Saturday, November 20, 2010

आठवणी आत्याच्या …..

आठवणी आत्याच्या …..


बहिणाबाई हे नाव आठवले कि अरे संसार संसार ... ह्या गाण्याचे सूर आपोआप मनात फेर धरतात. पण या जेष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्रीच्या गाण्यांबाबत माझ्या आठवणी खूपच वेगळ्या आहेत अनन्वय फाउंडेशन पुणे यांनी एक अतीशय सुंदर कॅसेट सन २००० मध्ये काढली होती.त्यातील या कावियत्रीची जगण्याकडे बघण्याची डोळस वृत्ती दर्शवणारी कविता

आला सास गेला सास

जीवा तुझे रे तंतर

जगन मरन एका सासाचे अंतर ………

हि मनात घर करून राहिली. माणूस आहे आणि माणूस नाही यात फक्त एका श्वासाचे अंतर असते, हे प्रखर सत्य किती अचूकतेने शब्दबद्ध केले आहे ते वाचून मन अंतर्मुख झाले. पुढे एका आत्म चरित्राला " एका श्वासाचे अंतर " हे नाव देखील पाहण्यात आले. त्यानंतर या कवियत्रीच्या कविता सूर ताल या करीतच फक्त न ऐकता त्या पलीकडे जावून जीवनाचा संदेश देणारे काव्य म्हणून त्याचा पुनःप्रत्यय घेण्याची सवयच लागली. असेच एकदा शब्द्दोचार आणि नात्याचे पदर उलगडवून दाखवणारी हि कविता ऐकली…..

माय म्हनता म्हनता ओट ओटालागी भिडे

आत्या म्हनता म्हनता केवडे अंतर पडे

माय म्हटली जशी तोंडातली साय

बाय म्हटली बिरानी जसी भरडली दाय

तात म्हनता म्हनता दातंमदी जिब अडे

काका म्हनता म्हनता कसी मांगे मांगे दडे

जीजी म्हनता म्हनता झाले जीभेले निवारा

सासू म्हनता म्हनता गेला तोंडातुनी वारा …..

आणि या कवितेने मला वेगळाच छंद लावला तो म्हणजे या थोर कावियत्रीस प्रत्ययास आलेली नाती आणि आपण अनुभवलेली नाती यातील सत्य याचा ताळेबंद मांडणे किंवा त्याचा लेखाजोखा घेणे शक्य होईल का ? या विचारांनी मनात थैमान घातले. मन स्वसंवाद करू लागले आणि शेवटी निर्धार केला कि ठीक आहे कदाचित आपल्या शब्दात तेवढे सामर्थ्य नसेल पण अनुभव सूत्रबद्ध होतात का, याचा तरी प्रयत्न करू आणि वरील कवितेतील शब्दांभोवती रुंजी घालता घालता मन ३५/४० वर्षे मागे गेले

वार होता सोमवार आणि तारीख होती ३० जुन १९७५ . पुण्यातील सिमला ऑफिसच्या चौकात सकाळी आठ साडेआठ वाजताच नवी स्वप्ने बघणारी पंधरा सोळा वयोगटातील मुले मुली आणि त्यांचे पालक यांच्या गर्दीचा पूर उसळला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे कार्यालय तिथे होते आणि त्यावेळी सर्व महाराष्ट्रातील शाळांकरिता ते मंडळ प्रमुख म्हणून कार्यरत होते.त्यांनी त्यादिवशी "एस.एस.सी." (त्यावेळची अकरावी) परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.आजच्या सारखे इंटर नेट,किंवा मोबाईल या सुविधा सहज साध्य नसल्याने परीक्षेचा निकाल पोस्टाने शाळांकडे जात असे किंवा संपूर्ण राज्यभरचा निकाल मंडळाच्या कार्यालयात, नव्हे कार्यालया बाहेर पाहण्यास उपलब्ध असे. कारण प्रत्येक परीक्षा केंद्रानुसार निकालाची यादी बोर्डावर चिकटवून असे बोर्ड पदपथावर ठेवले जात. याठिकाणी निकाल पाहण्यास जमलेल्या मुलांची भीतीयुक्त उत्सुकता व पालकांची "यंदा अकरावी" यातून झालेली सुटका कश्या प्रकारची आहे याची ओढ याची छाप गर्दीवर स्पष्ट दिसत होती. त्या गर्दीत मी हि होता पण बरोबर कोणीच नव्हते वडिलांचे नुकतेच निधन झालेले. आई तिच्या नोकरीच्या ठिकाणी तशी नवीन असल्याने रजा घेवू शकत नव्हती. माझ्या पुढे एक वर्ष शिकणारा मोठा भाऊ असे निकाल नेहमीच धक्कादायक असतात हे गृहीत धरून तिकडे न फिरकणारा. बर एखाद्या वर्ग मित्रास म्हणावे, चल, तुझा माझा काय " निकाल लागलाय " ते पाहू तर मी माझ्या मामाकडे सांगली जवळच्या इस्लामपुरात राहून शिकल्याने पुण्यात बरोबर कोणीच नाही. नेमके वातावरण कुंद ,पावसाळी हवा एखादी दुसरी सर येवून जात होती. हवेत थंडीची व मनात भीतीची झोंबरी लाट उठली होती. अखेर माझ्या परीक्षा केंद्राचा बोर्ड सापडला. केंद्र ग्रामीण भागातील असल्याने 'दामले,जोशी कुलकर्णी अश्या गर्दीत नाव शोधण्याची गरज नव्हती व श्री. चिंतामणराव देशमुखांची मित्र धावत येवून आरे आज आपला फायनलचा निकाल आणि तू खेळत काय बसलास तुला निकाल बघायचा नाही का? या प्रश्नास त्यांनी स्थितप्रज्ञासारखे दिलेले उत्तर "दुसरा कोण आला ते बघून ये " अशी हि परिस्थिती नक्कीच नव्हती. पण थोडे हटके आडनाव ' किंकर ' असल्याचा फायदा म्हणजे शोध शोध थोडी सोपी होती . धडधड्त्या अंतकरणाने बोट आणि नजर "क" च्या बाराखाडीवर फिरवली आणि काय? कुंद पावसाळी वातावरण झपाट्याने बदलले मळभ दूर झाले सोनेरी किरणांची एक लकेर त्या बोर्डावर आणि मनावर एकाच वेळी उमटली कारण चक्क निकालाच्या यादीत नाव सापडले. वरती नाव होते कुलकर्णी सीमा गजानन आणि पाठोपाठ माझे नाव. वर्गातील त्या सीमाने इंग्रजीतील व्याकरणाचा प्रश्न सोडवण्यास मदत केल्यानेच त्या पेपरात पास नापासच्या सीमेवर येवून पोहचण्यास मदत झाली होती. अर्थात इंग्रजी बरोबर अकरावी पास हि बिरुदावली कायमची माझी झाली पण पुन्हा त्यासाठी - "THANKS! " म्हणण्यापुरते हि बोलण्याचा योग काही आला नाही. आणि शोधून काढून बोलण्याची सीमा रेषा कधीच ओलांडली गेली नाही.

मनाने परीक्षा केंद्रावरती नेवून पोचविले. किती भारलेले वातावरण असे. आम्हा मुलांचे पालक दोन पेपरच्या मध्ये येवून थंड ताक किंवा दही भात घेऊन भर उन्हात पेपर संपण्याची वाट पाहत थांबल्याचे आज सुद्धा स्पष्ट आठवते. माझी मामी देखील माझ्यासाठी अशीच डबा घेवून येत असे दोन पेपरच्या मधल्या वेळेत आमच्यासाठी त्यांनी केलेली धावपळ आजही मनाची थरथर करते आणि पापणीच्या कडा ओलावतात. त्या मामा मामींकडे धावत जावून पास झाल्याचे सांगावे तर ते दोघेही १२५ मैलावर. आणि अचानक आठवण झाली माझ्या "डेक्कनच्या" आत्याची. होय डेक्कनची एक आणि सातारची एक अश्या दोन आत्या.आणि आमच्याकडे आई आणि बाबा दोन्हीकडे नातेवाईक, नाती गोती थोरला, मधला, धाकटा अश्या वर्गवारीत न मोडता किंवा तात्याकाका , माईआत्या , नानीमावशी अश्या दोन दोन उपाध्यांनी न ओळखता ती गाव,ठिकाण या वरूनच ओळखली जात त्यामुळे मुंबईचा मामा, पुण्याचे दादा,अष्ट्याची आत्या नाशिकचे काका हीच वर्ग वारी आम्हास तोंडपाठ. मग ठरवले धावत जावून पहिली आनंदाची हि बातमी सांगायची माझ्या डेक्कनच्या आत्याला.

आणि खरोखरच शब्दशः धावत निघालो कारण रिक्षा हे त्यावेळी उच्च मध्यम वर्गीयांचे वाहन आणि जवळ बसला देखील पुरेसे पैसे नाहीत. मग काय करणार? पण त्यावेळचे वय आणि त्यादिवशीचे कारण यामुळे विद्यापीठ मार्गे फर्ग्युसन रोड वरून वैशाली समोरची गणेशवाडी कधी आली तेही समजले नाही. सकाळचे अकरा वाजत आले होते पहाटे चार ते दहा या सहा तासांचे दगदगीतून मोकळी होवून आत्या नुकतीच कोठे हुशः करून बसणार तोपर्यंत मी समोर हजर. नक्की कसे सांगावे तोंडातून शब्द फुटत नव्हते. मी सरळ पायावर डोके ठेवले आणि म्हणालो मी पास झालो.त्यावेळी आत्याने उठवून मला जवळ घेतले मायेने पाठीवरून हात फिरवला आणि

" बापाविना पोर " एक दिवस मनुचे नाव काढील. (माझ्या बाबांना आम्ही अण्णा म्हणत असू तर बाकीचे त्यांना मनु म्हणत) असा तोंड भर आशीर्वाद देत ती माझ्या बाबांच्या आठवणींनी धाय मोकलून रडली. मलाच कळेना कि मी तिला पास झाल्याचे सांगून समाधान दिले कि त्रास दिला. पण नंतर फडताळातल्या तिच्या आपत्कालीन राखीव निधीतून रु. १०१ काढून देताना जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता तो पाहता माझी शंका आपोआप दूर झाली. आणि आज पस्तीस वर्षांनतर मागे वळून पाहताना जाणवते ती तिच्या कृतीतील माया आणि आशिर्वादातील ताकद.माझ्या ह्या आत्याचे माहेरचे नाव कुसुम शंकर किंकर. अगदी चार चौघांसारखे साधे नाव, कराड, जि. सातारा या तालुक्याचे गावी बालपण. तो काळ अगदी 'सोन्याचे दिवस ' म्हणावा असा ऐष अरामातील नसला तरी वडिलांचा भागीदारीतील असणारा सराफीचा व्यवसाय हा भरले घरदार म्हणवणारा नक्कीच होता. तिचे वडील माझे आजोबा हे भविष्यातील जाणकार व रत्नपारखी म्हणून परिसरात नावाजलेले पण व्यवसायातील हे यश दृष्ट लागावी तसे बघता बघता दूर गेले,भागीदारीचा शाप खरा ठरला. रोलर कोस्टर प्रमाणे यशाचे शिखर ते रसातळाला हा हि प्रवास काही समजावयाचे आत पूर्ण झाला. घरातील लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी दोघींनी एकाच वेळी पाठ फिरविली माझ्या आजीने हाय खावून मृत्यूस जवळ केले.आत्याचे वय तेरा असताना तीन लहान भावंडे व देशोधडीला लागलेला वडिलांचा संसार तिच्या पदरी टाकून तिने अज्ञाताचा मार्ग धरला. या परिस्थितीत एखादीने लग्नानंतर माहेर नशिबात नव्हतेच असे म्हणत जबाबदारीतून सुटका करून घेतली असती, पण माझ्या आत्याने किंकारांची चंद्रमोळी झोपडी सोडताना तेथली कष्टाची सवय आणि परिस्थितीवर मत करण्याची जिद्द बरोबर घेताना, नवऱ्याचे सुख व भावंडांची जबाबदारी हेच पुढील जीवनाचे ध्येय मानले.

किंकारांची कुसुम इनामदार झाली कलेढोण येथे गाईगुरे, शेतीवाडी अश्या राबत्या घराची लक्ष्मी झाली. अर्थात माहेरी वडील भावंडांसाठी राबणारे हात आता इनामदारी थाटासाठी राबू लागले.आत्याचे यजमान राजारामपंत हे नेहमीच नाकासमोर सरळ चालणारे व शिस्तप्रिय. मामांच्या ओळखीने मिळालेली लष्करातील नोकरी त्यांनी लष्करी शिस्तीने टिकवली. आत्यास स्त्री स्वात्यंत्र दिले आणि सर्व जबाबदारीपण दिली. त्यामुळे आत्या नवरा म्हणजे जणू चौथा मुलगाच सांभाळत होती. काटकसरीने संसार हा शब्द प्रयोग आपण नेहमी वापरतो. पण दर महाचे धान्य भरल्यावर पुड्यांचे कागद साठवून रद्दी घालणे, आणि पुडीचा दोरा जपून ठेवून त्याचा पडदा करणे, हे काटकसरी चे मार्ग म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्याचा खराखुरा प्रयास होता. पुढे मुले वयाने मोठी झाली, दिवस पालटले तसे तिने सुना ,नातवंडे या पुढच्या पिढ्यांना आपलेसे करताना न आपण भोगलेली दुखेः उगाळली,ना कोणास अडचण होईल असे वागली.

हि माझी आत्या वयाचे पंधराव्या वर्षी कुसुम राजाराम इनामदार झाली. माहेरी ती चार भावंडातील सर्वात थोरली. तिच्या खेरीज माझे बाबा म्हणजे यशवंत,काका व्यंकटेश, व आणखी एक आत्या म्हणजे निर्मला. यशवंत माझे बाबा हे कमलाकर उर्फ मनु, व्यंकटेश माझे काका हे पंडित, तर धाकटी आत्या निर्मला हि नमू व आज जिच्या आठवणी आपणास सांगत आहे ती थोरली आत्या हि अक्का या नावाने ओळखली जात असे. बाबांकडे आत्या थोरली म्हणून ती 'अक्का' तर माझ्या आजोळी आई भावंडात थोरली म्हणून तीही 'अक्काच' आणि हे केवळ नाम साधर्म्यापुरते मर्यादित नव्हते. आम्हा सर्व भावंडांसाठी ती दुसरी आईच होती.

माझे बाबा ज्यांना आम्ही अण्णा म्हणत असू, त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात नोकरी केली. जर त्यांनी सहकाराचा 'खा आणि खाऊ द्या!' हा मंत्र जपला असता तर कदाचित सहकार आयुक्त किंवा सहकार सचिव पदा पर्यंत पोहचून सेवानिवृत्त झाले असते, पण त्यांच्या मानी नव्हे स्वाभिमानी वृत्ती मुळे त्यांच्या वाट्याला आली सक्तीची सेवानिवृत्ती.तो काळ होता सन १९६८/६९चा, कोल्हापूर येथील भाड्याचे जागेचे दरमहाचे रु.४०/-हे घरभाडे थकू लागले नोकरी नाही म्हणून शेवटी त्यांनी पुण्यास मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला.

त्यामागेदेखील नव्याने संसाराची जुळवाजुळव करताना आक्काचा आशीर्वाद व पाठिंबा राहील हाच विचार मनात असावा असे वाटते. पुण्यात जागा मिळणे अवघड व खर्चाच्या मर्यादा यामुळे पुण्यास येवून सुद्धा एक खोली चाळवजा वाड्यातील कोथरूड येथे घेतली. त्याकाळी ते ठिकाण इतके दूर होते कि पालखी दर्शन किंवा गणेश उत्सव या करिता जिमखान्यापर्यंत येणारे "कोथरूडकर" पुण्याला चाललो असे म्हणायचे. त्या कोथरूड येथे एका खोलीत बाबांनी संसाराची दुसरी खेळी सुरु केली. आर्थिक आघाडीवर मागील पानावरून पुढे चालू हेच होते पुण्यातही दरमहा दररोज दीड किंवा आठवड्यातून एकदा दोन मापे इतकेच दुध घेवून देखील दरमहाचे रु.१५ व घरभाडे रु.४० हे देखील थकू लागले. त्यावेळी स्वतःचे संसारचे ठिगळ जोडता जोडता मायेची शाल पांघरणारी आत्याच होती.

आत्याचे यजमान कष्टाळू व आपण बरे आपला प्रपंच बरा अश्या वृत्तीचे त्यामुळे न त्यांना मदतीची अपेक्षा न त्यांच्या कडून मदतीची अपेक्षा. पण यामुळे आत्या उचलून काही थेट मदत करू शकत नव्हती. मग त्यावरही तिने उपाय शोधला दरमहाचे वाणी समान भरताना यजमानांना कधी सण आहे कधी पाहुणे येणार आहेत असे सांगत गरजेपेक्षा थोडे जास्तीचे सामान प्रथम पदरात पडून घेणे आणि नंतर त्यातील थोडे थोडे सामान बाजूला काढून ते १५/२० किलोचे ओझे हातातून वागवत डेक्कन ते कोथरूड असा ४ कि.मी चा प्रवास जाता येता पायी करणे आणि हि मदत कमी कि काय म्हणून माझ्या भावाला जो त्यावेळी जिमखान्यावरच्या 'भावे स्कुल' आताची विमलाबाई गरवारे प्रशाला येथे शिकत होता . त्याला दररोज एक वेळ जेवण सकाळचे देण्याचे महत पुण्य हि तिने कोणालाही न सांगता अनेक वर्षे पार पाडले. एखादे दिवशी काही कारणांनी यजमानांनी सुट्टी घेतली असेल व माझा भाऊ शाळेत जाण्यापूर्वी सकाळचे जेवणासाठी घरी आला तर माझी आत्या इतकी समयसूचक वागत असे कि रोजच येणाऱ्या माझ्या भावास पाहून " अरे शेखर आज इकडे कसा काय आलास ? सर्व ठीक आहे ना ? असे विचारात बर आला आहेस तर आज जेवूनच जा असे म्हणून आपले कर्तव्य न चुकता पार पाडत असे.माझा थोरला भाऊ माझे वडील अकाली गेले त्यावर्षी अकरावीत होता. त्यावर्षी वडिलांचे आजारपण ,मृत्यु, त्यानंतर आईने सुरु केलेली महिला उद्योग लि. हि कारखान्यातील नोकरी या सर्वांमुळे माझ्या भावास एक शैक्षणिक वर्ष गमवावे लागले. पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये परीक्षा फॉर्म भरण्याचे शेवटचे दिवशी आई कामास गेलेली, आम्ही तीन भावंडेच फक्त घरी होतो. फॉर्म भरण्यासाठी घरी पुरेसे पैसे नाहीत काय करावे हे मोठे प्रश्नचिन्ह. प्रथम आठवली ती आत्या पण त्यादिवशी ती घरीच नव्हती. अडचण म्हटले कि आत्या या उक्ती नुसार ते दार ठोठावूनच भाऊ घरी आला होता. मग काय करावे? मला आठवते आहे तेंव्हा घरातील एक पितळी तांब्या मोडीत घालून तू फॉर्म भर असा पर्याय मी सांगितला . प्रथम त्यास भावाची तयारी नव्हती पण आईस सांगण्याची जबाबदारी माझी असे सांगून दुपारी तीन पूर्वी सर्व सोपस्कार पार पाडून भावाने फॉर्म भरला. रात्री आईस मी मोठ्या धीराने भावाचे वर्ष वाचावे म्हणून घेतलेला निर्णय सांगितला तेंव्हा आईच्या डोळ्यात पाणी आले मला वाटले कि तांब्या मोडला म्हणून आईस वाईट वाटले पण ते अश्रू त्राग्याचे नव्हते तर समाधानाचे होते मुलांना वेळ आणि शिक्षण यांचे महत्व समजले याचे होते. त्या वर्षी भाऊ परीक्षेत पास झाला पुढे आय . टी. आय. मध्ये प्रवेश घेत पुढील शिक्षण पूर्ण केले. पण तो फॉर्म भरण्याचा दिवस आठवला कि आज हि तो दिवस जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. पुढे कित्येक दिवस माझी बहिण माझा भाऊ शेखर यास माहित आहे तांब्या मोडून अकरावी झालाय ते? असे चिडवत असे.अशी हि माझी आत्या दिसयला कशी होती या प्रश्नाला देखील माझे उत्तर म्हणजे दुसरी बहिणाबाईच तशीच नऊ वारी साडी, मोठे कुंकू, डोळ्याला चष्मा, आणि कष्टाळूही बहिणाबाई या कवियत्री सारखी. मला तीन आत्तेभाऊ त्यातील मधला तात्या उर्फ सुभाष हा संघाच्या चळवळीतला व माझ्या बाबांशी सूर जुळलेला त्यामुळे पुढे आमच्याही नियमित संपर्कातला. त्याला आत्याची आठवण म्हणजे लहानपणी त्याने एकदा घरातून चार आणे घेवून न सांगता बुंदीचा लाडू खाल्ला हि गोष्ट आत्याच्या नजरेतून सुटली नाही पण तिने ना मारझोड केली ना रागावली पण त्याला देवासमोर उभा करून म्हणाली म्हण देवाला मी चुकलो पुन्हा असे करणार नाही आणि शब्दशः नाक घासायला लावले. आणि या संस्कारामुळेच हाच माझा आत्तेभाऊ प्रथम प्रचारक व नंतर थर्मेक्स, कल्याणी ग्रुप, अशा विविध कंपन्यात काम करत करत शेवटी एका बहुराष्ट्रीय कंपनीचा एम. डी. म्हणून निवृत्त झाला. आज हि निवृतीनंतर स्वस्थ न बसता त्याने समाज कार्यात स्वतःला पूर्णता गुंतवून घेतले आहे. दरवर्षी त्याच्या घरी साजरी होणारी रामनवमी हि तर माझ्या आत्याच्या- सत्य बोला, सत्य चाला, राम तुमच्या पाठीला. या संदेशाची आठवण करून देणारी एक संस्काराची चळवळच झाली आहे.

माझा थोरला आत्येभाऊ सुधाकर यांनी कष्ट आणि बचत याचे बाळकडू आत्याकडून घेत बजाज ऑटो लि. येथे नोकरी करत जादावेळ काम, साप्ताहिक सुट्टीस काम करत स्वतःचे छोटेसे घर सर्वात प्रथम बांधले.

आज माझ्या आत्याचे माघारी माझे सर्वच आत्येभाऊ दिवाळी एकत्र साजरी करतात. माझा धाकटा आत्येभाऊ मुकुंद याचेकडे दिवाळीचा फराळ म्हणजे खरीखुरी मेजवानीच असते. वहिनींनी केलेला प्रत्येक पदार्थ फक्त लज्जत वाढवतो असे नाही, तर आत्याच्या हातच्या तिखट,

गोड पदार्थांच्या स्मृती जागवतो एकूणच कायतर सर्वात धाकटा आत्येभाऊ मुकुंद यास आत्याकडून हाताची चव आणि शीघ्र काव्य यांचे वरदान मिळाले ,त्यामुळे माझी आत्या सुगरण असल्याची साक्ष त्याचे घरी आजही सहज दिसते. मी माझ्या आत्यास सुगरण म्हणताना आजही दिवाळी आली कि तिचे पाकातले चिरोटे असे काही डोळ्यासमोर येतात कि जर तिला आर्थिक पाठबळ असते तर ह्या चिरोट्याच्या ब्रन्डने चितळे बंधूंच्या बाकरवडीशीच स्पर्धा केली असती. त्याप्रमाणे पुरणपोळी, शंकरपाळी हि एक खासियत. हे सणासुदीचे पदार्थ सोडाच पण रोजचे जेवण आणि चकोल्या, घवल्याची उसळ यांचे नुसते नाव देखील आत्या सुगरण असल्याची आठवण देते.कष्ट आणि आत्या हे नाते तर इतके घट्ट होते कि पहाटे साडे चारला सुरु होणारा तिचा दिवस थेट रात्री दहा वाजताच संपत असे. माझा सर्वात थोरला आतेभाऊ नाना उर्फ सुधाकर हा आत्यासाठी धान्याची पोती निवडण्याकरिता सायकल वरून घरी आणत असे व दुपारच्या वेळेत 'कामातील बदल हीच विश्रांती ' हि तत्व प्रणाली वापरून आत्त्या बैठक मारून ते धान्य निवडून परत पाठवीत असे. पण या कष्टातून तिने इतकी बचत केली कि दोन वर्षे सातत्याने हे जादा काम करून जिद्दीने तिने चार सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या. वकील लोक मिळकतीशी निगडीत कागद पत्रे बनवताना जो ‘स्वकष्टार्जित’ मिळकत हा शब्द प्रयोग वापरतात तो का याचे ज्ञान मला त्या बांगड्या बघून झाले.

याप्रकारे कष्ट करताना मुलांना देखील तिचे हेच सांगणे होते कि तुम्ही काम करण्यात लाज बाळगू नका , काम कोणतेही असो ते ताठ मानेने करा. आणि त्यामुळेच दिवाळीची सुट्टी म्हणजे प्रथम काम करून चार पैसे उभे करा आणि मग दिवाळी साजरी करा असे तिचे सांगणे असे. माझे तिन्ही आत्येभाऊ त्यामुळे दिवाळीची सुट्टी शाळेला लागली कि घरोघरी जावून उटणे, सुवासिक तेल या गोष्टी दारोदार फिरून विकत असत आणि त्यातून झालेली कमाई फटाके, नवे कपडे यांच्या खरेदीस हातभार लावण्यासाठी वापरात असत. म्हणजेच स्वकष्टार्जित व स्वाभिमानी उत्पन्न हेच सुखी जीवनाचे मार्ग आहेत याचे बाळकडू कृतीने संस्कार करीत आत्याने दिलेत हेच यातून जाणवते.माझ्या आत्ये-भावांशी बोलतांना जेंव्हा तिच्या आठवणी निघतात तेंव्हा एकदा माझा एक आत्येभाऊ सहजच म्हणून गेला कि आमची आई म्हणजे काय तिला कोणीही गंडवू शकत असे. ती भाबडी होती.

पण मला आठवणारी माझी आत्या त्यांच्या चार भावंडात थोरली. या माझ्या आत्याबाबत मी तर असे म्हणेन कि ती फक्त भाबडीच नव्हती तर तिने आयुष्यात पत्नी, आई, बहिण, नणंद, भावजय आत्या, आजी, मावशी अशा प्रत्येक नात्याचा पदर इतका सुरेख जपला कि प्रेम ,माया, आपुलकी, जिव्हाळा,उपकार, या शब्दार्थांसाठी शब्दकोश न बघता आत्याकडेच बघावे.

माझ्या वडिलांच्या डायरीतील पुढील परिच्छेद याचीच साक्ष देणारा आहे अशी माझी खात्री आहे. ……

“मनातल्या विचारांबरोबर घराबाहेर पडलेले पाऊल आता पुढेच पडावयाचे होते. थांबायचे नव्हते मागे वळून पहावयाचे नव्हते. आमची आई तशी लवकरच वारली तिच्या मागे आमच्या थोरल्या बहिणीने आम्हा लहान भावंडांना आईचे प्रेम दिले. ती तर गावातच राहत होती. आमच्या सबंध घरादाराशी जवळीक राखून होती ती, तिची मुले एक बंडखोर तर एक अबोल त्यागी तर एकाचा स्वभाव माझ्या मोठ्या मुला सारखा गूढ, त्यांचा जिव्हाळा. पावले आपोआप नकळत तिच्या घराकडे वळली. तीच घर तर मला परक नव्हतच. आई गेल्यावर एकाकी पोरकेपणावर तीनच फुंकर घालून दुखः हलक् केलेले. पण तिच्याशीही मोकळेपणे बोलावयाची चोरी. "जगावेगळा विक्षिप्तपणा" अशा शेलक्या शब्दात ती माझी संभावना करायला मागे पुढे पाहणारी नव्हती. जितकी प्रेमळ तितकीच शिस्तीची भोक्ती. ती रागावणे शक्य होते नव्हे तो तिचा हक्क होता. आणि मुख्य म्हणजे तिला हुकमत गाजवायची नसली तरी तिच्या प्रेमळ परंतु हुकमतीच्या शब्दापुढे मी पांगळा होतो. तिचे सामर्थ्य शब्दातले नसून त्यागातले, आपलेपणातले. भावाचे कल्याण व्हावे या शुद्ध हेतूतून निर्माण झालेले. मी अशावेळी काय करणार? मी एकटा आहे निर्णयात कोणी सहभागी नाही तुझा तू एकट्याने घ्यावयाचा म्हणजे जबाबदारी अधिकच वाढलेली. त्यातून ती एक स्त्री. ती माझ्या पत्नीचीच बाजू घेणार मग चक्क उरावर धोंडा ठेवून तथाकथित मोकळ्या वातावरणात हवापाण्याच्या गप्पा मारून क्षेमकुशल विचारून तिची मूर्ती भक्ती युक्त अंतकरणाने डोळ्यात साठवून निरोप घेतला.”

माझ्या वडिलांच्या या भावना म्हणजे त्यातून त्यांचा माझ्या आत्या विषयी असलेला पराकोटीचा आदर व्यक्त होतो. आणि खरोखरच,अश्या आदरास ती पात्र देखील होती. अशा किती म्हणून आठवणी सांगू ? मी तर म्हणेन मला माझ्या आत्याचे रूपाने माणसा माणसातील चांगुलपण भेटले. आजही कोणी मला जेंव्हा म्हणते तुला काय माहित आम्ही किती कष्ट काढलेत? तेंव्हा मला म्हणावे वाटते अरे बाबा असतील तुझे कष्ट मोठे,गेला अशील तुही दुर्दैवाच्या फेऱ्यातून पण हेही दिवस विसरून आनंदात कसे जगावे हे शिकायचे असेल तर मात्र तुला माझ्या आत्याचे परीक्षेतच पास झाले पाहिजे.

कराडचे आई माघारी भावंडांना सांभाळत काढलेले कष्ट असोत अथवा कलेढोण येथील शेतीवाडी,गुरेढोरे अश्या राबत्या घरात काढलेले कष्ट असोत किंवा नवऱ्या पाठोपाठ पुण्यासारख्या शहरात येवून एका खोलीतील केलेला संसार असो, कष्टांची मालिकाच आत्याबरोबर आयुष्यभर साथीला राहिली. पण त्याची खंत मात्र तिने मनात कधीच बाळगली नाही. पुढे लौकिक अर्थाने सर्वच मुलांचे संसार मार्गी लागले सुना, नातवंडांनी देखील आपल्या जबाबदाऱ्या पार पडल्या.

आणि मग या सर्वच आठवणींनी मन कातर होते लेखाच्या सुरवातीस कवियत्री बहिणाबाई यांची जी कविता नमूद केली आहे त्यात नातेसंबंध व शब्दोच्चार यांचा सुरेख सबंध दाखवीत कवियत्रीने नात्याचा ओलावा सांगताना - आत्या म्हणता म्हणता केवडे अंतर पडे. हे नमूद करताना द्न्तव्य उच्चार स्पष्ट केला आहे पण माझी आत्या म्हणजे - आत्या म्हणता म्हणता केवडे अंतर पडे नसून, आठवणीने तिच्या आजही अंतरी पीळ पडे, अशीच होती असे म्हणेन .

अगदी अखेरच्या दिवसात वयोमानाने येणारे आजार आणि वार्धक्य यांनी तिच्यावर कब्जा केल्यावर देखील त्यासाठी कुढत न राहता माझ्या मागे माझ्या नवऱ्याची देखभाल नीट होईल ना? या विचारातच ती राहिली. आणि आपल्या निकट वर्तीय लोकांकडून त्याचीच हमी घेवून वयाचे ८० व्या वर्षी आपले सहस्त्र चंद्रदर्शन पूर्ण होण्याआधी पण सर्वाना सहस्त्र चंद्राची शीतलता वाटतच महायात्रेस दि. ४ सप्टेंबर २००३ रोजी प्रयाण केले.

मनोगत दिवाळी विशेषांक २०१० मध्ये पूर्वप्रकाशित.


Thursday, November 4, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

मराठी ब्लॉग विश्वचे सर्व व्यवस्थापकीय सदस्य , वाचक,
सर्व ब्लॉगकर्ते हितचिंतक यांना ......
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !


शुचिर्भूत होऊनी पहाटे
य-अंधकारा लोटू दूर
दीप सहस्त्र तेजोमय उजळून
पालटून टाकू तमाचा नूर
चन देऊनी सहकार्याचे
लीहू मैत्रीचे गीत मधूर.....

Monday, November 1, 2010

अत्तराच्या कुपीची गोष्ट…..

पावसाचा हलकासा शिडकावा तापलेल्या धरित्रीवर झाला आणि बघता बघता सुट्टी संपल्याची घंटा झाल्याबरोबर मुले जशी मैदानातून पळतात तशी ढगांची पांगा पांग झाली. त्याच बरोबर वातावरणातला भरून राहिलेला कुंद्पणा आपोआप कमी झाला. हवेत एक सुखद गारवा आला. त्याने हलकेच खिडकी उघडली आणि त्याच बरोबर घर त्या मातीच्या वासाने भरून राहिले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. जणू त्या मृदगंधाबरोबर वारा त्याच्या गत आठवणींचा ठेवाच घेवून आला होता. अर्थात वास हा आपल्यासारख्या सामान्यांसाठीचा शब्द. त्याच्या साठी तो एक 'गंध'-अनाम .तसा तो थोडसा चोखंदळच म्हणा अगदी ‘गंध ‘पारखी नसला तरी निवडक आणि दर्जेदार अत्तरांचा वापर हि त्याची खासियत. त्यामुळे ऑफिसात देखील त्याचे अस्तित्व इतरांना किंचितसे सुगंधित असेच असे.पण त्याची हि आवड हे काही चोचले नव्हते. त्याच्या आवडीच्या एकदोन गंधा पलीकडे तो फारसा रमला नाही.
त्याच्या छोट्या पण सुबकतेने मांडलेल्या घरात त्याने आवडीने जपलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे एक छोट्खानी प्रदर्शनच त्याच्या हॉलमधील त्या सुंदर काचेच्या कपाटात असे. त्यात केंद्रस्थानी होती एक अत्तराची कुपी, पण कशी ? तर पूर्णतः रिकामी. ती कुपी अशी काही मांडून ठेवली होती की,वाटावे त्यात जुना गंध नव्हे तर जुन्या आठवणीच जणू बंद करून ठेवल्या आहेत. कधी जर त्याला त्यावरून छेडले तर तो बोलत नसे पण सहजतेने विषयांतर मात्र करीत असे. जणू त्याला ती कुपी बंदच ठेवायची होती.
पण आज त्याने घेतलेल्या दीर्घ श्वासाबरोबर त्या गंधांनी त्याला गत स्मृतीच्या गर्तेच ढकलले. आणि त्याचे स्वगतच सुरु  झाले......
सन १९७६/७७ चा काळ. कॉलेज नुकतेच सुरु झाले होते. तालुक्याचे ठिकाणचे गाव. गावातील वस्ती आणि कॉलेज दोन्ही हळूहळू वाढत होते.तो काळ म्हणजे मार्कांची टक्केवारी आणि पुढील शिक्षणाची दिशा याचे नाते देखील ठरून गेलेले. ८० टक्के किंवा अधिक मार्क, मग सोडा गाव आणि जा मेडीकल अथवा इंजीनियरिंगला तेही मुंबई, पुणे इकडे. ७५ टक्के मार्क्स मग मेडीकल अथवा इंजीनियरिंगला प्रवेश पण जा सांगली आणि अथवा सोलापूर, कोल्हापूर सारख्या जिल्ह्याचे ठिकाणी. ७० टक्के मार्क्स मग सायन्स साईड तीही हव्या त्या गावी ६० मार्क्स कॉमर्स आहेच.आणि पास आहात तर मग आर्ट आगदी आर्ततेने वाट पाहत आहे. असा तो सरधोपट काळ. आम्ही अकरावी जेमतेम पास. पण पी.डी. ( पदवी पूर्व ) परीक्षेत ६० टक्के पदरात पडले आणि कॉमर्सचे दार उघडले.
आमचे कॉलेज म्हणजे वर्गात १०० मुले तर एक दोन मुली. त्यामुळे 'मैत्रीण' हि संकल्पना तशी गोष्टीतच राहिली. मला आठवतेय आमच्या वर्गात माझा एक मित्र होता.त्याचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेल्यामुळे इतर मित्रांपासून थोडासा दुरावलेला. फारसा कोणात आपण होवून न मिसळणारा. पण त्याचे घर आमच्या घराचे जवळ त्यामुळे कॉलेज  साठी आम्ही बरोबर जावू लागलो. त्यातून आम्ही आपोआपच एकत्र आलो. आभ्यासासाठी त्याचे घरी येणे जाणे झाले. त्यातून त्याची अभ्यासातील गोडी वाढत गेली. का कोण जाणे पण एकूणच मित्राबरोबर सर्व घराशी नाते जुळून गेले. त्यावर्षी त्याच्या मधल्या बहिणीचे लग्न ठरले.
मग काय आम्ही मुलीकडचे आपोआपच ' नारायण ' झालो. पडेल ते काम तेही आनंदाने असे आमचे तीन चार आठवडे भुरकन उडून गेले. लग्न दोन दिवसांवर आले होते. पाहुण्याची वर्दळ वाढली. आणि त्या दिवशी त्या दोघी आल्या. दोघी बहिणी बहिणी. थोरली असेल पंधरा / सोळा वर्षाची, तर धाकटी बारा / तेरा वर्षाची परकरी पोर. अर्थात माझे वय देखील फार तर सतरा वर्षाचे पण नकळते. लग्नाच्या धांदलीत कधी त्या दोघींकडे मन खेचले गेले ते कळलेच नाही. माझ्या मित्राचे घर म्हणजे एक जुना वाडा होता. काटकोनात वळत जाणाऱ्या गल्लीचे कोपऱ्यात वाड्याचे मोट्ठे दार त्यातून आत जात एक छोटा बोळ पार केला कि मित्राचे घर.मग छोटा सोपा , पाठो पाठ अंधारे माजघर उजव्या हाताला माडीचा जिना समोर सैपाकघर. माजघर आणि सैपाकघर यांच्या मधील उंबरा म्हणजे माझी बैठकीची जागा. तिथे बसून माझे तासंतास कसे जात ते आठवले कि आजही हसू येते. त्या दिवशी 'गृहमुख' झाले जेवणावळी उठत होत्या आणि माझ्या मित्राच्या आईने घरतील सर्वांना अत्तर लावण्याचे काम मला दिले. घर भर हिंडून माझे काम सुरु झाले. आणि अचानक माजघरात त्या दोघी समोर आल्या मग काय अत्तराचा सुगंध नाकातच काय पुरा डोक्यात गेला. घाकटीने हात पुढे केला आणि वास घेत बाहेर पाळली देखील आता समोर थोरली सलज्ज पण मोहरलेली. मन एकदम मोरपिसे झाले. मी तिचा हात हातात घेतला निमित्त अत्तर लावण्याचे पण स्पर्शाने या हृदयातील सुगंध त्या हृदयात कसा पोहचला ते कळलेच नाही.अजाणत्या वयात मन जाणते करणारा तो स्त्री स्पर्श जणू माझे जगच बदलून गेला. सगळे मिळून सहवास दीड मिनिटांचा. पण आठवणी आजही तितक्याच ताज्या . अंधाऱ्या माजघराने जणू आयुष्याच्या प्रकाश वाटा दाखवल्या. मित्राच्या बहिणीचे लग्न झाले. पाठवणी झाली . मांडव रिता झाला. त्या दोघी मांडवातूनच गावी परतल्या. पण त्या दीड मिनिटाने माझे आयुष्यच बदलले. आठवणीचे मोरपीस सतत हळुवार स्मृतींना जागवू लागले. काही दिवस आठवणीच्या गावी सततचा मुक्काम असे. लग्नघर आणि अंधारे माजघर डोक्यात लख्ख राहिले. पण ना नाव विचारलेले ना पत्ता घेतलेला मित्राशी या विषयावर बोलायचे कसे? अखेर मन अभ्यासात आणि जीवन आभासात कसे गुंतले कळलेच नाही. पुढे पदवी पदरात घेवून पुण्यनगरीत पाय ठेवला. दिवस भर भर पुढे सरकत होते. अगदी छोट्या कापड दुकानात सेल्समन, ( आणि अभिमान काय तर प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर,त्या दुकानात कापड खरेदीला येते.)कंपनीसाठी क्लार्कस, मग मध्यम कंपनीसाठी कॉस्ट असिस्टंट असा प्रवास सुरु असताना अचानक एका बँकेत नोकरीची सुरवात. आणि आम्हाला स्वर्ग दोन बोटे उरला.कारण काय तर नोकरी आणि तीही बँकेतली.

आणि एक दिवस चक्क तीच शोधात आली. हो कारण माझ्या मित्राकडून पत्ता घेवून एवढ्या पुण्यात तिने शोधून काढले होते. १९७७ नंतर एकदम १९८७ मध्ये भेट.१० वर्षांचा काळ अगदी दहा मिनिटात भरून निघाला. माजघरातील ‘अत्तराची कुपी’ पुन्हा एकदा उघडली गेली. मन आठवणी आणि अभिमानाने भरून आले.जणू काही मध्ये काही काळ गेलाच नव्हता. “पुन्हा कधी का रे नाहीस भेटलास ?” तिच्या प्रश्नाने उर भरून आला. वाटले म्हणजे आहे कोणी तरी वाट पाहणारे. मोरपंखी क्षण पुन्हा एकदा उलगडले. म्हटले काय सांगू ? किती रात्री जागवल्यात तुझ्यासाठी.आणि सरळ सरळ तिला विचारले,” का का म्हणून शोधात आलीस ?”तर म्हणाली,”अरे पदवी झाली, गावी पुढे शिकायची सोय नाही.जवळचे मोठे गाव पुणे . इकडे यायचे ठरले. आईस एकदम आठवले कि तू आता पुण्यास असतोस. म्हटले भेटावे काही मदत होती का पाहावे.”मनात सतारीची तार अलगद छेडली गेली. मदत काय म्हणतेस मी तुझाच आहे.मग काय भटकणे सुरु झाले दिवस पालटू लागले. माझी नोकरी, तिचे कॉलेज दर आठवड्यास तिचे गावी जाणे यातून भेटीपेक्षा विरहच अधिक अनुभवास येवू लागला. असेच एकदा घरी ये कोणी असणार नाही तेंव्हा म्हणून बोलावले.ती आली किती विश्वास दाखवला तिने मन भरून आले. आनंदाने काळीज फुलले. प्रेमाने शारीरिक आकर्षणावर मात केली.  ती आली आणि गेली सूर झंकारले पण सतार अस्पर्शच राहिली. पुन्हा काही दिवस गेले. मे महिन्याची सुट्टी म्हणून ती गावीच गेली आणि एक दिवस अचानक तिचे पत्र बँकेत आले. आयुष्यातील एकमेव प्रेमपत्र हो मी तर त्याला प्रेमपत्रच मानतो. छोटेसेच वहीतील पण पंधरा वीस ओळींची मोती पसरलेली अक्षरे . तिने लिहले होते. लग्नाचे काय ठरवले आहेस अधून मधून भेटण्याचा टाईम-पास नको. वाचून चर्र झाले दहा वर्षापूर्वीचा पहिला स्पर्श आठवला. त्यातील जपलेली मोरपंखी निरागसता आठवली. बर खरेतर तीही आठवणीची कुपी बंद होवून आतल्या कप्यात दडली होती.कोण आले होते शोधात ती कुपी. का माझ्यासाठी ती अंतरंगातील कुपी होती, आणि तिच्या साठी नव्या गावी स्थिरावण्यासाठी हवी असणारी तात्पुरती मदत होती ? तिचे एकूणच वागणे गूढ वाटले. पुनर्भेटीचा तो सोहळा मी मनात कायमचा साठवला घरी बोलावले पण मर्यादा राखली. आणि किती सहजतेने लिहिले कि टाईम-पास नको.म्हणजे माझ्यासाठी काळ गेला आणि तिच्या साठी फक्त घड्याळाचे काटे सरकले? पंधरा ओळीनी पंधरा दिवस डोक्यात 'भुंगा' राहिला हे असे का ? म्हटले पुण्यातल्या पुण्यात असून हि पत्र पाठवते.आपण समक्ष भेटूनच खुलासा करूयात कि अग हा काही टाईम पास नाही.खरे तर हा परस्परांना आतून समजण्याचा समजून घेण्याचा,खूप दूरचा प्रवास आहे ज्यात त्या वळणाची मी वाट पाहत आहे. जिथे वाट नागमोडी होईल,पण मने सरळच राहतील. हात हातात गुंफून पुढील प्रवास करायच्या आणाभाका पुऱ्या होतील पंधरा दिवस मनाशी घोकून घोकून भेटीत काय बोलायचे कसे बोलायचे ठरवून तिला भेटायला तिच्या रूम वर गेलो तर भले थोरले कुलूप बंगल्यातील ते छोट्खानी आउट हाऊस, त्या समोर मी भांबावलेला उभा बंगल्याची मालकीण समोर येत म्हणाली,”अरे! ती गावी परत गेली कायमची. तिचे लग्न ठरले आहे.” माझे मलाच कळेना मी काय ऐकतोय? पण तेच वास्तव होते. कुलुपबंद दाराने आयुष्यातील सर्वच वाटा कायमच्या बंद केल्या आहेत हे जळजळीत वास्तव समोर आले. मी ज्याला प्रेम मानले ती तिची सोय होती.त्यामुळे तिचे पत्र म्हणजे जणू 'कारणे दाखवा नोटीस' होती कारण आता ती कायदे तज्ञ झाली होती. कोणत्याही कोर्टाची पायरी न चढताच पहिली लढाई मी हरलो होतो. शिक्षा काय तर स्मृती पटलावर कोरलेली प्रतिमा पुसता येत नव्हती. आणि ती तेथून काढून टाकायची तर भळभळती जखम आयुष्यभर ‘अश्वत्थामा ‘होणार होती.खरे तर मित्राला गावी जावून गाठून तिचा पत्ता घेवून पुन्हा एकदा तिच्यासमोर दत्त म्हणून उभे राहावे असे वाटत होते. पण जर ती नववधु म्हणूनच पुढे आली तर? ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते. प्रतिस्पर्धी वकीलच केस जिंकून गेली होती कारण माझ्याकडून कोणत्याच कोर्टात अपील होणार नव्हते. मी हरून जिंकलो होतो ती जिंकून हरली होती
मनातली वादळे मनातच शमली. ती आता कधी दिसेल का ? कधी कोठे आणि केंव्हा ? हि प्रश्न मालिका मानस छेडू लागली. एकदा घरी काही नातेवाईक आले म्हणून आम्ही सर्वजण एका संध्याकाळी संभाजी पार्कमध्ये गेलो होतो. आणि तिथे ती दिसली बरोबर तिचा नवरा होतो. नजरभेट झाली पण न मी काही बोलू शकलो ना ती थांबू शकली. एक वेळ ओळख न देताच गेली असती तरी वाईट वाटले नसते पण जाता जाता तिने मागे वळून पाहत असा काही कटाक्ष टाकला कि, मन पुन्हा एकदा माजघरातील अत्तराच्या कुपीतील तो गंध शोधू लागलो म्हणजे लग्नानंतर ती पुण्यातच आली होती. पण मन शोधून काढण्यासाठी पुढे धाव घेईना.कारण तसाही मी तिच्यासाठी टाईम-पास होतो ना. जगरहाटी थांबली नाही. समाजरीत आणि आयुष्यभर कष्ट काढणारी आई या दोन्हीला बळी पडून मी लग्नाला उभा राहिलो. नोकरी,संसार यांचे रहाटगाडगे सुरु झाले. मन कुठेच रमत नव्हते, शरीर आपला धर्म पार पाडत होते. आता अत्तराची कुपी सांडून संपली आहे. असा इशाराच जणू मनाने दिला. अश्याच का संध्याकाळी सुट्टी असून घरीच काही तरी काम चालले होते. दारावरची बेल वाजली. कोण आहे म्हणून दर उघडले तर ती आणि सोबत तिचा नवरा दारात. मनाची कवाडे वारंवार बंद करून देखील हि वास्तवाची दारे का पुन्हा पुन्हा का ठोठावते आहे असा प्रश्न मनात चमकून गेला पण तोंडातून आपोआपच शब्द आले, “अरेच्या! आज इकडे कसे काय?” तर मानभावीपणे नवऱ्यासमोर म्हणाली, "अरे आता संसारात स्थिरावले आहे. वेळ जात नाही घरी एकटे बसून म्हणून नोकरी करावी म्हणतेय, बघ ना तुझ्या बँकेत काही जमते का?"आता काय तर बँकेत नोकरीसाठी काही करता येईल का? मीही खरे तर काय करणार होतो कोणास ठाऊक? मन म्हणत होते कि कुपीतील सुगंधाची दरवळच ठीक, पुन्हा काही ती कुपी आणि तो गंध नको. पण घरातील इतरांचे उपस्थितीचा आणि तिच्या नवऱ्यासमोर तिचा मान ठेवीत मी काहीतरी प्रयत्न करेन असे म्हणालो. पुढे दोन,तीन महिने गेले एक दिवस तिने फोन केला आज दुपारी चार नंतर येवून जा आणि पत्ता दिला. जेंव्हा घर शोधून तिला पकडून म्हणावे कि, हा खरच टाईम पास नाही ग! असे वाटत होत तेंव्हा हि गावी निघून गेली आणि आता परस्वाधीन झाल्यावर मला म्हणते घरी येवून जा. मनाचा हिय्या होत नव्हता काय करू जावून? काय बोलू तिच्या नवऱ्याशी? पण तरीही गेलो दर तिनेच उघडले.अशी काही दिसत होती म्हणून सांगू ? तो केतकीचा पिवळेपणा भरून राहिला होता. चेहऱ्यावर नजर ठरू नये असा गोडवा आला होता मला कळत नव्हते कि ती बदलली कि माझे मनच प्रेमातून बाहेर पडत नाही आहे? मी विचारले नवरा कुठाय? तर म्हणते “तो आताच कामाला गेला आहे आत तरी ये ,का दारातूनच परत जाणार आहेस? “मी म्हटले,” मला सांग जेंव्हा दारात येवून तुझ्या प्रेमाची भिक मागायचे ठरवले तेंव्हा गाव सोडून निघून गेलीस आणि आता जेंव्हा झोळीच नाही तर तू दान देण्यास आतुर आहेस काय म्हणू तुला?”मला अजूनही आठवतेय त्यावर तिचे डोळे थोडेसे डबडबले किंचित बाजूला होत तिने मला आत येण्यास खुणावले. मी दारातून आत आलो मात्र ती दार ढकलून वेगाने आत पाळली. बाहेरच्या खोलीत सन्नाटा.मनात वादळ जणू वादळापूर्वीची शांतता. तोंडावरून हात फिरवीत ती बाहेर आली आणि तिला पुन्हा असे एकांतात डोळे भरून पाहताना तीच दरवळ जशीच्या तशी पुन्हा हवेतून आली. आणि काही समजायचे आतच तोंडून सहज शब्द गेले, “किती गोड दिसती आहेस”. ते ऐकले मात्र आणि तिचा इतक्या वर्षांचा सयंम सुटला. तिने धावत येवून मिठी मारली माझा हात हातात पकडून तो तिने तिच्या पोटावर ठेवला आणि म्हणाली अरे मला तुझा अंश हवा होता रे इथे. आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला कि ती खरच का इतकी गोड दिसते आहे. तिला नुकतेच दिवस गेले होते. ती आता माझी कधी होणार नाही याची साक्षच परमेश्वराने दिली होती. मी तिला अलगद थोपटत दूर केले ती पुन्हा एकदा आत गेली आणि एक बंद छोटीशी भेट हातात देत म्हणाली, “हि तुला माझ्या कडून भेट.माझी आठवण ठेव.पण पुन्हा पुन्हा कधीच भेटू नकोस”......

आणि आणि पुढील अनर्थ ओढवण्यापूर्वी मी वेगाने बाहेर पडलो. हातात तिची भेट घट्ट पकडली होती मागील आनंदाचे सर्व क्षण हातून जणू निसटून गेले होते. मन तिने दिलेली भेट बघण्यास उतावीळ झाले होते. घर गाठले योगायोग असा कि घरातील सर्वजण बाहेर गेले होते. त्यांनी निरोप लिहून ठेवला होता पण म्हटले नंतर वाचू. भेट वस्तूचे वेष्टन सुटता सुटेना जणू तेथेही न सुटणारा गुंता झाला होता अखेर त्याची गाठ सुटली पण हातून भेट निसटून खाली पडली घरभर अत्तराचा घमघमाट झाला. तोच वास ज्याने मला त्याच माजघरात नेवून पोचवले. भारलेले क्षण मोहरून उठले.सोबत तिची मोत्याची अक्षरे आणि त्यावर फक्त या चार ओळी ……

मनात होते तू माझा होशील

माझ्या ओठीचे अमृतात आकंठ बुडशील

क्षणाक्षणाने माझे जीवन फुलताना

कणाकणाने तू माझ्यातच विरघळशील.

ठरवले होते तुला एकदाच भेटायचे,हे सांगण्यासाठी कि मला कायमचा विसरून जा…. आज तुझा वाढदिवस म्हणून तोच गंध तुला देते ज्याने मला तुझे वेड लावले ...ते अत्तर सांडून गेले होते. मी ती कुपी अलगद उचलली आणि तिचे झाकण इतके घट्ट बंद केले कि पुन्हा ती कुपी कधीच उघडणार नाही.

घरच्यांनी निरोप लिहलेला कागद उचलला म्हटले चला दिनक्रम सुरु करावा तर त्यावर निरोप होता. "अरे आर्चिज मधून फोन होता मी तुझ्यासाठी मागवलेले अत्तर आजच आले आहे .मी म्हटले आज तुझा वाढदिवस कशाला उशीर म्हणून बाहेर गेले आहे. लवकरच येते. पुन्हा कुठे जावू नकोस .."मी म्हटले, “नाही आता पुन्हा कुठेही जाणार नाही ...खरच कुठेही जाणार नाही”.

तो होता एक अमृतानुभव.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१० ची दुपार. थंडीकडे कलू लागलेले वातावरण, बर्फाच्या पहिल्या हलक्याश्या शिडकाव्याने अधिकच थंड झाले होते. टोरोंटो आणि परिसरातील सायंकाळ 'हॅलोवीन' कडे सरकू लागली होती. पण अनेक संगीत प्रेमींच्या गाड्यांची चाके मात्र लिविंग आर्ट गॅलरीच्या ' हॅमरसन हॉल ' कडे वळु लागली होती. त्यासाठी कारण पण तसेच होते, त्या सायंकाळी तिथे होती संगीताची मेजवानीच. संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाचा कार्यक्रम, 'एम फॉर सेवा' या सेवाभावी संस्थेने आयोजित केला होता, आणि खाचाखच भरलेल्या त्या हॉलमध्ये असलेल्या भाग्यवंतात आमचाही समावेश होता. पंडीतजींचे ८०व्या वर्षातील पदार्पण हे संयोजना मागील एक निमित्त होते. पण खरे कारण पुणे सोडल्या पासून 'सवाई गंधर्व मोहत्सव' आणि त्या सारख्या दर्जेदार कार्यक्रमांना मुकलेल्या आमच्या सारख्या अभाग्यांसाठी आलेली ती एक संधी होती.
नेटके आणि सुबक सूत्रसंचालन, हिंदी आणि त्या पाठोपाठ इंग्लिश असे द्वीभाषिक निवेदन, यामुळे संपूर्ण वातावरण कठोर शिस्तीला देखील आपलेपणा आणत होते. कार्यक्रम नियोजित वेळेवर तर सुरु झालाच पण संपूर्ण हॉल वेळेपूर्वी आपापल्याजागी येवून स्थानापन्न झालेल्या संगीतप्रेमींनी भरून गेला होता. एम फॉर सेवा या संयोजक संस्थेची माहिती देणारी पाच/सात मिनिटांची चित्रफित, त्या नंतर पंडितजींचा जीवनप्रवास थोडक्यात उलगडून दर्शवणारी चित्रफित दाखवून त्यानंतर आज पंडितजींना साथ सांगत देणारे कलाकार पंडित समीर चटर्जी- तबला, पंडिता त्रीप्ती मुखर्जी- संवादिनी आणि सूर संगत, पंडित सुमन घोष- संवादिनी आणि सूर संगत, आणि पंडित डॉ. अमित आर्य यांचा परिचय करून देण्यात आला.आणि त्यानंतर .......खरे तर त्यानंतरच्या कार्यक्रमाच्या वर्णनासाठी शब्दच नाहीत. पुढील तीन तास आम्ही सर्व श्रोते अक्षरशः सूर सागरात बुडून गेलो होतो. पंडित जसराजजी काय गायले ? या प्रश्नाचे कदाचित तांत्रिक उत्तर माझ्या सारख्यास देणे अवघड जाईल पण इतके मात्र मी नक्की म्हणेन कि, त्यांनी आम्हाला तृप्त केले.
प्रथम शुद्ध रागदारीतील गायनाने लोकांना वातावरणातील भारलेपणाने जागीच खिळवून ठेवले होते त्यानंतर भक्ती संगीतातील सुरावटींनी मंत्र मुग्ध केले. त्यातील कृष्ण भक्ती गीत संपूर्ण संस्कृत रचना असूनही सुरांनी दिलेला आंनद शब्दांच्या पलीकडला होता. या सुरेल मैफिलीचे वर्णन कोणत्या  रागात, कोणती रचना, त्यातील चढ उतरांसह करायला गेल्यास,ज्यांना या मैफिलीस
येता आले नाही त्यांच्यासाठी काय ऐकायचे चुकले हे समजण्यासाठी ठीक होईल, पण मला अश्या येवू न शकलेल्या संगीत प्रेमींना इतकेच सांगायचे आहे पंडित जसराजजींना याची देही याची डोळा एकदा तरी ऐका. या जन्मी आपले भाग्य म्हणून असे गायक आपल्यास लाभले आहेत.साथ संगत तर अशी होती कि, विचारूच नका. पंडित सुमन घोष जेंव्हा जसराजजींच्या पाठोपाठ तान घेत तेंव्हा पंडितजी केंव्हा थांबले आणि सुमंजीनी सूर केंव्हा पकडला हे भल्या भल्यांना समजलेच नाही. परिचय करून देतांना पंडिता त्रीप्ती मुखर्जी या व्हाईट हाउस मध्ये दीपावली निमित्त गायल्या आहेत असा उल्लेख संयोजकांनी केला पण पण जेंव्हा त्यांचे सूर कानावर पडले तेंव्हा मन म्हणाले,अरे पंडिता त्रीप्तीजी व्हाईट हाउस मध्ये गायल्या यात त्या व्हाईट हाउस वाल्यांचे नशीब दांडगे म्हणून त्यांना इतके सुरेल स्वर अनुभवता आले. समीर चटर्जी आणि अमितजी यांना तर जसराजजींनी स्वतःच अनेकदा दाद दिली. उत्तरोत्तर रंगत गेलेली मैफिल आता थांबवयाची का ? असा प्रश्न जेंव्हा पंडितजींनी केला तेंव्हा प्रेक्षागृहातून नाही असा एक सुरात आवाज आला. आणि त्यापुढे जावून आम्हास आपले " ॐ नमो भागवते वासुदेवाय " .... ऐकायचे आहे असा आग्रह देखील झाला. आणि अहो आश्चर्य पंडितजींनी गेल्या सलगच्या तीन तासाच्या गायनाने आलेला स्वतःचा थकवा बाजूला सारून पुन्हा असा काही सूर लावला कि बस्स... मी लिहूच शकत नाही पुढे, तो होता एक अमृतानुभव