Tuesday, February 28, 2012

समाजसेवा आता तो मनापासून करणार होता

पडता सावली त्याची, देह त्याचा थरारला होता
पारा त्याच्या संतापाचा, त्यास मात्र अनभिज्ञ होता
म्हणे चित्त शुद्धी साठी तो आज, चालला मंदिरी सोवळ्यात होता
कळशी भर पाण्यासाठी,माउली तुडवीत होती काहिली
काठोकाठ विहीर त्याची, पाण्याने होती पुरती वाहिली
म्हणे चित्त शुद्धी साठी तो आज, उपवास निर्जळी करणार होता
सांगण्या एकात्मता त्याने, मांडीला हरिपाठ आज पारावरी
चित्त शुद्धी साठी तो सकाळी न्हायला, वरच्या पाणवठ्यावरी
मानवता हाच एक धर्म, असे आज तो वदणार होता
नको मनी दुजा भाव,अंतरीची विसरा अढी
मंत्र साक्षरतेचा देत वदला, शिकवा पुढची पिढी
शाळेतून मुलीचे नाव,तो आज काढणार होता
वाचाल तर वाचाल सांगत, घेतला प्रौढ साक्षरता वर्ग त्याने
संपताना वर्ग आठवणीने, घेतला अंगठा अर्जावरी हिकमतीने
इतर हक्कातील नाव त्याचे, तो उद्या काढणार होता
सोडूनी पूजा पाठ आता,मनापासून करावी समाजसेवा
लोक कल्याणातुनी कल्याण,साधण्याचा हेतू अंतरी हवा
त्यासाठी मतांचा जोगवा,मागत तो दारोदार फिरणार होता
सभ्यतेच्या बुरख्याआड आज तो दडणार होता
मतदारास आता 'मायबाप'तो वदणार होता
समाजसेवा आता तो मनापासून करणार होता
अन निवडीनंतर समाजाचे पांग तो फेडणार होता.

Sunday, February 19, 2012

कविता माझीच.

लिहीन म्हटले,माझ्यावरती मीच कविता 
शब्द नाचले पुढ्यात माझ्या,अर्थहीन मी दमलो पुरता 

बोलू भोगावर कि उपभोगावर,सांगू सत्य कि मांडू वंचना 
कसे सोडवू कोडे माझे,हीच मज पडली विवंचना 

जखमेवरची हालली खपली,घाव बसता मम वर्मावर 
दिसला नाही ओघळ कोणा,काय लिहू मी मम कर्मावर 

नव्हते मजला कधी धिक्कारले , पण नव्हते तसे कधी अव्हेरले 
मूक संवादाचे अर्थ तिच्या त्या, नाही का मज तेंव्हाच गवसले 

आजही स्मरते,तिच्या सहवासातील प्रत्येक क्षण होता आश्वासक 
नाही उमगले मर्म मज त्यातील,आज म्हणून मी आक्रंदतो नाहक 

लिहीन म्हणतो कविता माझी, दखल घेण्या मम सत्वाची 
ठणकता व्रण मम जखमेचा, राही मूर्त उभी तिज अस्तीवाची 

Saturday, February 18, 2012

हिशोब प्रेमाचा ...

चुंबिले सोनसळी किरणांनी मेघांना
आठवणींनी झाले गाल तिचे आरक्त
तिचे तिलाच नाही उमगले
हि भावना कशी झाली व्यक्त
प्रत्येक गोष्ट बोललीच पाहिजे का ?
मनाशीच बोलत ती राहिली अव्यक्त
साक्षीला हजर असूनही संध्या
मनोमनी राहिली ती विरक्त
कृष्ण सावळा झाला परिसर
आसक्त राधा,झाली मीरा भक्त
भरुनी गेली झोळी क्षणभर
दान देवूनी ओंजळ रिक्त
गणित सुटले, उत्तर पटले
मागे राहिले आकडेच फक्त
मांडुनी होता हिशोब प्रेमाचा
तोट्यातील फायदा उरला नक्त

Friday, February 10, 2012

तिचा वाढदिवस.

तिचे वाढदिवस अजूनही स्मरतात
शुभेच्छांचे संदेश ओठावर थांबतात 
कधी एका गुलाबाने डोळे तिचे बोलले होते
आज त्या सुगंधाने मन माझे विव्हळले होते 
आजही तिचा  वाढदिवस आला
डोळ्यांच्या कडा पाणावून गेला 
अशाच एका वाढदिवशी,
तिनेच,मला भेट दिली होती 
ज्यातून जीवनाची खरी ओळख
माझी मलाच झाली होती 
वैशाख वणवा असून
ती दुपार शहारली होती.
आता ती नाही माझी
परक्याचे धन आहे 
कधीच ओथंबून वाहणार नाही
असा एक आषाढ घन आहे.
भेट तिची स्मरता आठवतो,उन पावसाचा लपंडाव अन  
धुक्याची झालर सारून,श्रावण सर घेते अंतरीचा ठाव 
ती नाही माझी मन मनाला बजावते
आठवणींच्या कट्ट्यावर क्षणभर विसावते 
विसरण्याचा अट्टाहास पण किती विचित्र आहे
आता तिचा वाढदिवस गतस्मृतींचे चित्र आहे 
आठवणींचे कोंदण मी आज कोरतो आहे
आणि मी माझी  खरी ओळख पण विसरतो  आहे