Wednesday, February 27, 2013

मराठी भाषा दिवस


   आज २७ फेब्रु २०१३ जेष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस.आपण हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.खरेतर मराठी आपली मातृभाषा,ज्यातून आपण नेहमीच सहजतेने व्यक्त होऊ शकतो त्या भाषेसाठी स्वतंत्र दिवस का म्हणून साजरा करायचाअसा प्रश्न मला नेहमीच पडतो.
 पण मग आपल्या याराजभाषेची आजची परीस्थीती यावर आपण अंतर्मुख होतो. वेगाने कमी होत चाललेल्या 
महानगरातील मराठी शाळां बाबत हळहळ व्यक्त करतो

 मग लक्षात येते कि आपले व्यक्त होणेच कमी होत चालले आहे आणि म्हणूनच आपण हा दिवस नक्कीच साजरा केला पाहिजे,जे मनात येते, बोलावे वाटते ते कागदावर उतरले पाहिजे. आपण जितके मनमोकळं व्यक्त होऊ तितकी आपली भाषा सकस होईल 

 आपण वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होऊ आणि आपले भाषा ज्ञान समृद्ध होईल.विचारांची गुंफण शब्दांचा मोत्यात केली कि खरोखरच त्यातुन सुंदर रास तयार होईल.आणि नव कल्पनांचा महासागर आपल्या भेटीला येईल.आणि मग आपणही कुसुमाग्रजांना स्मरून म्हणत राहू कि - अनंत आमुची ध्येया सक्ती अनंत आमुची आशा, किनारा तुला पामराला...

Monday, February 25, 2013

वर शिरजोर झालेल्यांना .........

मराठी आंतरजाल, त्यावरील लिखाण आणि त्यावरील चोरी हा खरेतर तसा खूपच गंभीर विषय. पण विषयाचे गांभीर्य नसले कि त्यातील कळकळ संपते. आणि चोरून लिहणारा राजरोसपणे हे माझेच असे दाखवत सुटतो.
कल्पना शक्तीचा अभाव असला कि कोठून काय आणि कसे चोरायचे यावर यांची बुद्धी अतिशय तल्लखतेने चालते. अशा चोऱ्या माऱ्या करून स्वतःला लेखक, ब्लॉग रायटर म्हणवून घेणाऱ्यांना एकच सांगणे आहे, अरे बुद्धीचा वापर जर प्रांजळपणे करून स्वतः चे मन मोकळे करायचे ठरवले, तर तुम्ही देखील तितकेच चांगले लिहू शकाल. पण चोरून ते माझेच म्हणून प्रकाशीत केलेत तर त्यातून स्वतः ला फसविल्याचे समाधान तुम्ही नक्कीच मिळवाल. कदाचित सुरवातीस स्वतंत्र पणे लिहिणे कठीण वाटेल पण थोड्या चिकाटीने ते जमते.प्रश्न आहे स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा.

मला माहित आहे आपल्या जुन्या ग्रंथात मान्यता प्राप्त चौसष्ट कला प्रकारात चौर्य कला समाविष्ट आहे पण इतर त्रेसष्ट कलाची किमान नावे  तरी जाणून घ्या आणि मग हि चौसष्टावी आत्मसात करा.
नाहीतर सध्याचे राजकारणी सत्ताधीश जसे जनता राबवून घेण्यासाठी आणि पैसा खाण्यासाठी हे सूत्र जसे  निर्लज्जपणे वापरत आहेत, तसे चांगले लिखाण नवकल्पना कोणाच्याही असु देत त्याचा वापर आमच्याच प्रसिद्धी साठी हा निर्लज्जपणा आम्ही असाच चालू ठेवणार ह्या सुत्रानेच तुम्ही जगणार का? हा खरा प्रश्न आहे.
उत्तर तुमच्याच जवळ  आहे. आणि ते तुम्हाला स्वतःलाच द्यायचे आहे एवढे भान मात्र जरूर ठेवा. 

Sunday, February 24, 2013

अनुभव अंतर्मुखतेचा!


मायन दिनदर्शिका संपली२१ डिसेंबरची दीर्घ रात्र संपली.जग आपल्या नित्यक्रमात गुंतून गेले.आणि आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्या/वाईट घटनांवर चर्चा करीत आम्ही ३१ डिसेंबर '२०१२' ला निरोप देण्याची  तयारी सुरु केली.  आज समाजातील मोठा घटक याच सरधोपट मार्गाने जात आहे.
आता हे वाचून तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल - अरे,२१ डिसेंबर गेली३१ डिसेंबर देखील जाऊन नवीन  वर्ष सुरु  पण झालेआणि  आता हा काय नवीन सांगणारपण आपण विचार केलातर लक्षात  येईल  की दर  वर्षी  ३१ डिसेंबर साजरी करण्याच्या सार्वजनिक पद्धतीत इतका ठराविक तोचतोपणा आला आहे की त्याचे वर्णन करणाऱ्या  बातम्या  वाचताना,  मागील  वर्षीच्या बातम्या  शब्दही  बदलता चुकून  पुन्हा छापल्या  आहेत  असे वाटावे.कधीतरी आपणही त्या बातमीचा भाग होतो.   मग कोणीतरी 'हे सारे म्हणजे पाश्चिमात्य  संस्कृतीचा पगडाअसे तुणतुणे वाजवू लागतो. हे सगळे नेहमीचेच असे म्हणत  आपण आलेली ती झिंग झटकून पुन्हा नित्यक्रमात झिंगून जातो
आता भारतातील या पाश्चिमात्य संस्कृती पासून दूर येवून बघता बघता  अर्धे तप उलटून गेले. मी मायदेशी  असे पर्यंत  काही वेगळे होते असे देखील नाही.तेव्हा सभ्यता /असभ्यता यातील लक्ष्मणरेषा ओलांडताना  जग  काय म्हणेल हा प्रश्न स्वतःला विचारून अमर्याद सभ्यते ऐवजी मर्यादित असभ्यता खपवून घेतली जायची.
पाश्चिमात्य जगताचे आकर्षण मायभूमी,नोकरी,घरदार,स्थैर्य सर्व सोडून मला या जगात घेवून आले.सन २००६च्या  उत्तरार्धात कॅनडाची आर्थिक राजधानी असलेल्या  टोरोंटो या शहरी माझे आगमन झाले.या भूमीवर  प्रथम पाऊल  पडले तेंव्हा थोडे दिवस अगोदर आलेली माझी पत्नी आणि मुलगी सोडले तर ओळखीचेनात्यातील  कोणीही नव्हते.हातात नव्या  नोकरीतील नेमणूक पत्रही नव्हतेसर्व डाव नव्याने मांडायचा होताआणि हे सर्व हौसेचे धाडस होतेत्यामुळे त्याची बरी/वाईट फळे चाखण्याचे नशीब देखील एकट्याचेच होते.

विमानतळावर बाहेर पडताना मोठमोठ्या ट्रंका उचलायला लागु नयेत म्हणून इथल्या पोर्टर साहेबांची मदत
घेतली जेमतेम तीन चार मिनीटांचे अंतर असेल पण तेवढ्यासाठी त्याने पंधरा डॉलर घेतलेमग घरी पोहचण्यासाठी taxi करणे भागच होते म्हणून taxi ला हात केला सर्व समान उचललेमाझा इथल्या शिस्तप्रिय वाहतुकीतील पहिला प्रवास सुरु झालादहा/बारा मिनिटांच्या प्रवासानंतर बत्तीस डॉलर देत प्रवासाची सांगता केलीसमान घरात घेताना स्वतःशी संवाद साधत मनातल्या मनात सारा हिशेब रुपयात केला. शेवटी स्वतःला बजावले- 'निर्णय  तुझा  होता, आता गुणाकार  सोडून देवून,स्वतःची  ओझी  स्वतः उचलायला शिका.'
मग सुरु झाले इथले दैनंदिन जीवन.मायानगरी म्हणून मुंबई पहिल्यांदा अनुभवली तो दिवस आठवलाशाळेत असताना अकरावीला हिंदीत असलेला 'विविधता में  एकताहा पाठ तेंव्हा फक्त पाठ केला होता. तो मुंबईत प्रथम अनुभवलाआणि टोरोंटो येथे त्याचे खऱ्या अर्थाने विश्वरूप दर्शनच झाले.मुलीला शाळा प्रवेश घेण्याचे सोपस्कार  पार  पडण्यासाठी शाळेत गेलो,तेंव्हा  तिच्या वर्गात कोणी भारतीय आहे काअसा सहज प्रश्न केला आणि  उत्तरादाखल शाळा प्रमुखांकडून जी माहिती समोर आली ती अक्षरशः स्तंभित करणारीच होती.तिच्या शाळेत जगभरातील  बासष्ठ देशातील विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्यांच्या एकूण अडुसष्ट मातृभाषा होत्या.आणि भारतीयांची इथली खरीओळख दक्षिण आशियायी म्हणून जास्त आहे हे पहिल्यांदा समजले.
पुढील दोन /तीन महिन्यात काही भारतीय,आणि खास मराठी भाषिक असे परिचित भेटून परिघातील  मैत्रीचा गट तयार  झाला. मग या गटाची ३१ डिसेंबरची जंगी पार्टीही झाली.रात्रभर जागून खाणे पिण्यापासून ते जगण्याचे नक्की प्रयोजन  काय यावरील बौद्धिक, इथपर्यंत चर्चा झाल्या.सरत्या रात्री बरोबर ग्लास आणि डोकी हलकी करत आम्ही त्या वर्षाला निरोप दिला.नवीन वर्षात काय करायचे याचे मनन करीत सर्वजण घरी परतलो
नव वर्षातील पहिलाच दिवस सुट्टीचा असल्याने मी घरीच होतोगतवर्षाकडे वळून पाहताना मला प्रश्न पडला कि मी नक्की काय केलेभारतात असताना या जगाचे आकर्षण  म्हणून थोडाफार चंगळवाद अनुभवला आणि आता इकडे आल्यावर पण मी परत तेच करणार का?  मन अंतर्मुख झाले.  गेल्या चार/सहा  महिन्यात जे  जग पाहिलेयेथील कामाला महत्वमाणसाचा दर्जाशिस्तस्वच्छता या गोष्टींचा मनोमन आदर वाटला, तरीही मी मनात  नाराज का आहेयातून बाहेर पडण्यासाठी मी काही तरी वेगळे काम करावे असे ठरवले
त्यावेळी मी एका सांस्कृतिक/समाजसेवी संस्थेच्या संपर्कात आलेलो होतोचमायभूमी आणि मातृभाषा यांच्या ओढीतून काम करताना ते काम येथील भारतीय समाजाच्या सेवेसाठी झाले तर बरे असे मनास वाटलेत्यावेळी या संस्थेने एक आकर्षक आणि अभिनव उपक्रम हाती घेत असे ठरवले की सर्व जग सरत्या वर्षाला निरोप देत पण आपण वर्षारांभाचे स्वागत करायचेत्यातून आपल्या संस्कृतीची  ओळख येथे येवून राहिलेल्या भारतीय समाजाच्या नव्या पिढीला आणि इथल्या  समाजाला   करून द्यायचीआणि या संकल्पनेतून  गेली पाच वर्षे  आम्ही साजरा करतोय  जानेवारी - नव वर्षारंभाचा दिवस - नववर्षाच्या रम्य पहाटेस.
एकदा भारतीय संस्कृती, परंपरा,आपली भाषा याचे महत्व आपण समजावून देत त्यातून संस्कारक्षम मने घडवायची असे ठरवल्यावर त्या अनुषंगाने उपक्रम काय आपोआप सुचत गेलेआणि त्याची प्रचीती गेली  पाच वर्षे  आम्ही घेत आहोत.
संस्कृतीचे ठेवा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे हे संस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे समर्पक नाव पहाटेचे स्वप्न अर्थात-Dream @ Dawn' असे ठरलेअस्सल सांस्कृतिक 'पहाटदृक-श्राव्य  माध्यमातून रसिकांसमोर उलगडण्यात आली.सडा-रांगोळ्यापक्षांची किलबिल, मंदिरांमाधली काकडारतीघाटावर मंत्रोच्चार करीत स्नान करणारे योगीजन दाखवणारी मराठी चित्रपटातील पहाट आणि जोडीला शास्त्रीय संगीतातील  पहाटेचे  राग यांचा परिचय या कार्यक्रमात करून देण्यात आला.
दुसऱ्या वर्षी मातृभाषा आणि त्याचे महत्व लक्षात यावे म्हणून,मराठी भाषेतील आद्द्य वंदनीय व्यक्तिमत्व संत  ज्ञानेश्वर यांचा परिचय करून द्यावा असे ठरलेआता हा परिचय त्याच्या संपूर्ण कार्याची महती शब्दात सांगायचे म्हटले तर  वर्षारंभाची  पहाटच काय, पुरे वर्ष देखील अपुरे आहे.  मग त्यांची ओळख त्यांच्या  काही काव्य रचना आणि त्यांचा अर्थ यातून  उलगडत  तो रसिकांसमोर मांडवा असे ठरले आणि त्यातून श्रोत्यांनी अनुभवला ‘ओम नमोजी आद्या या ज्ञानेश्वरांच्या काव्यानुभूतीचा साक्षात्कार.
तिसऱ्या वर्षी संस्कृती संवर्धनप्राचीन योगविद्या आणि विस्मृतीत चाललेले खाद्यपदार्थ,  याबाबत काही  माहिती द्यावी   या संकल्पनेतून कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.घंटा नादाचे महत्व सांगत घंटा नादातून प्रार्थना व पूजन त्यानंतर योग विद्या योगासने यांचे महत्व सांगणारे  प्रात्यक्षिके आणि त्यानंतर ‘उकडपेंडी’ ची  अस्सल मराठी न्याहारी  सर्वांना  देत नववर्षाचे स्वागत करण्यात आले
चौथ्या वर्षी  ‘उषःकालअर्थात २०१२ ची सकाळ.या कार्यक्रमात निवेदनातून ,विविध संकेत स्थळातून आपल्या भोवतीचे  विश्व  जाणीवेतून  विस्तारत असताना,  संपर्कातून कसे जवळ येत आहे. अगदी रात्री बाराच्या ठोक्याला  आपल्या प्रियजनांना आपण किती सहजतेने शुभेच्छा देवू शकतो याची माहिती जुन्या जाणत्या  पिढीला  सांगत  कार्यक्रमाची  सुरवात झालीअर्थात आधुनिकीकरण आणि अद्ययावत  तंत्रज्ञान कितीही जवळ केले तरी आपल्या संस्कृतीतील सनातन  गुरुशिष्य परंपरा कशी मजबूत पणे टिकून आहे आणि शास्त्रीय संगीतात हा जुन्या नव्याचा समन्वय संगम किती मनोहर आहे याची प्रचीती  दमदार पिता-पुत्र तसेच  गुरु-शिष्य  गायकांनी उपस्थितांना करून  दिली.
पाचव्या म्हणजे यंदा २०१३ च्या वर्षारंभी विद्येची  देवता विघ्नहर्ता याच्या  चरणी प्रार्थना करण्यासाठी अतिशय सुयोग्य  असा  'अंगारकि चतुर्थी ' योग आल्याने सकाळी श्रीपुजेने करीत नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. 
अर्थात हे सर्व उपक्रम राबविताना अनेकांचा हातभार लागलाअंतर्मुख होत विचार केला तर आता वाटतेखरच ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सरलेल्या वर्षास निरोप देण्याची  पश्चिमात्य संस्कृती बाजूस  सारूननव वर्षाचे स्वागत  भारतीय परंपरेने करताना  संस्कारक्षम मनावर  दोन /चार चांगल्या गोष्टी ठसवण्यात  थोडेतरी यश  नक्कीच  आलेआणि आपल्या उज्ज्वल संस्कृतीचे छोटेसे का होईना, पण रोपटे या पश्चिमेत रुजवण्यास आमचा हातभार लागल्याचे समाधान नक्कीच मिळाले.
तळ  टीप - सदर लेख 'मुक्काम पोस्ट फॉरेन' या सदरात  'कोल्हापूर सकाळ' या दैनिकात ७ व १४ जानेवारीच्या अंकात पूर्व प्रकाशित झाला आहे.