दिनांक ३१ ऑक्टोबर २०१० ची दुपार. थंडीकडे कलू लागलेले वातावरण, बर्फाच्या पहिल्या हलक्याश्या शिडकाव्याने अधिकच थंड झाले होते. टोरोंटो आणि परिसरातील सायंकाळ 'हॅलोवीन' कडे सरकू लागली होती. पण अनेक संगीत प्रेमींच्या गाड्यांची चाके मात्र लिविंग आर्ट गॅलरीच्या ' हॅमरसन हॉल ' कडे वळु लागली होती. त्यासाठी कारण पण तसेच होते, त्या सायंकाळी तिथे होती संगीताची मेजवानीच. संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाचा कार्यक्रम, 'एम फॉर सेवा' या सेवाभावी संस्थेने आयोजित केला होता, आणि खाचाखच भरलेल्या त्या हॉलमध्ये असलेल्या भाग्यवंतात आमचाही समावेश होता. पंडीतजींचे ८०व्या वर्षातील पदार्पण हे संयोजना मागील एक निमित्त होते. पण खरे कारण पुणे सोडल्या पासून 'सवाई गंधर्व मोहत्सव' आणि त्या सारख्या दर्जेदार कार्यक्रमांना मुकलेल्या आमच्या सारख्या अभाग्यांसाठी आलेली ती एक संधी होती.
नेटके आणि सुबक सूत्रसंचालन, हिंदी आणि त्या पाठोपाठ इंग्लिश असे द्वीभाषिक निवेदन, यामुळे संपूर्ण वातावरण कठोर शिस्तीला देखील आपलेपणा आणत होते. कार्यक्रम नियोजित वेळेवर तर सुरु झालाच पण संपूर्ण हॉल वेळेपूर्वी आपापल्याजागी येवून स्थानापन्न झालेल्या संगीतप्रेमींनी भरून गेला होता. एम फॉर सेवा या संयोजक संस्थेची माहिती देणारी पाच/सात मिनिटांची चित्रफित, त्या नंतर पंडितजींचा जीवनप्रवास थोडक्यात उलगडून दर्शवणारी चित्रफित दाखवून त्यानंतर आज पंडितजींना साथ सांगत देणारे कलाकार पंडित समीर चटर्जी- तबला, पंडिता त्रीप्ती मुखर्जी- संवादिनी आणि सूर संगत, पंडित सुमन घोष- संवादिनी आणि सूर संगत, आणि पंडित डॉ. अमित आर्य यांचा परिचय करून देण्यात आला.आणि त्यानंतर .......खरे तर त्यानंतरच्या कार्यक्रमाच्या वर्णनासाठी शब्दच नाहीत. पुढील तीन तास आम्ही सर्व श्रोते अक्षरशः सूर सागरात बुडून गेलो होतो. पंडित जसराजजी काय गायले ? या प्रश्नाचे कदाचित तांत्रिक उत्तर माझ्या सारख्यास देणे अवघड जाईल पण इतके मात्र मी नक्की म्हणेन कि, त्यांनी आम्हाला तृप्त केले.
प्रथम शुद्ध रागदारीतील गायनाने लोकांना वातावरणातील भारलेपणाने जागीच खिळवून ठेवले होते त्यानंतर भक्ती संगीतातील सुरावटींनी मंत्र मुग्ध केले. त्यातील कृष्ण भक्ती गीत संपूर्ण संस्कृत रचना असूनही सुरांनी दिलेला आंनद शब्दांच्या पलीकडला होता. या सुरेल मैफिलीचे वर्णन कोणत्या रागात, कोणती रचना, त्यातील चढ उतरांसह करायला गेल्यास,ज्यांना या मैफिलीस
येता आले नाही त्यांच्यासाठी काय ऐकायचे चुकले हे समजण्यासाठी ठीक होईल, पण मला अश्या येवू न शकलेल्या संगीत प्रेमींना इतकेच सांगायचे आहे पंडित जसराजजींना याची देही याची डोळा एकदा तरी ऐका. या जन्मी आपले भाग्य म्हणून असे गायक आपल्यास लाभले आहेत.साथ संगत तर अशी होती कि, विचारूच नका. पंडित सुमन घोष जेंव्हा जसराजजींच्या पाठोपाठ तान घेत तेंव्हा पंडितजी केंव्हा थांबले आणि सुमंजीनी सूर केंव्हा पकडला हे भल्या भल्यांना समजलेच नाही. परिचय करून देतांना पंडिता त्रीप्ती मुखर्जी या व्हाईट हाउस मध्ये दीपावली निमित्त गायल्या आहेत असा उल्लेख संयोजकांनी केला पण पण जेंव्हा त्यांचे सूर कानावर पडले तेंव्हा मन म्हणाले,अरे पंडिता त्रीप्तीजी व्हाईट हाउस मध्ये गायल्या यात त्या व्हाईट हाउस वाल्यांचे नशीब दांडगे म्हणून त्यांना इतके सुरेल स्वर अनुभवता आले. समीर चटर्जी आणि अमितजी यांना तर जसराजजींनी स्वतःच अनेकदा दाद दिली. उत्तरोत्तर रंगत गेलेली मैफिल आता थांबवयाची का ? असा प्रश्न जेंव्हा पंडितजींनी केला तेंव्हा प्रेक्षागृहातून नाही असा एक सुरात आवाज आला. आणि त्यापुढे जावून आम्हास आपले " ॐ नमो भागवते वासुदेवाय " .... ऐकायचे आहे असा आग्रह देखील झाला. आणि अहो आश्चर्य पंडितजींनी गेल्या सलगच्या तीन तासाच्या गायनाने आलेला स्वतःचा थकवा बाजूला सारून पुन्हा असा काही सूर लावला कि बस्स... मी लिहूच शकत नाही पुढे, तो होता एक अमृतानुभव
No comments:
Post a Comment