Friday, December 28, 2012

एक चांदणी रात्र

                           नुकताच पावसाळा मागे टाकीत वरुण राजाने आपला मुक्काम हलवला होता.इंद्रदेवाने सप्तरंगी कमानी उतरवून त्यास निरोपही दिला होताथंडीची चाहूल अजून तरी नुसतीच हूल देत होतीआणि आमचा एक ग्रुप भटकंती साठी धकाधकीच्या दैनंदिन जीवनास मागे टाकून थोड्या वेगळ्या वाटेने प्रवासासाठी बाहेर पडला होतारजा सुट्या आणि प्रवास यांची सांगड घालत तीन दिवसांच्या प्रवासाला बाहेर पडताना निघे निघे पर्यंत दुपार टळून गेली.

                           आपापल्या दुचाक्या काढून शहराची गर्दी आणि मनावरचा ताण मागे टाके पर्यंत सूर्य मावळती कडे गेला होता.पण बघता बघता नागरवस्ती मागे पडून बराच वेळ झाला होता आणि हमरस्ता सोडून चांगल्या परंतु छोट्या सडकेने जायचे ठरवत आम्ही त्या भल्या थोरल्या पठाराला वळसा घालीत जाणारी वाट चोखाळली होतीविस्तीर्ण पठाराच्या माथ्यापर्यंत पोहचून आता सावकाश पण वळण वळणाने उतरत जाणाऱ्या पहिल्या वळणावर गाडी आली आणि फट्ट असा मोठा आवाज झाला आणि काय होतेय ते कळण्यापूर्वीच आमच्यातील एक दुचाकी हेलपाटत जावून रस्त्याच्या कडेला थांबलीगाडीचे मागील चाक भुईसपाट ( पंक्चर ) आले होते.

                        मुख्य रस्ता सोडून आत आलेले अंतर देखील जवळ जवळ पंचवीस मैल होतेघड्याळात नजर टाकली तर रात्रीचे आठ वाजत आले होते.सर्वात जवळचे दुरुस्तीचे दुकान सुमारे साठ मैल मागे पडले होते.आणि जवळची वस्ती पठाराच्या पायथ्याला सुमारे आठ ते दहा मैल दूर होती.आता कायअर्थात भटकंती हाच उद्देश असल्याने प्रश्नचिन्ह फार मोठे नव्हते.त्यामुळे मुक्काम कोठे हा नी तर आता मुक्काम कसा हा प्रश्न होता.  तीन पैकी दोन गाड्या आजूनही सुस्थितीत होत्यामग दोघांनी जवळच्या वस्तीवर जावून परिसरातच कसे राहता येईल आणि सोबत असलेला डाळ तांदुळाचा शिधा क्षुधा शांतीसाठी कसा वापरता येईल याचा शोध घ्यावा असे ठरले.

                           मग लगेचच दोघे जण जवळच्या वस्तीकडे रवाना झालेआम्ही चौघे मागे राहिलो होतो,आता काय यावर थोडा शांत चिताने विचार करता पहिला प्रश्न रात्र उघड्यावर कशी काढायची ?थोडे पाय मोकळे करीत त्या पाठरावरच्या मैदानातन जावे असे ठरवून बरोबर घेतलेल्या विजेऱ्या घेवून, बिघडलेली गाडी थोडी बाजूला लावून आम्ही निघालोपठाराच्या दुसऱ्या बाजूस अंधुक प्रकाशात थोडा उजेड दिसला म्हणून त्या दिशेने गेलो तर थोडे जवळ जाताच लक्षात आले कि तो दिवा म्हणजे दीपमाळेतील कोनाड्यात ठेवलेली पणती आहेमग निरखून परिसर पाहिला तर ते एक छोटेशेच पण अतिशय नेटके असे शीव  मंदिर आहेगाभाऱ्यात पण एक दिवा शांत पणे तेवत होताआत जावून दर्शन घेतलेमनास एक प्रसन्न समाधान मिळाले.इतक्या दूर आणि शांत परिसरात असून देखील मनातील एकटेपणाची भावना आपोआप दूर झालीमंदिरास अर्ध प्रदक्षिणा घालतानाच असे लक्षात आले कि मंदिरा भोवती स्वछ ओसरी असून प्रशस्त सारवलेली एक रिकामी खोली तिथेच आहे.

                              मग आजची रात्र इथेच काढावी हे नक्की करत परत आम्ही गाड्यांकडे आलो.इतक्यात आमच्यातील एक जण थोडा काळजीच्या स्वरात म्हणाला, "अरे आज आमवस्या आहेतरीही आपण असे दूर एकाकी ठिकाणी राहयचे?" त्याच्या प्रश्नाने उगीचच मनात शंकेची पाल चुकचुकलीपण दुसरा काही पर्याय दिसत नव्हताइतक्यात वस्तीवर गेलेली आमची गाडी परत आलीत्यांना त्या छोट्या गावात मदत नाही तर आपुलकी मिळाली होतीज्या घरी त्यांनी बरोबरच्या शिधेची खिचडी करून घेत येइल काअसे विचारले होते त्यांनी ती खिचडी पटकन करून दिलीचपण सोबत थोडी भाकरी चटणी पाणी देतबंद पडलेली गाडी कोठे आहेयाची चौकशी करीतजेव्हा पठाराच्या जवळ गाडी बंद पडली आहे असे समजले,तेंव्हा तेथील देवळात तुम्ही राहू शकाल असे हि सांगितले.

                                  थोडक्यात आमच्या पहिल्या मुक्कामाची सोय तर छानच झाली. बाईक शेजारीच सतरंजी घालून आम्ही पाटपाणी करून डबे उघडले.एका बाजूला दूरवर वळत गेलेला रस्ता आणि इतर तीन बाजूंना उंच डोंगर अश्या विस्तीर्ण पठारावर आवसेच्या रात्री आम्ही आमचे सुग्रास जेवण घेतले.फार थंडी नाहीवाऱ्याची सुखद झुळूक मधूनच येते आहे.दरीतील रानफुलांचा मद सुगंध मन भरून टाकीत आहे,आणि आमच्या गप्पा पोटोबाचे स्मरण सुरु आहेतास दीड तास कसा संपला कळलेच नाही.

                               जेवण खाण  उरकून मग आम्ही रमत गमत देवळाच्या दिशेने निघालो रात्रीचे अकरा वाजत आले होते.देवळातल्या ओसरीवर सतरंजी पसरून आम्ही त्यावर आडवे झालो.डोक्यावर रेंगाळणारे चार सहा पांढुरक्या ढगांचे पाचुंदे अलगद विरून गेले.आणि नभांगणातील तो नजरा आमच्या समोर खुला झाला.कुबेराने त्याचा खजिनाच त्या रात्री उधळून टाकलाय असे वाटावे असे ते दृश्य होते.आमावस्येची रात्रतिन्ही बाजूंनी डोंगर रांगा आणि सर्वात जवळची वस्ती पण आठ/दहा  मैलांवर दूरवर खाली.त्यामुळे कृत्रिम उजेडाचा मागमूस पण नाहीआणि नभांगणात एकाच वेळी हजारोंनी चमकणाऱ्या तारका.

                                  त्या चांदण्याच्या उजेडात ते शांत देवालय आणि परिसर स्वछ दिसू लागला होता. खूप खूप गप्पा मारायच्या उर्वरित रात्र आपली मनोगते परस्परांच्या समोर मांडायची असे ठरवून काही बोलणार इतक्यातच निसर्ग नजरा असा काही उलगडत गेला कि आम्ही पुरते निशब्द झालो.तुम्हास वाटेल कि,'अरेइतके काय आनंदून जाणेआहे ?' वर्षानुवर्षे तेच ते रात्रीचे आकाश,आम्ही दररोजच पाहतोय कीअरे हो रात्रीचे आकाश रोजच समोर दिसते प्रश्न आहे आपण ते पाहतो का याचाकारण दररोज समोर येणारे आकाश आपल्याला दिसते पण ते नजरेत येत नाही.

                                 जसे तंद्रीत असताना कोणी बोलत असते,शब्द कानावर पडतात पण आशय अजिबात लक्षातच येत नाहीमग उघडे डोळे आणि उघडे कान असे आपले रूप असून देखील समोरचा विचारतो अरे कुठे लक्ष आहे तुझे  ? मी आय बोलतोय ते समजतेय का ? तसे आपले रोजच्या रात्रीच्या आकाश बाबत होते.समोर खजिना असतो पण त्याचे मुल्य उमजलेले नसते.शिवाय वाढत्या शहरीकरणामुळे स्वछ निरभ्र आकाशशांत परिसर आपल्या पासून खूप दूर गेला आहे.त्यामुळे आपण देखील या निशुल्क आनंदाच्या खजिन्याच्या राशी दूर लोटल्या आहेत.

                               पण त्या रात्री कुबेराने आम्हाला तो खजिना फक्त उघडा केला होता असे नाही तर आम्ही त्यात अक्षरशः लोळत होतो.प्रत्येक चांदणीचे तेज वेगळे प्रत्येकीची छटा वेगळीकोणाचा रंग शुभ्र धवल तर कोणी नीलकांतीकोणाची छटा अशी फिक्कट गुलाबी कि नुसत्या दर्शनाने रोम रोम पुलकित व्हावाहे जसे रंगांचेतसेच विविध आकारांच्या बाबतएका संस्कृत सुभाषितात जो ....,रंगावली दर्शनेन नेत्र युगल संतुष्टती ! ' हा उल्लेख आहे तो कदाचित हि निसर्गाची रांगोळी पाहूनच आला असावा असे मनास वाटून गेले.                        
                                                       मगाशी सहज जो मित्र म्हणाला होता ,"अरे आज आमवस्या आहे" त्याला मी म्हणालो , मला आमवस्या आवडते.मला स्मशान शांतता छान वाटतेसांगा घेतलाय कधी याचा अनुभव ? नाही ना मग तुम्ही नक्कीच एका अपरंपार आनंदाला मुकताय.आता तुम्हाला वाटेल अरे हा काय बडबडतोय पण खरे सांगतो.आयुष्यात काही क्षण असे असतात कि त्याचा आनंद  वर्णनातून नाही तर अनुभावातुनच घेता येतो.वरती नुसती नजर टाकली तरी विविध रंग छटा असलेल्या चांदण्या आणि त्यांचे विविध आकार यांनी आकाश ओसंडून वहात होते.

                                                         दीपमाळेतील पणती एव्हाना शांत झाली होती पण शांतसा एक फिक्कट निळा प्रकाश परिसरात भरून राहिला होता.आणि त्या मंद प्रकाशात परिसरच न्हाऊन निघाला होता.जणू निद्रादेवीच्या आधीन होता होता मला त्या दिवशी चांदणभूल ह्या शब्दाचा अर्थ उमजला होता.