Friday, May 13, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग अकरा

डायरीतील नोंद-- असलेली- तसं बघितले तर कलकत्त्यात आता काही उरले नव्हते कालीचा हुकुम about turn. तथापि विवेकानंदांच्या जन्म ठिकाणाचे दर्शन व राम कृष्णांना मी पुनश्च येईन(३.५ वर्षांची कालमर्यादा) असे सांगून कलकत्याहून निघावे असा आग्रह काळ बदलता आहे. ३.५ वर्षांनंतर कोणती परिस्थिती असेल हे आत्ताच सांगता येणार नाहीं. तथापि शेवटी पुन्हा एकदा दक्षिणेश्वरी जाण्याचे ठरवून रेल्वे स्टेशन वर आलो.लोकल दक्षिणे श्वर नजीकचा स्टेशन वर थांबत नाहीं बाहेर जावे तर T.C.चा अडसर अखेर एकदा उलटा कौल लागल्यावर इथूनच निरोप घ्यावयची तयारी होती.व जसा कौल लागला तसे मन त्या दिशेने ओढ घेऊ लागले व मुंबई गाडीत बसलो.परंतु मध्ये सारडीहा स्टेशन वर मिलिटरी पोलिसांनी उतरवले. बंगाली येत नाहीं वगैरे कल्पना दिल्यावर थोड्या वेळाने मुक्तता. दुसरा एक असा W.T.त्याचे उत्तर I have no aim to travel त्याला स्टेशन मास्तर कडून हरकत.मी कल्याणला जाण्याची भूमिका स्पष्ट केली व ती त्याने (appreciated ) मान्य केली.खेडे गावात तलाव अशी सोय नाहीं आडावर जावून स्नान कपडे धुतले. भगवानके लिये घर छोडा है असे म्हणून जवळ शिदोरी असता  मागावेसे वाटेना. हॉकर्सचा फ्लश पत्यांचा खेळ. आडाण्याशी( संग) खेळ नको. बिनसले कि सुऱ्याशी गाठ असे त्यांच्या बोलण्यात आले. जुगाऱ्याकडील अन्न घ्यावे काय? ते उदारही असतात हा विचार प्रत्यक्ष मागणी नाहीं.छोट्या स्टेशन वर मेल थांबत नाहीं. टाटानगरला जावयास पाहिजे . म्हणून गाडीत बसलो. पुनश्च रात्रीचे गाडीत T.C. भेट No Money म्हटल्यावर मध्येच उतरून घ्या म्हणाला. बर म्हणालो. उतरू लागताच डब्यातील बहुतेक मुसलमान प्रवाश्यांनी हुं ! म्हणावयाचे व प्रवास चालू ठेवावयाचा सल्ला दिला.साऱ्यांनी "भाजा बदाम" शेंगा खावयास घेतल्या Except me तेंव्हा एका व्यापाऱ्याने ५ पैशाच्या अयाचित शेंगा घेऊन दिल्या टाटा नगर ८-८.५ ला व रात्री २.५-३ तासांनी मुंबई गाडी.
                                                                                               ------------------ x ----------------
टाटा नगरहून पुढे प्रवास चालू. जागा मिळणे मुश्कील ३.५ ते ४ तास उभ्याने. पुन्हा T.C. बंगाली वाघाची गाठ. परंतु गर्दी मुळे माझ्या पर्यंत पोहोचू शकला नाहीं.विलासपूर मार्गे पुढे मुंबई दिशेने रवाना संत्रा फोडी,पोहे, शेंगदाणे गुळ हि शिदोरी एकाने पुरी भाजी घेतली होती परंतु ती त्याला नको होती ती disopse off करण्या अगोदर तुम्हास नको असेल तर मी वापरू शकेन असे म्हणावे वाटते न वाटते तो खिडकीतून त्याने टाकून दिली.मनात विचार आला न जाणो त्यात दुसऱ्याचा शेर असेल त्याने जागा सोडण्यापूर्वी एक चिवडा पुडी गाडीत मिळून आली व त्याचा उपयोग. त्याची पुडी राहिली का? हे confirm केले जावयास हवे होते काय? एक ठिकाणी गोंदिया पुढे एक पोलीस ड्रेस घालून जागेकरिता दमात घेऊ पाहत होता.परंतु प्रवाशाने मी उठून बसतो परंतु तुला जागा मिळणार नाहीं असा पवित्रा घेतल्यावर तो गप्प पोलीस म्हणून नव्हे तर माणूस म्हणून शेजारी जागा दिली. शासनाचा बोज राहील तर बरे हा हेतू कल्याणवरून शिवाजीनगर oppsite बाजू कडे उतरून सौ. अक्का तिला कलकत्त्याहून लिहिलेले पत्र मी येण्या अगोदर मिळाले होते. प्रमिला येण्याचा आज संभव किल्ली असेल तर तिकडेच कोथरूडला जातो. जेवून जा म्हणाल्यावर जेवण. तुला सांगायला काही हरकत नाहीं तुझी बायको, अशी धीराची खऱ्या संस्कृतीची, तुझ भाग्य थोर म्हणून तुला मिळाली असे सौ. बद्दल गौरवोदगार व ती ऐकायला इथ नाहीं असे म्हणत असतानाच ती वाट चालत होती. मला पाहिल्यावर प्रथम अश्रूंना वाट.आज राजारामबापू पिंपरीला त्या दिवशी उभयता तिथेच थांबलो. गेल्या नंतर कांता व पंडित यांनी शोध शोधी चे जे परिश्रम त्याची हकीगत कानठळ्या बसवणारा आवाज. भूकंप अशी प्रतिक्रिया .तुझ्या भरवशावर कलकत्ता गाठले तसेच (T.C. ना तोंड देत ) पुणे हि गाठीन व हा प्रवास सुखरूप पार पाडण्याची जबाबदारी त्याने (भगवंताने) पार पाडली पुण्यात आल्यावर प्रेस्टीजच्या कल्पनेने कपडे बदलून सौ अक्काच्या घराकडे वाटेत विठ्ठल वाडीला जाऊन या प्रवासाची सांगता करावी हा विचार परंतु ज्ञानेश्वर पादुका दर्शनाने समाप्ती………(समाप्त)
डायरीतील नोंद-मला समजलेली - गेल्या दहा भागात मला गवसलेली माझ्या वडिलांची रोजनिशी जशीच्या तशी तुमच्या समोर मांडली. आम्ही तीन भावंडे आणि माझी आई यांना एकटे सोडून अचानक सर्व संग त्याग करून विरक्तीच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेत वडिलांनी घर सोडले होते. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सुरवातीच्या प्रवासातील तीन ते चार ठिकाणी ते ठिकाण वडिलांनी सोडले आणि मग त्यांना शोधत माग काढणारे माझे काका तिथे पोहचले असे झाले. पुढे मग त्यांच्या घर सोडून जाण्याच्या प्रश्नाची तीव्रता जगाच्या दृष्टीने कमी होत गेली. आता मुलांकडे बघून तुलाच घर चालवले पाहिजे असे सांगत, बहुतेक नातेवाईक आपापल्या संसारात रममाण झाले.आज त्याकाळी मी स्वतः आजोळी असल्याने आईचे रोजचे भावनिक हाल पाहण्यास मी नव्हतो. पण आज त्या दिवसातील आठवणी मन सुन्न करतात.
आज अखेरचा रोजनिशीचा भाग मी आपणासमोर ठेवला आहे. वडिलांना घरी परतण्याचा कौल मिळाला. ते कलकत्ता पुणे प्रवास विनातिकीट करताना पकडले गेले नाहीत. सुमारे दोन महिन्याचा कालावधी त्यांनी, समाज माझी काळजी घेईल. सर्व व्यवस्थित पार पडण्यासाठी भगवंत आहे, या श्रद्धेवर काढला. आज चाळीस वर्षांनतर या घटना क्रमाकडे पहिले कि, खरोखर श्रद्धा माणसाला किती बळ  देते याची प्रचीती येते.
पुण्यात परत आल्यावर देखील माझ्या वडिलांची पाऊले प्रथम माझ्या आत्याच्या घराकडेच वळली. आई माघारी वडिलांना आईच्या प्रेमाने तिनेच लहानाचे मोठे केले होते. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वर पादुकांच्या दर्शना नंतर माझ्या आत्याचे घर जवळ केले. या प्रवासानंतर पुढे दोन वर्षांनी किरकोळ आजारपणाचे कारण होवून जुलै १९७३ मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आईस तरुण पाणीच वैधव्य आले. पण अखेरच्या दिवसात त्यांची काळजी घेता आली या समाधानावर आईने आम्हा सर्व भावंडांना लहानाचे मोठे केले.
पण या रोजनिशीच्या वाचनातून,भले लौकिक दृष्ट्या माझे वडील संसारात यशस्वी नसतील, पण पारलौकिक अर्थाने ते सरळ मार्गी आणि त्यांचा अभिमान बाळगावा असे आदर्श पिता होते हे मात्र अंतिम सत्य मला समजले...
आणि हे सत्य मी माझ्या शब्दात तुमच्या समोर ठेवीत वडिलांची   डायरी बंद करतो....

Monday, May 9, 2011

मराठी काव्यातील 'माणिक'

१० मे ... एक्काहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सौ.सुमित्रा आणि श्री.सीताराम गोडघाटे,या दांपत्याचे पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले. भविष्यात एखाद्या क्षेत्रात हे मुल हिऱ्याप्रमाणे चमकून उठेल याची पुसटशी कल्पना नसताना,त्यांनी त्याचे नाव 'माणिक' असे ठेवले. पुढे वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्यावर्षी हे झाकले माणिक,खरोखरच कोहिनूर हिऱ्या प्रमाणे चमकून उठले. 'संध्याकाळच्या कविता' या गूढ गंभीर काव्य रचनेतून ते जगासमोर आले.अर्थात इतक्या माहिती नंतर देखील आपल्या मनीचे गूढ नाही ना संपले.कारण ते जगासाठी ते माणिक सीताराम गोडघाटे या नावानी लिहिते झाले नाहीत. त्यांच्या कविता तरल,गूढ गंभीर आणि आडनावाप्रमाणे गोडघाटणीच्या असल्या तरी त्यांनी लिह्ण्याकरिता घेतलेले नाव आहे 'ग्रेस'. माणिक हे पाळण्यातील नाव असले तरी ते लिहिते झाले ग्रेस या पूर्णतः ग्रेसफुल शीर्षकाने .

ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादात होता... किंवा
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते... या रचनांनी आज मनामनात प्रतिभावंत म्हणून नोंदलेले कवी ग्रेस त्यांचा ७१वा वाढदिवस दिनांक दहा मे रोजी साजरा करीत आहेत.त्यांच्या प्रतिभेला आणि त्यांना मानाचा  मुजरा देत समस्त रसिकाच्या वतीने जीवेत शरद शतम! अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत मी त्यांना दीर्घायुष चिंतितो.
प्रकाश जळतो हळू हळू कि चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दुखः सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका..
या ओळीतून जिथे कवीस प्रकाशाच्या उजळण्याच्या जागी प्रकाशाचे जळणे दिसते. किंवा निबिड अरण्यातील अनेक पावसात भिजून,हिरवा कच्च शेवाळलेला वृक्ष जणू मूकपणेच त्या रंगाचा स्वीकार करीत आहे. आणि नेणिवेच्या जाणीवेतून आयुष्याच्या क्षितिजावर सुख दुःखाकडे तटस्थतेने पाहणारा मेघ आपोआपच परका वाटू लागतो
या आणि अशा अनेक अर्थपूर्ण कविता देताना या कवीने गूढता,दुर्बोधता याकडे खऱ्या अर्थाने पाहण्यास शिकवले.कवीता समजणे आणि कविता उलगडणे यातील अन्तर जर तुम्हास कमी करता येणार असेल तरच तुम्ही ग्रेस समजून घेवू शकाल.अर्थात स्वतः कवी ग्रेस यांनी त्यांच्यावर बसलेल्या दुर्बोध कवितांचा जनक या शिक्याची कधीच पर्वा केली नाही. या उलट स्वतःमधील आणि कवितेतील गूढता आणि इतरांना वाटणारी दुर्बोधता जपताना त्यांनी भरभरून बोलत, त्यांच्या 'ती गेली तेंव्हा..'या सुप्रसिद्ध कवितेचे विश्लेषण अपुर्वतेने केले आहे त्यासाठी हि लींक आपण वेळ काढून जरूर ऐका-
सदर फिल्मच्या शीर्षकात ग्रेस यांना विचारवंत कवी असे संबोधले आहे.पण त्यांच्या कविता वाचयला लागले कि, प्रतिभावान कवीच्या अंतर्मुख करणाऱ्या प्रगल्भ रचना असे त्यांच्या कवितेस संबोधावे वाटते.कविमन कविता साकारताना वेगवेगळ्या रचनांमधून स्वतःला उलगडून सांगत असते असे मानतात. पण खराखुरा प्रतिभावान कवी स्वानुभावापेक्षा भावानुभव नेहमीच प्रभावी पणे मांडत असतो. कवी ग्रेस म्हणजे या कलाविष्काराचे मूर्तिमंत उदाहरण आहे.त्यामुळेच ऐन तारुण्यात हा कवी 'संध्याकालीन' रचनांतून तरलतेने उलगडत जातो.दिवसाच्या विविध कालपर्वतील सर्वाधिक गूढ वेळ म्हणजे कातरवेळ- सायंकाळ आणि या कवीची सर्वाधिक आवडती वेळ हीच आहे त्यामुळे -
संध्याकाळच्या कविता -१९६७(कवितासंग्रह)
चंद्रमाधवीचे प्रदेश - १९७७(कवितासंग्रह)
सांध्यपर्वातील वैष्णवी - १९९५(कवितासंग्रह)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - २०००(ललित लेख संग्रह)
सांजभयाच्या साजणी -२००६ (कवितासंग्रह) यासारखे प्रमुख काव्य व लिखाण या गूढ अशा सांजवेळेशी निगडीत झाले आहे.
या कवीस समजून घेणे हे एक आव्हानच ठरेल. आणि असे आव्हान पेलणे कठीण झाले कि, तथाकथित समीक्षक पटकन त्याच्यावर दुर्बोध हा शिक्का मारून रिकामे होतात. माझ्या दृष्टीने कवी ग्रेस हे दुर्बोध नसून एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे केवळ काव्य रचनेत नाही तर ललित लेखातून व्यक्त होणे असो किंवा एखाद्या पुस्तकाची अर्पण पत्रिका असो, त्यांच्या शीर्षकातच वाचकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद आहे.त्यामुळे -
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - -हत्तीच्या डोळ्यांतील पाणी निकराने मागे परतविणार्‍या एका मुंगीस...
मितवा : ...अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना.
वार्‍याने हलते रान : हे तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय... ...(स्वाक्षरीखाली ’अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी’ असा सूचक उल्लेख)
यासारखी विचार मग्न वृत्ती फुलवणारी शीर्षके ललित संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते सहजतेने वापरतात.
नागपूरच्या दाहक हवेत वाढताना माणूस,उन्हाने करपला तरी वृतीने शीतल राहत असावा.त्यामुळेच कवी सुरेश भट काय किंवा कवी ग्रेस काय हे संध्याकाळच्या गुढते बरोबर त्यातील अनाकलनीय नजाकत टिपताना दिसतात.
सुफी काव्य प्रकार हा ग्रेस यांना मनापासून भावलेला काव्यप्रकार त्यांनी त्यावर मनपूर्वक प्रेम केले.आपण जर या सुफी काव्य प्रकारच्या उत्त्पती बाबतचे हे वाक्य वाचले -
The word ‘Sufi’ is derived from the Arabic word ’suf’ which means wool. Sufi songs resembles a path of devotion and love which leads to none other than God himself. A person can strives towards intimate knowledge or communion with God through listening to Sufi Songs. तर या मनस्वी वृत्तीच्या माणसाचे या काव्य प्रकारावर का प्रेम होते ते आपोआप स्पष्ट होते.
या कवीला संध्यासूक्तांचा यात्रिक असे संबोधतात. मला वाटते कि कातर वेळेस जेंव्हा दिवस संपून पूर्ण अंधार होण्यापूर्वी जी धूसर वेळ असते ना ती मन अगतिक करणारी भावविवश वेळ. ती वेळ हि सर्वाधिक आभासी वेळ. या वेळेवर या कवीने मनस्वी प्रेम केले म्हणूनच या श्रेष्ठ कवीच्या रचना म्हणजे अक्षरशः अभासातील भास वाटतात.कारण ओळी त्याच पण प्रत्येकासाठी भिन्न अनुभूती देणाऱ्या.किती म्हणून आणि काय काय घ्यायचे ....
म्हणूनच त्यांच्याच- ' ती गेली तेंव्हा ..'या प्रसिद्ध रचनेतील -
तशी सांजही आमुच्या दारी, येवून थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता....
या ओळीवर थबकत मी शेवटी इतकेच म्हणतो कि-

मोत्यातून शोधण्या 'माणिक' मी रत्नपारखी झालो
शब्दात गवसता अर्थ मी अर्थ पारखा झालो ....

Sunday, May 1, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून.भाग दहा

नागपूर सकाळी सोडल्यावर मध्यंतरी प्रवासात एक कॅन्सर झालेल्या बोलू,खावू न शकलेल्या माणसाची  गाठ पडली.   विलासपूरचा  प्रवास श्रीवास पोस्टल क्लार्क यांचे बंधू मुळे घडून आला.घरी आजारी माणसास घेऊन जाताच,हॉस्पिटलची चौकशी सायकल रिक्षात असतानाच झाली. परंतु घरात कोणी माणसे नाहीत का? यांचे भाऊ कोठे आहेत ? म्हटल्यावर अगोदर घरी उतरून घेतले.बरोबर घरी पोचण्याकरिता स्टेशन-पोस्ट ऑफिस मधला पेंडर रोडचा माणूस,रिक्षावाला, पोस्टल शिपाई पुरषोत्तम या सर्वांनी सहकार्य दिले.पोहचल्यावर त्याची व्यवस्था लागल्यावर निघावयाचे तेंव्हा त्यांनी थांबून जा म्हटल्यावर जेवून निघालो.परंतु जेवण्यास मन होईना.तो वाचावा अशी भावना व भगवंताजवळ तसा मनोदय.परंतु घरी आल्यावर एकटा, लग्न न झालेला ,आजारामुळे खंगलेला हे सर्व पाहून त्यांचे भावाला विनाशोक कर्तव्य करावे,म्हणून निरोप घेतला व काय ती भगवंताची मर्जी म्हटले.
                                                   ---------------------- X ----------------------
विलासपूर ते हौरा पैसे नाहीतT.C..ला कसे तोंड द्यावयाचे असे काही विचार मनात नसता T.C.आल्यावर तिकीट तिकीट म्हटल्यावर नुसताच बसून,तर पुढे बंगाल मध्ये शिरण्यापूर्वी सकाळच्या वेळी काही खात असता तसेच खाणे पुढे चालू ठेवले. त्यावेळीही कोणतीही T.C.कडून चौकशी न होता प्रवास निर्विघ्न पार पडला.रात्री दुसरी मुंबई असलेले अफाट कलकत्ता पाहून मन काही दडपल्यासारखे झाले. मी अंधारात पाऊल टाकीत नाही ना ? तथापि Light has always guided me म्हणून धीरही. बोगदा. आत वस्ती करून असणाऱ्या माणसांबद्दलच्या जीवनाचे विचार, तसे म्हटले तर रात्र पडल्यावर सारे जग अंधारातच बुडून जाते.व आपण बोगद्यातच राहतो.दुसरी कशाचीही अशा नसलेल्या मनुष्यास खावयास कसे मिळते,याचा विचार करावा लागतो काय? का तो विचार मनात येतो? आज सकाळी हुगळी नदीत स्नान करून रामकृष्णांच्या तपोभूमीचे दक्षिणेश्वराचे दर्शन घेतले. काळी बाजूस पाच पिंडी यनेश्वर, जलेश्वर etc.अजून सर्व इतिहास समजून घ्यावयाचा आहे.एका खोलीत काही(बंगाली)पहात असता एक म्हातारा काही समजते का? म्हणून विचारात होता.नाही म्हणालो.पुन्हा काही वेळाने त्याची बाहेर गाठ पडली.वय वर्षे ८० संधिवाताचा विकार,बायको वारून २४ वर्षे झाली.तरी मला इथे आले पाहिजे ही भूमी पवित्र आहे इथल्या मातीने रामकृष्णांचे विचार शोषून घेतले आहेत (soaked ) त्या महापुरुष्याच्या सांगण्याकरिता,मला इथे आले पाहिजे.मला उद्देशून तो म्हणाला ( Face reading ) You have caunestness कळकळ मनाची शुद्धता वाढली पाहिजे. रामकृष्णांना सरस्वती प्रसन्न होती म्हणजे काय? केवळ सरस्वतीच प्रसन्न होती काय? असा माणूस ५०० वा हजर वर्षात होणार नाही तसेच श्रद्धा काय करू शकते.या बद्दलच्या ओळी. बेलूर मठात संध्याकाळी सरस्वती पूजा. भजने साष्टांग नमस्कार मी देवी समोर जाऊन केला तेंव्हा ते प्रमाम बाहेरून केला तरी चालेल असे म्हणाले. गुढघे टेकून नमस्काराची इथे पद्धत दिसली. पतंग आकाशात ३५ते ४० दिसले.दक्षिणेश्वराजवळच्या लोकल स्टेशनाजवळ एक बाई बरोबर आणि २-३ पुरुष स्त्री ( तरुण) व एक पुरुष वर्दळीवर आले रस्त्यावर भांडण .दुसऱ्या एकास कारण विचारता मोहबातीत अंतर पडले दुसरे कारण काय असणार? स्टेशनवर पुरी भाजी खाल्यावर पानावर जे राहिले ते चाटावयास मागितले (लहान मुलगा)त्याने अंग शहारले what hoorible
                                                                         ----------------------x --------------------------
आज कालीच्या देवळात ( कलकत्ता ) सकाळी ट्रामने गेलो. आयुष्यात प्रथमच ट्राममध्ये बसलो.तिथे दोन दोन चिठ्या तयार केल्या?
१. सौ. वती व मुलांची आर्थिक जबाबदारी स्वीकारणे ,२. सौ. वती व मुलांची जबाबदारी भगवंतावर टाकून निश्चिंत होणे, व जी चिट्ठी निघेल त्याप्रमाणे वागायचे ठरवून दोन्ही पैकी कोणताच निर्णय स्वतः घेण्यास असमर्थ असल्याने असा कौल लावायचे ठरवले.चिट्ठी पुजाऱ्याच्या संबंधी १०-१२ वर्षाचे मुलाने उचलली व तोच काली प्रसाद मानावयाचे ठरविले निर्णय सौ.वतीचे बाजूने लागला. इथेही १रु.ठेवा असा आग्रह परंतु पंढरपूरची बडवे गिरी नाही.देवळातून २-३ तासानंतर शांत चित्ताने बाहेर पडलो व हौरा स्टेशनचा रस्ता विचारात पायी चालावयास सुरवात केली.जाताना सेंट पॉल कॉथेड्रोल व त्यापलीकडे दिसणारी पांढरी शुभ्र व्हिक्टोरिया मुझीयमची इमारत पाहिली. व्हिक्टोरिया प्रजा वत्सल दाखवण्या करिता इमारतीवर एका बालकाला दुध पाजणारा,तसेच बालकाला ८-९ वर्षाच्या जवळ घेतलेला पुतळा.राज निष्ठेची शपथ घेतली जात आहे असे देखावे.राज्य रोहणाची मिरवणूक हत्ती घोडे जात आहेत असे bronze structure कर्झन , रिपनचे पुतळे पहावयास मिळाले.व अवघ्या ६५ वर्षाहूनहि थोड्या काळात कर्झनशाहीचा अस्त होऊन काळ बदलल्याची जाणीव. राज्य रोहणाच्या व शपथे च्या प्रसंगी दहशतीचा भाव, हर्ष एकाच्या चेहऱ्यावर नाही.सातव्या एडवर्ड चा अश्वारूढ पुतळा.शीर झुकलेले, गर्वोद्धत वाटला नाही नेहमीपेक्षा वेगळी पोझ. विस्तृत आकार जलाशय.पुढच्या बाजूस व्हिक्टोरिया राणीच्या हातात पृथ्वीचा गोल असून दुसऱ्या हातात राजदंड असावा. प्रवेश दारावर दोन संगमरवरी सिंह दारावर त्या राजवटीचे सील. जिन्याचे पॉंलिश कालच केल्या सारखे ताजे. ६५ वर्षानंतरही, पितळी तोफा. आतील भाग बंद. असून सैनिकी पहारा. अंधार झाला. सरस्वती विसर्जनाच्या मिरवणुका ट्रक मधून. एका मोठ्या मैदानातून बाहेर पडल्यावर Hevay traffic .१० अंक मोजावयाच्या आत ५ मोटारी पास थोडाही खळ नाही पायी रस्ता ओलांडणे कौशल्याचे काम. बहुतेक पायी प्रवास. रस्ता विचारल्यावरशार्ट कटने न जाता रहदारीच्या रस्त्यावरून जावे व इधर उधर न घुसना असा सल्ला.हलवायाने जिलबी देताना भगवान काय म्हणाला? असा प्रश्न केला. तोच दुसरीकडून चोरी करू नको असा आवाज आला हावडा स्टेशन वर झोप. (क्रमशः)
डायरीतील नोंद-मला समजलेली -या टप्यात घर सोडल्यापासून त्यांनी मनाशी निश्चय करून ठरवलेले काली मातेचे दर्शन घेण्यात त्यांना आलेल्या यशामुळे मला आजही मनास समाधान वाटते. अर्थात घर सोडून मातेच्या दर्शनाची ओढ मनात असताना त्यांची सामाजिक कर्तव्याची जाण जागरूक असल्याचे दिसते. नागपूर सोडल्यानंतर वाटेत आजारी परंतु अपरिचित व्यक्तीची भेट होताच सर्वतोपरी मदत करीत त्यांनी त्या व्यक्तीस सुखरूप घरी पोहचवले आहे. पुढे प्रत्यक्षात कोलकता येथे आगमन झाल्यावर तेथील गर्दी, गजबज यांनी आलेले भारावलेपण,अन्य भाविकांचे रामकृष्ण यांचे बद्दलचे मत, गरिबीतील लाचारी,या प्रसंगानि त्यांचे मन हेलावले आहे. रामकृष्ण मठाचे दर्शन पार पडल्यावर दुसरे दिवशी कालीमातेचे प्रत्यक्ष दर्शन. त्या दर्शनास जातानाच ते एका निश्चित उदेशाने तिथे गेल्याचे नोंदीतून स्पष्ट होते. घर सोडून हा सुरु केलेला प्रवास असाच सुरु ठेवावा कि संसारात परत जावे? या द्विधा मनास्थितीस उत्तर त्यांनी देवीकडे 'कौल' स्वरुपात मागितले. त्यांचे उत्तर घरी परत जा. असे आले. आणि त्यांनी तीन तासांपर्यंत बसून देवीची मूर्त मनात साठवून, त्यादिवशी अतिशय शांत चित्ताने परतण्याचा निर्णय घेतला.