Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Sunday, June 16, 2013

पितयापरी त्वां सांभाळिले ।

आजच्या रविवारी सकाळी नेहमीच कानावर पडणारे आणि बरेचदा म्हटले जाणारे व्यंकटेश स्तोत्र ऐकत होतो. पण एका ओळीवर मन एकदम अंतर्मुख झाले. कारण त्या ओळी होत्या -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
अनेक वर्ष नियमित म्हटले जाणारे स्तोत्र आणि त्यातील हे सुमधुर कडवे आज मला एक वेगळाच अर्थ समजावून सांगत होते.अर्थात या अंतर्मुखते मागे दोन घटनांची एकत्र गुंफण झाली होती. आज पितृ दिन जो निम्म्यापेक्षा अधिक जगात वडिलांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तो आजचा रविवार आणि आजची तिथी हि माझ्या आईची प्रथम पुण्यतिथी.
नक्की काय बोलावे ? कसे व्यक्त व्हावे काहीच सुचतच नाही. कारण तसे पितृ छत्र वयाच्या चौदाव्या वर्षी हरपले. आणि वयाच्या नवव्या वर्षापासून शिक्षणाकरिता घरापासून दूर रहावे लागल्यामुळे वडिलांचा सहवास कमी काळ लाभला. अल्प आजाराने त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अकस्मात निधन झाले.पण बालपणातील ज्या काही थोड्या धूसर काळाच्या पडद्याआड वडिलांच्या रेंगाळणाऱ्या आठवणी आहेत, त्यातील सर्वात महत्वाची आठवण म्हणजे," स्वाभिमानाने जगा ! " हा त्यांनी कृतीतून दिलेला संदेश. आणि जीवापाड केलेले प्रेम. अर्थात त्यावेळी लहान वयामुळे त्या कृती मागील भावना अर्थ हे तेंव्हा नक्कीच उमजले नाहीत पण आजच्या पितृदिनी त्या आठवणींनी मन सदगतीत नक्कीच होत आहे.
सन १९६८/६९ च्या दरम्यान वडिलांची नोकरी गेली आणि आमच्या घराची अवस्था व्यंकटेश स्तोत्रातील 'अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा ' यासारखी झाली. पण मला आठवतेय कि परिस्थीची खंत न बाळगता कष्टाने पण स्वाभिमानाने जगावे याचा पहिला धडा त्यांनी कृतीतून आम्हाला दिला. कोल्हापूर आणि रंकाळा यांचे नाते अतूट आहे. पण आमच्या आठवणीतील रंकाळा हा जेंव्हा शालिनी पॅलेस हे हॉटेल झाले नव्हते आणि रंकाळ्याचा काठ गावाबाहेर मोकळी हवा खाण्यासाठी फिरावयास जाण्याचे ठिकाण होते तो काळ. त्यावेळी 'रंकाळा चौपाटी' अस्तित्वात आलेली नव्हती पण हे ठिकाण एक दिवस नक्कीच चौपाटी होणार याची मनात खात्री होती बाबांच्या मनात पक्की खात्री होती. कारण तेथे फिरावयास येणाऱ्या लोकांना चिवडा पाकीट विकण्याचा पहिला प्रयोग माहे मे १९६८ मध्ये माझ्या बाबांनी केला.
त्या अर्थार्जनाचे प्रयोगास मी सक्रीय मदत केल्याचे मला आजही आठवते.इतकेच काय पण रु३.५०चे चिवडा सामान पोहे,शेगदाणे,खोबरे, तेल व छोट्या प्लास्टिक पिशव्या आणयचे मग आई त्याचा चिवडा बनवून देत असे. तर बाबा त्याची ५० पाकिटे तयार करीत असत. मग ती पाकिटे घेवून सायंकाळी ४.००ते ७.३० या वेळेत ती मी रंकाळ्यावर फिरावयास येणाऱ्या मंडळींना ती विकत असे. पन्नासावे पाकीट विकले गेले कि कोण आनंद होत असे मग ते ५.०० रुपये घेवून घरी गेले कि, त्यातून रु.३.५०चे चिवडा सामान व रु. १.५०चे किराणा सामान आणून त्या दिवशीची चूल पेटत असे.पण हे करताना कधी लाज बाळगण्याचे कारण नाही, आपण मिळवत आहे तो पैसा कष्ट करून मिळवत आहोत हे बाबांचे सांगणे असे. मला आठवते आहे कि, प्रथम हा धाडसी वाटलेला बाबांचा विचार पुढे किमान सहा महिने घर चालवण्यास उपयोगी ठरला.
प्रथम हा प्रयोग करताना परिचित नातेवाईक यांनी केलेली थट्टा आजही आठवते,पण आज “ रंकाळा चौपाटी”चे बदलते रूप पहिले तर मला मात्र बाबांची दूर दृष्टीच जाणवते. या चिवडा विक्रीतील एक किस्सा मला आजही आठवतो माझा थोरला भाऊ शेखर यास हा उद्योग फारसा आवडत नसे त्यामुळे तो स्वतः चिवडा विक्रीस जाण्यास राजी नसे. एके दिवशी बाबांनी थोडेसे सक्त्तीनेच माझ्या ऐवजी भावास चिवडा विक्रीस पाठवले.
तर तो गेला पण तासाभरातच परत आला आल्यावर घरी सर्वच आश्चर्य चकित झाले व त्यास विचारले अरे वा तू तर लवकर काम संपवलेस किती पाकिटे संपली? तर तो म्हणाला एक! आणि त्याचे पैसे कुठायत विचारल्यावर तो म्हणाला एक पाकीट पेरुवाल्यास दिले आणि आणि त्याचे कडून पेरू घेतला आणि तो खाल्ला. त्यानंतर बाबांनी कधी त्याला चिवडा विक्रीस पाठवले नाही.
खरे तर मला अण्णांचा सहवास तसा अल्पच लाभला. मी दहावीत गेलो आणि अण्णा गेले म्हणजे मी जेम तेम १४ वर्षांचा होतो आणि त्या चवदा वर्षांपैकी अखेरची पाच वर्षे मी त्यांचे पासून दूर मामाकडेच काढली. कारण मी चवथीपर्यंत घरीच असल्याने पहिली, भगवंताचे मंदिर- बार्शी, दुसरी ते चौथी, भक्ती सेवा विद्यापीठ - कोल्हापूर या ठिकाणी शिकलो.आणि त्यामुळेच माझ्या वडिलांबाबतच्या आठवणी तश्या थोड्या धूसरच आहेत पण त्या आठवणींचा चलचित्रपट आणि माझ्या मध्ये एक अदृश्य असा धुक्याचा पडदा आहे. कधी कधी एखादीच आठवणींची झुळूक येते आणि तो पडदा क्षणभरासाठी दूर होतो आणि अण्णा येवून समोर उभे राहिलेत असे वाटून तो काळ मी आजही पुन्हा एकदा तसाच अनुभवतो.
त्यामुळे जगाने जसे माझ्या बाबांना कधी ओळखले नाही तसे, जगास असे वाटते कि आम्हा मुलांना आमचे बाबा आठवतच नाहीत. पण त्याचा दोष मी माझ्या बाबांच्या आसपास वावरणाऱ्या परिचितांना देणार नाही कारण त्यांनी पहिले ते त्यांचे बाह्य रूप.अर्थात जवळचे नातेवाईक सुद्धा बाबांच्या वागणुकीवरून त्यांना तापट , हट्टी, दुराग्रही, हेकेखोर, तऱ्हेवाईक इतकेच काय पण माथेफिरू, वेडसर, मनोरुग्ण इत्यादी विशेषणे लावून मोकळे होत.
या नातेवाईकांना मी जवळचे नातेवाईक अश्यासाठी म्हटले आहे कि ज्या काळी दोन वेळची चूल घरात पेटणे हि चैन होती त्याकाळी त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची न कळती अपेक्षा होती. अर्थात काहींनी मदतीचा हात दिला तर काहींनी स्वतःचे पायावर उभे राहायला शिका असे पायात बळ येण्यापुर्वीच सांगितले
.
जसा जसा काळ मागे पडू लागला तसे तसे ज्या माझ्या वडिलांना इतकी विशेषणे न मागताच मिळाली ते माझे बाबा खरेच कसे होते याचा मला वरचेवर प्रश्न पडू लागला. कारण माझ्या आठवणीतील बाबा हे त्यांना मिळालेल्या कोणत्याच विशेषणात बसत नाहीत असा माझा पक्का समज होता पण न कळते वय आणि मन मोकळे करावे असे कोणी मैत्र नाही त्यामुळे माझे बाबा हे फक्त माझेच राहिले. त्यांचे मला भावलेले रूप इतके दिवस माझ्यापाशीच राहिले.
पुढे मी माझी पुण्यातील नोकरी संपवून चाकोरीतून बाहेर पडण्याचे ठरवले तेंव्हा मला बँकेतील मनेजर पद, भविष्यात बढती, पत्नी उच्च विद्या विभूषित, स्वतःचे चार खोल्यांचे अपार्टमेंट असताना हे स्थैर्य सोडून अनोळखी ठिकाणी जावून पुन्हा एकदा नवा डाव कशासाठी मांडायचा? असा प्रश्न केला ? फक्त हाच प्रश्न विचारून जर माझे हितचिंतक थांबले असते तरी ठीक होते. पण,का तू हि वडिलांसारखा वेडेपणा करायचे नक्की केले आहेस ? असा प्रश्न केला. आणि या प्रश्नाने मला खरोखर अंतर्मुख केले आणि ते मी वडिलांसारखा वेडेपणा करतोय का ? या विचारलेल्या प्रश्ना मुळे नाही तर माझे वडील या जगाला समजलेच नाहीत या दुःखाने.
पण त्यांनी आमच्या वर केलेली माया म्हणजेच वर नमूद केलेल्या श्लोकातीतील पुर्वाध होता तो म्हणजे -
जननीपरि त्वा पाळिले । वडील असून आईची माया दिली आणि जगण्यासाठी स्वाभिमानाचा मंत्र दिला.
आजही मित्रमंडळ, नातेवाईक किंवा परिचित यांची गप्पांची बैठक जमते आणि चर्चा वडिलार्जित मिळकत त्यामुळे होणारे वितंडवाद यावर येते तेंव्हा अतिशय अभिमन्ने मी नेहमीच सांगतो कि आमच्या वडिलांनी आमच्या साठी काय केले तर एक पैशाचे कर्ज अथवा उधार उसनवारीचे ओझे त्यांनी आमच्या शिरावर ठेवले नाही .आणि तोच आमचा सर्वात मोठा ठेवा आहे.
आता आज पितृ दिन असताना वडिलांच्या बरोबरीने आईच्या आठवण येण्यामागे, आज तिची प्रथम पुण्यतिथी इतकेच कारण नाही तर, वडिलांचे त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या आकस्मिक निधन झाल्यावर, पदरात असलेली तीन मुले संभालण्यासाठी तिने जे काही कष्ट घेतले होते त्याची किंमत शब्दात सांगता येणे कठीण आहे.
वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी वैधव्य पदरात पंधरा ते सहा वयोगटातील तीन मुले या परीस्थितीत तिने लेथ मशीनवर मशिनीस्ट म्हणून कष्टाची नोकरी स्वीकारून आम्हा तीन भावंडाना वाढवले. त्याकाळी आठ बाय दहाच्या चाळीतील खोली हेच आमचे विसाव्याचे ठिकाण होते. घरच्या गरिबीत नातेवाईक येत नसत, पुढे परिस्थिती सुधारल्यावर जेंव्हा नातेवाईकांपैकी कोणाकडून जेंव्हा पहिली साडी आईला घेतली गेली तेंव्हा आई म्हणाली होती कि," हा सन्मान माझा नसून सुधारलेल्या परिस्थितीचा आहे."
आणि पैशाशिवाय जगात किंमत नसली तरी, तो मिळवताना कधीही गैरमार्गाचा वापर करू नका, हे तिचे सांगणे होते. तिचा तो खंबीरपणाच आम्हा भावंडांना जगण्याचा मंत्र देवून गेला. त्यामुळे माझी आई म्हणजे वर उल्लेख केलेल्या श्लोकातील उत्तरार्ध आहे. कारण आईने आम्हाला कसे वाढविले हे सांगयचे झाले तर - पितयापरि त्वा सांभाळले | हेच खरे आहे.
म्हणूनच आजच्या पितृदिनी माझे अकाली गेलेल्या वडिलांना आणि त्यांच्या माघारी आमचे वडील झालेल्या आईस नतमस्तक होत वंदन करताना मी पुन्हा एकदा म्हणेन -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
आणि असे छत्र देणाऱ्या माझ्या बाबा आणि आई यांना आजच्या या पितृ दिनी माझे लाख लाख प्रणाम.

Saturday, May 25, 2013

विसंगती सदा घडो ......

अरेच्या! एक तर याला काही माहिती नाही किंवा लिहताना चूक केलेली दिसते, यापैकी काय वाटले आपल्याला. मनात विचार असा येणे यात चूक काही नाही कारण मूळ रचनेची सुरवात आहे ती अशी आहे ---
सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
अर्थात हे सुरेल अर्थपूर्ण गीत आणि त्यातील संदेश पूर्णता योग्यच आहे. पण या सुसंगातीवरून मी विसंगतीकडे का आलो ते मी आता सांगतो. नुकतेच माझ्या वाचनात एक वेगळ्या विषयावरचे पुस्तक आले. त्या पुस्तकाचे नाव आहे OXYMORONICA - paradoxical wit and wisdom from history's greatest wordsmiths लेखक - Dr. Mardy Grothe
या पुस्तकात लेखकाने विचारांच्या सुसंगतीतून विसंगतीतील सौंदर्य टिपले आहे असे मला वाटतेय. मला स्वतःला इंग्लिश वाचनाचा छंद वगैरे अजिबात नाही. उलट बरेचदा काही शब्दांच्या अचूक अर्थासाठी मी डिक्शनरीचा आधार अनेकदा घेत असतो. असे असून देखील या पुस्तकाने मला वेडे केले. या पुस्तकात जो खजिना दडला आहे त्याचा रस्ता आपणास दाखवणे आणि तो आपणास मिळाला तर आपणही नक्कीच श्रीमंत व्हाल याची खात्री वाटली, म्हणून या पुस्तकाचा अल्प परिचय मी आपणास करून देत आहे. आणि मूळ पुस्तक वाचून त्याचा खराखुरा आनंद मिळावा म्हणून परिचय जाणीवपूर्वक अल्पच ठेवणार आहे.
या पुस्तकातील सौंदर्य स्थळे शोधून त्याचा आनंद घेण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकेल.काही जण वाचनानंतर त्यातील काही विचार मनात कोरून ठेवून त्याचा आनंद घेतील,काहीजण त्यावर चर्चा करून अनुभव समृद्ध होतील. काही जण आपल्या आवडीचा विभाग पुन्हा पुन्हा वाचून आनंदाचा पुनःप्रत्यय घेतील. इतकेच काय पण काही जण स्वानुभावातील जगाला उलगडून सांगतील. इतके सर्व यात दडले आहे म्हणून मी त्यास खजिना म्हटले आहे.
मूळ पुस्तक इंग्लिश भाषेतील असल्याने काही माहिती मूळ भाषेत नोंदवून मगच माझे मत सांगणार आहे पण माझे मत किंवा पुस्तकावरील भाष्य हे कोणत्याही अधिकारातून नसून केवळ विचारांच्या अभिव्यक्तीपोटी केले आहे हे माझे आपणास नम्र सांगणे आहे.
पुस्तकाचे सुरवातीस लेखकाने - When people are asked to discribe an oxymoron, they almost always think of a " contradiction in terms " like jumbo shrimp, acting naturally, pretty ugly, असे म्हणत,पुढे काही प्रथितयश लोकांची सर्वमान्य झालेली काही वाक्ये दिलेली आहेत.
जसे-1. I am deeply superfisial.
2. Even is ignorance is encyclopedic.
3. I love my country too much to be a nationalist.
म्हणजेच या वाक्यातून दिसणारे शब्द परस्पर विरोधी असू शकतात. पण एकत्रितपणे ते खूप वेगळा अर्थ मांडताना दिसतात. माझे हे म्हणणे स्पष्ट व्हावे म्हणून पुस्तकातील काही भाग मी इथे मुद्दाम देत आहे.
All of these quotes contain a juxtaposition of oppsing terms. They may be described by the adjective oxymoronic because they are characterized by or related to the rhetorical figure called oxymoron. The Oxford English Dictionary defines oxymoron this way:
A rhetorical figure by which contradictory or incongruous terms are conjoined so as to give point to the statement or expression; an erprssion in its superficial or literal meaning self contradictory or absurd, but involving a point.
The word , which appers in English for the first time in 1640, has an interesting etymology. In ancient Greek oxus means " sharp or pointed"
and moros means "dull, stupid, or foolish." So oxymoron is itself an oxymoron , iiterally meaning " ashrap dullness " or " pointed foolishness. "
echnically , the correct plural form of the word is oxymora, but so many people say oxymorons that ( except for purists ,pedants, and yours truly ) it is now generally regarded as an acceptable usage.
The best examples of oxymoronica don't contain a simple contradiction in terms; they contain what might be discribed as a contradiction in ideas. Many oxymoronic observetions stretch our minds and expand our thinking;
Free love is too expensive.- BERNADETTE DEVLIN
Melancholy is the pleasure of being sad. - VICTOR HUGO
Observations like these are usually called paradoxical, and all are consistent with one of the definations of the word paradox:
A statement that seems self- contradictory , false, or absurd but is nonetheless well-founded or true.
paradox या शब्दाचा आढळ इंग्लिश भाषेत प्रथम १५४० झालेला आढळतो.म्हणजेच oxymoron या शब्दाच्या वापरापूर्वी सुमारे १०० वर्षे याचा वापर दिसतो. paradox या शब्दाचा उगम पुराणकाळातील दोन ग्रीक शब्दांमधून झाला आहे. त्यातील para म्हणजे beyond आणि dox म्हणजे opinion . म्हणजेच paradox चा शब्दशः अर्थ जरी beyond opinion असा असला तरी या शब्दाचा मुळ स्त्रोत " being beyond the pale of current opinion" or " contrary to current thinking."हा अर्थ दाखवतो. सुरवातीचे काळात अशा शब्दांचा वापर अभूतपूर्व अविश्वासानिय गोष्टी उलगडून सांगण्यासाठी केला गेला. प्रतिभावान नाटकर, साहित्यिक शेक्सपियर यांनी त्यांच्या 'अथेल्लो' या नाटकात केला आहे. इतिहासातील अनेक उदाहरणे याप्रकारत आढळतात.
Less is more.
The more things change, the more they remain the same.
To lead the people, walk behind them. या सारखी वाक्ये आणि त्याचा गर्भित अर्थ उलगडून सांगणारी लेखकाची प्रतिभा यांनी हे पुस्तक अक्षरशः भरून वाहते आहे.हि थोडीफार माहिती मी आपणासमोर मांडताना संपूर्ण पुस्तकातील सुरवातीचा ओळख करून देणारा भागच मांडला आहे. पुढे या पुस्तकात लेखकाने विषयाची मांडणी विभागवार करून
पुस्तकास नेटके रूप देत विषय अधिकच सोपा करीत नेताना तो उत्कंठावर्धक केला आहे. वेगवेगळ्या विभागात मांडलेला हा विषय -
Oxymoranic Wit & Humor, Ancient Oxymoranica, Artistic Oxymoronica, या सारख्या चौदा विषयांना स्पर्श करतो.
या पुस्तकाचे वाचनातून मला काय मिळाले?असे मी स्वतःस विचारले आणि उत्तर म्हणून मला जे अगदी सहज सुचले ते मी आपणास सांगत आहे.
१. मी आरशात डोकावले असता,मीच त्यात दिसत नाही.
२. मी पावसात जातो पण तो मला भिजवत नाही.
३. परिचित ठिकाणी मी नेहमीच हरवतो.
४. तुमचे सर्वाधिक नुकसान करणारा व्यवहार,नेहमीच फायदेशीर असतो.
५. मी विचार करणे सोडून दिले कि मला नवीन कल्पना सुचतात.
यातील काही कल्पना आपणास पूर्वी कधी आढळल्या असतील, तर तो केवळ योग योग असून केवळ विचारांच्या प्रक्रियेतील साधर्म्य समजावे. पण त्यापलीकडे जावून माझे इतकेच सांगणे आहे कि, आपण हे पुस्तक जरूर वाचा.
पुस्तक मिळण्याचे ठिकाण - Special Markets department, Harpercollins Publishers Inc.
10, East 53rd Street, New York, NY 10022.

Monday, May 9, 2011

मराठी काव्यातील 'माणिक'

१० मे ... एक्काहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सौ.सुमित्रा आणि श्री.सीताराम गोडघाटे,या दांपत्याचे पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले. भविष्यात एखाद्या क्षेत्रात हे मुल हिऱ्याप्रमाणे चमकून उठेल याची पुसटशी कल्पना नसताना,त्यांनी त्याचे नाव 'माणिक' असे ठेवले. पुढे वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्यावर्षी हे झाकले माणिक,खरोखरच कोहिनूर हिऱ्या प्रमाणे चमकून उठले. 'संध्याकाळच्या कविता' या गूढ गंभीर काव्य रचनेतून ते जगासमोर आले.अर्थात इतक्या माहिती नंतर देखील आपल्या मनीचे गूढ नाही ना संपले.कारण ते जगासाठी ते माणिक सीताराम गोडघाटे या नावानी लिहिते झाले नाहीत. त्यांच्या कविता तरल,गूढ गंभीर आणि आडनावाप्रमाणे गोडघाटणीच्या असल्या तरी त्यांनी लिह्ण्याकरिता घेतलेले नाव आहे 'ग्रेस'. माणिक हे पाळण्यातील नाव असले तरी ते लिहिते झाले ग्रेस या पूर्णतः ग्रेसफुल शीर्षकाने .

ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादात होता... किंवा
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते... या रचनांनी आज मनामनात प्रतिभावंत म्हणून नोंदलेले कवी ग्रेस त्यांचा ७१वा वाढदिवस दिनांक दहा मे रोजी साजरा करीत आहेत.त्यांच्या प्रतिभेला आणि त्यांना मानाचा  मुजरा देत समस्त रसिकाच्या वतीने जीवेत शरद शतम! अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत मी त्यांना दीर्घायुष चिंतितो.
प्रकाश जळतो हळू हळू कि चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दुखः सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका..
या ओळीतून जिथे कवीस प्रकाशाच्या उजळण्याच्या जागी प्रकाशाचे जळणे दिसते. किंवा निबिड अरण्यातील अनेक पावसात भिजून,हिरवा कच्च शेवाळलेला वृक्ष जणू मूकपणेच त्या रंगाचा स्वीकार करीत आहे. आणि नेणिवेच्या जाणीवेतून आयुष्याच्या क्षितिजावर सुख दुःखाकडे तटस्थतेने पाहणारा मेघ आपोआपच परका वाटू लागतो
या आणि अशा अनेक अर्थपूर्ण कविता देताना या कवीने गूढता,दुर्बोधता याकडे खऱ्या अर्थाने पाहण्यास शिकवले.कवीता समजणे आणि कविता उलगडणे यातील अन्तर जर तुम्हास कमी करता येणार असेल तरच तुम्ही ग्रेस समजून घेवू शकाल.अर्थात स्वतः कवी ग्रेस यांनी त्यांच्यावर बसलेल्या दुर्बोध कवितांचा जनक या शिक्याची कधीच पर्वा केली नाही. या उलट स्वतःमधील आणि कवितेतील गूढता आणि इतरांना वाटणारी दुर्बोधता जपताना त्यांनी भरभरून बोलत, त्यांच्या 'ती गेली तेंव्हा..'या सुप्रसिद्ध कवितेचे विश्लेषण अपुर्वतेने केले आहे त्यासाठी हि लींक आपण वेळ काढून जरूर ऐका-
सदर फिल्मच्या शीर्षकात ग्रेस यांना विचारवंत कवी असे संबोधले आहे.पण त्यांच्या कविता वाचयला लागले कि, प्रतिभावान कवीच्या अंतर्मुख करणाऱ्या प्रगल्भ रचना असे त्यांच्या कवितेस संबोधावे वाटते.कविमन कविता साकारताना वेगवेगळ्या रचनांमधून स्वतःला उलगडून सांगत असते असे मानतात. पण खराखुरा प्रतिभावान कवी स्वानुभावापेक्षा भावानुभव नेहमीच प्रभावी पणे मांडत असतो. कवी ग्रेस म्हणजे या कलाविष्काराचे मूर्तिमंत उदाहरण आहे.त्यामुळेच ऐन तारुण्यात हा कवी 'संध्याकालीन' रचनांतून तरलतेने उलगडत जातो.दिवसाच्या विविध कालपर्वतील सर्वाधिक गूढ वेळ म्हणजे कातरवेळ- सायंकाळ आणि या कवीची सर्वाधिक आवडती वेळ हीच आहे त्यामुळे -
संध्याकाळच्या कविता -१९६७(कवितासंग्रह)
चंद्रमाधवीचे प्रदेश - १९७७(कवितासंग्रह)
सांध्यपर्वातील वैष्णवी - १९९५(कवितासंग्रह)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - २०००(ललित लेख संग्रह)
सांजभयाच्या साजणी -२००६ (कवितासंग्रह) यासारखे प्रमुख काव्य व लिखाण या गूढ अशा सांजवेळेशी निगडीत झाले आहे.
या कवीस समजून घेणे हे एक आव्हानच ठरेल. आणि असे आव्हान पेलणे कठीण झाले कि, तथाकथित समीक्षक पटकन त्याच्यावर दुर्बोध हा शिक्का मारून रिकामे होतात. माझ्या दृष्टीने कवी ग्रेस हे दुर्बोध नसून एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे केवळ काव्य रचनेत नाही तर ललित लेखातून व्यक्त होणे असो किंवा एखाद्या पुस्तकाची अर्पण पत्रिका असो, त्यांच्या शीर्षकातच वाचकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद आहे.त्यामुळे -
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - -हत्तीच्या डोळ्यांतील पाणी निकराने मागे परतविणार्‍या एका मुंगीस...
मितवा : ...अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना.
वार्‍याने हलते रान : हे तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय... ...(स्वाक्षरीखाली ’अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी’ असा सूचक उल्लेख)
यासारखी विचार मग्न वृत्ती फुलवणारी शीर्षके ललित संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते सहजतेने वापरतात.
नागपूरच्या दाहक हवेत वाढताना माणूस,उन्हाने करपला तरी वृतीने शीतल राहत असावा.त्यामुळेच कवी सुरेश भट काय किंवा कवी ग्रेस काय हे संध्याकाळच्या गुढते बरोबर त्यातील अनाकलनीय नजाकत टिपताना दिसतात.
सुफी काव्य प्रकार हा ग्रेस यांना मनापासून भावलेला काव्यप्रकार त्यांनी त्यावर मनपूर्वक प्रेम केले.आपण जर या सुफी काव्य प्रकारच्या उत्त्पती बाबतचे हे वाक्य वाचले -
The word ‘Sufi’ is derived from the Arabic word ’suf’ which means wool. Sufi songs resembles a path of devotion and love which leads to none other than God himself. A person can strives towards intimate knowledge or communion with God through listening to Sufi Songs. तर या मनस्वी वृत्तीच्या माणसाचे या काव्य प्रकारावर का प्रेम होते ते आपोआप स्पष्ट होते.
या कवीला संध्यासूक्तांचा यात्रिक असे संबोधतात. मला वाटते कि कातर वेळेस जेंव्हा दिवस संपून पूर्ण अंधार होण्यापूर्वी जी धूसर वेळ असते ना ती मन अगतिक करणारी भावविवश वेळ. ती वेळ हि सर्वाधिक आभासी वेळ. या वेळेवर या कवीने मनस्वी प्रेम केले म्हणूनच या श्रेष्ठ कवीच्या रचना म्हणजे अक्षरशः अभासातील भास वाटतात.कारण ओळी त्याच पण प्रत्येकासाठी भिन्न अनुभूती देणाऱ्या.किती म्हणून आणि काय काय घ्यायचे ....
म्हणूनच त्यांच्याच- ' ती गेली तेंव्हा ..'या प्रसिद्ध रचनेतील -
तशी सांजही आमुच्या दारी, येवून थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता....
या ओळीवर थबकत मी शेवटी इतकेच म्हणतो कि-

मोत्यातून शोधण्या 'माणिक' मी रत्नपारखी झालो
शब्दात गवसता अर्थ मी अर्थ पारखा झालो ....