Sunday, November 6, 2011

छंद आठवणींचा!

तीच वेळ,तोच किनारा,आठवणीत रमण्याचा
छंद जडला,लाटेकडे डोळे लावून बसण्याचा
राग नव्हता उशीर होण्याचा,
सल होता न येण्याचा

तमा नव्हती नाकारण्याची,
खंत होती अव्हेरण्याची
नजरेस देत नजर,मी मागितली सोबत,
दोन पावले चालण्यासाठी....
नजरेतील नजर चुकवत,ती अडखळली होकारापाशी.

घाव बसले जिव्हारी,आयुष्य गेले संपून .....
वणवणलो पुरता,हातून निसटले ते शोधून,
शोधता सुवर्णक्षण,झाली आठवणीतली साखळी सोन्याची
हुरहूर मनी राहिली, परीस निसटून गेल्याची

शोधले किनारे,मांडला संसार,वाळूतील भातुकलीचा
दान पडले पदरी,जिंकलो डाव हरण्याचा
वाळूत दूर जाणारी तिची पाऊले,धूसर डोळ्यात साठवण्यासाठी
मीच झालो कोरडी लाट, ओल्या किनाऱ्यास भिजवण्यासाठी