Thursday, April 21, 2011

झिंगलेला साप .......

वारुळातून आला साप,चालू लागला सरळ
मधेच त्याने थांबून,टाकली थोडी गरळ
पाहून त्याची चाल जो तो गाली हसतो
बघून त्याची थेर, वयस्कर साप पुटपुटतो...
वेळ काळाचे भान नाही याला, केंव्हाही हा लावतो.

झिंगून सरळ चालल्यावर सारेजण हसणारच
घ्यावी इतकी थोडीच कि चाल राहावी वळणदार
वाढले जरी उन तरी, आतून वाटेल गार गार.

थोडा वेळ सरळ चालून,साप आला भानावर
फार नव्हती चढली,म्हणत डोलू लागला वाऱ्यावर
ते पाहून आजोबा सापांनी फुत्कारले त्याला ...
खूप झाला तमाशा,आता वारुळात जावून डोला

हो हो निघालोच म्हणत,पुन्हा सरळ गेला वारुळात
पाहून त्याची सरळ चाल सापिण बाईच्या डोळा पाणी
कधी संपणार वनवास म्हणत, उगारली तिने फुंकणी

पाहून तो अवतार,पुरेपूर उतरली सापाची
कात टाकीत तिला म्हणाला ,यापुढे पिईन फक्त विदेशी छापाची

Friday, April 15, 2011

थडग्यातून पुन्हा बाहेर आलेला कलाकार......

डोक्यावर टोपी, हातात काठी,
ढगळी विजार आणि तंगकोट,
असा पेहराव देहाशी
बोलके डोळे आणि नाकाखाली छोटीशी मिशी.
ओळखले का कोण बरे हि स्वारी खाशी
हि तर व्यक्ती दिसते विदुषकी
पण बुद्धी, प्रसिद्धी आणि पैसा चालत आला याच्या पायाशी ......
ओळखलेत न हे वर्णन आहे एका अति प्रसिद्ध विनोद वीर, कलासक्त अभिनेत्याचे.
ज्याचे नाव घेताच, तुम्ही कितीही काळजीत, तणावात असलात तरी खुदकन हसाल असा अभिनेता ...चार्ली चॅप्लीन.
या थोर कलाकाराचा आज जन्म दिवस. आपले आयुष्य लोकांना हसवत ठेण्यासाठी खर्ची घालणारा हा कलंदर माणूस
आपल्या वडिलांचे बोट धरून याने चित्रपट सृष्टीत प्रवेश करत - "The Eight Lancashire Lads," या चित्रपटापासून कामास सुरवात केली.
जगाला हसवणाऱ्या या कलाकाराने वास्तव जीवनात हर तऱ्हेचे भोग भोगले. मुलगा आणि कुटुंबीय याची देखभाल नीट
न केल्याच्या आरोपावरून चार्लीच्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला. अति मद्यपानामुळे वयाच्या ३७ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी चार्लीचे वय होते फक्त बारा वर्षे.
चार्लीवर सर्वाधिक प्रभाव होता त्याची आई हॅना हिचा. गायिका आणि विनोदी अभिनेत्री म्हणून काम करणारी त्याची आई ही त्याचे श्रद्धास्थान होते. पण आजारपणामुळे आवाजावर परिणाम झाल्याने,चार्ली वयाच्या पाचव्या वर्ष पासून काम करू लागला. आईचे आजारपण मात्र वाढत जावून शेवटी त्याची परिणीती ती मानसिक रुग्ण होण्यात झाली. पण चार्लीने आईस कधीच अंतर दिले नाही.
याप्रकारे कौटुंबिक ताण तणावा नंतर नाते संबंधात देखील या महान कलाकारास अनंत अडचणी सोसाव्या लागल्या. काही वर्षांसाठी टिकलेली 'भातुकलीच्या खेळामधली ' अर्ध्यावर डाव मोडणारी तीन अयशस्वी लग्ने पदरी घेत केलेले त्याचे चौथे लग्न अखेर पर्यंत टिकले. हे लग्न झाले तेंव्हा चार्लीचे वय होते फक्त त्रेपन्न वर्षे. आणि वधु ओना-ओ-नील हि होती अठरा वर्षांची. या दाम्पत्यास आठ मुले झाली.
इतक्या हेलकावणाऱ्या नौकेतून प्रवास करणाऱ्या, या अस्थिर आयुष्य जगणाऱ्या कलाकाराने चित्रपट माध्यमातुन जगाला दिला तो फक्त निखळ आनंदच.
अर्थात या महान कलाकाराचे चित्रपट हसवणारे असले,तरी त्यातून जीवनातील विसंगती,दुखः, यावरील भाष्य पुरेपूर हादरवणारे होते.
आयुष्यभर असे अनंत चटके सोसत जगलेल्या कलाकाराचा अंत,स्विझर्लंड या सर्वात शांतताप्रिय देशात झाला. सन १९७७ च्या नाताळच्या पवित्र दिवशी चिरनिद्रा घेतलेल्या कलाकाराच्या नशिबी मृत्यू नंतर देखील शांत आयुष्य नसावे म्हणूनच कि काय पण १ मार्च १९७८ या दिवशी,त्याच्या मृतदेहाची चोरी झाली. मृतदेहाची शवपेटी परत करण्यासाठी पैशाची मागणी चोरांनी केली.
अर्थात स्विस सरकारने ११ आठवड्यात सदर शवपेटी परत मिळवून.ती अधिक सुरक्षित पणे दफन करून या प्रकरणावर पडदा टाकला. मी मात्र या घटना क्रमाकडे पाहताना असे म्हणतो कि, सतत ताण  तणावाच्या दुष्ट चक्रातून,जगाला  विनोद बुद्धी आणि विनोदी वृत्ती यांनी ज्याने जन्मभर फक्त हसवत ठेवले,तो परम प्रिय चार्ली त्याच्या मृत्युनंतर आता कोणी रडत नाही ना याची खात्री करण्यासाठीच जणू थडग्यातून पुन्हा बाहेर आला. आणि जणू त्याला समजले कि, मी गेलो तरी माझे चित्रपट लोकांना नेहमीच हसत ठेवतील. या खात्रीनंतर जणू त्याने खरी खुरी चिरनिद्रा घेतली. तर शेवटी इतकेच म्हणेन कि...
Simplicity is a difficult thing to achieve. हे एकच वाक्य प्रत्यक्षात अमलात आणणाऱ्या या कलाकारास त्याच्या जन्म दिनी केवळ सलाम !

Tuesday, April 12, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले- डायरीच्या नोंदीतून. भाग नऊ

डायरीतील नोंद -- असलेली.
शनिवार ता. २३-१-७१ आज स्टे. वेटिंग रूम मध्ये सकाळ उजाडली.कालचा विचार पुढे चालू होता.निर्णय स्नान करून घेण्याची कल्पना.स्नान. नंतर कार्यक्रम आखला.भारत भ्रमण पायी व रु.५० आरंभी जमवणे आवश्यक आहे काय? W. Ticket सारे विचार मनात घोळत होते.निवेदन व रामकृष्ण मिशन हे विचार मनात आले.निवेदन तयार केले व विठ्ठल मंदिर शहादे येथे रवाना. मनाशी ते विठ्ठलाच्या पुढ्यात वाचून,प्रथम निष्कांचन सराफ होणार.जवळची पुंजी ५०पैसे विठ्ठल पेटीत टाकून आजपासून समाजाच्या जीवावर जगण्याचा निश्चय.दुपार१२.५५ ....रेयॉन चे मॅनेजर ट्रस्टी बिर्लांपैकी देवळाच्या व्यवस्थापनामध्ये अतिथि अभ्यागत सोय नाही.तशी सोय वैष्णव मंदिरात असते.असे स्थानिक पुजारी म्हणाले. विश्रांती भवनामध्ये पैशांनी सोय व अगोदर नोटीस देण्याचा परिपाठ.देऊळ पालीढाणा शिल्प पद्धतीचे.वाईचा नंदी आणि येथील फात्तरांच्या शिल्प कृती मध्ये वाई उजवी वाटली. खर्चाचा अंदाज बांधण्याचा कालावधी नमूद नाही. स्त्री मूर्तीमध्ये काही उणीवा. निगा निगराणी चांगली. देऊळ टेकडीवर त्यामुळे प्रसन्नता, संगमरवरी फरशी स्वच्छता ,हिरवळ, पाण्याची सोय, पंडेगिरी नाही. आजच अगदी अनोखे वातावरण. फुटाणे घेण्याची हि सोय राखली नाही. एका केळीवाल्याला विनंती करताच केळ व सिंधी हिंदू खानावळी मध्ये सर्व आवरल तरी डाळ रोटीची सोय.
भोजन, भगवान तेरा भला करे असा आशीर्वाद.स्टेशन शहादवर पुढे टिटवाळा गणेश श्रींची ओढ.असाच काही वर्षांपूर्वी भटकत असता अपूर्ण राहिलेली,कामना पूर्ण करण्याचा मनोदय व लांब दूर जाताना आशीर्वादाची शिदोरी असावी अशा भावनेने दर्शन. भजन कोण असशी तू भजनानंतर खिरोद्याच्या शास्त्रींकडून आत्मानंदात (श्रोते नसताही) झालेले प्रवचन.मधुकर राव चौधरींच्या गावचा तरुण वय २४ लग्न नाही.अध्यात्म मार्गी कठोपनिषद भाषांतर करण्यात गुंतला असा इतिहास.बंगालच्या समस्येवर बोलणे.तुम्ही आत्मघातकी आहात,चालू नक्षलवाद्या बंगल्यांना उद्देशून इंदिराजी दोषी.हे विचार रात्री कल्याणमार्गे नागपूर मेलने रवाना. प्रवासात एका मुसलमानाशी आवाज चढवून भाषण,तसेच त्याच्या आजारी मुलाबद्दल सहानभूती.सिंधी व मुसलमान असे डब्यात दोन तट सिंधी स्त्री आपल्या पूर्वीच्या(फाळणी) दुःखांना न विसरलेली.मुसलमानास उद्देशून सो जाना तो सो जा बारा बरस को रामायणातील कुंभकर्ण उल्लेखावरून हसू.वेळ आल्यावर पाहू दुसऱ्या एका स्त्रीस उद्देशून मी प्रथम माताजीको जगह दि थी असा मुसलमानाच्या तोंडून शब्द्द प्रयोग ऐकल्यावर बरे वाटले.दुसरे व्यक्ती चित्र रेल्वेमधील जाडजूड मवाली वजा फणसासारखे राकट व्यक्तिमत्व .जीवनाचे तत्व ज्ञान जर जगावयाचे तर ज्या गोष्टी आवश्यक त्या केल्या पाहिजेत. तथापि विचारी वाटला.भगवान को मानते,या आप नही या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही.परंतु साधू संतांच्या विचारप्रणालीचा अभ्यास.  सूरदास पहिले आत्मा फिर परमात्मा,असे म्हणतो व हे गोपाळ ही कंठी माळ,तुझी तू सांभाळ असे उपवासी पोटी भडकल्यावर म्हणतो,असे त्याच्या बोलण्यात आले.चोर परीस्थीतीने चोरी करतो असे तो म्हणाल्यावर समजा तुमचे हे म्हणणे मान्य करून एखाद्याने तुमचे डबोले पळविल्यास,उदार मनाने त्याला क्षमा कराल काय? हे ऐकल्यावर तो वैयक्तिक  मालकी  हक्कांबद्दल बोलू लागला तात्पर्य आचार आणि विचार विचार आणि आचार सुसंगत नाहीत
रविवार ता. २४-१-७१ गाडी पुढे पुढे धावत होती आणि अकोल्याला उतरवयाचा निर्णय घेतला. "मै तो अभी नंगा हुवा है मेरे पास कूछ भी नही है!"असे T.C. ला म्हणण्याचा प्रसंग आला नाही.पायाला चप्पल लागलेली, केसांचे जंगल वाढलेलं अशा अवतारात चौकशी.आज रविवार सुट्टी पत्ता माहित नाही ११ ला खंडेलवाल टावर पाशी ते ४ ला घर दाढी कटिंग उरकले जाऊन. कृषी विद्यापीठात कोणी मला चपरासी समजले असावे वाचमन कडून पत्ता घेवून सदगुरु कृपा गजानन प्रसन्न अशा बंगल्यापाशी थकून बसलो असता अचानक दादांची गाठ. स्नान पोहे रात्रो भोजन. झाशीच्या राणीची मुलांना कथा राजेंद्र why so dull ? सायकोलॉजी विचारात घेवून शिक्षण दिल जात नाही हे काय? त्याला येत नाही असे न म्हणता प्रयत्न करणे आवश्यक आहे काय? वाचन. ....................... x ...........................
२५-१-७१ ... -१-७१ सो ... सकाळी गच्चीवर .............. घेत असता पंडितची गाठ पडल्यावर त्यास प्रथम मला येथे ३ दिवसापेक्षा जास्त राहता येणार नाही अशी कल्पना दिली.त्याचे म्हणणे मी अचानक न कळविता जावू नये. त्यानंतर त्याने महाबळेश्वर सातारा वाई पाली मढ अशा ठिकाणी शोध घेतल्याचे सांगितले.कांतानेही गाडी देऊन सहकार्य दिले. चुलत भाऊ मात्र लाबं राहिल्याचे दिसले. जोडलेले प्रेम अधिक प्रभावी ठरले काय? चुलत घरी सल्ला Go to police सौ. अजून पुण्याला आहे. तिची Reaction विचारण्याचे धैर्य झाले नाही She will be continued to live मुलांबद्दल तुला परम वाटत नाही का ? या प्रश्नास कर्तव्य म्हणून उत्तर दिले. श्रीरामाचे देऊळ पाहिले. कृषी विद्यापीठ अकोला देवळाचे त्यातील वचनांमुळे आकर्षण.
                                                                    .................................... x ................................
२६ जाने. ध्वजवंदन कलेक्टर कचेरीत जाण्या अगोदर स्वातंत्र्य रक्षणाकरिता भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे.अशा भूमिकेतून देवदर्शन त्यात झेंडा वंदन वेळ हुकली. आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र असले पाहिजे श्रीराम देवळातील वाचणे उदरुत वहीवर केली. संध्याकाळी कन्याशाळेजवळच्या बागेत. नाथ पै.निगर्वी कोकणात मोटरेबल रस्ता नसतां सायकल वर हिंडले प्रामाणिक आम्ही पार्लमेंट मध्ये जरी बोलत असलो तरी खरे कार्य तुमचेच आहे ग्रामीण कार्यकर्त्यांना उत्तेजन दिल्याचा प्रसंग. त्यानंतर मला आलेले अनुभव घराबाहेर पडल्या पासूनचे सांगून वही वाचावयास दिली काही खाणाखुणा सांगितल्या. फक्त एकच गोष्ट माझ्या मनात येते ती म्हणजे मुले पुरेशी मोठी झालेली नाहीत,परंतु ही गोष्ट मात्र नक्की कि मी असमाधानाने, चिडून ,रुसून, रागावून, निराश होऊन घर सोडत नसून,तू मला मुलां बाबतच्या कर्तव्याचा विचार कळकळीने करावयाची,जी आठवण देतो आहे त्याची जाणीव ठेवूनच घर सोडले आहे
                                                ................................. x .................................
२७ जाने तुझे नक्की ठरले का? याला होय उत्तर देऊन आज जाण्याची आठवण दिली. दादा काय म्हणाले दादांनाही कल्पना दिली आहे. दादांच्या स्वाभाविक शब्द्दाला तुम्हाला आमचा स्वभाव ओळखता आला नाही ...... ४५ वर्षांच्या विचारानंतर झालेली ही स्वाभाविकच परिणीती होय असे सांगितले
दुपारी सर्व गाड्या निघून गेल्यानंतर स्टेशनवर गेल्याने आजचे जाणे उद्यावर लांबले. 'मढे' या भावजयीच्या शब्द्दावरून काही समजावयाला गेलो असता एकेरीवर येवून तुझ्या खड्कुची मिंधी नाही मला फक्त माझा नवरा काय ते सांगू शकतो. तुला लाज नाही म्हणून माझ्या घरी भिक मागवयाला आलास. बायकोला ठेवलीयाय तिथ आणि इथ गिळायला आलाय स्टेशनवर वाटले तर ट्रंका उचलाव्यात etc..
                                                                   
                                                                  -----------x----------------
आज सकाळी १० च्या सुमारास अकोला सोडले. for Nagpur राम कृष्ण श्रमाबरोबरच रेशीम बाग मनात घोळत होती. संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राम कृष्णाश्रम ,नागपूरला हजर झालो. पद्धत treatment प्रार्थनेनंतर कुणी प्रसादाचे राहिलय का? अगर इथे का बसला अशा प्रश्नातून संधी घेऊन ओळख करून द्यावयाचा विचार होता.परंतु बराच वेळ गेल्यानंतर स्वतःच एका स्वामींना मनोगत सांगितल्यावर त्यांनी Bengal is disturbed असे सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न परंतु शेवटी as you are adomnant you may go म्हणाले मी ते काय को ऑपरेशन देवू शकतात विचारल्यावर नियमांकडे बोट दाखवून No shelter for night . he is nor free to take such decision ......असे त्यांचे ऐकून स्टेशन कडे .via झाडाच्या तळातला गणपती पाहून Third class waiting रूम मध्ये मुक्काम. (क्रमशः)

डायरीतील नोंद-मला समजलेली -या भागातील डायरीची नोंद प्रवास एका नव्या टप्यावर पोहचल्याची माहिती देतो. महाबळेश्वरापासून पायी झालेला माणगाव ... पाली महड ..खोपोली मार्गे कल्याण असा प्रवासाचा पहिला टप्पा संपल्यानंतर त्यांच्या मनात देवाच्या शोधाच्या प्रेरणेतून भारत भ्रमणाची कल्पना साकारली आहे. फक्त निरुदेश भटकणे असते तर त्यांनी, कसलाही संग्रह न करण्याचा केलेला निश्चय, मग प्रथम रु. ५० गोळा होणे जरुरीचे असे ठरवले आणि कसलाच साठ करयचा नाही,समाज काळजी घेईल असे म्हणत,स्वतः जवळ असलेले ५०पैसे हि त्यांनी,देवासामोरील दानपेटीत टाकले.त्यावेळी मनातला  निश्चय पूर्ण होईल,तसेच हा समाजच माझी काळजी घेईल,हि त्यांची अंतरीची श्रद्धा मला वंदनीय वाटते.हा प्रवास सुरु असताना वाटेत अकोला येथे ते त्यांच्या भावाचे घरी जातात. प्रत्यक्षात पत्ता माहित नाही ऐकलेल्या परिसरात अंदाजाने चौकशी सुरु , आणि अचानक वडिलांना आजोबाची भेट होणे हे सहजतेने नोंदवलेले योग देखील मला अचंबित करतात. घर सोडून प्रवास करताना ते अकोला येथे भावाचे घरी आले तरी मुळ संकल्पापासून दूर जायचे नाही हे नक्की असल्याने दुसऱ्याच दिवशी त्यांनी भावास मला येथे तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहता येणार नाही. असे सांगितले.त्यावर माझे काका यांनी वडिलांना खूपच समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी न कळवता घर सोडण्यातून निर्माण झालेल्या अडचणी,त्यांच्या शोधासाठी तेंव्हा केलेली धडपड त्यांना सांगितली.पण त्यांनी त्याकडे तटस्थतेने पाहिल्याचे दिसते. माझ्या काकुस माझे वडील, काम धंदा न करता आता भावाचे घरीच ठाण मांडणार, अशी वाटलेली अनाठायी भीती व त्यातून झालेला संघर्ष हे प्रत्येकाचे विचार आणि संसार चालवताना जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, कसे भिन्न असतात याचीच साक्ष देतात. पुढे अकोल्यानंतर नागपुरात रामकृष्ण मठात अपेक्षित सहकार्य न मिळून देखील कसलेही किल्मिष मनात न ठेवता त्यांनी स्टेशनवर रात्र काढली. एकूणच अडचणींकडे त्यांनी खूपच निग्रहपूर्वक व त्रयस्थ वृत्तीने पाहिल्याचे पदोपदी दिसत आहे.

Friday, April 8, 2011

माझ्यासाठी नव निर्मिती.....

आज बसलो लिहायला कविता, लेखणीत भरली ठासून शाई
जुळवण्यासाठी यमक, कानामात्रे शोधताना,वेलांटीच उलटी होई

आठवेनात नवीन शब्द,सुचेनात विचार
अकार उकार हवेत कोणाला,नुसतेच मारू रफार

मग पुन्हा पुन्हा उचलले,भोवतीचे कागदांचे बोळे
कडव्याच्या जुळवा जुळवी साठी ,फिरवले त्यावरून डोळे

ताल  नाही, सूर नाही, नाहीत अलंकार,अनुप्रास
त्यासाठी सुचावे लागते,आतून विनासायास

आडातच काही नाही,तर येईल कसे पोहऱ्यात
छंद बद्ध झाली नाही,तरी मीच माझ्या तोऱ्यात

अशी हि माझी कविता,मीच पुन्हा पुन्हा वाचून पाही
माझ्यासाठी नव निर्मिती, बाकी म्हणती काहीच्या काही

Tuesday, April 5, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून. भाग आठ

डायरीतील नोंद -- असलेली
 श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या धर्मशाळेत मुक्काम. समोरील दोन्ही तळ्याची स्वच्छता वाटली नाही. शेवाळ्याने झाकून हिरवट. चुळ. एक प्रकारचा वास.पुढे उन पाण्याच्या झऱ्यावर स्नान,काल उपवास अतिशय थकवा.स्नानोत्तर ग्लानी जवळ श्री विठ्ठल रुखमाई च्या देवळात दर्शन व जवळ हॉटेल मध्ये लाडू. जेवणाची सोय ( साधे) नसल्याचे सांगितले.सावकाश बल्लाळेश्वर मंदिरात जावून साष्टांग नमस्कार व बंगालला जाण्यास आशीर्वाद मागितला. पुराणीकांच्या जेवणाची आयत्यावेळी सोय नाही. संन्यासी,अथिती, अभ्यागतांची देवस्थानातर्फे काही व्यवस्था होते किंवा नाही, याची चौकशी न करिता तेथल्या पेटीत मूलतः निवृत्तीची प्रेरणा होवून आलेले,रानटी वाघ माणसाळविता येत नाहीत अशा अर्थाचे व शक्यतो राम कृष्ण परम हंसाच्या मार्गाने जाण्याबाबतचे पत्र रवाना करून बाहेर. राइस प्लेट भागवत एक नमुना (धंदा करावयाचा तो कठोर वृत्तीने . भोजनगृह प्रोप्रायटर) दुपारी पुन्हा प्रवासास सुरवात.सुमारे पाच मैलावर मुक्काम. आजच्या यजमानाचा मोठा विलक्षण अनुभव आला. संध्याकाळ संपून निरव रात्रीला सुरवात.रस्त्यावरील एकमेव झोपडीत मी एक वाटसरू असून सोय होईल का?म्हणून विचारल्यावर माझ्याकडे ढुंकूनही न बघता आपल्याच उद्योगात मग्न असताना हुं केले.नंतर माझ्या जवळचे तांदूळ शिजवून द्याल का, त्यावर काय बुवा का? हो बुवाच म्हटल्यावर पातेल्यात भाताची हंडी चढवून त्याकडे मला पहावयास सांगून बुवा कसे? बायको मुले असता विरक्त वृत्तीचा त्याला भयंकर संताप येवून मी बरे केले नाही असी त्याची भावना.त्याला स्वतःला ९ मुले असून एक मँट्रिक गावातला कार्यकर्ता, कॉंग्रेसशी संबंधी शिव शंकराचा भक्त. त्याची प्रथम ओळखच आज होला मारून आणलाय या शब्दाने प्रांजळ मला निदान महिन्यातून एकदा बायको पाहिजे. मी थापड्या बुवा असून थापेबाजी चालणार नाही संपूर्ण नाव व पत्ता लिहून हि हकीगत पोलीस पाटलांना कळविणार आहे.बुवा होऊन देशाचे कल्याण म्हटल्यावर तुम्ही आणि देशाचे कल्याण करणार म्हणून, उपहासाने तुम्ही जेवून घ्या जेवल्यावर तुम्हाला बांधून घालतो, गडबड कराल तर कोयत्याशी गाठ आहे,अशा वातावरणात जेवणाची सुरवात झाली. माझी वृत्ती शांत होती. त्याला बिडी प्यायचीही सवय जेवतांना स्थिर वृत्ती.भात तुम्ही घेवू शकता. त्याने  आपली भाकरी कालवणासह आग्रहाने मला दिली.तिथे असलेली गावातली माणसे गेल्यावर एक कातकरी फरारी असून त्याला पकडण्याकरिता पोलीस फिरताहेत त्याला आश्रय मी देतो हि समजूत (गावकऱ्यांची )असून तुम्ही शांतपणे जेवा.तुम्ही शिव शंकरच आहात. परंतु मला वाटते तुमच्या डोक्यावर काहीतरी नक्की परिणाम झाला आहे.त्याकरिता तुमच्या कपाळावर डाग दिला पाहिजे. स्वतःला झालेली दुःखे व त्याकरिता त्याने हाता पायावर घेतलेले डाग पाहून,त्याच्या शूरत्वाचा प्रत्यय.जेवण झाल्यावर आता तुम्ही बाहेर अंगणात झोपा, अशी माझी रवानगी. अंगावर पांघरूण नाही.वरील वातावरणात हि मी येथेच झोपणार.गृहस्थाने त्याच्या वृत्तीत पालट होऊन एक पोते पांघरावयास दिले.नाथाच्या पोथीतल्या कथा ( बाळासाहेब) पोराला रसाळपणे सांगत होता.सकाळी निरोप घेतला. बंद दाराशी पोते ठेवले आभार मानले व विचारून निघालो.
-------------------x ------------------------
वार दिनांक खोपोलीच्या दिशेने उजाडण्या पूर्वी वाटचाल सुरु. सुमारे तेरा मैल चालल्यावर खाण्याची हालचाल. वाटेत कोयना पुनर्वसहातींची गावे. शिमडी, कारगाव . एके ठिकाणी मारुतीचे देऊळ . मुळ ठिकाणाहून त्यांनी श्रद्धेने आणला असला पाहिजे. जवळचे तांदूळ कुठे शिजवून मिळतील का?
अलीकडच्या गावच्या म्हातारीने सून बाहेर गेली आहे. पुढील गावी वस्ती आहे. पुढील गावी आई मला तांदूळ शिजवून मिळतील का?म्हणून विचारल्यावर तिने शेजारच्या म्हातारीकडे बोट दाखवले.२-५ जण भोवती जमा झाले. परंतु कोठे सोय होण्यासारखी दिसली नाही.प्रवास चालू शीळ फाट्याला रात्र. पूर्व इतिहास जेंव्हा घरावर जप्त्ती आली तेंव्हा आईने मला पोटाशी धरून " तुझा सांभाळ आता प्रत्यक्ष परमेश्वर करील" त्याची प्रचीती.राम कृष्णांना भावना नसतात त्यांना इतिहास ऐकावयाचा आहे हि भूमिका.
-------------------------- x --------------------------
वार दिनांक शीळ फाटा ते खोपोली. दैनंदिन संगीत भजनांची जोड देऊन खर्च भागवण्याची व रेल्वेने पुढील प्रवासाची कल्पना. खोपोली कर्जत (अंबरनाथला शहादे येथे न जाता) रेल्वेने प्रवास.कर्जतला मध्यान्हीच्या वेळी हेतू सांगून अथिती म्हणून आलो आहे. स्टेशन जवळच्या बंगल्यात शेट लोक झोपलेले आहेत असे उत्तर. दुसरीकडे वयस्क ब्राह्मणाकडे गेलो असता जात पोटशाखा चौकशी केली. देशस्थ यजुर्वेदी म्हटल्यावर मी तुम्हाला ५० पैसे देतो तुमची अपेक्षा काय? संग्रह नाही हे सूत्र सांगितले. पुढे तुम्ही येथील श्रीराम मेढी ५ लाखांची असामी आहे, दिलच अस काही मी सांगत नाही परंतु तुम्ही त्यांच्या कडे जावू शकता गाडी २.४५ थांबावयाचे नाही म्हणून मध्ये हॉटेलमध्ये खावून कल्याणकडे रवाना. कल्याणला हितगुज स्वतःची कुवत किती अदमास घे.जेवणाचे भान नाही स्टेशनवर खाऊन पाणी पिऊन वेटिंग रूम मध्ये झोप. बाकावरील जागा.पाय लागणे असे वादाचे विषय.छोटा मुलगा वय ८ते १० बाकावर झोपायचे नाही, असे पोलीस म्हणतात ,हि थाप देवून खाली झोपण्याची सूचना देई. हमाल हितसंबंधी असावा असे पाहटे दिसले.शहादे विठ्ठल मंदिरात जाऊन वेडावाकडा गाईन, परंतु तुझाच म्हणवीन अशी योजना. दक्षिणेश्वराचे ओढीने टाळली.निवांत जागी पुस्तकावरील विठ्ठलाला साक्षी ठेवून भजने म्हटली. (क्रमशः)
डायरीतील नोंद-मला समजलेली -- माणूस देव शोधण्याचे मागे धावतो. पण त्या मागे त्यागाची भावना ठेवत दिनक्रम आचरला,तर अनंत अडचणीत देखिल मार्ग सापडतो. आणि मला वाटतेय कि पाली पासून कर्जत पर्यंतच्या प्रवासातील अनुभव याचीच साक्ष देतात. उपवासाची तयारी आणि जिद्द असली तरी उपवास आणि पायी चालत राहणे यातून आलेला थकवा नोंदवताना, देवस्थानात जेवणाची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्याचा निषेध लेखी पेटीत टाकून पुढील प्रवास सुरु ठेवला. मुक्कामासाठी झोपडीत मागितलेला आश्रय आणि तेथील घटना क्रम हा आलीप्तपणे पाहिल्यास संकटास तटस्थतेने सामोरे जाणे, हे त्यांनी अंगवळणीच पडून घेतले होते असे वाटते. जेवण तयार करून मिळावे म्हणून अपरिचित ठिकाणी प्रयत्न करताना,झालेली भावना विवशता आईची आठवण येण्यास कारणीभूत ठरली. तर आजूबाजूस नतद्रष्ट वृत्ती दिसल्यास त्यातून संताप उफाळून येवू नये म्हणून भजनाचा आधार घेत त्यांनी त्याचा प्रवास सुरु ठेवल्याचे दिसत आहे.

Friday, April 1, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग सात

चिमणी चाक
जंगलातील चिमणी कोणताही संग्रह करीत नाही लागणाऱ्या दिवसापुरती कमाई केली आणि स्वच्छंदी राहील असे तिचे जीवन असते.
पोलादपूर महाड प्रवास फार सुंदर झाला चाकाच्या घरघरी बरोबर राम कृष्ण राम कृष्ण परमहंस आवाज महाड नदीत स्नान प्रवास रामदास .. रामकृष्ण
लंगोटी वरून विचार
....... x .......
s t stand वर झोपून. पाणी सोय शेडच्या मध्ये नाही. तोंड धुवून माणगाव रस्त्याने पुढे जाता पाळे येथे सावलीत. इथे कां? एकाने पृच्छा केली.
मुंबईला निघालो आहे चालत. मला वाटले वेडसर आहात पण तसे वाटत नाही .इथच थांबा. गावात तुमच्याकरिता काही पैश्याची सोय होते कां? नंतर वडारी केंजळ बाजूचे अशी ओळख करून देऊन त्याने आपल्या प्रपंचाची कहाणी सांगितली मुलगा थोरला नाव रामदास सुनेचे नाव सुलोचना अलीकडे पटेना ती ३/४ दिवस जेवा काही म्हणेना वेगळे राहण्याची प्रवृत्ती पाठीमागची भावंडे त्यांच्यावर माया नाही. त्यांना सल्ला. जर तुमच्या शिवाय संसाराचे गाडे अड्नारच असेल तरच तुम्ही त्यात लक्ष घाला सुनेला सिनेमा हवा वगैरे हकीगत. मुलांच्या अंगी कर्तुत्व असेल तर तो किती उड्या मारतोय ते पहा. बापाची आणि मुलाची माया तुटत नाही वेळेला ते एक झाल्याशिवाय राहणार नाहीत तरी त्याला तोडल्या सारखे दाखवा पण तोडू नका. दुपारी तीन वाजे पर्यंत जेवणाचा निरोप आला नाही तेंव्हा confirm करून पुढे निघण्याची तयारी तेंव्हा ४ पुऱ्या मुलाबरोबर आल्या. रस्ता तापला आहे पायाला फोड आले तरी श्रद्धेने पुढे पाऊल. दक्षिणेश्वर या ध्यासाने रायगडाची ओढ असूनही गेलो नाही. बौद्ध व पांडव लेण्या पहिल्या नाहीत महात्माजींना एकदा जोग फाल्स पाहायला येणार कां असे विचारले असता मी याहूनही उंचावरून पडणारे पाणी पहिले आहे (पाऊस) मी माझ्या कामात निमग्न आहे तुम्ही जावून या या उत्तराची आठवण पुढे वीट भट्ट्या, खाडीचे पाणी आत घुसलेले. देखावा सुंदर पुलाच्या कट्ट्यावर बसलो असता एक समाज सेवक आंबेडकर यांची गाठ त्यांचे गाव मैलावर.प्रवासाची कल्पना दिल्यावर दासगावी धर्मशाळा असल्याचे सांगितले जे बुद्ध झाले त्यांच्या वागणुकीत फरक झाला आहे कां? फक्त टोपी पाटी बदलल्यासारखे हे झाले आहे.त्यांच्या म्हणण्या प्रमाणे खर्च आटोक्यात, मुख्यतः हिंसेबद्दल कोंबड्या वगैरेबद्दल मला विचारायचे होते ठाम उत्तर नाही.
डोंगरातच घळीतच मुक्काम महाड पेक्षा हवामान रात्रीचे आल्हाद दायक
........ x .......
सकाळी उठून पाहतो तो भोंवती डाव पडलेले.उठून पाहतो तो रानफुल जाईसारखे पांढरे शुभ्र प्रसन्नतेने हासते आहे. प्रत्येक वस्तूच्या निर्मिती मागे काहीतरी परमेश्वरी हेतू दडलेला असतो हे निश्चित प्रसन्नतेने अधिक प्रसन्न वाटले हे मात्र खरे पुढे पाणी लागेल तिथे स्नान.परंतु आज सौ उन्हेरे नारळीच्या बागेत उन्हाळी असलेले हे स्थान, असे स्नान हि मेजवानी वाटली. पाण्याची तीन कुंडे पहिल्या कुंडावर मुस्लीम पद्धतीने बांधकाम . शेजारी दर्गा, कबर १३४२ H असे नमूद असलेले त्याला जी निशाणी वाहिली ती भगव्या झेंड्याच्या आकाराची रंगाने हिरवी होती. मुसलमानी प्रार्थना
स्नान करताना एकजण 'या अल्ला परवर दिगार' असे म्हणाला. लोकांनी लावलेली काठी असे तिथे खेळणाऱ्या मुलीला फकीर म्हणाला.परंतु लोकांनी कुठली आम्हीच लावली आहे असे छोटी मुलगी वय ८ते१० म्हणाली. दासगावला अंदाजे १.५ ते २ च्या सुमारास पोहोचलो व हॉटेल मध्ये जावून साधुत्व वृत्ती धारण करून मुंबई मार्गे बंगालला दक्षिणेश्वरी जात आहे आपणास आपल्या इच्छेने काही (उपहार) द्यावयाचे असल्यास देऊ शकता. चहा पुढे आला तो घेवून अंमळ प्रश्नोतरे ऐकत होतो. खा पिके सौना नाही खा पिके सौ देना साधू समाजाला अनुपयुक्त (भूभार) असा कदाचित त्यांचा ग्रह झाला असावा असे वाटून ठिकाण सोडले.दासगावला मी परमेश्वराचा दासानुदास असून दक्षिणेश्वराच्या रोखानेच माझी पाऊले पडतील व एकदा तोंडातून बंगालचे नाव निघाल्यावर आता मागे घेता येणार नाही. सूर्य मावळे पर्यंत जमेल तसे चालावयाचे मुक्काम लोणारीला वाटेत नाक्यावर एक ग्रहस्थ (वेषावरून) ब्राह्मण भेटला त्याला मी देवाचे नावाने घर सोडले आहे पायी प्रवास चालू आहे आज कुठे मुक्कामाची सोय होत असेल एखाद्याचे नाव सांगा. तात्या खोत जाणकार आहे तुमची नक्की सोय होईल परंतु तिथे गेल्यावर सर्वजण

सिनेमाला जाणार आहेत बायकांनी नाक्यावर जावे असा सल्ला दिला.व तेथून निघालो बुंदी लाडू पोटभर पाणी आणि st शेड मध्ये मुक्काम. वाटेत एका मुसलमानाच्या घरी पाणी पिण्याचा प्रसंग आला त्या घरी हरिश्चंद्र नावाचा गुराखी होता. त्यास म्हणालो पाणी जे देवाने निर्माण केले ते हिंदुकारिता अगर मुसल मानंकारिता नव्हे व मुसलमान अखेर माणूसच आहे
वार दिनांक जाने १९७ लोणारी पासून पायी प्रवासास सुरवात. माणगाव सुमारे १ मैल. सुमारे १६ तासात पाणी नाही व १.५ दिवसाहून जास्त जेवण नाही. चाल मात्र चालू चलो अभेदानंद अभी चलो. गुरु म्हणून कुणा माणसावर माझा विश्वास ठेवावयाची तयारी नव्हती, म्हणून प्रत्यक्ष भगवंतच माझा गुरु झालाय. वेळ आली म्हणजे गुरु भेटल्याशिवाय राहत नाही तो प्रत्यक्ष चालून येतो.सहन करण्याची वृत्ती म्हणजे तितिक्षा याचे आज असे धडे घेतले
पोटात अन्नाचा कण नव्हता. पाणी नाही तरी मधले काही क्षण विलक्षण समाधानात गेले येता येता उपवासाचा खरा अर्थ कळला सर्वांभूती आत्मा या तत्वाची जाणीव व्हावी म्हणून उपवास. वाटल साऱ्या श्रीमंतांना २ दिवस उपवास करावयाला सांगावे म्हणजे त्यांना गरिबांबद्दल खरा कळवळा उत्पन्न होईल खांजाई देवीजवळ बंगालच्या परिस्थितीबद्दल चे एक कच्चे निवेदन तयार केले. देवीच्या देवळात बैठक (meeting) बहुदा राजकीय कार्यकर्त्यांची . मी तिथे कदाचित थांबेन म्हणून त्यांनी मला माणगावला जायचा सल्ला दिला
----------- x ----------
माणगावच्या नदीत स्नान करताना मामू अशी भाषा, परंतु गळ्यात जानवे दिसले पेर फुटीवर कपडे वाळत टाकलेले सोडवून घेताना काट्याशी धसमुसळे पणा करून चालत नसतो.
वसंत भुवन देहरूपी गाडीमध्ये पाण्याचे पेट्रोल भरून पुढील प्रवासास. कोलाड नोगोठ्ण्याचे दिशेने. वाटेत बायकोच्या खुनाचा आरोप असलेला कातकरी पहाण्यात आला पण निरखून पाहिले गेले नाही. खांबला आज प्रथमच एके ठिकाणी (वेदक) जावून मी देवाकरिता गाव सोडले असून मुंबईस पायी प्रवास करीत आहे. आज संध्याकाळी मुक्कामाची व्यवस्था व्हावी.
तेंव्हा एका प्रौढ बाईने इच्छा असली तरी मुलाला पसंत पडणार नाही थोडे तांदूळ घेवून जा व देवीच्या देवळात मुक्काम करावा असा सल्ला दिला Helpless असल्याबद्दल
रागवू नये. तसे मानण्याचे काहीच कारण नाही म्हणून निरोप. देवळातील पोथी प्रवचने पुराणे बंद पडली असावीत तथापि नित्य पूजा चालू. मुंबईकर मंडळींनी भक्ती भावाने मोठी घंटा अर्पण केली आहे.देवळातच शाळा तीतीक्षेकारिता काही पाळणूक थके पर्यंत चाललो, भूक लागल्यावर जेवण . अंगावर एक किडा २-३ दा फुंकर मारली तरी हलेना तेंव्हा बैस बाबा म्हणालो अशीच भगवंताची वागणूक असावी. What creative energy has got by brain
स्वप्न सुंदरीचे सौंदर्य माझ्यावर परिणाम करू शकले नाही. स्वप्न आपण नुसते पाहतो परंतु स्वप्नातील भावनेशी एकरूप होवून त्या देखाव्यात जे शुचितेचे वातावरण तयार केले होते त्यात भर म्हणून रांगोळी पाहिजे असे मनात येवून "रांगोळी" असे उद्गगार बाहेर पडले.परंतु ते अखेर स्वप्नच होय.तशा प्रकारेच माणूस या जगताशी एकरूप झालेला असतो. बोगदेवजा गुहा पाणी मारून थंडगार आल्हाद दायक वातावरण
................. x ................
खांब हून सकाळी नागोठ्ण्याचे दिशेने जात असता एकाच्या गळ्यात पाली असे नाव लिहिलेला गंजीफ्राक दिसला तत्पूर्वी पाली बद्दल सूचना मिळाली होती. पाली वाकण पासून पाच मैल मध्ये नदीवर स्नान पुढे चाल पालीच्या दिशेने. पुलावर डोळे मिटून पडलो असता आकाशाचा देखावा त्यातून एक काळा ठिपका स्वच्छ आकाशात एक पक्षी उडतो तसा निर्माण होवून विलीन. पालीला पोहचल्यावर देवळात थांबू नये असा सूर. परंतु परिस्थिती सांगितल्यावर धर्मशाळेवजा ओवरीत पाडावयाची पंचांची परवानगी(आपटे)
इतरही बेत बोललो पण no response म्हणून निरोप स्वस्थ झोप. श्री गणेशा पुढे निवेदन करावे अशी भावना.
................. x ................
डायरीतील नोंद-मला समजलेली --
यापूर्वीच्या भागात त्यांनी महाबळेश्वर पासुन पुढील प्रवास पायी केला असे मी म्हटले होते. पण सातव्या भागाची सुरवात बघताना त्यांच्या नोंदीवरून असे वाटते कि, त्यांनी महाबळेश्वर सोडताना पोलादपूर पर्यंतचा प्रवास पायी केला आहे आणि त्यानंतर पोलादपूर ते महाड हा टप्पा बहुदा प्रवास वाहनाने केला आहे.कारण हा प्रवास सुंदर झाला असे लिहताना ते म्हणतात-
'चाकाच्या घरघरी बरोबर राम कृष्ण राम कृष्ण परमहंस आवाज' त्यावरून,चार ते सहा दिवसानंतर त्यांनी एक टप्पा गाडी वापरली असावी आणि त्या प्रवासात गाडीच्या संथ लयीतील आवाजाबरोबर त्यांचे मनातील विचार उफाळून वर आले असावेत.आपले नव्हते का होत लहानपणी कि,जर पिठाच्या गिरणीत गेलो तर तेथील चाकाच्या पाट्याच्या लयीत कोणतेही गाणे म्हणता येत असे तसेच काहीसे झाले असावे.याप्रमाणे घर सोडल्यानंतर त्यातल्यात्यात सुखाचा प्रवासाचा बसने केलेला प्रवास संपल्यानंतर पहिली रात्र त्यांनी एस.टीच्या शेडमध्ये काढली आणि पुढील प्रवास पायी सुरु केला. घर सोडून आलेला मानसिक ताण खाण्या पिण्याची सुरु झालेली अबाळ यांच्या बाह्य खुणा चेहरा शरीर यावर दिसू लागल्या असाव्यात. आणि त्यामुळेच पुढच्या टप्प्यात थकलेले शरीर विश्रांती साठी झाडा खाली विसावतच,बघणाऱ्याच्या नजरेत एक वेडा थांबल्याचे दिसते.
यानंतर पुढील दोन तीन दिवसातील प्रवास म्हणजे, घेतलेला निर्णय किती कठीण आहे, पुढे किती कष्टप्रद परीस्थीतीस तोंड द्यावे लागणार आहे, याचीच झलक होती. पायी सलग चालण्याची सवय अद्याप झाली नसल्याने, पायास फोड येणे;शिधा अथवा जेवण उपलब्ध होण्यात आलेला अनियमितपणा, यातून किती कठीण परिस्थिती अनुभवली, याची साक्ष ठायी ठायी दिसते.