१० मे ... एक्काहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सौ.सुमित्रा आणि श्री.सीताराम गोडघाटे,या दांपत्याचे पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले. भविष्यात एखाद्या क्षेत्रात हे मुल हिऱ्याप्रमाणे चमकून उठेल याची पुसटशी कल्पना नसताना,त्यांनी त्याचे नाव 'माणिक' असे ठेवले. पुढे वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्यावर्षी हे झाकले माणिक,खरोखरच कोहिनूर हिऱ्या प्रमाणे चमकून उठले. 'संध्याकाळच्या कविता' या गूढ गंभीर काव्य रचनेतून ते जगासमोर आले.अर्थात इतक्या माहिती नंतर देखील आपल्या मनीचे गूढ नाही ना संपले.कारण ते जगासाठी ते माणिक सीताराम गोडघाटे या नावानी लिहिते झाले नाहीत. त्यांच्या कविता तरल,गूढ गंभीर आणि आडनावाप्रमाणे गोडघाटणीच्या असल्या तरी त्यांनी लिह्ण्याकरिता घेतलेले नाव आहे 'ग्रेस'. माणिक हे पाळण्यातील नाव असले तरी ते लिहिते झाले ग्रेस या पूर्णतः ग्रेसफुल शीर्षकाने .
ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादात होता... किंवा
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते... या रचनांनी आज मनामनात प्रतिभावंत म्हणून नोंदलेले कवी ग्रेस त्यांचा ७१वा वाढदिवस दिनांक दहा मे रोजी साजरा करीत आहेत.त्यांच्या प्रतिभेला आणि त्यांना मानाचा मुजरा देत समस्त रसिकाच्या वतीने जीवेत शरद शतम! अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत मी त्यांना दीर्घायुष चिंतितो.
प्रकाश जळतो हळू हळू कि चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दुखः सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका..
या ओळीतून जिथे कवीस प्रकाशाच्या उजळण्याच्या जागी प्रकाशाचे जळणे दिसते. किंवा निबिड अरण्यातील अनेक पावसात भिजून,हिरवा कच्च शेवाळलेला वृक्ष जणू मूकपणेच त्या रंगाचा स्वीकार करीत आहे. आणि नेणिवेच्या जाणीवेतून आयुष्याच्या क्षितिजावर सुख दुःखाकडे तटस्थतेने पाहणारा मेघ आपोआपच परका वाटू लागतो
या आणि अशा अनेक अर्थपूर्ण कविता देताना या कवीने गूढता,दुर्बोधता याकडे खऱ्या अर्थाने पाहण्यास शिकवले.कवीता समजणे आणि कविता उलगडणे यातील अन्तर जर तुम्हास कमी करता येणार असेल तरच तुम्ही ग्रेस समजून घेवू शकाल.अर्थात स्वतः कवी ग्रेस यांनी त्यांच्यावर बसलेल्या दुर्बोध कवितांचा जनक या शिक्याची कधीच पर्वा केली नाही. या उलट स्वतःमधील आणि कवितेतील गूढता आणि इतरांना वाटणारी दुर्बोधता जपताना त्यांनी भरभरून बोलत, त्यांच्या 'ती गेली तेंव्हा..'या सुप्रसिद्ध कवितेचे विश्लेषण अपुर्वतेने केले आहे त्यासाठी हि लींक आपण वेळ काढून जरूर ऐका-
सदर फिल्मच्या शीर्षकात ग्रेस यांना विचारवंत कवी असे संबोधले आहे.पण त्यांच्या कविता वाचयला लागले कि, प्रतिभावान कवीच्या अंतर्मुख करणाऱ्या प्रगल्भ रचना असे त्यांच्या कवितेस संबोधावे वाटते.कविमन कविता साकारताना वेगवेगळ्या रचनांमधून स्वतःला उलगडून सांगत असते असे मानतात. पण खराखुरा प्रतिभावान कवी स्वानुभावापेक्षा भावानुभव नेहमीच प्रभावी पणे मांडत असतो. कवी ग्रेस म्हणजे या कलाविष्काराचे मूर्तिमंत उदाहरण आहे.त्यामुळेच ऐन तारुण्यात हा कवी 'संध्याकालीन' रचनांतून तरलतेने उलगडत जातो.दिवसाच्या विविध कालपर्वतील सर्वाधिक गूढ वेळ म्हणजे कातरवेळ- सायंकाळ आणि या कवीची सर्वाधिक आवडती वेळ हीच आहे त्यामुळे -
संध्याकाळच्या कविता -१९६७(कवितासंग्रह)
चंद्रमाधवीचे प्रदेश - १९७७(कवितासंग्रह)
सांध्यपर्वातील वैष्णवी - १९९५(कवितासंग्रह)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - २०००(ललित लेख संग्रह)
सांजभयाच्या साजणी -२००६ (कवितासंग्रह) यासारखे प्रमुख काव्य व लिखाण या गूढ अशा सांजवेळेशी निगडीत झाले आहे.
या कवीस समजून घेणे हे एक आव्हानच ठरेल. आणि असे आव्हान पेलणे कठीण झाले कि, तथाकथित समीक्षक पटकन त्याच्यावर दुर्बोध हा शिक्का मारून रिकामे होतात. माझ्या दृष्टीने कवी ग्रेस हे दुर्बोध नसून एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे केवळ काव्य रचनेत नाही तर ललित लेखातून व्यक्त होणे असो किंवा एखाद्या पुस्तकाची अर्पण पत्रिका असो, त्यांच्या शीर्षकातच वाचकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद आहे.त्यामुळे -
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - -हत्तीच्या डोळ्यांतील पाणी निकराने मागे परतविणार्या एका मुंगीस...
मितवा : ...अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना.
वार्याने हलते रान : हे तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय... ...(स्वाक्षरीखाली ’अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी’ असा सूचक उल्लेख)
यासारखी विचार मग्न वृत्ती फुलवणारी शीर्षके ललित संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते सहजतेने वापरतात.
नागपूरच्या दाहक हवेत वाढताना माणूस,उन्हाने करपला तरी वृतीने शीतल राहत असावा.त्यामुळेच कवी सुरेश भट काय किंवा कवी ग्रेस काय हे संध्याकाळच्या गुढते बरोबर त्यातील अनाकलनीय नजाकत टिपताना दिसतात.
सुफी काव्य प्रकार हा ग्रेस यांना मनापासून भावलेला काव्यप्रकार त्यांनी त्यावर मनपूर्वक प्रेम केले.आपण जर या सुफी काव्य प्रकारच्या उत्त्पती बाबतचे हे वाक्य वाचले -
The word ‘Sufi’ is derived from the Arabic word ’suf’ which means wool. Sufi songs resembles a path of devotion and love which leads to none other than God himself. A person can strives towards intimate knowledge or communion with God through listening to Sufi Songs. तर या मनस्वी वृत्तीच्या माणसाचे या काव्य प्रकारावर का प्रेम होते ते आपोआप स्पष्ट होते.
या कवीला संध्यासूक्तांचा यात्रिक असे संबोधतात. मला वाटते कि कातर वेळेस जेंव्हा दिवस संपून पूर्ण अंधार होण्यापूर्वी जी धूसर वेळ असते ना ती मन अगतिक करणारी भावविवश वेळ. ती वेळ हि सर्वाधिक आभासी वेळ. या वेळेवर या कवीने मनस्वी प्रेम केले म्हणूनच या श्रेष्ठ कवीच्या रचना म्हणजे अक्षरशः अभासातील भास वाटतात.कारण ओळी त्याच पण प्रत्येकासाठी भिन्न अनुभूती देणाऱ्या.किती म्हणून आणि काय काय घ्यायचे ....
म्हणूनच त्यांच्याच- ' ती गेली तेंव्हा ..'या प्रसिद्ध रचनेतील -
तशी सांजही आमुच्या दारी, येवून थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता....
या ओळीवर थबकत मी शेवटी इतकेच म्हणतो कि-
मोत्यातून शोधण्या 'माणिक' मी रत्नपारखी झालो
शब्दात गवसता अर्थ मी अर्थ पारखा झालो ....
No comments:
Post a Comment