Thursday, March 31, 2011

असेही एक "एप्रिल फूल"

मी एक जागरूक पुणेकर या नात्याने सर्व कामे बाजूला ठेवून चहा बरोबर पेपर वाचत होतो. काही प्रमुख बातम्यावरून नजर फिरवली आणि त्यावरील प्रतिक्रिया देण्या साठी हिला हकनाक हाक मारली.
कारण बातम्या होत्याच तशा सनसनाटी.....
चितळे बंधू मिठाईवाले यांनी पुण्यात स्वतःच्या १०० शाखा सुरु करण्याचे ठरवले. पाश्चिमात्य बाजार पेठेस अनुसरून मुख्य दुकान यापुढे २४*७ असे पूर्णवेळ ग्राहक सेवा देणार ...सकाळ पुणे.
अण्णा हजारे यापुढे कसलेही उपोषण मागे घेणार नाहीत. ... महाराष्ट्र टाईम्स मुंबई
येत्या पाच वर्षात सर्व खेड्यांना विद्युत पुरवठा करणार..पंतप्रधान .. टाईम्स ऑफ इंडिया यासारख्या स्थानिक, राज्य स्तरावरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील अशा बातम्या आपल्या आज वाचनात आल्या तर तुम्ही काय कराल.
मला माहित नाही तुमचे पण मी काय केले ते सांगतो
मी  तिन्ही वेळा पेपर पुन्हा पुन्हा उलट सुलट कर करून बघितला  आणि चहा घेता घेता ओरडून म्हणालो, " अग्ग्ग पाहिलस का पेपरात काय आलंय! "
त्यावर आतून आवाज आला ...."मला मेलीला मिळतो इतक्या लवकर वाचायला पेपर,काय ते तुम्हीच सांगा. "
अग काय ऐकतेस का ? कोठून सुरवात करू
हे बघ दिल्लीची घोषणा आहे ....येत्या पाच वर्षात सर्व खेड्यांना विद्युत पुरवठा करणार..पंतप्रधान
बर! डब्यात भाजी काय देवू. म्हणजे बर ! बातमीसाठी आणि भाजी काय देवू माझ्यासाठी.
पुढे ऐक, महाराष्ट्र टाईम्स ने म्हटलेय
अण्णा हजारे यापुढे कसलेही उपोषण मागे घेणार नाहीत. ... ऐक प्राणांकित घोषणा ... महाराष्ट्र टाईम्स
ते ठीक आहे, तुम्हाला डब्यात किती पोळ्या भरू ते सांगा.
अग मी बोलतोय काय तुझे चाललेय काय ?
बर आता आपली पुण्याची बातमी ऐक .
चितळे बंधू त्यांच्या १०० शाखा काढणार आहेत. आणि त्याचे मुख्य शाखा आता चोवीस तास आणि सातहि दिवस उघडी ठेवणार.
अहो! तुमची तब्येत ठीक आहे न ! आणि बर नसेल तर कामावर जावूच नका. पण हे काय भलतेच वाचताय मगापासून ...
अग असे काय करतेस आज एक एप्रिल आणि मी आजचाच पेपर वाचतोय म्हटले ...

अस्स होय. आत्ता समजले आता पेपरवाले पण 'एप्रिल फूल' करतात वाटते.

Thursday, March 24, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग सहा

डायरीतील नोंद-- असलेली
गुरुवार -
श्री क्षेत्र महाबळेश्वर दर्शन
जीवनाचे बिल्बपत्र अर्पण करण्याची कल्पना
रम्य निसर्ग पंच नद्या सनातन जीवन दायिनी कृष्णा व आधुनिक विज्ञान वाहिनी कोयना
देवस्थान ब्रह्मारण्य अतिबळ, महाबळ लिंगा मध्ये नद्यांचे साक्षात्कार ---देवस्थान उत्त्पन्न ,सेवा विशेष शिसवी चंद्र राव मोरे नाग वीज ट्रस्टी
पायी प्रतापगडाकडे मधल्या वाटेने प्रयाण व वाड्याकडील पायथ्याशी रोशी मुक्काम
शुक्रवार -
वाड्यावरून मधल्या वाटेने प्रतापगडाकडे आईचे स्नान करून दर्शन फार दिवसांची इच्छा पूर्ण. आई तुझे लाडके लेकरू आज तुझ्या कडे आले आहे. शिवस्तुती संध्या काळी मधून अधून वीज परंतु चांदणे प्रचंड वाऱ्याच्या झोतात झोप गारठा तथापि शीण नाही चमकती चांदणी दर्शन शब्दांचा भास.
शनिवार + सोमवार
तटावर ३ तास निश्चल तटावरून उडी घेशील कां ? विचारले गेले हो म्हणालो पापणीही हलवायची नाही निविकल्प समाधी समाधीत रामकृष्ण हे नाव (अभेदानंद) एक साप मी इथेच बसतो तिकडे साप न येता बिळात.
जंगलात जीवनाचे उद्दिष्ट कोणते? विश्वाची नियतीशक्ती तिचा शोध बोध घेणे whether दक्षिणेश्वराकडे. माझा भूतांवर विश्वास नाही if दक्षिणेश्वर पथ्ये
३ दिवसांपेक्षा जास्त  मुक्काम नाही.
            वार स्नान व भवानी मातेच्या मंदिरात. राम कृष्ण विवेकानंद अभेदानंद असा जप गाभाऱ्यातून आवाज समग्र प्रतापगड दर्शन "क्ष" भेट
केंव्हा जाणार ? पृच्छा सातारच्या महाराजांची हि मिळकत असून माझ्यापासून कोणालाही त्रास नाही त्रासाचे उदाहरण न दाखविता धक्के मारून काढण्याची भाषा . केदारेश्वर दिवा नाही शिवाजी महाराज साक्षात शिवाचे अवतार साष्टांग नमस्कार दंडेलीच्या भाषेने राम कृष्ण पुरे पडतील काय? हा विचार. बंद दरवाजा नजीक बाहेरील बाजूस मुक्काम रात्रो गडावरून विचारपूस तेंव्हा तुम्ही ज्याला दुखः मानता त्याला आम्ही सुख मानतो असे उत्तर दिले आपुलकी बद्दल आभार मानले.
              वार प्रतापगडाकडून वाड्याकडे येताना बहुधा फकीर नावाचा एक जन भेटला. मुले विचारात नाहीत असे त्याचे म्हणणे अफझलखान कबरी जवळ यांनी( Possibly मुस्लीम ) नाव गाव न पुसता १ रु. भेट म्हणून दिला(अल्ला तेरा भला करो)आशीर्वाद. पुराणिक यांनी काळ जेवणखाणाबद्दल चौकशी केली होती आज त्यांच्या कडे वडा खाताना म्हाताऱ्याने पुन्हा प्रपंचात जावून पडण्याचा सल्ला दिला मीही आता सध्या निरुपयोगीच आहे तुम्हीही आपल्या मुलांबाळाकडून मिळेल ते संतोषाने खाऊन राहा. डोक्यात राख घालू नका .
I have said nothing त्यांचे आभार मानून देव करता करविता त्यांच्या बुद्धी प्रमाणे वागणार असे म्हणालो. वाड्यावरून चालत प्रयाण. वाटेत खेड्यात जेथे वाहतुकीची साधने पोचली नाहीत व माणुसकी शिल्लक आहे असा सुमारे ५० वर्षाचा म्हातारा भेटला. पृच्छा. देवासाठी घरदार सोडले हे त्यास खरे वाटले नाही. माणूस भाऊबंदांच्या भांडणाने घरदार सोडणार नाही पण (जीवाची सखी) बायको मुळे सोडेल. तेंव्हा बायकोस दोष द्यावयास जागा नाही असे म्हणालो त्याने जाताना भाकरीची (नाचणी) सोय केली. निरोगी दष्टपुष्ट गाय व तिचे वासरू ( as if काली रामकृष्ण ) यांचे दर्शन ...
One above can see all पुरावा Luxury bus पायी चार मैल चालेन असा अंदाज भगवंताने ७.५ मैल चालवले वस्ती कडे दिव्यांच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न परंतु मध्येच जंगलात मुक्काम.
                                                                                           .......... X ...... X ........X .......
डायरीतील नोंद-मला समजलेली – पहिल्या भाग एक ते भाग सहा मध्ये,बाबांचा प्रवास जरी कोथरूड ते सातारा मार्गे स्वारगेट इतकाच असला तरी मनाने ते त्यांचे बालपण फिरून आले.आई तिचा अकाली मृत्यू त्यांचे पुण्यास येणे,नातेवाईकांकडून आलेले अनुभव, चुलत आजोबांनी पुढील शिक्षणासाठी घरी ठेवून घेणे,थोरल्या बहिणी पासून ते पत्नी पर्यंत नातेसंबंधाने झालेली मानसिक आंदोलने असा त्यांचा पस्तीस वर्षांचा प्रवास नोंदला आहे. सातारा ते महाबळेश्वर ते कसे आलेत याची नोंद नाही.पण महाबळेश्वर आणि त्यापुढील कल्याण पर्यंतचा प्रवास,त्यांनी पायी केला आहे. तो काळ हा त्यांच्या मनस्थितीचा अंदाज केल्यास त्यांनी परिसर निसर्ग आणि माणसे यासह पुरेपूर अनुभवला पण नोंदी मात्र तुलनेने तटस्थपणे केल्या आहेत. तसेच डायरीतील प्रत्येक नोंद मुळात जशी आहे तशीच ठेवताना संपूर्ण सत्य सांगणे आणि अन्वयार्थ कुवतीनुसार काय वाटते ते सांगताना काढणे हेच तंत्र अखेरपर्यंत पाळावयाचे ठरवले आहे.
काळ १९७०/७१ चा.त्याकाळी महाराष्ट्राचा ग्रामीण परिसर तुलनेने अधिक वनांनी व्यापलेला होता. त्यामुळे तेंव्हा महाबळेश्वर व त्यापुढे रायगड जिल्ह्यातून त्यांनी केलेला प्रवास बहुतांशी पायी आहे.आणि नंतर कल्याण ते कोलकता हा रेल्वे प्रवास तोही विना तिकीट केला आहे.त्यावरून त्यांनी केलेल्या धाडसाची आपणास थोडीफार कल्पना येईल. आणि त्याच्या प्रवासाला मी धाडस या करिता म्हणतो आहे कारण त्यांचा महाबळेश्वर नंतर सुरु झालेला प्रवास पायी आहे. पण त्याच बरोबर तो चाळीस वर्षांपूर्वीचा आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. तसेच घर सोडताना त्यांनी किती रक्कम बरोबर घेतली याची नोंद नसली तरी नव्वद ते शंभर रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याचेकडे असणे शक्यच नव्हते. पुढे जावून त्यांच्या जवळील रोकड रक्कमेचा झालेला उल्लेख मी ओघातच सांगेन म्हणजे आपणास त्यांच्या प्रवासाची महती लक्षात येईल.
खरे तर घर सोडण्याची मानसिक तयारी असणे आणि घरदार सोडल्याची परिस्थिती प्रत्यक्ष स्वीकारणे यातील अंतर भरून काढणे तसे खुपच अवघड काम आहे. कणखर मनाने निर्णय घेतलेला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे सुरवातीस मन दोलायमान झाल्याचे दिसून येते.त्यामुळे महाबळेश्वर मुक्कामी देव दर्शनानंतर महादेवाचे पिंडीवर बिल्ब पत्र वाहताना त्याच्या मनात सर्वस्व त्यागाची भावना उफाळून आली असावी असे वाटते. त्या सर्वच परिस्थितीचे वर्णन - 'जीवनाचे बिल्बपत्र अर्पण करण्याची कल्पना ' या एका वाक्यातून प्रतिबिंबित होताना दिसत आहे. येथून पुढील प्रवास हा पायी असल्याने त्यांनी दररोजचे अंतर कधी पंधरा तर कधी वीस किलोमीटर पर्यंत आक्रमले आहे.म्हणजेच दिवसातील आठ ते अकरा तास त्यांनी पायी चालण्यात खर्चले आहेत. महाबळेश्वर नंतर वाडा मार्गे त्यांनी प्रतापगडाकडे प्रयाण केले आहे. त्याचे करारी वागणे प्रेरणादायी गोष्टीची तीव्र ओढ यामुळे गड आणि परिसर याची त्यांना भुरळ पडल्याचे जाणवते. भवानी मातेचे दर्शन घेतल्यावर ते देवीचे दर्शन घेतले असे न म्हणता आईचे दर्शन असे लिहून ठेवतात. आणि प्रतापगड त्याचा इतिहास यापुढे नतमस्तक होताना ते स्वतः बरोबरच एक वेगळा संवाद साधताना दिसतात.तेथील निसर्ग व परिसर याच्याशी तद्रूप होताना त्यांनी किती एकाग्रता ठेवली हे त्यांच्या- 'तटावर ३ तास निश्चल तटावरून उडी घेशील कां ? विचारले गेले, “ हो म्हणालो”,पापणीही हलवायची नाही निविकल्प समाधी' या नोंदीतून जाणवते. प्रवासाचे सुरवातीस असलेली जीवन संपवण्याची कल्पना मागे पडून,आता कोणतेही धाडस करण्याची मनस्थिती या नोंदीतून जाणवते त्यामुळे तटस्थ बसल्यावर आलेल्या सापाचे देखील भय त्यांना वाटले नाही.
मात्र याच काळात विविध नमुन्याची,माणसे कशी पदोपदी भेटत होती.ते सर्व जण त्यांच्याशी कसे वागले याचा प्रत्यय या सुरवातीच्या नोंदीपासून दिसत आहे.त्यामुळे गडावरील देवळातील मुक्काम न आवडलेला कोणी,जेंव्हा धक्के मारून हाकलण्याची   भाषा करतो तेंव्हा हि जिगर किंवा अशी जिद्द जार परकीयांची आक्रमणे झाली तेंव्हा मराठी माणसांनी दाखवली असती तर इंग्रजांचा अंमल भारतावर झालाच नसता असे मला वाटले. कोणाकडून अनपेक्षित मदतीचा हात पुढे तर कोणाचा संसारात परत जा हा सल्ला. म्हणजे जणू चालती बोलती जीवनाची शाळाच त्यांच्या भोवती उघडली होती. आणि हर एक तऱ्हेचा शिक्षक त्यांना सल्ला देण्यासाठी पावलोपावली भेटत होता असेच मला वाटले. (क्रमशः)

Saturday, March 19, 2011

मज भेटला ईश्वर ...

कलता सूर्य डोंगरामागे, पाऊले चालती झपा झपा

ओढ घराची लागता, चढ वाटे सोपा सोपा
सरकली झाडामागे उन्हे,जशी ललाटीची बट
उतरली कातर सांज, जणू काजळीचा घट

दाटणाऱ्या अंधाराला, लूक लुकत पाही चांदणी .
पाऊले घराकडे धावती, पोर वाट पाही अंगणी.
क्षिताजापार उडाली पाखरे, सांडत चांदणे वाटेवर
कसे तुडवू याला म्हणत,वारा धावे सभोवार

वाजता पाउल झोपडीशी,झेपावले ते तान्हुले
चुली समोरुनी मंद हास्य,मनोमनी सुखावले
अन तिरपा कटाक्ष,सांडला डोळ्यातून
सरला दिवस कष्टाचा,फुलला भाकरीचा भास्कर
मी निरोप दिला काळजीला,
अन माझ्या लक्ष्मीत मज भेटला ईश्वर

Thursday, March 10, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले- डायरीच्या नोंदीतून.भाग पाच.

डायरीतील नोंद -- असलेली
आमची आई तशी लवकरच वारली तिच्या मागे आमच्या थोरल्या बहिणीने आम्हा लहान भावंडांना आईचे प्रेम दिले.ती तर गावातच राहत होती.आमच्या सबंध घरादाराशी जवळीक राखून होती ती, तिची मुले एक बंडखोर,तर एक अबोल त्यागी तर एकाचा स्वभाव माझ्या मोठ्या मुला सारखा गूढ, त्यांचा जिव्हाळा.पावले आपोआप नकळत तिच्या घराकडे वळली.तीच घर तर मला परक नव्हतच. आई गेल्यावर एकाकी पोरकेपणावर तीनच फुंकर घालून दुखः हलक् केलेले. पण तिच्याशीही मोकळेपणे बोलावयाची चोरी. "जगावेगळा विक्षिप्तपणा" अशा शेलक्या शब्दात ती माझी संभावना करायला मागे पुढे पाहणारी नव्हती. जितकी प्रेमळ तितकीच शिस्तीची भोक्ती. ती रागावणे शक्य होते नव्हे तो तिचा हक्क होता. आणि मुख्य म्हणजे तिला हुकमत गाजवायची नसली तरी तिच्या प्रेमळ परंतु हुकमतीच्या शब्दापुढे मी पांगळा होतो. तिचे सामर्थ्य शब्दातले नसून त्यागातले, आपलेपणातले.भावाचे कल्याण व्हावे या शुद्ध हेतूतून निर्माण झालेले. मी अशावेळी काय करणार? मी एकटा आहे,निर्णयात कोणी सहभागी नाही तुझा तू एकट्याने घ्यावयाचा म्हणजे जबाबदारी अधिकच वाढलेली.त्यातून ती एक स्त्री. ती माझ्या पत्नीचीच बाजू घेणार,मग चक्क उरावर धोंडा ठेवून तथाकथित मोकळ्या वातावरणात हवापाण्याच्या गप्पा मारून,क्षेमकुशल विचारून,तिची मूर्ती भक्ती युक्त अंतकरणाने डोळ्यात साठवून निरोप घेतला.
जाये तू जाये कहां ? उपनगरातून नगरात आलो होतो. जावयाचेहि होते परंतु कोठे? याच नगरात बालपण गेले. त्याच्या खुणा ठायीठायी विखुरल्या होत्या.आज निर्जीव वास्तु देखील सजीव झाल्या सारख्या वाटत होत्या हितगुज करीत होत्या. कारण सर्वांपासून निरोप घेवून दूर जायचे होते. माझी शाळा असंख्य जुन्या आठवणी मनात डोकावत होत्या. या दगडमातीच्या वास्तुत हि शक्ती आली कोठून ? हसणारी फुले , वाऱ्याच्या झुळके बरोबर डोलणारी बाग उडणारे कारंजे क्रीडांगण, आईनंतर काही पवित्र संस्कार या शालामातेने माझ्यावर केले. आदर्शवादाची परंपरा जोपासली. “Factu non verba-"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" हे ध्येय वाक्य मिरवणारी हि माऊली कृती वीरांचा गौरव,तर वाचावीरांकडे पाहून हसत होती.बोल तू कोण? तिचा पुत्र म्हणवून घ्यावयास लायक आहेस ?
नाटकातला ट्रान्सफर सीन प्रमाणेंच,मी शिशुपणातून बालपणात केंव्हा प्रवेश केला,ते कळलेही नाही मात्र वातावरणात फरक जाणवणारा होता.कालचा राजा आजचा भिकारी, कालचा राजा आजचा गुलाम, कालचा अमीर आजचा फकीर,जमीन अस्मानचा फरक.
'गृहराज्यावर चिमणा राजा राज्य करी ,
आईची मृदुल कटी सिहासंन त्याचीया परी'
एखाद्या राज्यक्रांतीने सिहांसन उध्वस्थ व्हावे आगदी तसेच.आर्थिक आघाडीवर आमच्या वडिलांचा,सपशेल पराभव झाला होता व या पराभवाची हाय वडिलांआधी,माझ्या आईने खाल्ली. होते कसे? झाले कसे? हे दोन प्रश्न तिला सतावित होते. आणि इहलोकी हे प्रश्न सुटले नाहीत म्हणून कि काय तिने परलोकी धाव घेतली.
राजाच्या रंकाला, अमीराच्या फकिराला मग राजवाडा कुठला? हुमायुना तुझे स्थान दिल्लीत नाही. चाहु बाजूनी तुझी पारध होणार आहे. राजवाडा रिकामा करावाच लागणार आहे. कस्तुरीमृगाप्रमाणे या कस्तुरीचा सुगंध दश दिशात पसरो असेच आपले बाळ जन्मताना प्रत्येक पित्याचा आशीर्वाद आसतो.मात्र दैवे लाभला चिंतामणी तसे हे भाग्य लाखात एखाद्याचे वाट्याला येते. वडिलांचे आशीर्वाद पाठीशी घेवून जन्मग्राम सोडले आणि शिक्षणाकरींता पुणे गाठले.
डायरीतील नोंद-मला समजलेली –
वडील घराबाहेर पडले.कोथरूड येथून ते सर्वात प्रथम गणेशवाडी,डेक्कन जिमखाना येथे,माझ्या आत्याकडे गेले. आणि मग त्यांनी पुणे सोडले.घर सोडणे हा निर्णय मनी झाला.पण पुढील प्रवास नक्की केलेला नाही. या दोलायमान मनस्थितीत,त्यांनी वरील नोंद केली आहे.त्यामुळे ते आईच्या आठवणीने उदास होतात.आईच्या अकाली मृत्यूस कारणीभूत झालेली परिस्थिती,पुण्यात व्यतीत केले बालपण,त्यांच्या डोळ्यासमोरून सरकते.जीवनातील चढ उतार आणि प्राप्त परिस्थिती,याची सांगड घालताना ते ऐतिहासिक दाखले देतात.निर्णय अवघड असला,तरी पुढेच जावयाचे आहे,या मनाच्या खंबीरतेवर ते येतात,आणि त्यामुळे शाळा तिचे घोषवाक्य, शाळेने केलेले संस्कार यात देखील ते रममाण होतात. (क्रमशः)

Tuesday, March 1, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग चार.

डायरीतील नोंद -- असलेली
काही तरी विचित्र घडते आहे,कि जे आपण रोखू शकणार नाही;अशी माझ्या थोरल्या चिरंजीवांची भावना झाली असावी. आई घरात नाही आणि अण्णांची तर गावाला जावयाची तयारी चाललेली दिसते,बरे पूर्वसूचना,तीही नाही.माझी प्रत्येक हालचाल,जणू अगतिक बनून,तो डोळ्यांनी टिपीत होता. तयारी पूर्ण होताच आईजवळ देण्याकरिता,एका बसच्या तिकिटा पाठीमागे,त्याचेजवळ निरोप लिहून ठेवला "मी लवकरच परत येण्याकरिता दूर जात आहे."आणि काय घडणार याची कल्पना येवून,त्याचे डोळे पाणावले.शब्द मुके झाले होते, संयम आणि भावना यांचे ओढाताणीत,यावेळी कोणती हालचाल करेल.आई वडील यांना सारखेच पणाने,खुश करण्याच्या तारेवरच्या कसरतीवर,आम्ही दोघेही खुश होतो.स्वतःच्या मनाचा थांग पत्ता लागू न देण्याच्या,लहान वयातील धूर्तपणावर,कौतुकाचे पांघरूण घालत होतो.थोडक्यात आमची मुले,त्यांच्या गुण दोषांसह ती जशी आहेत तशी,आम्हाला आवडत होती आणि याचेच दुसरे नाव माया होय.
ती कदाचित मागे पळत येवून,हाताच्या बोटाला धरून,"अण्णा कुठ्ठे कुठ्ठे जावयाचे नाही,चला घरी आई तुमची वाट पाहील" आणि मग तिला ढकलून जावे म्हटले,तर सूर्यवंशी उत्तानपाद राजाची ..... गोष्ट आठवून,न जाणो माझ्या अगोदरच हि हट्टी बया,आपला अपमान झाला म्हणून रुसून फुगून,जंगल जवळ करावयाला पाहणार नाही.आणि तशी वेळ येवू नये म्हणून,निर्णय तिच्या पासून तिच्या आई पासून,साऱ्या साऱ्या पासून गुप्त ठेवला होता.प्रत्यक्ष तशा प्रसंगाला तोंड द्यावयाच्या वेळी,कसे वागावयाचे याची मनाच्या मनी अनेकवेळा कवायत करून घेत होतो.
अण्णा आता सौभाग्यवतीच्या लाघवी हास्याला भुलणार नव्हते.छोट्या छबकडीने घातलेल्या विळख्याला,वत्सलतापूर्वक बळी पडणार नव्हते.आपले घर,आपली पत्नी आपलीच कच्ची बच्ची लेकरे,हे सारे काही आपलेच,असता तू कुठे निघालास? वासरांना बघूनही वात्स् लतेचा पान्हा तुझ्या हृदह्यात दाटत नाही का? पंछी ना कर इतना प्यार प्यार है . . . पाखरांनो मी तुमच्यावर मला स्वतःला विसरून प्रेम केले.त्याची परत फेडही तुम्ही आपल्या शक्ती बुद्धी नुसार केली.आणि तुमची आई तुम्हाला म्हणाली,तुमचा बाप भ्याड आहे तर तुम्ही कोणाची बाजू घ्याल. तुम्हाला माझे खरे मनोगत समजेल का? हा शुरांत शूरपणाचा निर्णय राबविताना,माझ्या मनाच्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या उडणार आहेत. सहधर्मचारिणीला एकटे टाकून जावयाचे,तिच्या सुखदुखांत वास्तविक वाटेकरी व्हावयाचे टाकून होय, कुटुंबासाठी व्यक्तीने, गावासाठी कुटुंबाने. साठी गावाने प्रसंगी मोठा त्याग करण्याची वेळ हीच खरी कसोटीची वेळ असते,माझ्यातील विवेक जागा होवून बोलला.
तानाजी लग्नाची अक्षत घेवून महाराजांकडे आला आहे.परंतु महाराज सचिंत आहेत.हि अवघड कामगिरी पार पाडील तर,तो माझा तान्याच परंतु बोलांव कि न बोलांव.प्रसंगाला शोभेल? महाराजांच मन हेलकावे खातेय.आणि निर्णय पक्का झाल्यावर,"आधी लगीन कोंडाण्याच मग रायबाच" असे दिलासा देणारे वाक्य.वृद्ध शेलारमामा उदयभानूशी लढताना हरला नाही,इतक्या वृद्ध वयात कशासाठी लढायच? देव देश अन धर्मासाठी .. प्राण घेतले आपुल्या हाती.
चक्रव्यूह भेदायला तर हवा.तात इथे नाहीत,तू तर सिंहाचा छावा अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. सीतेच्या वनवासाच्या झळा,पती सानिध्याने सुसह्य,तर तरुणपणी एकलेपणाची व्यथा,मनाच्या मनी बोलावयाची चोरी. राजघराण्यातील स्त्रीचे कर्तव्य.किती एक दोन म्हणून सांगू,या साऱ्यांनी आपल्या विशिष्ठ श्रद्धेने,प्रचलित प्रसंगावर मात केली होती. तुलाही त्यांच्याच मार्गाने गेले पाहिजे.मनातल्या विचारांबरोबर घराबाहेर पडलेले पाऊल आता पुढेच पडावयाचे होते. थांबायचे नव्हते मागे वळून पहावयाचे नव्हते.
डायरीतील नोंद-मला समजलेली –वडिलांनी घर सोडतानाचा प्रसंग डायरीत लिहताना,घरी काय वातावरण होते ते इतके अचूक उभा केले आहे कि,मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी नसलो तरी,काय घडले असेल,याचा चल चितपटच डोळ्यासमोर उभा राहतो. माझे वडील तसे थोडे संतापीच होते. मुलांनी प्रगती करावी,हि भावना मनात बाळगताना,कधी कधी शिस्तीचा अतिरेक होत असे.पण त्या मागे मुलांचे हितच अधिक असे.एकदा घरी माझा भाऊ जेंव्हा तो जेमतेम आठ /नऊ वर्षांचा होता,तेंव्हा आरशा समोर उभा राहून बहिणीसाठी आणलेली,पावडर लावीत होता. तेंव्हा ती बाब न आवडल्याने,वडिलांनी सरळ तो डबा उचलला,आणि तिसऱ्या मजल्यावरून समोरील शेतात फेकून दिला.वेळ पाळणे या बाबत देखील,त्यांचा स्वभाव कमालीचा कडक होता. आम्ही लहान असताना,एका रविवारी दुपारी सिनेमास जाण्याचे ठरले. बस आणि सिनेमा वेळेत गाठण्यासाठी,घर दुपारी दोन वाजता सोडणे जरुरीचे असूनही,आईने घरातील अवराआवरीत उशीर केला.एकदा आईस पाच मिनिटात बाहेर पडायचे असे सांगून,वडिलांनी पाच मिनिटे वाट पहिली. त्यावेळी आई जेवणानंतरची भांडी घासत राहिली,त्यावेळी वडिलांनी घरातील टेबलावर ठेवतात ते घड्याळ उचलले,आणि आईसमोर फरशीवर आपटून फोडले.त्या कृतीत अतिरेकि संताप असला,तरी वेळेचे आणि शिस्तीचे महत्व होते. असे आज मला मागे वळून पाहताना वाटते.
अशा संतापी वडिलांनी बसच्या तिकिटावर,जेंव्हा आईसाठी मी घर सोडून जात आहे,असा निरोप ठेवला असेल तेंव्हा,भावाच्या जागी मी असतो तरी,त्या क्षणी त्यांना थांबवू शकलो असतो का? याचे उत्तर आजही मला नक्की देता येत नाही.आणि आता त्यांच्या डायरीतील तो भाग वाचताना,त्यांचा निर्धार आणि मनाच्या निग्रहाची,त्यांनी केलेली ध्रुवाच्या अढळवृत्तीशी तुलना पाहता,मी तिथे असण्याने परिस्थिती बदलू शकलो असतो का ? याचे उत्तर आजही देता येत नाही,हेच खरे.पण हे नक्की कि,त्यांची ती कृती म्हणजे, जबाबदारी झटकून केलेला भ्याड पणा नक्कीच नव्हता. त्या बाबतीत मी,झ्या वडिलांची एक धाडसी पुरुष म्हणून कायमच बाजू घेईन. (क्रमशः)