Sunday, December 25, 2011

सिंहावलोकन

                       आज २५ डिसेंबर  सुट्टी संपत आली होती, दुपारचा चहा झाला होता. आणि घरात गप्पा मारताना सहजच कोणी तरी म्हणाले, २०११ हे वर्ष लवकर संपले. मग मी विचार करू लागलो खरच असे काही घडते का ? एखादे वर्ष लवकर संपते का ? खरेतर तसे काही नसते. पण पाहणाऱ्याचा दृष्टीकोन त्याच काळाला वेगळ्या मापात मोजतो. 
                     नवपरिणीत वधु लग्नानंतर नव्या घरी येते. नव्या वातावरणाशी जुळवून घेत नवी आव्हाने स्वीकारत  स्थिर होऊ पाहते. मग पहिली मंगळा गौर, पहिला दिवाळ सण आणि हो कधी कधी चुकलेल्या अंदाजातून आलेला पहिला पाळणा. तिच्या दृष्टीने  मागे वळून पाहिल्यास वर्ष कसे संपले कळातच नाही.
                     नव्याने सुरु झालेली नोकरी तीन महिने प्रशिक्षण, मग प्रोबेशन वगैरे अटीवर सुरु झालेली नोकरी. कधी साहेब कनवाळू भेटतो. एखादा अवघड प्रोजेक्ट संपवण्याची जबाबदारी देताना,  "मला तुझ्यात स्पार्क दिसला म्हणून तुला हि जबाबदारी देतोय", असे म्हणत  घरापासून लांब पाठवून देतो. आपणही झटून काम नियोजित वेळेत संपवतो. आता घरी यायला मिळणार असे म्हणेपर्यंत प्रोजेक्ट वाढतो. "आता नवीन कोणी शोधण्या पेक्षा तूच हे काम पुरे कर". असे साहेब साईटवर येवून बजावून जातो.आणि मग ते काम संपवून आपण ऑफिसात रुजू होतो. सहकार्यांशी गप्पा मारताना साहेबांशी झालेला संवाद सांगत आपण म्हणतो, "पहा किती जबाबदारी दिली होती." शेजारच्या टेबलवरील एखादी पांढरी मिशी गालातच हसते. कारण तेंव्हा समजत नाही, परतीच्या प्रवासात शेजारच्या सीटवर    ती पांढरी मिशी आल्यावर आपण हसण्याचे कारण विचारतो. मग कळते बाहेरगावी प्रोजेक्ट असला कि, पाठवणाऱ्या प्रत्येकाला साहेब " तुझ्यात स्पार्क दिसला " असेच म्हणतो.ते ऐकल्यावर आमच्या डोक्यात स्पार्क पडतो,अरे खरा स्पार्क माझ्यात नाही तर आहे साहेबात.घरी आल्यावर मित्र मंडळीत गप्पा मारताना वाटते वर्ष कधी संपले कळलेच नाही.
                     घरात सायंकाळी बाहेरून आले कि, वडील त्यांची डायरी काढून हिशोब लिहित बसलेले हे रोजचे दृश्य. पूर्वी कधी विचारण्याचे धाडस झाले नाही, पण पहिला पगार हाती ठेवताना विचारले,"बाबा वर्षानुवर्षे कारकुनी केलीत, बेसिक डी. ए. च्या चक्रातून कधी बाहेर आलाच नाहीत. शक्य असून वर कमाईस कधी हात लावला नाहीत. तर मग हि डायरी कशासाठी?" 
तेंव्हा वडील म्हणाले,पहिला पगार हाती देतातानाच विचारलेस म्हणून सांगतो. "अरे म्हटले तर काय? येईल ती जमा होईल तो खर्च आणि राहील ती शिल्लक हाही  हिशेबच आहे मग डायरी कशाला? पण बाबा अरे डायरी म्हणजे सिंहावलोकन. "
त्यांच्या या उत्तराने मी पुरता चक्रावलो. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न चिन्ह पाहून ते मला म्हणाले ,"जेंव्हा भरपूर जंगले होती, वनसंपदा,अरण्ये हि प्राण्यांसाठी होती, त्या काळातील हि गोष्ट आहे. जंगलात राजा प्रमाणे वावरणारा आणि जगणारा सिंह, मग तो शिकारीसाठी निघालेला असू देत किंवा आपल्या कार्यक्षेत्रावर  नजर ठेवण्यासाठी टेहळणीवर  निघालेला असू देत, त्याची एक सवय असते कि, निघालेल्या ठिकाणापासून ते इप्सित स्थळी पोहचेपर्यंत, वाटेत तो थांबून नेहमी किती अंतर चालून झाले ते तो वळून पाहतो.त्याचे हे वळून पाहणे किंवा अवलोकन हि त्याची सहजवृत्ती असते. त्यामुळे सिंह आणि त्याने केलेले अवलोकन या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला शब्द म्हणजे 'सिंहावलोकन'. " आता मला सांग जर अख्या जंगलावर अधिपत्य गाजवणारा सिंह देखील मागे वळून पाहत, काय कमावले, काय गमावले, किती चाललो, किती आलोआणि किती जायचेय हे ठरवतो, तर मग संसार करताना मी फक्त हिशेब मांडून कोठे आहे हे पहिले तर काय बिघडले. त्यातूनच कळते वर्ष भरात काय झाले, वर्ष कसे संपले. 
एखादा खर्च जरुरीचा होता का ? पुढील वर्षात महत्वाचे काम काय ? हे नियोजन करता येते. या सवयी मुळेच तर  आज डोक्यावर कर्ज न घेता संसार पार पडला."
थोडक्यात काय वर्षे येतात आणि जातात तुम्ही काय केलेत त्यावरून वर्षाचा वेग ठरतो. आता २०११ संपायला सहा दिवस आहेत, तेही उगवतील आणि मावळतील, पण जर त्यावेळी तुम्ही सिंहावलोकन केलेत तर कदाचित चाललेली  वाट कमी आणि  चालायची वाट जास्त, असे दिसले तरी पुढील  मार्गक्रमणाचा   वेग तर ठरवता येईल 

Tuesday, December 13, 2011

पोटापुरता पसा पाहिजे ....

                                                                              जर का तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि काय हवे ते माग म्हणाला तर ? तर आमची मागणीची यादी तयार होई पर्यंत, किंवा मनातली इच्छा देवास सांगेपर्यंत,बहुदा देव कंटाळून निघून जाईल.कारण आपण खूप संभ्रमात पडू,हे मागू का ते मागू या भावनिक गोंधळात बुडून जावू.पण जर तुमच्या भावनेला जर अचूक शब्दात पकडून तुमची रास्त मागणी देवाकडे पोहचवायची असेल तर ? त्यालाही एक छान उपाय आहे, तुमच्या भावनेला अचूक वाट करून देण्यासाठी,तुम्ही अशा माणसाला साकडे घालू शकता, ज्याचे शब्द भांडार अगणित आहे. देवाकडे काय मागायचे हि अडचण तुमच्या आमच्या सारख्या माणसांची. या शब्द प्रभूकडे देवाने विचारले, "बोल वत्सा, तुला  काय हवे ते माग" तर या शब्द प्रभूच्या ओठी शब्द येतात ..
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी 
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ..
           आले न लक्षात, तुमची भावना कोणतीही असो, ती व्यक्त करण्यासाठी न्याय शब्द देणारे कवी आहेत, ज्यांना सरस्वतीचा आशीर्वाद नव्हे तर वरद हस्तच लाभला होता, ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके 'गदिमा' उर्फ श्री.गजानन दिगंबर माडगुळकर सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळ या एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला. बालपण तेथून जवळच असलेल्या माडगूळ या गावी गेले. पुढे शिक्षणासाठी ते पंत प्रतिनिधी यांच्या औंध या संस्थानात आले. पण दुर्दैवाने त्यांना इयत्ता १० वी नंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. माझ्या मते त्यांनी त्यावेळी थांबवले ते शिक्षण चार भिंतीच्या शाळेतील. पण बिन भिंतीच्या शाळेत ते इतके शिकले कि, त्यास सीमा नाही. त्यांनी लिहिलेल्या कथा,कविता या पुढे एम. ए. च्या अभ्यासासाठी निवडल्या गेल्याच, पण त्याशिवाय त्यांच्या साहित्य निर्मितीवर अभ्यास करून किमान चार ते पाच जणांनी पी.एचडी मिळवली आहे. आणि ती पी.एचडी हा त्या पदवी धारकांच्या  इतकाच गदिमा यांचाही सन्मान आहे. पण स्वतःचे लौकिक शिक्षण अपुरे असून हि पुढील पिढीला संदेश देताना गदिमा त्यांच्या गीतातून सांगतात- 
व्यर्थ जन्म रे विद्येवाचून, ज्ञान जगातील घेई वेचून
कीर्ती आण तू पायी खेचून, यशवंत हो, जयवंत हो, 
वयाच्या १९ व्या वर्षी आपले नशीब अजमावण्यासाठी, घरदार सोडून त्यांनी चित्रपट सृष्टीचे दार,करवीर नगरीत येवून ठोठावले. पैसा, प्रसिद्धी थोडी उशिरा लाभली,पण यश मात्र पदरी पडले.कारण त्यांच्या अंगी असलेले शब्द कौशल्य. सुरवातीच्या उमेदवारीच्या काळात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत संपली तरी मी समाधानी राहीन, हि त्यांची वृत्ती होती.  हि भावनाच त्यांच्या 'पोटापुरता पसा पाहिजे' या गीतात दिसते. याच गीतात ते शेवटी म्हणतात...
सोसे  तितुके देई ,याहुनी हट्ट नसे ग माझा 
सौख्य देई वा दुखः ईश्वरा, रंक करी व राजा
अपुरेपण हि  नलगे ,नलगे पास्तावाची पाळी..
आणि त्यास जागून ते जगले. दोन वेळच्या जेवणाची सोय होताच आपल्या पोटा पाण्याच्या पलीकडे जावून राहिलेला वेळ त्यांनी साहित्य,काव्य निर्मिती यासाठी दिला. भावनेला शब्दरूप देणे हा त्यांचा सहजधर्म होता. त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्वतःला  देशसेवेसाठी झोकून देताना तरुणांच्या  मनात देशप्रेम निर्माण करणारी अनेक गीते रचली.पण स्वतःच्या राष्ट्रास माउलीची उपमा देत केलेली - 
वेद मंत्राहून आम्हा वंद्य  वंदे मातरम, हि रचना आजही अंगावर रोमांच उभे करते.
गदिमा म्हटले कि, गीत रामायण हे नाते अतूट आहे.सलग ५२ आठवडे नियमितपणे रेदिओ केंद्रावरून प्रसारित झालेल्या गीत रामायणातील अनेक रचना त्यांनी ऐनवेळी तयार केल्याचे सुधीर फडके यांनी अनेकदा सांगितले आहे.गीत रामायण लिहून झाल्यावर त्यांना 'आधुनिक वाल्मिकी'असे संबोधण्यात येवू लागले. गदिमा स्वतः मात्र गीत रामायण हे ईश्वरी आशीर्वादातून झालेली रचना आहे असेच नम्रतेने सांगत.त्यामुळेच त्यांनी गीत रामायणाची जन्म कथा सांगताना, 'एक अदृश्य  अंगुली लिहिते' असे म्हणत ते नतमस्तक होतात. स्वतः इतकी अमुल्य निर्मिती करताना संदेश मात्र देतात कि - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... 
अर्थात गदिमांच्या अनेक विध पैलूंपैकी गीत रामायण हा त्याच्या रचनेतील 'कोहिनूर' म्हणता येईल. पण त्यांनी त्याच बरोबर चित्रपट सृष्टी करिता पण प्रचंड काम केले आहे. गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयीने मराठी चित्रपट सृष्टी वर आपली मोहर अशी उमटवली कि ते एक युग म्हणूनच ओळखले जाते.अर्थात त्यांचे चित्रपट सृष्टीसाठीचे योगदान इतके मोठे आहे कि त्यांनी एकूण १५७ मराठी व २३ हिंदी चित्रपटासाठी योगदान दिले. त्यांचे मराठी इतकेच हिंदी भाषेवरील प्रभुत्व देखील  सुरेख होते.त्यांची पटकथा असलेल्या 'दो आंखे बारा हाथ ' या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट मोह्त्सवात झाली होती.
गदिमा  वृतीने प्रेमळ असले तरी स्वभावाने तापट म्हणूनच ओळखले जात.त्यामुळे त्यांना कोणी डिवचले कि, ते हमखास अधिक सुंदर रचना करत असत. शब्द रचनेवरील त्यांची  हुकमत इतक्या टोकाची होती कि एकदा त्यांना, आहे ना तुमच्यात सहजता मग 'ळ' या शब्दावर काव्य करून दाखवा,असे आव्हान दिले. त्यावर उत्तर म्हणून त्यांनी त्याच बैठकीत आपल्याला एक अजरामर रचना दिली ती म्हणजे ..
घननिळा लडीवाळा झुलवू  नको हिंदोळा....
लावणी आणि संत काव्य या दोन्हीवरील त्यांचे  प्रभुत्व वादातीत होते. त्यामुळे ज्या लेखणीतून ..
'फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसला लागल कोल्हा' 
हि रचना उतरली त्याच लेखणीने, 
इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी, ज्ञानेशाची...
हि रचना दिली आहे यावर पटकन विश्वास बसत नाही. आणि असा समजुतीचा घोटाळा तुमचा आमचा होतो असे  नाही तर एच. एम. व्ही. या कंपनीने प्रथम,' इंद्रायणी काठी' ची रेकॉर्ड काढताना त्यावर गीतकार म्हणून गदिमांचे नाव न छापता पारंपारिक रचना असे छापले होते.
मला तर नेहमी वाटते कि अक्षरास अर्थाचे कोंदण दिल्याशिवाय शब्दार्थ सार्थ होत नाहीत  आणि असे शब्दांना अचूक कोंदणात बसवणारे कारागीर म्हणजे 'गदिमा'. त्यांच्या नजरेने पाहिले तर कुरूप वेडे बदकाचे पिल्लू देखील राजहंस होते. किंवा त्यांच्या शब्द सामर्थ्यातून ते प्रसंगी देवाला विकत घेण्याचे धाडस करू शकतात. आणि तेदेखील कवडी दमडी न खर्च करता.
या प्रतिभा संपन्न कवी, पटकथाकार, गीतकार, चित्रपट अभिनेता आणि माजी विधान परिषद सदस्य श्री. गजानन दिगंबर माडगुळकर यांची आज पुण्यतिथी. आज त्यांना आपल्यातून जावून ३५ वर्षे होत आहेत. ते  देह रूपाने आपल्यात नसले तरी शब्द रूपाने अनंत  काळ पर्यंत आपल्यातच राहणार आहेत. पण तरीही शेवटी म्हणावे वाटते कि ..
जरा मरण यांतून सुटला कोण प्राणिजात ?
दुखः मुक्त जगला  का रे कुणी जीवनात ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा  
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 
आणि त्यांनी दिलेला  हाच जीवनाचा संदेश समजावून घेण्याचा अल्पसा प्रयत्न हीच त्यांना आजच्या स्मृतीदिनी खरी आदरांजली.

Sunday, December 4, 2011

८८ हे काय वय होते का जायचे ?

सर्व साधारण आयुष्यमान,वाढते वयोमान विचारात घेतले तर याचे उत्तर होय असेच आहे.पण आज हा प्रश्न ज्यांच्या जाण्याचे संदर्भात विचारला गेला आहे त्यांच्या बाबत खरेतर हे काही जाण्याचे वय नव्हते हेच खरे.आपल्या सर्वांचे लाडके आणि अनेक तरुणींच्या मनातील'कॅटबरी चव' जिवंत ठेवणारे चॉकलेट हिरो देवानंद यांचे नुकतेच निधन झाले.त्यासंदर्भात मात्र नक्कीच त्यांचे जाण्याचे वय नक्कीच झाले नव्हते.आणि म्हणूनच ,मायबोलीकारांपैकी मित यांनी म्हटल्या प्रमाणे ८८ हे काय वय होते का जायचे ! हे अगदी भाव पूर्णतेने म्हटले आहे असे मनाला नक्की पटते.
खरच एखादी बातमी एखादी घटना इतकी त्रासदायक असते कि, आपले मन आपल्यालाच सतत विचारत राहते कि, असे का घडले? आणि हो हे आताच घडायला हवे होते का ? पण तरीही याबाबत एक त्रिकालाबाधित सत्य गदिमा त्यांच्या एका अजरामर काव्य रचनेत सांगून गेले आहेत ती ओळ इथे लागू होते ती म्हणजे ...'अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात'. आणि आत्ताच येवून धडकलेली हि बातमी अतर्क्य नसली तरी अकस्मात नक्कीच आहे.
पुण्यात माझे येणे कॉलेज शिक्षण संपल्यानंतर १९८० सालातील. जगण्याची धडपड सुरु करताना सुरवातीस केलेल्या नोकऱ्या देखील थोड्या रुटीनला सोडून.राहायला कोथरूड आणि नोकरी लक्ष्मी रस्त्यावर, दुपारचे दोन तीन तास कुठे काढायचे? हा त्या काळातील प्रश्न. बस प्रवासाचा खर्च दोनदा न परवडणारा. मग काय कधी अलका टॉकीज चौकातील रिगल किंवा डेक्कन वरील लकी हि वेळ काढण्याची ठिकाणे.त्यातील लकी हे सर्वाधिक आवडीचे ठिकाण  कारण देवानंद यांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात आपला वेळ असाच लकी मध्ये चहा पीत काढला होता. पुढे लकीची आठवण ठेवत, देवानंद यांनी पुन्हा एकदा लकीला लकीली भेट पण दिल्याचे पुणेकरांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या आजही स्मरणात असेल. आज लकीही नाही आणि देवानंद आपल्यात नाहीत, पण लकी आणि लकी पडण्यापूर्वी काही वर्षे तेथे असलेले देवानंद याचे हसमुख पोस्टर जसेच्या तसे डोळ्यासमोर आहे.
त्यांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने माझ्या श्री.शिरीष पिंगळे या मित्राने त्यांच्या कलागुणांचा यथोचित गौरव करणारा लेख एका इंग्रजी दैनिकात लिहल्याचे आजही स्मरणात आहे. आज चित्रपट सृष्टी आणि चित्रपट पाहणे यातील सुलभता पाहता आम्ही वयाच्या सतराव्या वर्षी पहिला चित्रपट पहिला हे वाक्य आज अनेकांना खरेही वाटणार नाही, पण हे सत्य आहे आणि सर्व प्रथम जिल्ह्याचे ठिकाणी जावून पाहिलेला माझा पहिला चित्रपट होता जॉनी मेरा नाम ... हि देव साहेबांची दुसरी आठवण.
पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले ! झुठाही सही.... असे म्हणत पुढे जीवन सुरु झाले. आयुष्यात प्रेम पुजारी होता आले नाही तरी प्रेम पुजारी या चित्रपटातील ...शोखीयोमे घोला जाये फुलोंका शबाब ह्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी आजही कणभरही कमी झालेली नाही. आज अमिताभ बच्चन किंवा अमीर , शाहरुख सलमान यांची कारकीर्द सुपरहिरो किंवा शतकातील नावाजलेले कलाकार म्हणून नोंदवली जाते, तरी अशी एक खांबी इमारत उभारण्याचे काम प्रथम देवजींनी केले. राज कपूर,दिलीपकुमार यांची छाप असलेला काळ असून देखील आपला वेगळा ठसा जनसामान्यांच्या मनात उमटवणारे देवानंदजी कायमच लक्षात राहतील.
जर का मी आता जातोय असे सांगत निरोप घेण्याची इच्छा देवानंद यांनी व्यक्त केली असती तर त्यांचा प्रत्येक चाहता आजही म्हणाला असता कि ....अभी न जावो छोडकर कि दिल अभी भरा नही...
आणि आज  त्यांच्या पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीला नतमस्तक होत श्रद्धांजली वाहताना मन म्हणेल .... लेना होगा जनम तुम्हे कई कई बार