Wednesday, January 31, 2018

ऐसे ही किसी रोज ना जाने के लिए आ ....

ऐसे ही किसी रोज ना जाने  के लिए  आ ....

दूरवर हलकेसे वरील शब्द कानावर पडले आणि कुठेतरी खोलवर तिच्या आठवणीने गलबलून आले . तिच्या माझ्यातील नाते संबंध आणि हि गझल किती समांतर आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येत गेली .

खरे तर तिची माझी भेट झाली त्याला आता तीन दशके संपून गेलीत , जगासाठी ती कुमारी ,सौभाग्यवती आणि आता विधवा अशा अनेक रूपात माहित असेल पण माझ्या साठी मात्र ती या नितांत सुंदर गझलेतील प्रेयसीच आहे .

पहिली सुरवातीची तिची ओढ म्हणजे सगळे जग सोडून धावत येऊन गळ्यात पडणे म्हणजे काय असते याची प्रचती होती . काळ पुढे धावत होता ,प्रेमा पलीकडे असलेल्या वास्तव जगाचे प्रश्न समोर आले होते , जीवनात किमान स्थैर्य येण्याची धडपड सुरु असतानाच तिला घरच्यांच्या दबावाला झुकून लग्नासाठी उभे राहावे लागले होते .

त्यावेळी तिने तिची अगतिकता एका छोट्या पत्राने मला कळवली होती . त्याचे पाठवलेले उत्तर तिला कधीच मिळाले नाही . माझा होकार माझ्या मनात तसाच राहिला .  तिचा साखरपुडा झाला आणि एकदा तिच्या नियोजित वरा  बरोबर फिरावयास बागेत आलेली नजरेस पडली ती दुरून झालेली नजर भेट तिने स्वीकारलेला निर्णय किती अगतिकतेमधून आहे हेच सांगत होती .पण आता मागे वळून येणे तिला शक्य नव्हते ,ती तिच्या मार्गाने पुढे गेली  आणि ती सौभाग्यवती झाली पण अन्य कोणासाठी तरी ....

आणि मी तिच्या समोर असताना काहीही ओळख दिली  नाही कारण मला तिच्या जीवनात जरासुद्धा दुःख असावे असे कधीच वाटले नाही पण मन मात्र आक्रनंदुन म्हणत होते -----

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ।

कारण असे वाटायचे अजूनही काहीतरी असे घडेल , ती येईल प्रेम करण्यासाठी नाही तर माझ्या प्रेमाला धक्का देण्यासाठी येईल एकदाच भेटून ती का दुसऱ्याची झाली हे डोळ्यात पाणी आणून सांगेल आणि मला त्या गझलेतील पुढील शब्द माझी आर्तता तिला पोहचवत आहेत  असे वाटून ओठावर  शब्द आले .....


रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

मन जरी म्हणत असले तुला त्रास नको तू आता माझी नाहीसच तर मी का तुझा हट्ट धरावा , म्हणून समाजासाठी ये ,सोडून जाण्यासाठी ये , असे  प्रेयसीला मन म्हणत असले तरी हृदयाचा आवाज तिला इतकेच सांगू इच्छित आहे कि ....

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ


रंजिश ही सही... ( एक कल्पना चित्र - मनातल्या काल्पनिक प्रेयसीचे )


Thursday, January 25, 2018

भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

दिनांक ३१ डिसेंबर २०१० या दिवशी मी ' मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने ' या ब्लॉग लिखाणास सुरवात केली . प्रथम लेखांचा / कवितांचा किंवा काहीतरी लिहीत राहण्याचा वेग बरा होता. पण गेली दोन तीन वर्षे लिखाण जवळ जवळ थांबलेच .

पण आता पुन्हा काही तरी लिहीत राहावे . जरा मनमोकळेपणाने व्यक्त व्हावे असे वाटायला लागलेय म्हणून पुन्हा सुरवात करायचे ठरवलंय . बघू कसे जमतेय . बरेच दिवस  कोरा असलेला कॅनव्हास काही रंग भरले तर बोलेल का ? त्यावरचे चित्र मनोगत उलगडून दाखवण्यास समर्थ ठरेल का ? अशा काही शंकांनी मन भरून गेले आहे . पण रेखाटन केल्याशिवाय जसे चित्र पूर्ण होत नाही तसे मनातील  भावनांना शब्दरूप दिल्याशिवाय मनास . हलके वाटत नाही हेच खरे .

जेंव्हा ब्लॉग लिखाण सुरु केले तेंव्हा आपला ब्लॉग कोणी वाचेल का ? अशी एक पुसटशी शंका मनात होतीच . नियमित लिखाण असताना एक ते आठ हजार पर्यंत वाचकांच्या भेटी टप्या टप्याने होत गेल्या पण लिखाण थांबल्यानंतर देखील होणाऱ्या वाचक भेटीने अकरा  हजार  भेटीचा टप्पा गाठला आणि पुन्हा काहीतरी  लिहावे  या विचारांनी उचल खाल्ली .

तर मग आता किमान महिन्यातून दोनदा मी आपणास  भेटणार ,  म्हणजे मी आता पुनर्भेटीस येत आहे . कधीआनंद देणार तर कधी कंटाळून टाकणार ( बोअर करणार ), बघू आता त्यात तरी नियमीत पणा ठेवता येतोय का ?

कारण आपल्या पुनर्भेटीची ओढ मलाच स्वस्थ बसू देत नाही म्हणून मी पुन्हा ब्लॉगकडे वळालोय , तर करणार ना स्वागत माझ्या स्वनिमंत्रित भेटीचे ?