Thursday, September 16, 2010

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा .....

आज दि.१६ सप्टेंबर २०१० रोजी मी माझा स्वतःचा मातृभाषेतील मराठी ब्लॉग आपणासमोर उलगडीत आहे. त्यावर आपलेच लिखाण - नव्हे मनातील आंदोलने उतरवावीत - ही इच्छा! पण त्यासाठी समर्पक नाव देखील सुचत नव्हते. शब्द कागदावर उमटताना ही प्रेरणा का व कोणामुळे झाली? असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःलाच केला तेंव्हा किती म्हणून वंदनीय नावे डोळ्यासमोर आली! त्यात आहेत संत ज्ञानेश्वर, मुक्ताई ते संत बहीणाई यांच्या पर्यंतचे शब्दप्रभू , विंदा ते गोनीदां पर्यंतचे साहीत्यिक, आणि डॉ. यु. म. पठाण यांच्यापासून डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या पर्यंतचे विचारवंत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात वंदनीय! व.पू.,पू.ल. यांचे शहरी संस्काराचे सा हित्य, बहीणाबाई ते जनाबाई या संत कवियत्रींचे सहज सुलभ काव्य, किंवा जी.ए., ग्रेस यांचे दुर्बोध, गूढ लेखन - प्रत्येकाने काहीतरी नवे व जीवन समृद्ध करणारे सा हित्य दिले आहे. हे सर्वच जण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेतच, पण तरीही या सर्वांपलीकडे रसाळ, ओघवते व हृदयस्पर्शी लेखन करणारे "गदिमा" हेच माझे प्रेरणास्थान आहे. शब्द तोच - जो तुम्हा आम्हास आगदी परिचयातील असतो - पण त्याची गुंफण जेंव्हा गदिमांकडून होते तेंव्हा त्या शब्दाचा शब्दालंकार बनतो. तर अशा पूजनीय, वंदनीय, मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या आणि आम्हास सुसंस्कृत करणाऱ्या सर्वच विचारवंत, साहित्यिक व माझे प्रेरणास्थान असलेल्या माडगुळकर बंधूंना वंदन करून आज मी माझ्या मराठी ब्लॉगची सुरवात करीत आहे. सुरुवात तर केली आहे, पाहू पुढे काय होते?

माणसाचा स्वसंवाद हा नेहमीच मातृभाषेतून चालतो. आणि म्हणूनच मराठी माणसास ठेच लागली ( आणि ती मराठी माणसास बरेचदा लागतच असते ) की तो कळवळताना OH!GOD असे न म्हणता आईSSSSग्ग ! असेच म्हणतो. कारण मनातून येणारी वेदना मुखातून प्रगटताना ती मातृभाषेतूनच येते. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. हे वाक्य म्हणताना आपण माझी मातृभाषा आणि मला अभिमान या शब्दांवर भर देतो.

आज ब्लॉग सुरु करताना आणखी एक योग साधण्याचा माझा मानस होता. गदिमांचे नाव ज्या रचनांमुळे अजरामर झाले आहे त्या गीत रामायणाने मराठी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. त्या अवीट गोडीच्या रचनांमधील माझी सर्वाधिक आवडती रचना....

दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

प्रथम आकाशवाणीवर प्रसारित झाली त्याला आज दि.१६ सप्टेंबर रोजी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि याच दिवशी मी माझा मराठी ब्लॉग आपणासमोर ठेवत आहे. प्रथमचा प्रयत्न असल्याने आपल्या अभिप्रायाची जरूर वाट पहात आहे.

आजच्या लिखाणाची सांगता करताना एवढेच म्हणेन की …….

श्रीरामाच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या कृष्णा काठच्या बहे या ग्रामी जन्म, बार्शी व कलासक्त करवीर नगरीत बालपण, आणि त्यानंतर पोटासाठी भटकत कोल्हापूर...पुणे... हैदराबाद.... मुंबई...आणि अखेरीस टोरोंटो असा केलेला नव्हे .... असा माझा आजपर्यंतचा घडलेला प्रवास. खूप काही कळते असा अविर्भाव पुणेकर असूनही न आणता इतकेच सांगू इच्छितो की, गेल्या एक्कावन्न वर्षात जे काही अनुभवले ते आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माणूस ठरवत असतो अनेक गोष्टी पण अखेरीस जे घडते, ते विधात्याचे मर्जीनुसार! म्हणूनच सर्वच घटनांकडे मी नेहमीच पाहत आलो आहे ते गदिमांच्या शब्द नजरेतून - आपल्या हाती आहे प्रामाणिकपणे कर्तव्य, कर्म करत राहणे. पण त्यापलीकडे मात्र -

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.....

मन हो रामरंगी रंगले ...

मन हो रामरंगी रंगले ...


संगीत तुलसीदास या नाटकातील श्री गोविंद सदाशिव टेंबे यांचे पहाडी रागावर आधारित हे पद स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली रचना. या विषयी मी पुढे लिहणार आहेच. पण त्यातील " मन विश्वरंगी रंगले .... हि माझ्या ब्लॉगच्या नामकरणा मागील प्रेरणा . मनाच्या विचार तरंगातून उठणाऱ्या लहरी. ज्यावर उमटणार आहेत मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने जिथे साकारणार आहेत शब्दचित्रे .