Wednesday, October 13, 2010

कवी मन आणि कविता !

कवी मन आणि कविता यावर लिहावयाचे झाले तर,

त्यासाठी देखील तुम्हास कवी कल्पना करता येणे जरुरीचे आहे.

प्रत्येक कवी भावनांना वाट करून देतांना सहजतेने लिहतो.

मला बरेचदा एखादी कल्पना सुचते. पण त्याला कारण अमुक एक

घटना नसते. पण बऱ्याच कविता सुचतात,

दिवस आणि रात्रीच्या धूसर सीमारेषेवर.

सांज, कातर अशी ती मनाची गलबल वाढवणारी वेळ.

सहज म्हणून लिहावयास घेतले तर मनाची अवस्था ......

कधी शब्द सहज येतात, विचारांची जणू गाणी होतात.

पण कधी शब्द रुसतात, भावनांचा रस्ताच अडवून बसतात.

कधी सापडतो ताल, कधी भरकटणे बेताल.

कधी पायवाटेची वहिवाट, कधी राजमार्गाचे हरवणे.

कधी उन्मेषास आहोटी, कधी उद्वेगाचे बरसणे ...

आणि मग या अवस्थातून जाताना...

एखाद्या सांजवेळी प्रेयसी,

वाट पाहून पाहून थकलेली असते,

तरीही त्याने येण्याचे टाळलेले असते...

त्याची न येण्याची गणिते वेगळी असतात

पण तिच्या प्रश्नांना उत्तरेच नसतात

मग त्याही अवस्थेत तिचा 'इंतजार'

शब्द बद्ध होतो ....

हृदयात हुरहूर, मनात काहूर
डोळ्याच्या पापण्यांनी थोपवला पूर
ओठ उलगले शब्द न फुटले
तुझ्या आठवांनी श्वासच थिजले

Monday, October 11, 2010

अशीच एक सायंकाळ !

एक शहर थोडे वाढलेले. थोडे पसरलेले. नात्याचे गुंते फुललेले,
कधी नदी काठी,कधी किल्यापाठी,
कधी बाईक वरील लाँग राईड,
कधी गावाबाहेरील रस्त्यावरून चालतच पकडलेली एक साइड.
अशाच जातात अनेक संध्याकाळी.
माहित नसते पुढे काय लिहलेय भाळी.
त्या दिवशी एका संध्याकाळी हवेत असाच थोडा गारवा थोडी शिरशिरी.
रोजचा रस्ता रोजची वाट,
पण तिने माळली नाही नेत्र् कटाक्षातून ओसंडणारी हसरी वहिवाट.

तिला विचारले काय झाले तर म्हणते सारे संपले
खूप बोललो मनातून हललो. पण उत्तरादाखल मौनच बोलले.

ती संध्याकाळ खूपच लांबली जणू उन्हे परतायची थांबली
मला आठवल्या सगळ्याच संध्याकाळी
माहित नव्हते हेच आहे कपाळी.

आता सुद्धा संध्याकाळ होते
मनात एक कविता रेंगाळते ...

तीच हि कविता ...अशीच एक सायंकाळ !

कोणी म्हणते संध्याकाळ,
कोणी वदे कातरवेळ !

कोणासाठी बटाटेवडे, भेळ
कोणासाठी नाटक सिनेमाचा मेळ!

कुठे प्रश्न कसा काढू तुझ्यासाठी वेळ
जमत नाही कशाचाच ताळमेळ!

खरे तर सारे शब्दांचे खेळ ....
सूर्य कलतो,मन ढळते

रात्र मागे,प्रश्न सोडते
कदाचित उद्या,मिळेल उत्तर

प्रश्न नाही सुटला,तरी बेहत्तर !

सायंकाळी पुन्हा भेटेन
शिरशिरीत देखील पुन्हा पेटेन..

जळून जाता होईन खाक
मज सहवासाची लाज राख...

फिनिक्स पुन्हा धडपडून उडेल
पंखांची फडफड मनाला भिडेल

उद्या पुन्हा दिवस उगवेल
प्रश्नाचे नवे रान माजवेल..

रान तू सहज करशील पार
पण कातरवेळी पाऊल अडेल...
समोरचा पूल कोसळून पडेल

एक किनारा माझा एक किनारा तुझा
आणि मधला प्रवाह झपूर्झा ......

Sunday, October 10, 2010

लिहणार आहात का कधी दैनंदिनी?

आज १०/१०/१० खरे तर ८/८/८८ पासूनच अनेकदा अशा जुळून येणाऱ्या तारखा आणि आपण काहीतरी
वेगळे करावे हि उर्मी मनात अनेकदा येवून गेली. पण त्या त्या वेळी असे काही तरी घडले कि,
प्रत्यक्षात काही उतरलेच नाही. म्हटले चला आता १०/१०/१० अशी सुरेख तारीख आली आहे तर
आज पासून दैनंदिनी लिखाणास सुरवात करूया.

पण अंतर्मन बोलते झाले आणि म्हणाले. काही तरीच काय? म्हणे दैनंदिनी लिहणार
आणि मनात खालील विचारांची मालिकाच येवून गेली.
कधी काही मनात आले कि लेखणी उचलावी आणि अनुभव नोंदवून ठेवावा इतपत ठीक.
पण काही जण दैनंदिनी लिहतात. ते नक्की काय करतात ? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
आणि दैनंदिनीतील नोंदी खरच खऱ्या असतात का?
मी आज घरी कोणीही आजारी नसतना मी खोटे कारण नोंदवून रजा घेतली.
आज समोरच्या टेबलवर बसणारी अमुक तमुक xxxx खरच इतकी गोड दिसत होती,
वाटले आत्ता उठावे आणि xxxx
मी आज इतके पैसे लाच म्हणून देवून माझे हे अवैध काम पूर्ण करून घेतले.
उद्या त्याला इतकी रक्कम आणून दे म्हणजे तुझे काम करतो असे सांगितले आहे.
आज माझ्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती पुढील आठवड्यात माहेरी येणार आहे,
आणि तिने भेटायला बोलवले आहे.
अशा नोंदी असणारी दैनंदिनी कोणी ठेवते का ? नाही.
पण घटना मात्र अशा घडत असतात.
म्हणूनच मला नेहमी असे वाटते कि,
स्वतः विषयी, स्वतःला आलेल्या अनुभवांविषयी, मनातल्या आंदोलनांविषयी,
ज्यांच्याकडे खरे बोलण्याची ताकद असते तेच ...
सातत्य आणि सत्यता जपण्याचे धाडस ज्यांच्याकडे आहे तेच ...
"तुम्ही नेहमी खरे बोला लोकांना तो विनोद वाटेल"- असे म्हणणारा
 मार्क ट्वेन ज्यांना समजला आहे तेच ...
माझ्या चुका इतरांना समजल्याने मला काय कमीपणा येणार आहे?
असा विचार जे करू शकतात तेच.....
कालची गोष्ट उद्या कोणास कळली तर काय होईल याची आज ज्यांना चिंता नसते तेच ....
आत्म चरित्र आणि आत्म चारित्र्य जे एकाच पातळीवर तोलतात तेच ..... दैनंदिनी लिहू शकतात.
आणि म्हणूनच मी कधीही दैनंदिनी लिहणार नाही. आणि एवढेच फक्त मी खरे बोलू शकतो..
तुमचे काय ? लिहणार आहात का कधी दैनंदिनी?

Saturday, October 9, 2010

तडजोडी !

त्याचा मित्र हा तिचा कोणीतरी दूरचा मामा. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी म्हणून ती आली होती.
तेंव्हाची भेट हि पहिली भेट. पुढे आठ दहा वर्षे भुरकन उडून गेली मग उच्च शिक्षणासाठी ती
त्याच्या गावी आली. मग त्याच्या मित्राचा संदर्भ शोधत तिने त्याला शोधले. काही दिवस भेटी गाठी
आणि एक दिवस तिचे पत्र. तुझा विचार काय आहे.. काही संदर्भ लागण्यापूर्वी त्यास विचार करण्यास
वेळ देण्यापूर्वी,उत्तर देण्यापूर्वी, सुस्थळी जावून स्थिरावण्याचा तिचा एकतर्फी निर्णय.
आणि असे का केलेस यावर घरच्यांची घाई होती.
असे तिचे उत्तर आणि पत्रास उत्तर म्हणून त्याची कविता ...

आई बाबांच्या शब्द खातर केल्यास तु तडजोडी,
संसाररूपी सागरात विसरून मला घेतलीस उडी!

हृदयाची शकले करीत वाट पकडली नागमोडी,
किनाऱ्यावर हिंदोळत राहिली एकाकी माझी होडी!

तुझ्या श्वासाने कडाडते वीज!

शांततेचे काही प्रकार असे असतात कि काही विचारू नका. अस्वस्थ मनस्थिती,
घडाळ्याच्या टिक टिकीने देखील हैराण होते तर स्वस्थ मन रेल्वे फलाटावर देखील
ढाराढूर झोपी जाते. हव्या वाटणाऱ्या एकांतात उच्छ्वास देखील थरार निर्माण करतात.
आणि ओठावर शब्द येतात ....

निशब्द शांततेत तुझ्या श्वासाने कडाडते वीज, कोसळते आभाळ,
अंतरिक्षातील कृष्णविवर
खेचते खोलवर , सर्वांग शहारते जागेवर
अंतरीचे मन पाखरू झेपावते दूरवर.............

Wednesday, October 6, 2010

शब्दांवाचून कळेल का सारे शब्दांच्या पलीकडले ?

नुकताच मागील महिन्यात मी ब्लॉग सुरु केला आहे.लवकरच तो 'मराठी ब्लॉग विश्व' च्या मुळ प्रवाहात सामील होईल.अद्याप तो वाचता झालेला नाही,पण खात्री आहे थोड्या दिवसातच तो सर्वांपर्यंत पोहचेल. आता वाटले पुढील लिखाण ज्याच्या मदतीने मी आपणा पर्यंत पोहचवणार आहे त्यावरच लिहावे. मला काही सांगायचय! असे म्हणताना ज्याचा आधार घेतल्याशिवाय विचारांची देवाण घेवाण पुरीच होत नाही त्याविषयी लिहावे, ते म्हणजे शब्द.

भाषा व त्या अनुषंगाने विचार करावयाचा झाला तर भावनांना अचूक रस्ता दाखवण्याचे काम जे शब्द करतात त्यांना आपण माध्यम म्हणतो. आणि भावना अचूकतेने मांडता आल्या तर त्यास आपण वैचारिक देवाणघेवाण म्हणतो. आणि भावना अचूकतेने मांडल्या तर त्यात वैचारिक स्पष्टता दिसते. माणूस प्राथमिक विचार किंवा स्वसंवाद नेहमीच मातृभाषेतूनच करतो पण उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मातृ भाषेतूनच देत असतो. त्या संदर्भातील बिरबलाची एक गोष्ट प्रसिद्ध आहेच पण ती मी ओघात पुन्हा एकदा मांडतो.

एकदा अकबराच्या दरबारात एक भाषा पंडित येतो त्याने 'केल्याने देशाटन ' ....या उक्तीस उनुसरून देशोदेशी फिरून ज्ञान कीर्ती व अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलेले असते. हा भाषा पंडित अकबराचे सभेत सांगतो कि मला अरेबिक,पर्शियन संस्कृत, हिंदी मराठी या सारख्या एकूण सोळा भाषा व त्याही अस्खलितपणे बोलता येतात. माझे या नवरत्नांनी भरलेल्या जाणकारांच्या सभेस असे आव्हान आहे कि त्यांनी माझी मातृभाषा कोणती हे अचूकपणे ओळखावे. त्यावर अकबर बादशाह वादविवादास परवानगी देतो. अनेक भाषा तज्ञ आपआपल्यापरीने चर्चेत वादविवादात भाग घेतात पण त्या पंडिताची भाषा ओळखण्यात असमर्थ ठरतात. त्यावर अखेरीस बादशाह सभेस आवाहन करतो कि जो कोणी या पंडित महाशयांची मातृभाषा अचूक ओळखेल त्यास ५००० सुवर्ण मुद्रा बक्षिस देण्यात येतील.

या घोषणे नंतर बिरबल बादशहास म्हणतो, महाराज माझी यास तयारी आहे पण त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे आज रात्री भोजन आणि मुक्कामासाठी या पंडित महाशयांनी मजकडे आले पाहिजे. त्यास पंडित महाशयांनी होकार दिल्यावर त्यादिवशीची सभा संपते.

दुसरे दिवशी सभेत बिरबल त्या पंडित महाशायांसह येतो व अकबर बादशहास सांगतो कि यांची मातृभाषा अरेबिक आहे. त्यावर ते पंडित महाराज ते मान्य करतात कि होय माझी मातृभाषा अरेबीकच आहे. त्यावर बादशाह बिरबलास शाबासकी व बक्षीस देतो व विचारतो तेंव्हा बिरबल सांगतो.काही नाही महाराज मी घरी गेल्यावर महाराजांबरोबर हवा पाण्याच्याच गप्पा मारल्या व आम्ही झोपून गेलो. नंतर पंडित गाढ झोपी गेल्यावर मी त्यांच्या अंगावर थंडगार पाण्याची घागर ओतली त्यावर पंडित महाराज दचकून उठत ओरडले. अरे अरे कोण आहे ?कोण आहे ? आणि ते शब्द बाहेर पडताना ते शुद्ध अरेबिक मधीलच होते. माझे काम झाले होते मी त्याची क्षमा मागून रात्री झोपी गेलो मला माझे उत्तर मिळाले होते. हि गोष्ट काय सांगते कि..मनाच्या आत असणारी उर्मी शब्दबद्ध होताना ती मातृभाषेतूनच होते. आणि हि उर्मी सर्वार्थाने स्पष्ट करण्यासाठी गरज असते मातृभाषेची. आणि म्हणूनच जागतिक कीर्तीचे असंख्य शिक्षण तज्ञ देखील मान्य करतात कि विद्यार्थ्याचे किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. हे विचार आणि वरील गोष्ट पाहता आज मी माझे विचार शब्दबद्ध करीत आहे ते हे सांगण्यासाठी कि शब्द म्हणजे काय?

शब्द .. काय आणि किती म्हणून लिहणार?

शब्द .... मनातील भावना कागदावर उतरवण्यासाठीचे माध्यम.

मनातील विचार अचूक मांडण्याचे काम शब्द करतात. आता आपण या वाक्यावरच थांबून फेरविचार करूयात खरच मनातील प्रत्येक भावनेस शब्दरूप देता येते का? मला वाटते याचे उत्तर आहे हो आणि नाही दोन्हीही. जर तुम्हास मनाची सृजनशीलता असेल तर करू शकाल तुम्ही तुमच्या भावना शब्द बद्ध मग तुमचे बोलणे ठरेल अविस्मरणीय. पण जर तुमच्याकडे सृजनशीलताच नसेल तर तुमच्या तोंडून निघाणारे शब्द ठरतील बाष्कळ/ बाष्फळ बडबड.

शब्द म्हणजे कवी मनास पडलेले एक स्वप्नच म्हणा हवेतर. त्यामुळे कोणी म्हणते...

शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना

आवरू किती गडे धीर नाही लोचना ....

तर कोणी म्हणते ...

शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले

प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले...

पण या खेरीज मला सर्वार्थाने भावलेली रचना आहे

शब्द शब्द जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी ....

अर्थात या गीताबाबत एक गंमत अशी आहे कि हे गाणे प्रथम ऐकल्यापासून पुढे खूप दिवस मी ते एका चुकीच्या शब्दासह मनात कोरून ठेवले होते ते असे..

शब्द शस्त्र जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी .... आणि मला असे वाटत होते कि मराठीत एक सुविचार आहे कि 'शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा' आणि या संकल्पनेवरूनच हे गीत साकारलेले आहे.पण पुढे त्या गीताच्या ओळी जेंव्हा वाचण्यात आल्या आणि समजले कि, शब्द शस्त्र असे नाही तर शब्द शब्द जपून ठेव असे कवीस म्हणायचे आहे. आणि त्यावर अंतर्मुख होवून विचार करू लागल्यावर असे जाणवले कि बकुल फुलाची नाजूकता आणि नजाकत ज्यास भावली आहे त्यालाच शब्द शब्द जपून ठेवण्याच्या विनंती मागची कळकळ समजेल.

बरेचदा तोंडून गेलेला शब्द हा धनुष्यातून सुटलेला बाण असून तो गेला कि गेला. म्हणून एकदा गेलेला शब्द परत परत घेता येत नाही हे वाक्य दृढ झालेअसावे. पण मला वाटते कि शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा हा विचार भारतीयांपेक्षा ऑस्ट्रेलियातील लोकांना जास्त लागू होतो कारण त्या ठिकाणी चुकीचे शब्द वापरणे म्हणजे आपल्याच शब्दाचे 'बूमरँग' होणे होय. कारण आपलाच शब्द आपल्यावर कधी उलटेल हेच सांगता येत नाही.

आपल्याला संवादासाठी शब्द लागतो हे जरी खरे असले तरी 'मौनम् सर्वार्थ साधनंम' हे सुभाषित मात्र खूप बोलके ठरते. त्यामुळे चर्चेत भाग घ्यायचा आणि अचूक ठिकाणी गप्प बसायचे याला लोक धोरणीपणा म्हणतात. त्या कृतीवर शेरा मारताना त्याचे गप्प राहणे किंवा मौन खूपच बोलके होते असे म्हणतात. याउलट चुकीच्या वेळी चर्चेत गप्प राहणाऱ्यास नंतर त्यावेळी बोलायला तुझे तोंड शिवले होते का? या प्रश्नास सामोरे जावे लागते. एकूण काय तर इंग्लिश मधील 'Reading between the lines ' काय किंवा हिंदीतील 'समझनेवालोंको इशारा काफी होता हैं !' काय किंवा आपल्या मराठीतील ' शब्दावाचून कळले मजला शब्दांच्या पलीकडले ' काय हे सर्व संदर्भ हेच दर्शवतात कि शब्द तोच पण त्याच्या छटा अनेक आहेत. त्यामुळे शब्दातून मिळणारी माहिती हि शब्दछटा, शब्दार्थ, शब्दरूप, शब्द्छेद, यानुसार भिन्न ठरतात.

संवादाचे राहू दे पण भांडणाचे प्रकार सुद्धा प्रत्येक शब्दसमूह वेगवेगळ्या प्रकारे नमूद करतो. त्यामुळे शब्दाने शब्द वाढला,शाब्दिक चकमक झाली, वाद झाला, खटका उडाला, विषय हातघाईवर आला, डोकी फुटली इथपासून ते रणकंदन माजले इथपर्यंत विसंवादाची नोंद जावून पोहचते.

एखाद्याने काही वचन दिले, भविष्यात मदत करण्याची हमी दिली, मदतीची ग्वाही दिली तर आपण म्हणतो कि काही काळजी करू नका त्यांनी शब्द दिलाय. पुढे जर तो मनुष्य म्हटल्या प्रमाणे वागला तर आपण म्हणतो त्याने शब्द पाळला. पुढे वचनभंग केला, मदत नाकारली, तर आपण म्हणतो शब्द फिरवला.

शब्द समूह आणि त्याचा वापर करताना आपली जागरूकता कशी असते त्याचे उदाहरण म्हणजे एक दोघांपेक्षा जास्त एकत्र आलेल्या गटातील समूहाचे वर्णन करताना समूह माणसांचा असेल तर घोळका, पक्षांचा असेल तर थवा, गायी म्हशी असतील तर कळप, उंटांचा असेल तर जथा, असे भिन्न भिन्न शब्द समूह आपण वापरतो.

त्या पलीकडे जावून काही भावनांना आपण खरेच शब्दरूप देवू शकतो का ? हा मला खरा सतावणारा प्रश्न आहे. मानवी स्वभाव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेण्याचा आहे. हे जरी कितीही खरे मानले तरीही सगळेच शब्दातून सांगणे प्रत्येकास जमतेच असे नाही. म्हणूनच काही वेळेस परस्पर विरोधी संकल्पना वापरीत परिस्थितीचे वर्णन करण्याकडे माणसांचा कल असतो. त्यातून तयार होतात पुढील संकल्पना . बोलके मौन. भिजलेला पाऊस. जळणारे उन. अंधारी रात्र. लख्ख उजेड. तर काही संकल्पना शब्दात कशा उतरवाव्यात हे प्रश्न सुटतच नाहीत. उदा. तापलेल्या जमिनीवर कोसळलेल्या पहिल्या पावसाने निर्माण केलेला वास. अचानक अप्रिय घटना घडल्यावर पाठीच्या मणक्यातून थेट मस्तकापर्यंत गेलेली सणक. मला वाटते म्हणूनच अत्यानंद, अति तीव्र दुखः, पराकोटीची कृतज्ञता यावर भाष्य करताना आपल्या तोंडी शब्द येतात ....' हे सांगायला माझ्यापाशी शब्दच नाहीत' म्हणजेच पुन्हा एकदा आपण अव्यक्त शब्दानेच व्यक्त होतो नाही का ?

तर कसा वाटला हा माझा शब्द सोहळा. आपल्या प्रतिक्रिया शब्दांकित करावयासाठी मी निशब्द होवून वाट पाहत शब्दशः इथेच थांबतो....

Sunday, October 3, 2010

आठवणींची वावटळ .....

 
 तो महिना  श्रावण नक्की होता.काहीतरी कारण काढून,
दोन दिवसांची रजा आणि दोन मित्र गाठून भटकायला  बाहेर पडलो होतो.
खरेतर चेंज  म्हणून पुणे  सोडून भटकंती आरंभली होती.
वरंध घाट ओलांडून माझी  राजदूत पार्क  करून,
रस्त्याला लागून  असलेल्या त्या छोट्या  पाण्याच्या प्रवाहाकडे पाहत बसलो होतो.
मित्र खाण्याच्या सोयीत गुंतले होते.
इतक्यात पाण्यावर घागर भरून  ती वर रस्त्याकडे आली.
परकर पोलके टिपिकल बंजारी प्रकारातले. वर येता येता माझी नजर तिच्याकडे
गेली घागरीतील पाणी हिंदकळून बटा भिजवीत छातीवर आले होते.
स्वतःच्या सौंदर्याची जाण नसणारी निरागसता
चेहऱ्यावर. आणि मनही तितकेच  निरागस. कारण,
 नजर भेट होताच असे काही गोड हसली कि..... जणू कोण बरे ?
तिच्या हास्य लहरींनी जुन्या आठवणीची मंद लकेर उठली.
पण स्मृतींना ओळख पटताच ओठांवर शब्द आले..
चोहीकडे हिरवळ
मध्ये पाण्याचा ओहळ
मन नभी का दाटली
आठवणींची वावटळ .......

अव्यक्त !

दिल्या घेतल्या वचनांची आठवण,
कडा पापण्यांच्या भिजवती!

स्पंदने हृदयातली,
दुरुनी तुज जाणती!

तुज स्मृतीचा महासागर
त्यास गत क्षणांची भरती!

व्यक्त करण्या भावना,
अव्यक्त शब्द बोलती !

नाव गाव कशाला पुसता ?...

शेक्सपियरने म्हटलेच आहे नावात काय आहे ? हे वाक्य आपण बरेचदा ऐकले आहे . पण मला मात्र या पाठोपाठ आठवतो तो चिं.वि.जोशी यांचा याबाबतचा निखळ विनोद. एका ठिकाणी ते म्हणतात-"समर्थ रामदास कि कोणी म्हटलेच आहे कि .. आणि हो आणि कुणी म्हणायला कशाला पाहिजे खरे ते खरेच!"

यावरून आठवले कि नाव आणि गाव हे सर्वाधिक जिव्हाळ्याचे विषय ठरतात. त्यामुळे त्यावर झालेली विविध गाणी काय किंवा अगदी सवाल जवाब, लावणी प्रकारातील गाणी काय ? जसे सुलोचना चव्हाण याची प्रसिद्ध लावणी –

नाव गाव कशाला पुसता, अहो आहे मी कोल्हापूरची

मला हो म्हणतात लवंगी मिरची ..... हि लावणी काय किंवा

नाव सांग सांग नाव सांग या सारखी गाणी म्हणजे, शेक्सपियर काहीही म्हटलेले असो, नाव आणि गाव याबाबत एकूणच प्रत्येकजण सजग असतो. मनाचा एक कोपरा जन्मभूमीशी असा निगडीत असतो कि, मन जरी म्हणत असले कि -पोटासाठी भटकत दूरदेशी फिरेन, राजाच्या सदनी अथवा घोर रांनी शिरेन तरी घरापासून दूर गेले कि आपल्या परिसरातील कोणी तरी भेटावे हि आस वाढीस लागते. भेटणारा नवा माणूस आपल्या परिचित ठिकाणचा निघाला कि ओढ आपोआपच वाटते. तर या नाव आणि गाव यातील गाव म्हटले कि मनात येवून जाणाऱ्या विचारांची मालिका मी आपणा समोर मांडत आहे.

माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तसे ग्रामीण भागातच आणि तेही नातेवाईकांच्या कडे राहून झाले. कॉलेज सकाळी ७.१५ ते १२.३० या वेळेत असे. तालुक्याचे गाव व सुमारे ३५ वर्षापूर्वीचा काळ त्यामुळे अभ्यासाशिवायचा वेळ कसा मार्गी लावावा हाही प्रश्न बरेचदा पडे. शिवाय तेंव्हा थोडी व आता खूपच वाटणारी एक खंत म्हणजे गायन, चित्रकला किंवा स्वतः मध्ये गुंतून राहता येईल असा छंद कधीच जोपासता आला नाही. आणि आता त्यावर विचार करणे म्हणजे जे राहून गेले ते .... या सदरात मोडणारे.त्याकाळी करमणुकीचे प्रमुख साधन म्हणजे रेडीओ.आकाशवाणी व रेडीओ सिलोन यावरील अनेक कार्यक्रम खरोखरच कान देवून ऐकल्याचे आजही आठवते. काही काळ रेडीओ सिलोन वरील पत्रमैत्री पण जोपासली होती.त्यावेळी भारतातील अनेक गावांची नावे माहित झाली काही ठिकाणी मैत्रीचे धागे जुळले गेले पण का कोण जाणे  पण वीण घट्ट झालीच नाही. अनेक गावांची वर्णने ऐकली. पण त्यातून काही गावे त्यांची नावे व मनचक्षु समोर येणारे चित्र यांची उगीचच सांगड घालण्याचा मनास छंद लागला.

आजही चिकमंगळूर म्हटले कि जनता पक्षाची पीछेहाट व इंदिराजींचे जोरदार पुनरागमन इतकेच आठवते. निवडणुका म्हटले कि दूरदर्शनवरील विनोद दुवा यांचे परीक्षण व त्यात यशवंतराव चव्हाण म्हटले कि सातारा आणि बाबू जगजीवनराम म्हटले कि सासाराम यांची आठवण जातच नाही.

काही गावांचे बाबत त्यांचे आजचे रूप पाहिलेले नाही किंवा ते पाहण्याचा योग कधी येईल माहित नाही, पण नालंदा म्हटले कि उच्च विद्याविभूषित गुरुजन आणि त्यांचे शिष्यगण यांनी भारलेले वातावरण, किंवा कुरुक्षेत्र म्हटले कि लष्करी छावणी असे मन चित्र साकारते.

मला तर नेहमी वाटते कि आडनाव आणि गाव याबाबत बाराखडीतील काही अक्षरे यांचा समूह घ्या, एखाद्या अक्षरास काना आणि अथवा मात्रा किंवा उकार द्या, कि झाले आडनाव अथवा गावाचे नाव. पण अशी गावे स्वतःचा कोणताच चेहरा तयार करीत नाहीत. तर काही गावांच्या नावातच एखादा सूर ताल असल्याचा भास होतो. झुमरीतलैया , नैनिताल किंवा विदिशा, मधुबनी हि नावे गावातील जनजीवन खूपच सुखद असल्याचा भास निर्माण करतात.

काही गावांबाबत तिथे जन्मलेले किंवा त्या परिसरात वाढलेले कर्तुत्ववान लोक त्या गावची प्रतिमा अशी तयार करतात कि जणू ते गावच भाग्यशाली ठरते.माझ्या मनात हा गावांची नावे व त्यातील सूर ताल यांचा खेळ सुरु असताना एकदा एका पाठोपाठ एक अशी तीन नावे डोळ्यासमोरून गेली. त्याच्या नावात साधर्म्य होतेच पण त्याच बरोबर बरेच काही होते काय काय सांगू त्याविषयी असे झाले ती गावे म्हणजे ... मालगुडी, मालगुंड, आणि माडगूळ.
त्यापैकी मालगुडी म्हटले कि आर के नारायणन यांची १९८५/८६ सालातील दूरदर्शनवरील मालिका "मालगुडी डेज" व तिचे श्रवणीय संगीत आठवते. त्याच बरोबर शंकर नाग यांचे कलात्मक दिग्दर्शन आठवून दूरदर्शन चा सुवर्णकाळ आजही डोळ्यासमोर साकारतो. या मालिकेचे चित्रीकरण कर्नाटक राज्यातील अगुंबे या शिमोगा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात झाले होते. आर के नारायण यांच्या गोष्टीत उल्लेखण्यात आलेले हे ठिकाण प्रत्यक्षात अस्तिवात आहे कि नाही या बाबत प्रवाद आहे, पण काही लोकांच्या मते ते कोईमतूर हे एका बाजूस नदी व दुसऱ्या बाजूस अरण्य असणारे ठिकाण आहे. काही लोकांच्या मते लालगुडी हे कावेरी नदीतीरावरील ठिकाण म्हणजे मालगुडी होय. काही लोकांच्या मते यादवगिरी नावाचे म्हैसूर जवळील ठिकाण म्हणजे मालगुडी आहे. प्रत्यक्षात काहीही असो, सदर मालिका व त्यातील पात्रे इतकी जिवंत होती कि दक्षिण भारतीय संस्कृतीचे ते अचूक असे जिवंत चित्रण होते.आणि त्यामुळेच मालगुडी डेज ते श्रवणीय संगीत आज पंचवीस वर्षानंतर देखील तोच थरार मनात निर्माण करू शकते.

मालगुडी पाठोपाठ माझ्या मनाने मालगुंड कधी गाठले ते कळलेच नाही. पण मी मालगुंडला काही रत्नागिरी-गणपतीपुळे या मार्गे नाही गेलो बरका, तर आधी गेलो शाळेच्या दिवसात, मग उलगडली मराठीच्या पुस्तकाची पाने आणि पोहचलो त्या कवितेपाशी. शब्द होते...

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने ....
खरोखर मराठी कवितेच्या एका युगावर छाप पडणारा कवी. श्री कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत. कसे असेल त्यांचे गाव आज देखील त्यांच्या त्या कोकणातील गावात जन्मणारे युवक तितकेच पेटून उठणारे असतील का?
का अजूनही त्या तुतारीचा शोधच आपण घेतो आहोत? का कोणत्याच राज्यकर्त्याचे कान यापुढे तुतारीचे स्वर एकुच शकणार नाहीत? अशा प्रश्नांची मालिकाच उभी राहिली. अर्थात या पुढील भारत भेटीत गणपती पुळे येथील श्री दर्शन होताच मालगुंड गाठण्याचा मनाचा निर्धार मात्र आता पक्का झाला आहे.

आणि आता माडगूळ. त्या बाबत तर काय म्हणू ? मराठी साहित्याने ज्या गावामुळे 'मंतरलेले दिवस' अनुभवले, गीत रामायणातील लावण्य असो किंवा 'करुणाष्टकातील' कारुण्य असो, 'सत्तान्तारातील' वन्यजीवांचा संघर्ष असो. माडगूळच्या मातीतील माणसाने दाखवलेली माणुसकी सांगणारे 'माणदेशी माणसे' असो जे काही मराठी साहित्यात उतरले ते या माणदेशी माडगूळच्या मातीतूनच आले आहे. पुण्यात असून पंचवटीतील गजाननाचे चरण स्पर्श करण्याचे भाग्य चुकले पण तात्यांना नमस्कार करण्याचे पुण्य मात्र पदरी बांधता आले. आणि म्हणूच माडगूळच्या मातीने दिलेली दोन नक्षत्रे काळाच्या पडद्याआड गेली असली तरी मराठी मनात कायमच तळपत राहतील यात शंकाच नाही. हे नमूद करून मी माझे गावांच्या नावावरून केलेले हे भ्रमण थांबवतो. कशी वाटली हि शब्द भ्रमंती ते मात्र जरूर सांगा.