदेश देणारे काव्य म्हणून त्याचा पुनःप्रत्यय घेण्याची सवयच लागली. असेच एकदा शब्द्दोचार आणि नात्याचे पदर उलगडवून दाखवणारी हि कविता ऐकली…..

माय म्हनता म्हनता ओट ओटालागी भिडे

आत्या म्हनता म्हनता केवडे अंतर पडे

माय म्हटली जशी तोंडातली साय

बाय म्हटली बिरानी जसी भरडली दाय

तात म्हनता म्हनता दातंमदी जिब अडे

काका म्हनता म्हनता कसी मांगे मांगे दडे

जीजी म्हनता म्हनता झाले जीभेले निवारा

सासू म्हनता म्हनता गेला तोंडातुनी वारा …..

आणि या कवितेने मला वेगळाच छंद लावला तो म्हणजे या थोर कावियत्रीस प्रत्ययास आलेली नाती आणि आपण अनुभवलेली नाती यातील सत्य याचा ताळेबंद मांडणे किंवा त्याचा लेखाजोखा घेणे शक्य होईल का ? या विचारांनी मनात थैमान घातले. मन स्वसंवाद करू लागले आणि शेवटी निर्धार केला कि ठीक आहे कदाचित आपल्या शब्दात तेवढे सामर्थ्य नसेल पण अनुभव सूत्रबद्ध होतात का, याचा तरी प्रयत्न करू आणि वरील कवितेतील शब्दांभोवती रुंजी घालता घालता मन ३५/४० वर्षे मागे गेले

वार होता सोमवार आणि तारीख होती ३० जुन १९७५ . पुण्यातील सिमला ऑफिसच्या चौकात सकाळी आठ साडेआठ वाजताच नवी स्वप्ने बघणारी पंधरा सोळा वयोगटातील मुले मुली आणि त्यांचे पालक यांच्या गर्दीचा पूर उसळला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे कार्यालय तिथे होते आणि त्यावेळी सर्व महाराष्ट्रातील शाळांकरिता ते मंडळ प्रमुख म्हणून कार्यरत होते.त्यांनी त्यादिवशी "एस.एस.सी." (त्यावेळची अकरावी) परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.आजच्या सारखे इंटर नेट,किंवा मोबाईल या सुविधा सहज साध्य नसल्याने परीक्षेचा निकाल पोस्टाने शाळांकडे जात असे किंवा संपूर्ण राज्यभरचा निकाल मंडळाच्या कार्यालयात, नव्हे कार्यालया बाहेर पाहण्यास उपलब्ध असे. कारण प्रत्येक परीक्षा केंद्रानुसार निकालाची यादी बोर्डावर चिकटवून असे बोर्ड पदपथावर ठेवले जात. याठिकाणी निकाल पाहण्यास जमलेल्या मुलांची भीतीयुक्त उत्सुकता व पालकांची "यंदा अकरावी" यातून झालेली सुटका कश्या प्रकारची आहे याची ओढ याची छाप गर्दीवर स्पष्ट दिसत होती. त्या गर्दीत मी हि होता पण बरोबर कोणीच नव्हते वडिलांचे नुकतेच निधन झालेले. आई तिच्या नोकरीच्या ठिकाणी तशी नवीन असल्याने रजा घेवू शकत नव्हती. माझ्या पुढे एक वर्ष शिकणारा मोठा भाऊ असे निकाल नेहमीच धक्कादायक असतात हे गृहीत धरून तिकडे न फिरकणारा. बर एखाद्या वर्ग मित्रास म्हणावे, चल, तुझा माझा काय " निकाल लागलाय " ते पाहू तर मी माझ्या मामाकडे सांगली जवळच्या इस्लामपुरात राहून शिकल्याने पुण्यात बरोबर कोणीच नाही. नेमके वातावरण कुंद ,पावसाळी हवा एखादी दुसरी सर येवून जात होती. हवेत थंडीची व मनात भीतीची झोंबरी लाट उठली होती. अखेर माझ्या परीक्षा केंद्राचा बोर्ड सापडला. केंद्र ग्रामीण भागातील असल्याने 'दामले,जोशी कुलकर्णी अश्या गर्दीत नाव शोधण्याची गरज नव्हती व श्री. चिंतामणराव देशमुखांची मित्र धावत येवून आरे आज आपला फायनलचा निकाल आणि तू खेळत काय बसलास तुला निकाल बघायचा नाही का? या प्रश्नास त्यांनी स्थितप्रज्ञासारखे दिलेले उत्तर "दुसरा कोण आला ते बघून ये " अशी हि परिस्थिती नक्कीच नव्हती. पण थोडे हटके आडनाव ' किंकर ' असल्याचा फायदा म्हणजे शोध शोध थोडी सोपी होती . धडधड्त्या अंतकरणाने बोट आणि नजर "क" च्या बाराखाडीवर फिरवली आणि काय? कुंद पावसाळी वातावरण झपाट्याने बदलले मळभ दूर झाले सोनेरी किरणांची एक लकेर त्या बोर्डावर आणि मनावर एकाच वेळी उमटली कारण चक्क निकालाच्या यादीत नाव सापडले. वरती नाव होते कुलकर्णी सीमा गजानन आणि पाठोपाठ माझे नाव. वर्गातील त्या सीमाने इंग्रजीतील व्याकरणाचा प्रश्न सोडवण्यास मदत केल्यानेच त्या पेपरात पास नापासच्या सीमेवर येवून पोहचण्यास मदत झाली होती. अर्थात इंग्रजी बरोबर अकरावी पास हि बिरुदावली कायमची माझी झाली पण पुन्हा त्यासाठी - "THANKS! " म्हणण्यापुरते हि बोलण्याचा योग काही आला नाही. आणि शोधून काढून बोलण्याची सीमा रेषा कधीच ओलांडली गेली नाही.

मनाने परीक्षा केंद्रावरती नेवून पोचविले. किती भारलेले वातावरण असे. आम्हा मुलांचे पालक दोन पेपरच्या मध्ये येवून थंड ताक किंवा दही भात घेऊन भर उन्हात पेपर संपण्याची वाट पाहत थांबल्याचे आज सुद्धा स्पष्ट आठवते. माझी मामी देखील माझ्यासाठी अशीच डबा घेवून येत असे दोन पेपरच्या मधल्या वेळेत आमच्यासाठी त्यांनी केलेली धावपळ आजही मनाची थरथर करते आणि पापणीच्या कडा ओलावतात. त्या मामा मामींकडे धावत जावून पास झाल्याचे सांगावे तर ते दोघेही १२५ मैलावर. आणि अचानक आठवण झाली माझ्या "डेक्कनच्या" आत्याची. होय डेक्कनची एक आणि सातारची एक अश्या दोन आत्या.आणि आमच्याकडे आई आणि बाबा दोन्हीकडे नातेवाईक, नाती गोती थोरला, मधला, धाकटा अश्या वर्गवारीत न मोडता किंवा तात्याकाका , माईआत्या , नानीमावशी अश्या दोन दोन उपाध्यांनी न ओळखता ती गाव,ठिकाण या वरूनच ओळखली जात त्यामुळे मुंबईचा मामा, पुण्याचे दादा,अष्ट्याची आत्या नाशिकचे काका हीच वर्ग वारी आम्हास तोंडपाठ. मग ठरवले धावत जावून पहिली आनंदाची हि बातमी सांगायची माझ्या डेक्कनच्या आत्याला.

आणि खरोखरच शब्दशः धावत निघालो कारण रिक्षा हे त्यावेळी उच्च मध्यम वर्गीयांचे वाहन आणि जवळ बसला देखील पुरेसे पैसे नाहीत. मग काय करणार? पण त्यावेळचे वय आणि त्यादिवशीचे कारण यामुळे विद्यापीठ मार्गे फर्ग्युसन रोड वरून वैशाली समोरची गणेशवाडी कधी आली तेही समजले नाही. सकाळचे अकरा वाजत आले होते पहाटे चार ते दहा या सहा तासांचे दगदगीतून मोकळी होवून आत्या नुकतीच कोठे हुशः करून बसणार तोपर्यंत मी समोर हजर. नक्की कसे सांगावे तोंडातून शब्द फुटत नव्हते. मी सरळ पायावर डोके ठेवले आणि म्हणालो मी पास झालो.त्यावेळी आत्याने उठवून मला जवळ घेतले मायेने पाठीवरून हात फिरवला आणि

" बापाविना पोर " एक दिवस मनुचे नाव काढील. (माझ्या बाबांना आम्ही अण्णा म्हणत असू तर बाकीचे त्यांना मनु म्हणत) असा तोंड भर आशीर्वाद देत ती माझ्या बाबांच्या आठवणींनी धाय मोकलून रडली. मलाच कळेना कि मी तिला पास झाल्याचे सांगून समाधान दिले कि त्रास दिला. पण नंतर फडताळातल्या तिच्या आपत्कालीन राखीव निधीतून रु. १०१ काढून देताना जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता तो पाहता माझी शंका आपोआप दूर झाली. आणि आज पस्तीस वर्षांनतर मागे वळून पाहताना जाणवते ती तिच्या कृतीतील माया आणि आशिर्वादातील ताकद.माझ्या ह्या आत्याचे माहेरचे नाव कुसुम शंकर किंकर. अगदी चार चौघांसारखे साधे नाव, कराड, जि. सातारा या तालुक्याचे गावी बालपण. तो काळ अगदी 'सोन्याचे दिवस ' म्हणावा असा ऐष अरामातील नसला तरी वडिलांचा भागीदारीतील असणारा सराफीचा व्यवसाय हा भरले घरदार म्हणवणारा नक्कीच होता. तिचे वडील माझे आजोबा हे भविष्यातील जाणकार व रत्नपारखी म्हणून परिसरात नावाजलेले पण व्यवसायातील हे यश दृष्ट लागावी तसे बघता बघता दूर गेले,भागीदारीचा शाप खरा ठरला. रोलर कोस्टर प्रमाणे यशाचे शिखर ते रसातळाला हा हि प्रवास काही समजावयाचे आत पूर्ण झाला. घरातील लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी दोघींनी एकाच वेळी पाठ फिरविली माझ्या आजीने हाय खावून मृत्यूस जवळ केले.आत्याचे वय तेरा असताना तीन लहान भावंडे व देशोधडीला लागलेला वडिलांचा संसार तिच्या पदरी टाकून तिने अज्ञाताचा मार्ग धरला. या परिस्थितीत एखादीने लग्नानंतर माहेर नशिबात नव्हतेच असे म्हणत जबाबदारीतून सुटका करून घेतली असती, पण माझ्या आत्याने किंकारांची चंद्रमोळी झोपडी सोडताना तेथली कष्टाची सवय आणि परिस्थितीवर मत करण्याची जिद्द बरोबर घेताना, नवऱ्याचे सुख व भावंडांची जबाबदारी हेच पुढील जीवनाचे ध्येय मानले.

किंकारांची कुसुम इनामदार झाली कलेढोण येथे गाईगुरे, शेतीवाडी अश्या राबत्या घराची लक्ष्मी झाली. अर्थात माहेरी वडील भावंडांसाठी राबणारे हात आता इनामदारी थाटासाठी राबू लागले.आत्याचे यजमान राजारामपंत हे नेहमीच नाकासमोर सरळ चालणारे व शिस्तप्रिय. मामांच्या ओळखीने मिळालेली लष्करातील नोकरी त्यांनी लष्करी शिस्तीने टिकवली. आत्यास स्त्री स्वात्यंत्र दिले आणि सर्व जबाबदारीपण दिली. त्यामुळे आत्या नवरा म्हणजे जणू चौथा मुलगाच सांभाळत होती. काटकसरीने संसार हा शब्द प्रयोग आपण नेहमी वापरतो. पण दर महाचे धान्य भरल्यावर पुड्यांचे कागद साठवून रद्दी घालणे, आणि पुडीचा दोरा जपून ठेवून त्याचा पडदा करणे, हे काटकसरी चे मार्ग म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्याचा खराखुरा प्रयास होता. पुढे मुले वयाने मोठी झाली, दिवस पालटले तसे तिने सुना ,नातवंडे या पुढच्या पिढ्यांना आपलेसे करताना न आपण भोगलेली दुखेः उगाळली,ना कोणास अडचण होईल असे वागली.

हि माझी आत्या वयाचे पंधराव्या वर्षी कुसुम राजाराम इनामदार झाली. माहेरी ती चार भावंडातील सर्वात थोरली. तिच्या खेरीज माझे बाबा म्हणजे यशवंत,काका व्यंकटेश, व आणखी एक आत्या म्हणजे निर्मला. यशवंत माझे बाबा हे कमलाकर उर्फ मनु, व्यंकटेश माझे काका हे पंडित, तर धाकटी आत्या निर्मला हि नमू व आज जिच्या आठवणी आपणास सांगत आहे ती थोरली आत्या हि अक्का या नावाने ओळखली जात असे. बाबांकडे आत्या थोरली म्हणून ती 'अक्का' तर माझ्या आजोळी आई भावंडात थोरली म्हणून तीही 'अक्काच' आणि हे केवळ नाम साधर्म्यापुरते मर्यादित नव्हते. आम्हा सर्व भावंडांसाठी ती दुसरी आईच होती.

माझे बाबा ज्यांना आम्ही अण्णा म्हणत असू, त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात नोकरी केली. जर त्यांनी सहकाराचा 'खा आणि खाऊ द्या!' हा मंत्र जपला असता तर कदाचित सहकार आयुक्त किंवा सहकार सचिव पदा पर्यंत पोहचून सेवानिवृत्त झाले असते, पण त्यांच्या मानी नव्हे स्वाभिमानी वृत्ती मुळे त्यांच्या वाट्याला आली सक्तीची सेवानिवृत्ती.तो काळ होता सन १९६८/६९चा, कोल्हापूर येथील भाड्याचे जागेचे दरमहाचे रु.४०/-हे घरभाडे थकू लागले नोकरी नाही म्हणून शेवटी त्यांनी पुण्यास मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला.

त्यामागेदेखील नव्याने संसाराची जुळवाजुळव करताना आक्काचा आशीर्वाद व पाठिंबा राहील हाच विचार मनात असावा असे वाटते. पुण्यात जागा मिळणे अवघड व खर्चाच्या मर्यादा यामुळे पुण्यास येवून सुद्धा एक खोली चाळवजा वाड्यातील कोथरूड येथे घेतली. त्याकाळी ते ठिकाण इतके दूर होते कि पालखी दर्शन किंवा गणेश उत्सव या करिता जिमखान्यापर्यंत येणारे "कोथरूडकर" पुण्याला चाललो असे म्हणायचे. त्या कोथरूड येथे एका खोलीत बाबांनी संसाराची दुसरी खेळी सुरु केली. आर्थिक आघाडीवर मागील पानावरून पुढे चालू हेच होते पुण्यातही दरमहा दररोज दीड किंवा आठवड्यातून एकदा दोन मापे इतकेच दुध घेवून देखील दरमहाचे रु.१५ व घरभाडे रु.४० हे देखील थकू लागले. त्यावेळी स्वतःचे संसारचे ठिगळ जोडता जोडता मायेची शाल पांघरणारी आत्याच होती.

आत्याचे यजमान कष्टाळू व आपण बरे आपला प्रपंच बरा अश्या वृत्तीचे त्यामुळे न त्यांना मदतीची अपेक्षा न त्यांच्या कडून मदतीची अपेक्षा. पण यामुळे आत्या उचलून काही थेट मदत करू शकत नव्हती. मग त्यावरही तिने उपाय शोधला दरमहाचे वाणी समान भरताना यजमानांना कधी सण आहे कधी पाहुणे येणार आहेत असे सांगत गरजेपेक्षा थोडे जास्तीचे सामान प्रथम पदरात पडून घेणे आणि नंतर त्यातील थोडे थोडे सामान बाजूला काढून ते १५/२० किलोचे ओझे हातातून वागवत डेक्कन ते कोथरूड असा ४ कि.मी चा प्रवास जाता येता पायी करणे आणि हि मदत कमी कि काय म्हणून माझ्या भावाला जो त्यावेळी जिमखान्यावरच्या 'भावे स्कुल' आताची विमलाबाई गरवारे प्रशाला येथे शिकत होता . त्याला दररोज एक वेळ जेवण सकाळचे देण्याचे महत पुण्य हि तिने कोणालाही न सांगता अनेक वर्षे पार पाडले. एखादे दिवशी काही कारणांनी यजमानांनी सुट्टी घेतली असेल व माझा भाऊ शाळेत जाण्यापूर्वी सकाळचे जेवणासाठी घरी आला तर माझी आत्या इतकी समयसूचक वागत असे कि रोजच येणाऱ्या माझ्या भावास पाहून " अरे शेखर आज इकडे कसा काय आलास ? सर्व ठीक आहे ना ? असे विचारात बर आला आहेस तर आज जेवूनच जा असे म्हणून आपले कर्तव्य न चुकता पार पाडत असे.माझा थोरला भाऊ माझे वडील अकाली गेले त्यावर्षी अकरावीत होता. त्यावर्षी वडिलांचे आजारपण ,मृत्यु, त्यानंतर आईने सुरु केलेली महिला उद्योग लि. हि कारखान्यातील नोकरी या सर्वांमुळे माझ्या भावास एक शैक्षणिक वर्ष गमवावे लागले. पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये परीक्षा फॉर्म भरण्याचे शेवटचे दिवशी आई कामास गेलेली, आम्ही तीन भावंडेच फक्त घरी होतो. फॉर्म भरण्यासाठी घरी पुरेसे पैसे नाहीत काय करावे हे मोठे प्रश्नचिन्ह. प्रथम आठवली ती आत्या पण त्यादिवशी ती घरीच नव्हती. अडचण म्हटले कि आत्या या उक्ती नुसार ते दार ठोठावूनच भाऊ घरी आला होता. मग काय करावे? मला आठवते आहे तेंव्हा घरातील एक पितळी तांब्या मोडीत घालून तू फॉर्म भर असा पर्याय मी सांगितला . प्रथम त्यास भावाची तयारी नव्हती पण आईस सांगण्याची जबाबदारी माझी असे सांगून दुपारी तीन पूर्वी सर्व सोपस्कार पार पाडून भावाने फॉर्म भरला. रात्री आईस मी मोठ्या धीराने भावाचे वर्ष वाचावे म्हणून घेतलेला निर्णय सांगितला तेंव्हा आईच्या डोळ्यात पाणी आले मला वाटले कि तांब्या मोडला म्हणून आईस वाईट वाटले पण ते अश्रू त्राग्याचे नव्हते तर समाधानाचे होते मुलांना वेळ आणि शिक्षण यांचे महत्व समजले याचे होते. त्या वर्षी भाऊ परीक्षेत पास झाला पुढे आय . टी. आय. मध्ये प्रवेश घेत पुढील शिक्षण पूर्ण केले. पण तो फॉर्म भरण्याचा दिवस आठवला कि आज हि तो दिवस जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. पुढे कित्येक दिवस माझी बहिण माझा भाऊ शेखर यास माहित आहे तांब्या मोडून अकरावी झालाय ते? असे चिडवत असे.अशी हि माझी आत्या दिसयला कशी होती या प्रश्नाला देखील माझे उत्तर म्हणजे दुसरी बहिणाबाईच तशीच नऊ वारी साडी, मोठे कुंकू, डोळ्याला चष्मा, आणि कष्टाळूही बहिणाबाई या कवियत्री सारखी. मला तीन आत्तेभाऊ त्यातील मधला तात्या उर्फ सुभाष हा संघाच्या चळवळीतला व माझ्या बाबांशी सूर जुळलेला त्यामुळे पुढे आमच्याही नियमित संपर्कातला. त्याला आत्याची आठवण म्हणजे लहानपणी त्याने एकदा घरातून चार आणे घेवून न सांगता बुंदीचा लाडू खाल्ला हि गोष्ट आत्याच्या नजरेतून सुटली नाही पण तिने ना मारझोड केली ना रागावली पण त्याला देवासमोर उभा करून म्हणाली म्हण देवाला मी चुकलो पुन्हा असे करणार नाही आणि शब्दशः नाक घासायला लावले. आणि या संस्कारामुळेच हाच माझा आत्तेभाऊ प्रथम प्रचारक व नंतर थर्मेक्स, कल्याणी ग्रुप, अशा विविध कंपन्यात काम करत करत शेवटी एका बहुराष्ट्रीय कंपनीचा एम. डी. म्हणून निवृत्त झाला. आज हि निवृतीनंतर स्वस्थ न बसता त्याने समाज कार्यात स्वतःला पूर्णता गुंतवून घेतले आहे. दरवर्षी त्याच्या घरी साजरी होणारी रामनवमी हि तर माझ्या आत्याच्या- सत्य बोला, सत्य चाला, राम तुमच्या पाठीला. या संदेशाची आठवण करून देणारी एक संस्काराची चळवळच झाली आहे.

माझा थोरला आत्येभाऊ सुधाकर यांनी कष्ट आणि बचत याचे बाळकडू आत्याकडून घेत बजाज ऑटो लि. येथे नोकरी करत जादावेळ काम, साप्ताहिक सुट्टीस काम करत स्वतःचे छोटेसे घर सर्वात प्रथम बांधले.

आज माझ्या आत्याचे माघारी माझे सर्वच आत्येभाऊ दिवाळी एकत्र साजरी करतात. माझा धाकटा आत्येभाऊ मुकुंद याचेकडे दिवाळीचा फराळ म्हणजे खरीखुरी मेजवानीच असते. वहिनींनी केलेला प्रत्येक पदार्थ फक्त लज्जत वाढवतो असे नाही, तर आत्याच्या हातच्या तिखट,

गोड पदार्थांच्या स्मृती जागवतो एकूणच कायतर सर्वात धाकटा आत्येभाऊ मुकुंद यास आत्याकडून हाताची चव आणि शीघ्र काव्य यांचे वरदान मिळाले ,त्यामुळे माझी आत्या सुगरण असल्याची साक्ष त्याचे घरी आजही सहज दिसते. मी माझ्या आत्यास सुगरण म्हणताना आजही दिवाळी आली कि तिचे पाकातले चिरोटे असे काही डोळ्यासमोर येतात कि जर तिला आर्थिक पाठबळ असते तर ह्या चिरोट्याच्या ब्रन्डने चितळे बंधूंच्या बाकरवडीशीच स्पर्धा केली असती. त्याप्रमाणे पुरणपोळी, शंकरपाळी हि एक खासियत. हे सणासुदीचे पदार्थ सोडाच पण रोजचे जेवण आणि चकोल्या, घवल्याची उसळ यांचे नुसते नाव देखील आत्या सुगरण असल्याची आठवण देते.कष्ट आणि आत्या हे नाते तर इतके घट्ट होते कि पहाटे साडे चारला सुरु होणारा तिचा दिवस थेट रात्री दहा वाजताच संपत असे. माझा सर्वात थोरला आतेभाऊ नाना उर्फ सुधाकर हा आत्यासाठी धान्याची पोती निवडण्याकरिता सायकल वरून घरी आणत असे व दुपारच्या वेळेत 'कामातील बदल हीच विश्रांती ' हि तत्व प्रणाली वापरून आत्त्या बैठक मारून ते धान्य निवडून परत पाठवीत असे. पण या कष्टातून तिने इतकी बचत केली कि दोन वर्षे सातत्याने हे जादा काम करून जिद्दीने तिने चार सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या. वकील लोक मिळकतीशी निगडीत कागद पत्रे बनवताना जो ‘स्वकष्टार्जित’ मिळकत हा शब्द प्रयोग वापरतात तो का याचे ज्ञान मला त्या बांगड्या बघून झाले.

याप्रकारे कष्ट करताना मुलांना देखील तिचे हेच सांगणे होते कि तुम्ही काम करण्यात लाज बाळगू नका , काम कोणतेही असो ते ताठ मानेने करा. आणि त्यामुळेच दिवाळीची सुट्टी म्हणजे प्रथम काम करून चार पैसे उभे करा आणि मग दिवाळी साजरी करा असे तिचे सांगणे असे. माझे तिन्ही आत्येभाऊ त्यामुळे दिवाळीची सुट्टी शाळेला लागली कि घरोघरी जावून उटणे, सुवासिक तेल या गोष्टी दारोदार फिरून विकत असत आणि त्यातून झालेली कमाई फटाके, नवे कपडे यांच्या खरेदीस हातभार लावण्यासाठी वापरात असत. म्हणजेच स्वकष्टार्जित व स्वाभिमानी उत्पन्न हेच सुखी जीवनाचे मार्ग आहेत याचे बाळकडू कृतीने संस्कार करीत आत्याने दिलेत हेच यातून जाणवते.माझ्या आत्ये-भावांशी बोलतांना जेंव्हा तिच्या आठवणी निघतात तेंव्हा एकदा माझा एक आत्येभाऊ सहजच म्हणून गेला कि आमची आई म्हणजे काय तिला कोणीही गंडवू शकत असे. ती भाबडी होती.

पण मला आठवणारी माझी आत्या त्यांच्या चार भावंडात थोरली. या माझ्या आत्याबाबत मी तर असे म्हणेन कि ती फक्त भाबडीच नव्हती तर तिने आयुष्यात पत्नी, आई, बहिण, नणंद, भावजय आत्या, आजी, मावशी अशा प्रत्येक नात्याचा पदर इतका सुरेख जपला कि प्रेम ,माया, आपुलकी, जिव्हाळा,उपकार, या शब्दार्थांसाठी शब्दकोश न बघता आत्याकडेच बघावे.

माझ्या वडिलांच्या डायरीतील पुढील परिच्छेद याचीच साक्ष देणारा आहे अशी माझी खात्री आहे. ……

“मनातल्या विचारांबरोबर घराबाहेर पडलेले पाऊल आता पुढेच पडावयाचे होते. थांबायचे नव्हते मागे वळून पहावयाचे नव्हते. आमची आई तशी लवकरच वारली तिच्या मागे आमच्या थोरल्या बहिणीने आम्हा लहान भावंडांना आईचे प्रेम दिले. ती तर गावातच राहत होती. आमच्या सबंध घरादाराशी जवळीक राखून होती ती, तिची मुले एक बंडखोर तर एक अबोल त्यागी तर एकाचा स्वभाव माझ्या मोठ्या मुला सारखा गूढ, त्यांचा जिव्हाळा. पावले आपोआप नकळत तिच्या घराकडे वळली. तीच घर तर मला परक नव्हतच. आई गेल्यावर एकाकी पोरकेपणावर तीनच फुंकर घालून दुखः हलक् केलेले. पण तिच्याशीही मोकळेपणे बोलावयाची चोरी. "जगावेगळा विक्षिप्तपणा" अशा शेलक्या शब्दात ती माझी संभावना करायला मागे पुढे पाहणारी नव्हती. जितकी प्रेमळ तितकीच शिस्तीची भोक्ती. ती रागावणे शक्य होते नव्हे तो तिचा हक्क होता. आणि मुख्य म्हणजे तिला हुकमत गाजवायची नसली तरी तिच्या प्रेमळ परंतु हुकमतीच्या शब्दापुढे मी पांगळा होतो. तिचे सामर्थ्य शब्दातले नसून त्यागातले, आपलेपणातले. भावाचे कल्याण व्हावे या शुद्ध हेतूतून निर्माण झालेले. मी अशावेळी काय करणार? मी एकटा आहे निर्णयात कोणी सहभागी नाही तुझा तू एकट्याने घ्यावयाचा म्हणजे जबाबदारी अधिकच वाढलेली. त्यातून ती एक स्त्री. ती माझ्या पत्नीचीच बाजू घेणार मग चक्क उरावर धोंडा ठेवून तथाकथित मोकळ्या वातावरणात हवापाण्याच्या गप्पा मारून क्षेमकुशल विचारून तिची मूर्ती भक्ती युक्त अंतकरणाने डोळ्यात साठवून निरोप घेतला.”

माझ्या वडिलांच्या या भावना म्हणजे त्यातून त्यांचा माझ्या आत्या विषयी असलेला पराकोटीचा आदर व्यक्त होतो. आणि खरोखरच,अश्या आदरास ती पात्र देखील होती. अशा किती म्हणून आठवणी सांगू ? मी तर म्हणेन मला माझ्या आत्याचे रूपाने माणसा माणसातील चांगुलपण भेटले. आजही कोणी मला जेंव्हा म्हणते तुला काय माहित आम्ही किती कष्ट काढलेत? तेंव्हा मला म्हणावे वाटते अरे बाबा असतील तुझे कष्ट मोठे,गेला अशील तुही दुर्दैवाच्या फेऱ्यातून पण हेही दिवस विसरून आनंदात कसे जगावे हे शिकायचे असेल तर मात्र तुला माझ्या आत्याचे परीक्षेतच पास झाले पाहिजे.

कराडचे आई माघारी भावंडांना सांभाळत काढलेले कष्ट असोत अथवा कलेढोण येथील शेतीवाडी,गुरेढोरे अश्या राबत्या घरात काढलेले कष्ट असोत किंवा नवऱ्या पाठोपाठ पुण्यासारख्या शहरात येवून एका खोलीतील केलेला संसार असो, कष्टांची मालिकाच आत्याबरोबर आयुष्यभर साथीला राहिली. पण त्याची खंत मात्र तिने मनात कधीच बाळगली नाही. पुढे लौकिक अर्थाने सर्वच मुलांचे संसार मार्गी लागले सुना, नातवंडांनी देखील आपल्या जबाबदाऱ्या पार पडल्या.

आणि मग या सर्वच आठवणींनी मन कातर होते लेखाच्या सुरवातीस कवियत्री बहिणाबाई यांची जी कविता नमूद केली आहे त्यात नातेसंबंध व शब्दोच्चार यांचा सुरेख सबंध दाखवीत कवियत्रीने नात्याचा ओलावा सांगताना - आत्या म्हणता म्हणता केवडे अंतर पडे. हे नमूद करताना द्न्तव्य उच्चार स्पष्ट केला आहे पण माझी आत्या म्हणजे - आत्या म्हणता म्हणता केवडे अंतर पडे नसून, आठवणीने तिच्या आजही अंतरी पीळ पडे, अशीच होती असे म्हणेन .

अगदी अखेरच्या दिवसात वयोमानाने येणारे आजार आणि वार्धक्य यांनी तिच्यावर कब्जा केल्यावर देखील त्यासाठी कुढत न राहता माझ्या मागे माझ्या नवऱ्याची देखभाल नीट होईल ना? या विचारातच ती राहिली. आणि आपल्या निकट वर्तीय लोकांकडून त्याचीच हमी घेवून वयाचे ८० व्या वर्षी आपले सहस्त्र चंद्रदर्शन पूर्ण होण्याआधी पण सर्वाना सहस्त्र चंद्राची शीतलता वाटतच महायात्रेस दि. ४ सप्टेंबर २००३ रोजी प्रयाण केले.

मनोगत दिवाळी विशेषांक २०१० मध्ये पूर्वप्रकाशित.


Thursday, November 4, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

मराठी ब्लॉग विश्वचे सर्व व्यवस्थापकीय सदस्य , वाचक,
सर्व ब्लॉगकर्ते हितचिंतक यांना ......
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !


शुचिर्भूत होऊनी पहाटे
य-अंधकारा लोटू दूर
दीप सहस्त्र तेजोमय उजळून
पालटून टाकू तमाचा नूर
चन देऊनी सहकार्याचे
लीहू मैत्रीचे गीत मधूर.....

Monday, November 1, 2010

अत्तराच्या कुपीची गोष्ट…..

पावसाचा हलकासा शिडकावा तापलेल्या धरित्रीवर झाला आणि बघता बघता सुट्टी संपल्याची घंटा झाल्याबरोबर मुले जशी मैदानातून पळतात तशी ढगांची पांगा पांग झाली. त्याच बरोबर वातावरणातला भरून राहिलेला कुंद्पणा आपोआप कमी झाला. हवेत एक सुखद गारवा आला. त्याने हलकेच खिडकी उघडली आणि त्याच बरोबर घर त्या मातीच्या वासाने भरून राहिले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. जणू त्या मृदगंधाबरोबर वारा त्याच्या गत आठवणींचा ठेवाच घेवून आला होता. अर्थात वास हा आपल्यासारख्या सामान्यांसाठीचा शब्द. त्याच्या साठी तो एक 'गंध'-अनाम .तसा तो थोडसा चोखंदळच म्हणा अगदी ‘गंध ‘पारखी नसला तरी निवडक आणि दर्जेदार अत्तरांचा वापर हि त्याची खासियत. त्यामुळे ऑफिसात देखील त्याचे अस्तित्व इतरांना किंचितसे सुगंधित असेच असे.पण त्याची हि आवड हे काही चोचले नव्हते. त्याच्या आवडीच्या एकदोन गंधा पलीकडे तो फारसा रमला नाही.
त्याच्या छोट्या पण सुबकतेने मांडलेल्या घरात त्याने आवडीने जपलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे एक छोट्खानी प्रदर्शनच त्याच्या हॉलमधील त्या सुंदर काचेच्या कपाटात असे. त्यात केंद्रस्थानी होती एक अत्तराची कुपी, पण कशी ? तर पूर्णतः रिकामी. ती कुपी अशी काही मांडून ठेवली होती की,वाटावे त्यात जुना गंध नव्हे तर जुन्या आठवणीच जणू बंद करून ठेवल्या आहेत. कधी जर त्याला त्यावरून छेडले तर तो बोलत नसे पण सहजतेने विषयांतर मात्र करीत असे. जणू त्याला ती कुपी बंदच ठेवायची होती.
पण आज त्याने घेतलेल्या दीर्घ श्वासाबरोबर त्या गंधांनी त्याला गत स्मृतीच्या गर्तेच ढकलले. आणि त्याचे स्वगतच सुरु  झाले......
सन १९७६/७७ चा काळ. कॉलेज नुकतेच सुरु झाले होते. तालुक्याचे ठिकाणचे गाव. गावातील वस्ती आणि कॉलेज दोन्ही हळूहळू वाढत होते.तो काळ म्हणजे मार्कांची टक्केवारी आणि पुढील शिक्षणाची दिशा याचे नाते देखील ठरून गेलेले. ८० टक्के किंवा अधिक मार्क, मग सोडा गाव आणि जा मेडीकल अथवा इंजीनियरिंगला तेही मुंबई, पुणे इकडे. ७५ टक्के मार्क्स मग मेडीकल अथवा इंजीनियरिंगला प्रवेश पण जा सांगली आणि अथवा सोलापूर, कोल्हापूर सारख्या जिल्ह्याचे ठिकाणी. ७० टक्के मार्क्स मग सायन्स साईड तीही हव्या त्या गावी ६० मार्क्स कॉमर्स आहेच.आणि पास आहात तर मग आर्ट आगदी आर्ततेने वाट पाहत आहे. असा तो सरधोपट काळ. आम्ही अकरावी जेमतेम पास. पण पी.डी. ( पदवी पूर्व ) परीक्षेत ६० टक्के पदरात पडले आणि कॉमर्सचे दार उघडले.
आमचे कॉलेज म्हणजे वर्गात १०० मुले तर एक दोन मुली. त्यामुळे 'मैत्रीण' हि संकल्पना तशी गोष्टीतच राहिली. मला आठवतेय आमच्या वर्गात माझा एक मित्र होता.त्याचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेल्यामुळे इतर मित्रांपासून थोडासा दुरावलेला. फारसा कोणात आपण होवून न मिसळणारा. पण त्याचे घर आमच्या घराचे जवळ त्यामुळे कॉलेज  साठी आम्ही बरोबर जावू लागलो. त्यातून आम्ही आपोआपच एकत्र आलो. आभ्यासासाठी त्याचे घरी येणे जाणे झाले. त्यातून त्याची अभ्यासातील गोडी वाढत गेली. का कोण जाणे पण एकूणच मित्राबरोबर सर्व घराशी नाते जुळून गेले. त्यावर्षी त्याच्या मधल्या बहिणीचे लग्न ठरले.
मग काय आम्ही मुलीकडचे आपोआपच ' नारायण ' झालो. पडेल ते काम तेही आनंदाने असे आमचे तीन चार आठवडे भुरकन उडून गेले. लग्न दोन दिवसांवर आले होते. पाहुण्याची वर्दळ वाढली. आणि त्या दिवशी त्या दोघी आल्या. दोघी बहिणी बहिणी. थोरली असेल पंधरा / सोळा वर्षाची, तर धाकटी बारा / तेरा वर्षाची परकरी पोर. अर्थात माझे वय देखील फार तर सतरा वर्षाचे पण नकळते. लग्नाच्या धांदलीत कधी त्या दोघींकडे मन खेचले गेले ते कळलेच नाही. माझ्या मित्राचे घर म्हणजे एक जुना वाडा होता. काटकोनात वळत जाणाऱ्या गल्लीचे कोपऱ्यात वाड्याचे मोट्ठे दार त्यातून आत जात एक छोटा बोळ पार केला कि मित्राचे घर.मग छोटा सोपा , पाठो पाठ अंधारे माजघर उजव्या हाताला माडीचा जिना समोर सैपाकघर. माजघर आणि सैपाकघर यांच्या मधील उंबरा म्हणजे माझी बैठकीची जागा. तिथे बसून माझे तासंतास कसे जात ते आठवले कि आजही हसू येते. त्या दिवशी 'गृहमुख' झाले जेवणावळी उठत होत्या आणि माझ्या मित्राच्या आईने घरतील सर्वांना अत्तर लावण्याचे काम मला दिले. घर भर हिंडून माझे काम सुरु झाले. आणि अचानक माजघरात त्या दोघी समोर आल्या मग काय अत्तराचा सुगंध नाकातच काय पुरा डोक्यात गेला. घाकटीने हात पुढे केला आणि वास घेत बाहेर पाळली देखील आता समोर थोरली सलज्ज पण मोहरलेली. मन एकदम मोरपिसे झाले. मी तिचा हात हातात घेतला निमित्त अत्तर लावण्याचे पण स्पर्शाने या हृदयातील सुगंध त्या हृदयात कसा पोहचला ते कळलेच नाही.अजाणत्या वयात मन जाणते करणारा तो स्त्री स्पर्श जणू माझे जगच बदलून गेला. सगळे मिळून सहवास दीड मिनिटांचा. पण आठवणी आजही तितक्याच ताज्या . अंधाऱ्या माजघराने जणू आयुष्याच्या प्रकाश वाटा दाखवल्या. मित्राच्या बहिणीचे लग्न झाले. पाठवणी झाली . मांडव रिता झाला. त्या दोघी मांडवातूनच गावी परतल्या. पण त्या दीड मिनिटाने माझे आयुष्यच बदलले. आठवणीचे मोरपीस सतत हळुवार स्मृतींना जागवू लागले. काही दिवस आठवणीच्या गावी सततचा मुक्काम असे. लग्नघर आणि अंधारे माजघर डोक्यात लख्ख राहिले. पण ना नाव विचारलेले ना पत्ता घेतलेला मित्राशी या विषयावर बोलायचे कसे? अखेर मन अभ्यासात आणि जीवन आभासात कसे गुंतले कळलेच नाही. पुढे पदवी पदरात घेवून पुण्यनगरीत पाय ठेवला. दिवस भर भर पुढे सरकत होते. अगदी छोट्या कापड दुकानात सेल्समन, ( आणि अभिमान काय तर प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर,त्या दुकानात कापड खरेदीला येते.)कंपनीसाठी क्लार्कस, मग मध्यम कंपनीसाठी कॉस्ट असिस्टंट असा प्रवास सुरु असताना अचानक एका बँकेत नोकरीची सुरवात. आणि आम्हाला स्वर्ग दोन बोटे उरला.कारण काय तर नोकरी आणि तीही बँकेतली.

आणि एक दिवस चक्क तीच शोधात आली. हो कारण माझ्या मित्राकडून पत्ता घेवून एवढ्या पुण्यात तिने शोधून काढले होते. १९७७ नंतर एकदम १९८७ मध्ये भेट.१० वर्षांचा काळ अगदी दहा मिनिटात भरून निघाला. माजघरातील ‘अत्तराची कुपी’ पुन्हा एकदा उघडली गेली. मन आठवणी आणि अभिमानाने भरून आले.जणू काही मध्ये काही काळ गेलाच नव्हता. “पुन्हा कधी का रे नाहीस भेटलास ?” तिच्या प्रश्नाने उर भरून आला. वाटले म्हणजे आहे कोणी तरी वाट पाहणारे. मोरपंखी क्षण पुन्हा एकदा उलगडले. म्हटले काय सांगू ? किती रात्री जागवल्यात तुझ्यासाठी.आणि सरळ सरळ तिला विचारले,” का का म्हणून शोधात आलीस ?”तर म्हणाली,”अरे पदवी झाली, गावी पुढे शिकायची सोय नाही.जवळचे मोठे गाव पुणे . इकडे यायचे ठरले. आईस एकदम आठवले कि तू आता पुण्यास असतोस. म्हटले भेटावे काही मदत होती का पाहावे.”मनात सतारीची तार अलगद छेडली गेली. मदत काय म्हणतेस मी तुझाच आहे.मग काय भटकणे सुरु झाले दिवस पालटू लागले. माझी नोकरी, तिचे कॉलेज दर आठवड्यास तिचे गावी जाणे यातून भेटीपेक्षा विरहच अधिक अनुभवास येवू लागला. असेच एकदा घरी ये कोणी असणार नाही तेंव्हा म्हणून बोलावले.ती आली किती विश्वास दाखवला तिने मन भरून आले. आनंदाने काळीज फुलले. प्रेमाने शारीरिक आकर्षणावर मात केली.  ती आली आणि गेली सूर झंकारले पण सतार अस्पर्शच राहिली. पुन्हा काही दिवस गेले. मे महिन्याची सुट्टी म्हणून ती गावीच गेली आणि एक दिवस अचानक तिचे पत्र बँकेत आले. आयुष्यातील एकमेव प्रेमपत्र हो मी तर त्याला प्रेमपत्रच मानतो. छोटेसेच वहीतील पण पंधरा वीस ओळींची मोती पसरलेली अक्षरे . तिने लिहले होते. लग्नाचे काय ठरवले आहेस अधून मधून भेटण्याचा टाईम-पास नको. वाचून चर्र झाले दहा वर्षापूर्वीचा पहिला स्पर्श आठवला. त्यातील जपलेली मोरपंखी निरागसता आठवली. बर खरेतर तीही आठवणीची कुपी बंद होवून आतल्या कप्यात दडली होती.कोण आले होते शोधात ती कुपी. का माझ्यासाठी ती अंतरंगातील कुपी होती, आणि तिच्या साठी नव्या गावी स्थिरावण्यासाठी हवी असणारी तात्पुरती मदत होती ? तिचे एकूणच वागणे गूढ वाटले. पुनर्भेटीचा तो सोहळा मी मनात कायमचा साठवला घरी बोलावले पण मर्यादा राखली. आणि किती सहजतेने लिहिले कि टाईम-पास नको.म्हणजे माझ्यासाठी काळ गेला आणि तिच्या साठी फक्त घड्याळाचे काटे सरकले? पंधरा ओळीनी पंधरा दिवस डोक्यात 'भुंगा' राहिला हे असे का ? म्हटले पुण्यातल्या पुण्यात असून हि पत्र पाठवते.आपण समक्ष भेटूनच खुलासा करूयात कि अग हा काही टाईम पास नाही.खरे तर हा परस्परांना आतून समजण्याचा समजून घेण्याचा,खूप दूरचा प्रवास आहे ज्यात त्या वळणाची मी वाट पाहत आहे. जिथे वाट नागमोडी होईल,पण मने सरळच राहतील. हात हातात गुंफून पुढील प्रवास करायच्या आणाभाका पुऱ्या होतील पंधरा दिवस मनाशी घोकून घोकून भेटीत काय बोलायचे कसे बोलायचे ठरवून तिला भेटायला तिच्या रूम वर गेलो तर भले थोरले कुलूप बंगल्यातील ते छोट्खानी आउट हाऊस, त्या समोर मी भांबावलेला उभा बंगल्याची मालकीण समोर येत म्हणाली,”अरे! ती गावी परत गेली कायमची. तिचे लग्न ठरले आहे.” माझे मलाच कळेना मी काय ऐकतोय? पण तेच वास्तव होते. कुलुपबंद दाराने आयुष्यातील सर्वच वाटा कायमच्या बंद केल्या आहेत हे जळजळीत वास्तव समोर आले. मी ज्याला प्रेम मानले ती तिची सोय होती.त्यामुळे तिचे पत्र म्हणजे जणू 'कारणे दाखवा नोटीस' होती कारण आता ती कायदे तज्ञ झाली होती. कोणत्याही कोर्टाची पायरी न चढताच पहिली लढाई मी हरलो होतो. शिक्षा काय तर स्मृती पटलावर कोरलेली प्रतिमा पुसता येत नव्हती. आणि ती तेथून काढून टाकायची तर भळभळती जखम आयुष्यभर ‘अश्वत्थामा ‘होणार होती.खरे तर मित्राला गावी जावून गाठून तिचा पत्ता घेवून पुन्हा एकदा तिच्यासमोर दत्त म्हणून उभे राहावे असे वाटत होते. पण जर ती नववधु म्हणूनच पुढे आली तर? ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते. प्रतिस्पर्धी वकीलच केस जिंकून गेली होती कारण माझ्याकडून कोणत्याच कोर्टात अपील होणार नव्हते. मी हरून जिंकलो होतो ती जिंकून हरली होती
मनातली वादळे मनातच शमली. ती आता कधी दिसेल का ? कधी कोठे आणि केंव्हा ? हि प्रश्न मालिका मानस छेडू लागली. एकदा घरी काही नातेवाईक आले म्हणून आम्ही सर्वजण एका संध्याकाळी संभाजी पार्कमध्ये गेलो होतो. आणि तिथे ती दिसली बरोबर तिचा नवरा होतो. नजरभेट झाली पण न मी काही बोलू शकलो ना ती थांबू शकली. एक वेळ ओळख न देताच गेली असती तरी वाईट वाटले नसते पण जाता जाता तिने मागे वळून पाहत असा काही कटाक्ष टाकला कि, मन पुन्हा एकदा माजघरातील अत्तराच्या कुपीतील तो गंध शोधू लागलो म्हणजे लग्नानंतर ती पुण्यातच आली होती. पण मन शोधून काढण्यासाठी पुढे धाव घेईना.कारण तसाही मी तिच्यासाठी टाईम-पास होतो ना. जगरहाटी थांबली नाही. समाजरीत आणि आयुष्यभर कष्ट काढणारी आई या दोन्हीला बळी पडून मी लग्नाला उभा राहिलो. नोकरी,संसार यांचे रहाटगाडगे सुरु झाले. मन कुठेच रमत नव्हते, शरीर आपला धर्म पार पाडत होते. आता अत्तराची कुपी सांडून संपली आहे. असा इशाराच जणू मनाने दिला. अश्याच का संध्याकाळी सुट्टी असून घरीच काही तरी काम चालले होते. दारावरची बेल वाजली. कोण आहे म्हणून दर उघडले तर ती आणि सोबत तिचा नवरा दारात. मनाची कवाडे वारंवार बंद करून देखील हि वास्तवाची दारे का पुन्हा पुन्हा का ठोठावते आहे असा प्रश्न मनात चमकून गेला पण तोंडातून आपोआपच शब्द आले, “अरेच्या! आज इकडे कसे काय?” तर मानभावीपणे नवऱ्यासमोर म्हणाली, "अरे आता संसारात स्थिरावले आहे. वेळ जात नाही घरी एकटे बसून म्हणून नोकरी करावी म्हणतेय, बघ ना तुझ्या बँकेत काही जमते का?"आता काय तर बँकेत नोकरीसाठी काही करता येईल का? मीही खरे तर काय करणार होतो कोणास ठाऊक? मन म्हणत होते कि कुपीतील सुगंधाची दरवळच ठीक, पुन्हा काही ती कुपी आणि तो गंध नको. पण घरातील इतरांचे उपस्थितीचा आणि तिच्या नवऱ्यासमोर तिचा मान ठेवीत मी काहीतरी प्रयत्न करेन असे म्हणालो. पुढे दोन,तीन महिने गेले एक दिवस तिने फोन केला आज दुपारी चार नंतर येवून जा आणि पत्ता दिला. जेंव्हा घर शोधून तिला पकडून म्हणावे कि, हा खरच टाईम पास नाही ग! असे वाटत होत तेंव्हा हि गावी निघून गेली आणि आता परस्वाधीन झाल्यावर मला म्हणते घरी येवून जा. मनाचा हिय्या होत नव्हता काय करू जावून? काय बोलू तिच्या नवऱ्याशी? पण तरीही गेलो दर तिनेच उघडले.अशी काही दिसत होती म्हणून सांगू ? तो केतकीचा पिवळेपणा भरून राहिला होता. चेहऱ्यावर नजर ठरू नये असा गोडवा आला होता मला कळत नव्हते कि ती बदलली कि माझे मनच प्रेमातून बाहेर पडत नाही आहे? मी विचारले नवरा कुठाय? तर म्हणते “तो आताच कामाला गेला आहे आत तरी ये ,का दारातूनच परत जाणार आहेस? “मी म्हटले,” मला सांग जेंव्हा दारात येवून तुझ्या प्रेमाची भिक मागायचे ठरवले तेंव्हा गाव सोडून निघून गेलीस आणि आता जेंव्हा झोळीच नाही तर तू दान देण्यास आतुर आहेस काय म्हणू तुला?”मला अजूनही आठवतेय त्यावर तिचे डोळे थोडेसे डबडबले किंचित बाजूला होत तिने मला आत येण्यास खुणावले. मी दारातून आत आलो मात्र ती दार ढकलून वेगाने आत पाळली. बाहेरच्या खोलीत सन्नाटा.मनात वादळ जणू वादळापूर्वीची शांतता. तोंडावरून हात फिरवीत ती बाहेर आली आणि तिला पुन्हा असे एकांतात डोळे भरून पाहताना तीच दरवळ जशीच्या तशी पुन्हा हवेतून आली. आणि काही समजायचे आतच तोंडून सहज शब्द गेले, “किती गोड दिसती आहेस”. ते ऐकले मात्र आणि तिचा इतक्या वर्षांचा सयंम सुटला. तिने धावत येवून मिठी मारली माझा हात हातात पकडून तो तिने तिच्या पोटावर ठेवला आणि म्हणाली अरे मला तुझा अंश हवा होता रे इथे. आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला कि ती खरच का इतकी गोड दिसते आहे. तिला नुकतेच दिवस गेले होते. ती आता माझी कधी होणार नाही याची साक्षच परमेश्वराने दिली होती. मी तिला अलगद थोपटत दूर केले ती पुन्हा एकदा आत गेली आणि एक बंद छोटीशी भेट हातात देत म्हणाली, “हि तुला माझ्या कडून भेट.माझी आठवण ठेव.पण पुन्हा पुन्हा कधीच भेटू नकोस”......

आणि आणि पुढील अनर्थ ओढवण्यापूर्वी मी वेगाने बाहेर पडलो. हातात तिची भेट घट्ट पकडली होती मागील आनंदाचे सर्व क्षण हातून जणू निसटून गेले होते. मन तिने दिलेली भेट बघण्यास उतावीळ झाले होते. घर गाठले योगायोग असा कि घरातील सर्वजण बाहेर गेले होते. त्यांनी निरोप लिहून ठेवला होता पण म्हटले नंतर वाचू. भेट वस्तूचे वेष्टन सुटता सुटेना जणू तेथेही न सुटणारा गुंता झाला होता अखेर त्याची गाठ सुटली पण हातून भेट निसटून खाली पडली घरभर अत्तराचा घमघमाट झाला. तोच वास ज्याने मला त्याच माजघरात नेवून पोचवले. भारलेले क्षण मोहरून उठले.सोबत तिची मोत्याची अक्षरे आणि त्यावर फक्त या चार ओळी ……

मनात होते तू माझा होशील

माझ्या ओठीचे अमृतात आकंठ बुडशील

क्षणाक्षणाने माझे जीवन फुलताना

कणाकणाने तू माझ्यातच विरघळशील.

ठरवले होते तुला एकदाच भेटायचे,हे सांगण्यासाठी कि मला कायमचा विसरून जा…. आज तुझा वाढदिवस म्हणून तोच गंध तुला देते ज्याने मला तुझे वेड लावले ...ते अत्तर सांडून गेले होते. मी ती कुपी अलगद उचलली आणि तिचे झाकण इतके घट्ट बंद केले कि पुन्हा ती कुपी कधीच उघडणार नाही.

घरच्यांनी निरोप लिहलेला कागद उचलला म्हटले चला दिनक्रम सुरु करावा तर त्यावर निरोप होता. "अरे आर्चिज मधून फोन होता मी तुझ्यासाठी मागवलेले अत्तर आजच आले आहे .मी म्हटले आज तुझा वाढदिवस कशाला उशीर म्हणून बाहेर गेले आहे. लवकरच येते. पुन्हा कुठे जावू नकोस .."मी म्हटले, “नाही आता पुन्हा कुठेही जाणार नाही ...खरच कुठेही जाणार नाही”.

तो होता एक अमृतानुभव.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१० ची दुपार. थंडीकडे कलू लागलेले वातावरण, बर्फाच्या पहिल्या हलक्याश्या शिडकाव्याने अधिकच थंड झाले होते. टोरोंटो आणि परिसरातील सायंकाळ 'हॅलोवीन' कडे सरकू लागली होती. पण अनेक संगीत प्रेमींच्या गाड्यांची चाके मात्र लिविंग आर्ट गॅलरीच्या ' हॅमरसन हॉल ' कडे वळु लागली होती. त्यासाठी कारण पण तसेच होते, त्या सायंकाळी तिथे होती संगीताची मेजवानीच. संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाचा कार्यक्रम, 'एम फॉर सेवा' या सेवाभावी संस्थेने आयोजित केला होता, आणि खाचाखच भरलेल्या त्या हॉलमध्ये असलेल्या भाग्यवंतात आमचाही समावेश होता. पंडीतजींचे ८०व्या वर्षातील पदार्पण हे संयोजना मागील एक निमित्त होते. पण खरे कारण पुणे सोडल्या पासून 'सवाई गंधर्व मोहत्सव' आणि त्या सारख्या दर्जेदार कार्यक्रमांना मुकलेल्या आमच्या सारख्या अभाग्यांसाठी आलेली ती एक संधी होती.
नेटके आणि सुबक सूत्रसंचालन, हिंदी आणि त्या पाठोपाठ इंग्लिश असे द्वीभाषिक निवेदन, यामुळे संपूर्ण वातावरण कठोर शिस्तीला देखील आपलेपणा आणत होते. कार्यक्रम नियोजित वेळेवर तर सुरु झालाच पण संपूर्ण हॉल वेळेपूर्वी आपापल्याजागी येवून स्थानापन्न झालेल्या संगीतप्रेमींनी भरून गेला होता. एम फॉर सेवा या संयोजक संस्थेची माहिती देणारी पाच/सात मिनिटांची चित्रफित, त्या नंतर पंडितजींचा जीवनप्रवास थोडक्यात उलगडून दर्शवणारी चित्रफित दाखवून त्यानंतर आज पंडितजींना साथ सांगत देणारे कलाकार पंडित समीर चटर्जी- तबला, पंडिता त्रीप्ती मुखर्जी- संवादिनी आणि सूर संगत, पंडित सुमन घोष- संवादिनी आणि सूर संगत, आणि पंडित डॉ. अमित आर्य यांचा परिचय करून देण्यात आला.आणि त्यानंतर .......खरे तर त्यानंतरच्या कार्यक्रमाच्या वर्णनासाठी शब्दच नाहीत. पुढील तीन तास आम्ही सर्व श्रोते अक्षरशः सूर सागरात बुडून गेलो होतो. पंडित जसराजजी काय गायले ? या प्रश्नाचे कदाचित तांत्रिक उत्तर माझ्या सारख्यास देणे अवघड जाईल पण इतके मात्र मी नक्की म्हणेन कि, त्यांनी आम्हाला तृप्त केले.
प्रथम शुद्ध रागदारीतील गायनाने लोकांना वातावरणातील भारलेपणाने जागीच खिळवून ठेवले होते त्यानंतर भक्ती संगीतातील सुरावटींनी मंत्र मुग्ध केले. त्यातील कृष्ण भक्ती गीत संपूर्ण संस्कृत रचना असूनही सुरांनी दिलेला आंनद शब्दांच्या पलीकडला होता. या सुरेल मैफिलीचे वर्णन कोणत्या  रागात, कोणती रचना, त्यातील चढ उतरांसह करायला गेल्यास,ज्यांना या मैफिलीस
येता आले नाही त्यांच्यासाठी काय ऐकायचे चुकले हे समजण्यासाठी ठीक होईल, पण मला अश्या येवू न शकलेल्या संगीत प्रेमींना इतकेच सांगायचे आहे पंडित जसराजजींना याची देही याची डोळा एकदा तरी ऐका. या जन्मी आपले भाग्य म्हणून असे गायक आपल्यास लाभले आहेत.साथ संगत तर अशी होती कि, विचारूच नका. पंडित सुमन घोष जेंव्हा जसराजजींच्या पाठोपाठ तान घेत तेंव्हा पंडितजी केंव्हा थांबले आणि सुमंजीनी सूर केंव्हा पकडला हे भल्या भल्यांना समजलेच नाही. परिचय करून देतांना पंडिता त्रीप्ती मुखर्जी या व्हाईट हाउस मध्ये दीपावली निमित्त गायल्या आहेत असा उल्लेख संयोजकांनी केला पण पण जेंव्हा त्यांचे सूर कानावर पडले तेंव्हा मन म्हणाले,अरे पंडिता त्रीप्तीजी व्हाईट हाउस मध्ये गायल्या यात त्या व्हाईट हाउस वाल्यांचे नशीब दांडगे म्हणून त्यांना इतके सुरेल स्वर अनुभवता आले. समीर चटर्जी आणि अमितजी यांना तर जसराजजींनी स्वतःच अनेकदा दाद दिली. उत्तरोत्तर रंगत गेलेली मैफिल आता थांबवयाची का ? असा प्रश्न जेंव्हा पंडितजींनी केला तेंव्हा प्रेक्षागृहातून नाही असा एक सुरात आवाज आला. आणि त्यापुढे जावून आम्हास आपले " ॐ नमो भागवते वासुदेवाय " .... ऐकायचे आहे असा आग्रह देखील झाला. आणि अहो आश्चर्य पंडितजींनी गेल्या सलगच्या तीन तासाच्या गायनाने आलेला स्वतःचा थकवा बाजूला सारून पुन्हा असा काही सूर लावला कि बस्स... मी लिहूच शकत नाही पुढे, तो होता एक अमृतानुभव

Wednesday, October 13, 2010

कवी मन आणि कविता !

कवी मन आणि कविता यावर लिहावयाचे झाले तर,

त्यासाठी देखील तुम्हास कवी कल्पना करता येणे जरुरीचे आहे.

प्रत्येक कवी भावनांना वाट करून देतांना सहजतेने लिहतो.

मला बरेचदा एखादी कल्पना सुचते. पण त्याला कारण अमुक एक

घटना नसते. पण बऱ्याच कविता सुचतात,

दिवस आणि रात्रीच्या धूसर सीमारेषेवर.

सांज, कातर अशी ती मनाची गलबल वाढवणारी वेळ.

सहज म्हणून लिहावयास घेतले तर मनाची अवस्था ......

कधी शब्द सहज येतात, विचारांची जणू गाणी होतात.

पण कधी शब्द रुसतात, भावनांचा रस्ताच अडवून बसतात.

कधी सापडतो ताल, कधी भरकटणे बेताल.

कधी पायवाटेची वहिवाट, कधी राजमार्गाचे हरवणे.

कधी उन्मेषास आहोटी, कधी उद्वेगाचे बरसणे ...

आणि मग या अवस्थातून जाताना...

एखाद्या सांजवेळी प्रेयसी,

वाट पाहून पाहून थकलेली असते,

तरीही त्याने येण्याचे टाळलेले असते...

त्याची न येण्याची गणिते वेगळी असतात

पण तिच्या प्रश्नांना उत्तरेच नसतात

मग त्याही अवस्थेत तिचा 'इंतजार'

शब्द बद्ध होतो ....

हृदयात हुरहूर, मनात काहूर
डोळ्याच्या पापण्यांनी थोपवला पूर
ओठ उलगले शब्द न फुटले
तुझ्या आठवांनी श्वासच थिजले

Monday, October 11, 2010

अशीच एक सायंकाळ !

एक शहर थोडे वाढलेले. थोडे पसरलेले. नात्याचे गुंते फुललेले,
कधी नदी काठी,कधी किल्यापाठी,
कधी बाईक वरील लाँग राईड,
कधी गावाबाहेरील रस्त्यावरून चालतच पकडलेली एक साइड.
अशाच जातात अनेक संध्याकाळी.
माहित नसते पुढे काय लिहलेय भाळी.
त्या दिवशी एका संध्याकाळी हवेत असाच थोडा गारवा थोडी शिरशिरी.
रोजचा रस्ता रोजची वाट,
पण तिने माळली नाही नेत्र् कटाक्षातून ओसंडणारी हसरी वहिवाट.

तिला विचारले काय झाले तर म्हणते सारे संपले
खूप बोललो मनातून हललो. पण उत्तरादाखल मौनच बोलले.

ती संध्याकाळ खूपच लांबली जणू उन्हे परतायची थांबली
मला आठवल्या सगळ्याच संध्याकाळी
माहित नव्हते हेच आहे कपाळी.

आता सुद्धा संध्याकाळ होते
मनात एक कविता रेंगाळते ...

तीच हि कविता ...अशीच एक सायंकाळ !

कोणी म्हणते संध्याकाळ,
कोणी वदे कातरवेळ !

कोणासाठी बटाटेवडे, भेळ
कोणासाठी नाटक सिनेमाचा मेळ!

कुठे प्रश्न कसा काढू तुझ्यासाठी वेळ
जमत नाही कशाचाच ताळमेळ!

खरे तर सारे शब्दांचे खेळ ....
सूर्य कलतो,मन ढळते

रात्र मागे,प्रश्न सोडते
कदाचित उद्या,मिळेल उत्तर

प्रश्न नाही सुटला,तरी बेहत्तर !

सायंकाळी पुन्हा भेटेन
शिरशिरीत देखील पुन्हा पेटेन..

जळून जाता होईन खाक
मज सहवासाची लाज राख...

फिनिक्स पुन्हा धडपडून उडेल
पंखांची फडफड मनाला भिडेल

उद्या पुन्हा दिवस उगवेल
प्रश्नाचे नवे रान माजवेल..

रान तू सहज करशील पार
पण कातरवेळी पाऊल अडेल...
समोरचा पूल कोसळून पडेल

एक किनारा माझा एक किनारा तुझा
आणि मधला प्रवाह झपूर्झा ......

Sunday, October 10, 2010

लिहणार आहात का कधी दैनंदिनी?

आज १०/१०/१० खरे तर ८/८/८८ पासूनच अनेकदा अशा जुळून येणाऱ्या तारखा आणि आपण काहीतरी
वेगळे करावे हि उर्मी मनात अनेकदा येवून गेली. पण त्या त्या वेळी असे काही तरी घडले कि,
प्रत्यक्षात काही उतरलेच नाही. म्हटले चला आता १०/१०/१० अशी सुरेख तारीख आली आहे तर
आज पासून दैनंदिनी लिखाणास सुरवात करूया.

पण अंतर्मन बोलते झाले आणि म्हणाले. काही तरीच काय? म्हणे दैनंदिनी लिहणार
आणि मनात खालील विचारांची मालिकाच येवून गेली.
कधी काही मनात आले कि लेखणी उचलावी आणि अनुभव नोंदवून ठेवावा इतपत ठीक.
पण काही जण दैनंदिनी लिहतात. ते नक्की काय करतात ? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
आणि दैनंदिनीतील नोंदी खरच खऱ्या असतात का?
मी आज घरी कोणीही आजारी नसतना मी खोटे कारण नोंदवून रजा घेतली.
आज समोरच्या टेबलवर बसणारी अमुक तमुक xxxx खरच इतकी गोड दिसत होती,
वाटले आत्ता उठावे आणि xxxx
मी आज इतके पैसे लाच म्हणून देवून माझे हे अवैध काम पूर्ण करून घेतले.
उद्या त्याला इतकी रक्कम आणून दे म्हणजे तुझे काम करतो असे सांगितले आहे.
आज माझ्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती पुढील आठवड्यात माहेरी येणार आहे,
आणि तिने भेटायला बोलवले आहे.
अशा नोंदी असणारी दैनंदिनी कोणी ठेवते का ? नाही.
पण घटना मात्र अशा घडत असतात.
म्हणूनच मला नेहमी असे वाटते कि,
स्वतः विषयी, स्वतःला आलेल्या अनुभवांविषयी, मनातल्या आंदोलनांविषयी,
ज्यांच्याकडे खरे बोलण्याची ताकद असते तेच ...
सातत्य आणि सत्यता जपण्याचे धाडस ज्यांच्याकडे आहे तेच ...
"तुम्ही नेहमी खरे बोला लोकांना तो विनोद वाटेल"- असे म्हणणारा
 मार्क ट्वेन ज्यांना समजला आहे तेच ...
माझ्या चुका इतरांना समजल्याने मला काय कमीपणा येणार आहे?
असा विचार जे करू शकतात तेच.....
कालची गोष्ट उद्या कोणास कळली तर काय होईल याची आज ज्यांना चिंता नसते तेच ....
आत्म चरित्र आणि आत्म चारित्र्य जे एकाच पातळीवर तोलतात तेच ..... दैनंदिनी लिहू शकतात.
आणि म्हणूनच मी कधीही दैनंदिनी लिहणार नाही. आणि एवढेच फक्त मी खरे बोलू शकतो..
तुमचे काय ? लिहणार आहात का कधी दैनंदिनी?

Saturday, October 9, 2010

तडजोडी !

त्याचा मित्र हा तिचा कोणीतरी दूरचा मामा. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी म्हणून ती आली होती.
तेंव्हाची भेट हि पहिली भेट. पुढे आठ दहा वर्षे भुरकन उडून गेली मग उच्च शिक्षणासाठी ती
त्याच्या गावी आली. मग त्याच्या मित्राचा संदर्भ शोधत तिने त्याला शोधले. काही दिवस भेटी गाठी
आणि एक दिवस तिचे पत्र. तुझा विचार काय आहे.. काही संदर्भ लागण्यापूर्वी त्यास विचार करण्यास
वेळ देण्यापूर्वी,उत्तर देण्यापूर्वी, सुस्थळी जावून स्थिरावण्याचा तिचा एकतर्फी निर्णय.
आणि असे का केलेस यावर घरच्यांची घाई होती.
असे तिचे उत्तर आणि पत्रास उत्तर म्हणून त्याची कविता ...

आई बाबांच्या शब्द खातर केल्यास तु तडजोडी,
संसाररूपी सागरात विसरून मला घेतलीस उडी!

हृदयाची शकले करीत वाट पकडली नागमोडी,
किनाऱ्यावर हिंदोळत राहिली एकाकी माझी होडी!

तुझ्या श्वासाने कडाडते वीज!

शांततेचे काही प्रकार असे असतात कि काही विचारू नका. अस्वस्थ मनस्थिती,
घडाळ्याच्या टिक टिकीने देखील हैराण होते तर स्वस्थ मन रेल्वे फलाटावर देखील
ढाराढूर झोपी जाते. हव्या वाटणाऱ्या एकांतात उच्छ्वास देखील थरार निर्माण करतात.
आणि ओठावर शब्द येतात ....

निशब्द शांततेत तुझ्या श्वासाने कडाडते वीज, कोसळते आभाळ,
अंतरिक्षातील कृष्णविवर
खेचते खोलवर , सर्वांग शहारते जागेवर
अंतरीचे मन पाखरू झेपावते दूरवर.............

Wednesday, October 6, 2010

शब्दांवाचून कळेल का सारे शब्दांच्या पलीकडले ?

नुकताच मागील महिन्यात मी ब्लॉग सुरु केला आहे.लवकरच तो 'मराठी ब्लॉग विश्व' च्या मुळ प्रवाहात सामील होईल.अद्याप तो वाचता झालेला नाही,पण खात्री आहे थोड्या दिवसातच तो सर्वांपर्यंत पोहचेल. आता वाटले पुढील लिखाण ज्याच्या मदतीने मी आपणा पर्यंत पोहचवणार आहे त्यावरच लिहावे. मला काही सांगायचय! असे म्हणताना ज्याचा आधार घेतल्याशिवाय विचारांची देवाण घेवाण पुरीच होत नाही त्याविषयी लिहावे, ते म्हणजे शब्द.

भाषा व त्या अनुषंगाने विचार करावयाचा झाला तर भावनांना अचूक रस्ता दाखवण्याचे काम जे शब्द करतात त्यांना आपण माध्यम म्हणतो. आणि भावना अचूकतेने मांडता आल्या तर त्यास आपण वैचारिक देवाणघेवाण म्हणतो. आणि भावना अचूकतेने मांडल्या तर त्यात वैचारिक स्पष्टता दिसते. माणूस प्राथमिक विचार किंवा स्वसंवाद नेहमीच मातृभाषेतूनच करतो पण उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मातृ भाषेतूनच देत असतो. त्या संदर्भातील बिरबलाची एक गोष्ट प्रसिद्ध आहेच पण ती मी ओघात पुन्हा एकदा मांडतो.

एकदा अकबराच्या दरबारात एक भाषा पंडित येतो त्याने 'केल्याने देशाटन ' ....या उक्तीस उनुसरून देशोदेशी फिरून ज्ञान कीर्ती व अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलेले असते. हा भाषा पंडित अकबराचे सभेत सांगतो कि मला अरेबिक,पर्शियन संस्कृत, हिंदी मराठी या सारख्या एकूण सोळा भाषा व त्याही अस्खलितपणे बोलता येतात. माझे या नवरत्नांनी भरलेल्या जाणकारांच्या सभेस असे आव्हान आहे कि त्यांनी माझी मातृभाषा कोणती हे अचूकपणे ओळखावे. त्यावर अकबर बादशाह वादविवादास परवानगी देतो. अनेक भाषा तज्ञ आपआपल्यापरीने चर्चेत वादविवादात भाग घेतात पण त्या पंडिताची भाषा ओळखण्यात असमर्थ ठरतात. त्यावर अखेरीस बादशाह सभेस आवाहन करतो कि जो कोणी या पंडित महाशयांची मातृभाषा अचूक ओळखेल त्यास ५००० सुवर्ण मुद्रा बक्षिस देण्यात येतील.

या घोषणे नंतर बिरबल बादशहास म्हणतो, महाराज माझी यास तयारी आहे पण त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे आज रात्री भोजन आणि मुक्कामासाठी या पंडित महाशयांनी मजकडे आले पाहिजे. त्यास पंडित महाशयांनी होकार दिल्यावर त्यादिवशीची सभा संपते.

दुसरे दिवशी सभेत बिरबल त्या पंडित महाशायांसह येतो व अकबर बादशहास सांगतो कि यांची मातृभाषा अरेबिक आहे. त्यावर ते पंडित महाराज ते मान्य करतात कि होय माझी मातृभाषा अरेबीकच आहे. त्यावर बादशाह बिरबलास शाबासकी व बक्षीस देतो व विचारतो तेंव्हा बिरबल सांगतो.काही नाही महाराज मी घरी गेल्यावर महाराजांबरोबर हवा पाण्याच्याच गप्पा मारल्या व आम्ही झोपून गेलो. नंतर पंडित गाढ झोपी गेल्यावर मी त्यांच्या अंगावर थंडगार पाण्याची घागर ओतली त्यावर पंडित महाराज दचकून उठत ओरडले. अरे अरे कोण आहे ?कोण आहे ? आणि ते शब्द बाहेर पडताना ते शुद्ध अरेबिक मधीलच होते. माझे काम झाले होते मी त्याची क्षमा मागून रात्री झोपी गेलो मला माझे उत्तर मिळाले होते. हि गोष्ट काय सांगते कि..मनाच्या आत असणारी उर्मी शब्दबद्ध होताना ती मातृभाषेतूनच होते. आणि हि उर्मी सर्वार्थाने स्पष्ट करण्यासाठी गरज असते मातृभाषेची. आणि म्हणूनच जागतिक कीर्तीचे असंख्य शिक्षण तज्ञ देखील मान्य करतात कि विद्यार्थ्याचे किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. हे विचार आणि वरील गोष्ट पाहता आज मी माझे विचार शब्दबद्ध करीत आहे ते हे सांगण्यासाठी कि शब्द म्हणजे काय?

शब्द .. काय आणि किती म्हणून लिहणार?

शब्द .... मनातील भावना कागदावर उतरवण्यासाठीचे माध्यम.

मनातील विचार अचूक मांडण्याचे काम शब्द करतात. आता आपण या वाक्यावरच थांबून फेरविचार करूयात खरच मनातील प्रत्येक भावनेस शब्दरूप देता येते का? मला वाटते याचे उत्तर आहे हो आणि नाही दोन्हीही. जर तुम्हास मनाची सृजनशीलता असेल तर करू शकाल तुम्ही तुमच्या भावना शब्द बद्ध मग तुमचे बोलणे ठरेल अविस्मरणीय. पण जर तुमच्याकडे सृजनशीलताच नसेल तर तुमच्या तोंडून निघाणारे शब्द ठरतील बाष्कळ/ बाष्फळ बडबड.

शब्द म्हणजे कवी मनास पडलेले एक स्वप्नच म्हणा हवेतर. त्यामुळे कोणी म्हणते...

शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना

आवरू किती गडे धीर नाही लोचना ....

तर कोणी म्हणते ...

शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले

प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले...

पण या खेरीज मला सर्वार्थाने भावलेली रचना आहे

शब्द शब्द जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी ....

अर्थात या गीताबाबत एक गंमत अशी आहे कि हे गाणे प्रथम ऐकल्यापासून पुढे खूप दिवस मी ते एका चुकीच्या शब्दासह मनात कोरून ठेवले होते ते असे..

शब्द शस्त्र जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी .... आणि मला असे वाटत होते कि मराठीत एक सुविचार आहे कि 'शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा' आणि या संकल्पनेवरूनच हे गीत साकारलेले आहे.पण पुढे त्या गीताच्या ओळी जेंव्हा वाचण्यात आल्या आणि समजले कि, शब्द शस्त्र असे नाही तर शब्द शब्द जपून ठेव असे कवीस म्हणायचे आहे. आणि त्यावर अंतर्मुख होवून विचार करू लागल्यावर असे जाणवले कि बकुल फुलाची नाजूकता आणि नजाकत ज्यास भावली आहे त्यालाच शब्द शब्द जपून ठेवण्याच्या विनंती मागची कळकळ समजेल.

बरेचदा तोंडून गेलेला शब्द हा धनुष्यातून सुटलेला बाण असून तो गेला कि गेला. म्हणून एकदा गेलेला शब्द परत परत घेता येत नाही हे वाक्य दृढ झालेअसावे. पण मला वाटते कि शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा हा विचार भारतीयांपेक्षा ऑस्ट्रेलियातील लोकांना जास्त लागू होतो कारण त्या ठिकाणी चुकीचे शब्द वापरणे म्हणजे आपल्याच शब्दाचे 'बूमरँग' होणे होय. कारण आपलाच शब्द आपल्यावर कधी उलटेल हेच सांगता येत नाही.

आपल्याला संवादासाठी शब्द लागतो हे जरी खरे असले तरी 'मौनम् सर्वार्थ साधनंम' हे सुभाषित मात्र खूप बोलके ठरते. त्यामुळे चर्चेत भाग घ्यायचा आणि अचूक ठिकाणी गप्प बसायचे याला लोक धोरणीपणा म्हणतात. त्या कृतीवर शेरा मारताना त्याचे गप्प राहणे किंवा मौन खूपच बोलके होते असे म्हणतात. याउलट चुकीच्या वेळी चर्चेत गप्प राहणाऱ्यास नंतर त्यावेळी बोलायला तुझे तोंड शिवले होते का? या प्रश्नास सामोरे जावे लागते. एकूण काय तर इंग्लिश मधील 'Reading between the lines ' काय किंवा हिंदीतील 'समझनेवालोंको इशारा काफी होता हैं !' काय किंवा आपल्या मराठीतील ' शब्दावाचून कळले मजला शब्दांच्या पलीकडले ' काय हे सर्व संदर्भ हेच दर्शवतात कि शब्द तोच पण त्याच्या छटा अनेक आहेत. त्यामुळे शब्दातून मिळणारी माहिती हि शब्दछटा, शब्दार्थ, शब्दरूप, शब्द्छेद, यानुसार भिन्न ठरतात.

संवादाचे राहू दे पण भांडणाचे प्रकार सुद्धा प्रत्येक शब्दसमूह वेगवेगळ्या प्रकारे नमूद करतो. त्यामुळे शब्दाने शब्द वाढला,शाब्दिक चकमक झाली, वाद झाला, खटका उडाला, विषय हातघाईवर आला, डोकी फुटली इथपासून ते रणकंदन माजले इथपर्यंत विसंवादाची नोंद जावून पोहचते.

एखाद्याने काही वचन दिले, भविष्यात मदत करण्याची हमी दिली, मदतीची ग्वाही दिली तर आपण म्हणतो कि काही काळजी करू नका त्यांनी शब्द दिलाय. पुढे जर तो मनुष्य म्हटल्या प्रमाणे वागला तर आपण म्हणतो त्याने शब्द पाळला. पुढे वचनभंग केला, मदत नाकारली, तर आपण म्हणतो शब्द फिरवला.

शब्द समूह आणि त्याचा वापर करताना आपली जागरूकता कशी असते त्याचे उदाहरण म्हणजे एक दोघांपेक्षा जास्त एकत्र आलेल्या गटातील समूहाचे वर्णन करताना समूह माणसांचा असेल तर घोळका, पक्षांचा असेल तर थवा, गायी म्हशी असतील तर कळप, उंटांचा असेल तर जथा, असे भिन्न भिन्न शब्द समूह आपण वापरतो.

त्या पलीकडे जावून काही भावनांना आपण खरेच शब्दरूप देवू शकतो का ? हा मला खरा सतावणारा प्रश्न आहे. मानवी स्वभाव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेण्याचा आहे. हे जरी कितीही खरे मानले तरीही सगळेच शब्दातून सांगणे प्रत्येकास जमतेच असे नाही. म्हणूनच काही वेळेस परस्पर विरोधी संकल्पना वापरीत परिस्थितीचे वर्णन करण्याकडे माणसांचा कल असतो. त्यातून तयार होतात पुढील संकल्पना . बोलके मौन. भिजलेला पाऊस. जळणारे उन. अंधारी रात्र. लख्ख उजेड. तर काही संकल्पना शब्दात कशा उतरवाव्यात हे प्रश्न सुटतच नाहीत. उदा. तापलेल्या जमिनीवर कोसळलेल्या पहिल्या पावसाने निर्माण केलेला वास. अचानक अप्रिय घटना घडल्यावर पाठीच्या मणक्यातून थेट मस्तकापर्यंत गेलेली सणक. मला वाटते म्हणूनच अत्यानंद, अति तीव्र दुखः, पराकोटीची कृतज्ञता यावर भाष्य करताना आपल्या तोंडी शब्द येतात ....' हे सांगायला माझ्यापाशी शब्दच नाहीत' म्हणजेच पुन्हा एकदा आपण अव्यक्त शब्दानेच व्यक्त होतो नाही का ?

तर कसा वाटला हा माझा शब्द सोहळा. आपल्या प्रतिक्रिया शब्दांकित करावयासाठी मी निशब्द होवून वाट पाहत शब्दशः इथेच थांबतो....

Sunday, October 3, 2010

आठवणींची वावटळ .....

 
 तो महिना  श्रावण नक्की होता.काहीतरी कारण काढून,
दोन दिवसांची रजा आणि दोन मित्र गाठून भटकायला  बाहेर पडलो होतो.
खरेतर चेंज  म्हणून पुणे  सोडून भटकंती आरंभली होती.
वरंध घाट ओलांडून माझी  राजदूत पार्क  करून,
रस्त्याला लागून  असलेल्या त्या छोट्या  पाण्याच्या प्रवाहाकडे पाहत बसलो होतो.
मित्र खाण्याच्या सोयीत गुंतले होते.
इतक्यात पाण्यावर घागर भरून  ती वर रस्त्याकडे आली.
परकर पोलके टिपिकल बंजारी प्रकारातले. वर येता येता माझी नजर तिच्याकडे
गेली घागरीतील पाणी हिंदकळून बटा भिजवीत छातीवर आले होते.
स्वतःच्या सौंदर्याची जाण नसणारी निरागसता
चेहऱ्यावर. आणि मनही तितकेच  निरागस. कारण,
 नजर भेट होताच असे काही गोड हसली कि..... जणू कोण बरे ?
तिच्या हास्य लहरींनी जुन्या आठवणीची मंद लकेर उठली.
पण स्मृतींना ओळख पटताच ओठांवर शब्द आले..
चोहीकडे हिरवळ
मध्ये पाण्याचा ओहळ
मन नभी का दाटली
आठवणींची वावटळ .......

अव्यक्त !

दिल्या घेतल्या वचनांची आठवण,
कडा पापण्यांच्या भिजवती!

स्पंदने हृदयातली,
दुरुनी तुज जाणती!

तुज स्मृतीचा महासागर
त्यास गत क्षणांची भरती!

व्यक्त करण्या भावना,
अव्यक्त शब्द बोलती !

नाव गाव कशाला पुसता ?...

शेक्सपियरने म्हटलेच आहे नावात काय आहे ? हे वाक्य आपण बरेचदा ऐकले आहे . पण मला मात्र या पाठोपाठ आठवतो तो चिं.वि.जोशी यांचा याबाबतचा निखळ विनोद. एका ठिकाणी ते म्हणतात-"समर्थ रामदास कि कोणी म्हटलेच आहे कि .. आणि हो आणि कुणी म्हणायला कशाला पाहिजे खरे ते खरेच!"

यावरून आठवले कि नाव आणि गाव हे सर्वाधिक जिव्हाळ्याचे विषय ठरतात. त्यामुळे त्यावर झालेली विविध गाणी काय किंवा अगदी सवाल जवाब, लावणी प्रकारातील गाणी काय ? जसे सुलोचना चव्हाण याची प्रसिद्ध लावणी –

नाव गाव कशाला पुसता, अहो आहे मी कोल्हापूरची

मला हो म्हणतात लवंगी मिरची ..... हि लावणी काय किंवा

नाव सांग सांग नाव सांग या सारखी गाणी म्हणजे, शेक्सपियर काहीही म्हटलेले असो, नाव आणि गाव याबाबत एकूणच प्रत्येकजण सजग असतो. मनाचा एक कोपरा जन्मभूमीशी असा निगडीत असतो कि, मन जरी म्हणत असले कि -पोटासाठी भटकत दूरदेशी फिरेन, राजाच्या सदनी अथवा घोर रांनी शिरेन तरी घरापासून दूर गेले कि आपल्या परिसरातील कोणी तरी भेटावे हि आस वाढीस लागते. भेटणारा नवा माणूस आपल्या परिचित ठिकाणचा निघाला कि ओढ आपोआपच वाटते. तर या नाव आणि गाव यातील गाव म्हटले कि मनात येवून जाणाऱ्या विचारांची मालिका मी आपणा समोर मांडत आहे.

माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तसे ग्रामीण भागातच आणि तेही नातेवाईकांच्या कडे राहून झाले. कॉलेज सकाळी ७.१५ ते १२.३० या वेळेत असे. तालुक्याचे गाव व सुमारे ३५ वर्षापूर्वीचा काळ त्यामुळे अभ्यासाशिवायचा वेळ कसा मार्गी लावावा हाही प्रश्न बरेचदा पडे. शिवाय तेंव्हा थोडी व आता खूपच वाटणारी एक खंत म्हणजे गायन, चित्रकला किंवा स्वतः मध्ये गुंतून राहता येईल असा छंद कधीच जोपासता आला नाही. आणि आता त्यावर विचार करणे म्हणजे जे राहून गेले ते .... या सदरात मोडणारे.त्याकाळी करमणुकीचे प्रमुख साधन म्हणजे रेडीओ.आकाशवाणी व रेडीओ सिलोन यावरील अनेक कार्यक्रम खरोखरच कान देवून ऐकल्याचे आजही आठवते. काही काळ रेडीओ सिलोन वरील पत्रमैत्री पण जोपासली होती.त्यावेळी भारतातील अनेक गावांची नावे माहित झाली काही ठिकाणी मैत्रीचे धागे जुळले गेले पण का कोण जाणे  पण वीण घट्ट झालीच नाही. अनेक गावांची वर्णने ऐकली. पण त्यातून काही गावे त्यांची नावे व मनचक्षु समोर येणारे चित्र यांची उगीचच सांगड घालण्याचा मनास छंद लागला.

आजही चिकमंगळूर म्हटले कि जनता पक्षाची पीछेहाट व इंदिराजींचे जोरदार पुनरागमन इतकेच आठवते. निवडणुका म्हटले कि दूरदर्शनवरील विनोद दुवा यांचे परीक्षण व त्यात यशवंतराव चव्हाण म्हटले कि सातारा आणि बाबू जगजीवनराम म्हटले कि सासाराम यांची आठवण जातच नाही.

काही गावांचे बाबत त्यांचे आजचे रूप पाहिलेले नाही किंवा ते पाहण्याचा योग कधी येईल माहित नाही, पण नालंदा म्हटले कि उच्च विद्याविभूषित गुरुजन आणि त्यांचे शिष्यगण यांनी भारलेले वातावरण, किंवा कुरुक्षेत्र म्हटले कि लष्करी छावणी असे मन चित्र साकारते.

मला तर नेहमी वाटते कि आडनाव आणि गाव याबाबत बाराखडीतील काही अक्षरे यांचा समूह घ्या, एखाद्या अक्षरास काना आणि अथवा मात्रा किंवा उकार द्या, कि झाले आडनाव अथवा गावाचे नाव. पण अशी गावे स्वतःचा कोणताच चेहरा तयार करीत नाहीत. तर काही गावांच्या नावातच एखादा सूर ताल असल्याचा भास होतो. झुमरीतलैया , नैनिताल किंवा विदिशा, मधुबनी हि नावे गावातील जनजीवन खूपच सुखद असल्याचा भास निर्माण करतात.

काही गावांबाबत तिथे जन्मलेले किंवा त्या परिसरात वाढलेले कर्तुत्ववान लोक त्या गावची प्रतिमा अशी तयार करतात कि जणू ते गावच भाग्यशाली ठरते.माझ्या मनात हा गावांची नावे व त्यातील सूर ताल यांचा खेळ सुरु असताना एकदा एका पाठोपाठ एक अशी तीन नावे डोळ्यासमोरून गेली. त्याच्या नावात साधर्म्य होतेच पण त्याच बरोबर बरेच काही होते काय काय सांगू त्याविषयी असे झाले ती गावे म्हणजे ... मालगुडी, मालगुंड, आणि माडगूळ.
त्यापैकी मालगुडी म्हटले कि आर के नारायणन यांची १९८५/८६ सालातील दूरदर्शनवरील मालिका "मालगुडी डेज" व तिचे श्रवणीय संगीत आठवते. त्याच बरोबर शंकर नाग यांचे कलात्मक दिग्दर्शन आठवून दूरदर्शन चा सुवर्णकाळ आजही डोळ्यासमोर साकारतो. या मालिकेचे चित्रीकरण कर्नाटक राज्यातील अगुंबे या शिमोगा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात झाले होते. आर के नारायण यांच्या गोष्टीत उल्लेखण्यात आलेले हे ठिकाण प्रत्यक्षात अस्तिवात आहे कि नाही या बाबत प्रवाद आहे, पण काही लोकांच्या मते ते कोईमतूर हे एका बाजूस नदी व दुसऱ्या बाजूस अरण्य असणारे ठिकाण आहे. काही लोकांच्या मते लालगुडी हे कावेरी नदीतीरावरील ठिकाण म्हणजे मालगुडी होय. काही लोकांच्या मते यादवगिरी नावाचे म्हैसूर जवळील ठिकाण म्हणजे मालगुडी आहे. प्रत्यक्षात काहीही असो, सदर मालिका व त्यातील पात्रे इतकी जिवंत होती कि दक्षिण भारतीय संस्कृतीचे ते अचूक असे जिवंत चित्रण होते.आणि त्यामुळेच मालगुडी डेज ते श्रवणीय संगीत आज पंचवीस वर्षानंतर देखील तोच थरार मनात निर्माण करू शकते.

मालगुडी पाठोपाठ माझ्या मनाने मालगुंड कधी गाठले ते कळलेच नाही. पण मी मालगुंडला काही रत्नागिरी-गणपतीपुळे या मार्गे नाही गेलो बरका, तर आधी गेलो शाळेच्या दिवसात, मग उलगडली मराठीच्या पुस्तकाची पाने आणि पोहचलो त्या कवितेपाशी. शब्द होते...

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने ....
खरोखर मराठी कवितेच्या एका युगावर छाप पडणारा कवी. श्री कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत. कसे असेल त्यांचे गाव आज देखील त्यांच्या त्या कोकणातील गावात जन्मणारे युवक तितकेच पेटून उठणारे असतील का?
का अजूनही त्या तुतारीचा शोधच आपण घेतो आहोत? का कोणत्याच राज्यकर्त्याचे कान यापुढे तुतारीचे स्वर एकुच शकणार नाहीत? अशा प्रश्नांची मालिकाच उभी राहिली. अर्थात या पुढील भारत भेटीत गणपती पुळे येथील श्री दर्शन होताच मालगुंड गाठण्याचा मनाचा निर्धार मात्र आता पक्का झाला आहे.

आणि आता माडगूळ. त्या बाबत तर काय म्हणू ? मराठी साहित्याने ज्या गावामुळे 'मंतरलेले दिवस' अनुभवले, गीत रामायणातील लावण्य असो किंवा 'करुणाष्टकातील' कारुण्य असो, 'सत्तान्तारातील' वन्यजीवांचा संघर्ष असो. माडगूळच्या मातीतील माणसाने दाखवलेली माणुसकी सांगणारे 'माणदेशी माणसे' असो जे काही मराठी साहित्यात उतरले ते या माणदेशी माडगूळच्या मातीतूनच आले आहे. पुण्यात असून पंचवटीतील गजाननाचे चरण स्पर्श करण्याचे भाग्य चुकले पण तात्यांना नमस्कार करण्याचे पुण्य मात्र पदरी बांधता आले. आणि म्हणूच माडगूळच्या मातीने दिलेली दोन नक्षत्रे काळाच्या पडद्याआड गेली असली तरी मराठी मनात कायमच तळपत राहतील यात शंकाच नाही. हे नमूद करून मी माझे गावांच्या नावावरून केलेले हे भ्रमण थांबवतो. कशी वाटली हि शब्द भ्रमंती ते मात्र जरूर सांगा.

Thursday, September 16, 2010

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा .....

आज दि.१६ सप्टेंबर २०१० रोजी मी माझा स्वतःचा मातृभाषेतील मराठी ब्लॉग आपणासमोर उलगडीत आहे. त्यावर आपलेच लिखाण - नव्हे मनातील आंदोलने उतरवावीत - ही इच्छा! पण त्यासाठी समर्पक नाव देखील सुचत नव्हते. शब्द कागदावर उमटताना ही प्रेरणा का व कोणामुळे झाली? असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःलाच केला तेंव्हा किती म्हणून वंदनीय नावे डोळ्यासमोर आली! त्यात आहेत संत ज्ञानेश्वर, मुक्ताई ते संत बहीणाई यांच्या पर्यंतचे शब्दप्रभू , विंदा ते गोनीदां पर्यंतचे साहीत्यिक, आणि डॉ. यु. म. पठाण यांच्यापासून डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या पर्यंतचे विचारवंत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात वंदनीय! व.पू.,पू.ल. यांचे शहरी संस्काराचे सा हित्य, बहीणाबाई ते जनाबाई या संत कवियत्रींचे सहज सुलभ काव्य, किंवा जी.ए., ग्रेस यांचे दुर्बोध, गूढ लेखन - प्रत्येकाने काहीतरी नवे व जीवन समृद्ध करणारे सा हित्य दिले आहे. हे सर्वच जण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेतच, पण तरीही या सर्वांपलीकडे रसाळ, ओघवते व हृदयस्पर्शी लेखन करणारे "गदिमा" हेच माझे प्रेरणास्थान आहे. शब्द तोच - जो तुम्हा आम्हास आगदी परिचयातील असतो - पण त्याची गुंफण जेंव्हा गदिमांकडून होते तेंव्हा त्या शब्दाचा शब्दालंकार बनतो. तर अशा पूजनीय, वंदनीय, मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या आणि आम्हास सुसंस्कृत करणाऱ्या सर्वच विचारवंत, साहित्यिक व माझे प्रेरणास्थान असलेल्या माडगुळकर बंधूंना वंदन करून आज मी माझ्या मराठी ब्लॉगची सुरवात करीत आहे. सुरुवात तर केली आहे, पाहू पुढे काय होते?

माणसाचा स्वसंवाद हा नेहमीच मातृभाषेतून चालतो. आणि म्हणूनच मराठी माणसास ठेच लागली ( आणि ती मराठी माणसास बरेचदा लागतच असते ) की तो कळवळताना OH!GOD असे न म्हणता आईSSSSग्ग ! असेच म्हणतो. कारण मनातून येणारी वेदना मुखातून प्रगटताना ती मातृभाषेतूनच येते. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. हे वाक्य म्हणताना आपण माझी मातृभाषा आणि मला अभिमान या शब्दांवर भर देतो.

आज ब्लॉग सुरु करताना आणखी एक योग साधण्याचा माझा मानस होता. गदिमांचे नाव ज्या रचनांमुळे अजरामर झाले आहे त्या गीत रामायणाने मराठी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. त्या अवीट गोडीच्या रचनांमधील माझी सर्वाधिक आवडती रचना....

दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

प्रथम आकाशवाणीवर प्रसारित झाली त्याला आज दि.१६ सप्टेंबर रोजी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि याच दिवशी मी माझा मराठी ब्लॉग आपणासमोर ठेवत आहे. प्रथमचा प्रयत्न असल्याने आपल्या अभिप्रायाची जरूर वाट पहात आहे.

आजच्या लिखाणाची सांगता करताना एवढेच म्हणेन की …….

श्रीरामाच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या कृष्णा काठच्या बहे या ग्रामी जन्म, बार्शी व कलासक्त करवीर नगरीत बालपण, आणि त्यानंतर पोटासाठी भटकत कोल्हापूर...पुणे... हैदराबाद.... मुंबई...आणि अखेरीस टोरोंटो असा केलेला नव्हे .... असा माझा आजपर्यंतचा घडलेला प्रवास. खूप काही कळते असा अविर्भाव पुणेकर असूनही न आणता इतकेच सांगू इच्छितो की, गेल्या एक्कावन्न वर्षात जे काही अनुभवले ते आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माणूस ठरवत असतो अनेक गोष्टी पण अखेरीस जे घडते, ते विधात्याचे मर्जीनुसार! म्हणूनच सर्वच घटनांकडे मी नेहमीच पाहत आलो आहे ते गदिमांच्या शब्द नजरेतून - आपल्या हाती आहे प्रामाणिकपणे कर्तव्य, कर्म करत राहणे. पण त्यापलीकडे मात्र -

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.....