Monday, January 5, 2015

परसदारीचा चाफा -

रोजनिशी त्याची आणि तिची -
खरच एक नाणे आणि दोन बाजू . वर्षानु वर्षे आपण ऐकत आलो आहोत. मग काय घटना तीच,पण तगमग किती वेगळी . भिन्न दृष्टीकोन. सरळ समोरासमोर नजरेला नजर देत जेंव्हा बोलता येत नाही तेंव्हा आडमार्गाने नजर फिरवत किंवा समक्ष न बोलता माघारी मांडलेली बाजू म्हणजे दृष्टीकोन ?
बरेचदा असे प्रश्न सतावतात, एकदा असेच तिला म्हटले, ज्याचा त्याचा दृष्टीकोन ! तर मला म्हणाली,तुझे आपले काही तरीच म्हणे दृष्टीकोन ! आणि मग त्यावरच बोलत राहिली, म्हणाली कोन म्हटले कि दोन बाजू आणि एक कंगोरा . आणि अगदी ३६० अंशात पहायचे म्हटले तर सगळे जग उलटे पालटे होवून जाते. पण आपण तेंव्हा सम पातळीत येतो आणि कंगोरा पण उरत नाही खरे ना ?
आज किती बरे दिवस झाले ? गावाशेजारील या नदीवर येवून. एका बाजूला डोह, तर थोडा वळसा घेत खड्काळीतून धावताना झालेले विस्तीर्ण पात्र, त्या वरील तो छत्तीस कमानींचा पूल , आणि त्या पुलाच्या मध्यावर आपले येवून बसणे?
आजही अशीच नेहमी सारखी त्याची पावले वळली, चालू लागला
डावीकडे डोह वरून शांत खोलीचा अंदाज नसलेला- त्याचा सारखा
उजवीकडे खडकातून अल्लडपणे धावणारा फेसाळता प्रवाह -तिच्या सारखा
कोणीतरी त्याला पहिले पण दखल घेतली नाही कशी घेतील तो होता पण स्वतः पुरता .
इतरांसाठी अलविया, वल्ली आणि असाच कोणीतरी.
पुलाचा मध्य आला त्याची पावले मंदावली हेच ते ठिकाण ! किती वर्षे झाली ? मोजलीत कुठे ? आणि का मोजायची ? कुठल्या मापाने ? त्याचा हात शबनम मध्ये गेला त्याची पोतडी बाहेर आली. पाने विस्कळीत झाली होती पण आठवणी आजही तशाच घट्ट अगदी पक्क्या बांधणीत राहून गेल्या होत्या. त्याचा हात पाने चाळू लागला आणि नजर प्रवाहाकडे .......
परसदारीचा चाफा -
त्याचा - आजीच्या सुप्रभाती चालणाऱ्या साग्रसंगीत पुजेची फुले परसदारी जावून परडीतून आणणे हे रोजचे काम. कधी कधी कंटाळा येतो पण चुकवावे मात्र नाही वाटत . परडी भरून होता होता आजीची अंघोळ झालेली असे आणि कधी कधी रेडिओवर लागणारे ते ठेक्यातील सुप्रभातम आजीच्या खड्या सुरात सुरु झालेले असे , आणि त्या सुरातील खडेपणा आणि आजीच्या भक्तीतील खरेपणा माझी सकाळ चैतन्यमय करीत असे .
त्याही दिवशी परडी घेवून मागील दारातून बाहेर आलो आणि समोर ती चाफ्याच्या झाडाखाली उभी. निशब्द ! आता जवळ पास कोणी नाही तर ती काय थोडेच बोलत असणार. का न बोलायला काय झाले ? बोलायला काय माणसेच लागतात का ? मी नाही का रोज त्या चाफ्याशी बोलत ? मग हि का नाही बरे बोलत ? जावू दे मला काय ? मी आपला आजीची पुजेची फुले गोळा करतो आणि पळतो आत.
जरा पुढे होत मी फुल उचलायला वाकलो आणि ती अय्या करत पाळली. आणि मागून आजीची हाक," अरे सुंभा !अजून एक पण फुल वेचले नाहीस कुठे लक्ष आहे तुझे ?"
आणि मी काय सांगणार आजीला माझे आज सगळे लक्ष चाफ्याकडे आहे म्हणून!
परसदारीचा चाफा -
तिचा - मुंबईच्या आलिशान घरात कितीही लवकर झोपले तरी पहाट अशी कधी नसतेच. पण इकडे गावाकडे झुंजूमुंजू होताच कसे अनेक आवाज आपल्याला गुदगुल्या करीत जागे करतात. आजही जाग आली अशाच किलबिलाटाने . पण पाठोपाठ एक मंद सुगंध
अक्षरशः हलवून आणि झपाटून गेला.मला लवकर उठायचा कंटाळा कधीच नाही . पण एखादी पहाट चुकवून लोळत पडायला पण नक्कीच आवडते.
घरात शांतता होती पण एक प्रसन्न गंध दाटला होता. मागील दाराचा चाफा मला बोलवत होता. मी त्याच्यापाशी पोचले आणि किती म्हणून बोलत होता तो. मला बोलूच देत नव्हता. मागे तो उभा आहे हे पण त्यांनीच सांगितले. त्याच्या डोळ्यातील चमक मला आपोआप जाणवली. म्हटले बघू तरी काय करतो ते ? मी चाफ्याखाली उभी राहून चाफ्याशी भरभरून बोलतेय आणि याचा पुतळा.
आणि अचानक येवून तो माझ्या पुढे वाकला जणू सोनचाफा होत.बोलला काहीच नाही.
चाफ्याच्या झाडाने फांदी हलवत मला त्याचा निरोप दिला . मी स्वतःशीच बोलत पळाले आणि तो चाफा माझ्याकडे पहात नुसताच उभा होता सुंभा सारखा !
पण त्या चाफ्याकडे माझे लक्ष होतेच कुठे ?