Saturday, April 25, 2020

आओगे जब तुम ओ साजना

आयुष्यात प्रेम , ममता , आपुलकी सर्व काही गमावलेला एक तरुण, आर्थिक आघाडीवर भरपूर पैसे यश असूनही पराभूत आणि मनाच्या उद्विग्न अवस्थेत भरकटून सर्वस्व सोडून दिशाहीन जात असतो.

आणि जीवनावर भरभरून प्रेम करणारी एक अल्लड युवती, जिने तिच्या मनातल्या राजकुमाराशी लग्न  करून संसार थाटण्याचे नक्की केलेले असते आणि त्या  स्वप्नवत अवस्थेत आपल्या घरी जात असते.

आयुष्याच्या अशा अगदी  भिन्न मनस्थितीत ते दोघे जण एकमेकांना भेटतात. भेट एका रेल्वेच्या डब्यात झाली असल्याने रेल्वे  आणि ....... अर्थात जब वुई मेट या चित्रपटाची कथा पुढे सरकू लागते . एकूणच या चित्रपटाच्या कथेला वेग आहे . दोघांच्या आयुष्यातील  गतकाळ आणि भविष्य यांची सांगड घालत आपले अनुभव परस्परांना सांगत प्रवास पुढे चालू ठेवतात.

या अशा एका वेगवान कथानकात एका वळणावर  संपूर्ण चित्रपटाला कलाटणी देणाऱ्या क्षणी, कथानकात अतिशय सहज सामावून जाणारे हे गीत पडद्यावर इतक्या तरलतेने सुरु होते कि बस्स ....

उस्ताद रशीद खान यांनी ज्या ताकतीने पहिली आ आ आ  हि तान  घेतली आहे कि जणू त्या आर्ततेतूनच पुढील परिस्थिती काय असेल याचा अंदाज यावा.

पडद्यावर कॅमेरा पुढील दृश्यावर नेण्यासाठी या आलापी पाठोपाठ येणारे बासरीचे स्वर गीतातील आर्तता सुरवातीसच अधोरेखित करतात.


आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे .... हि रचना. हे गीत मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा त्यातून नवीन नवीन अर्थ उलगडतात असे मला नेहमीच वाटते.

नैना तेरे कजरारे हैं
नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने
वादे किए कई सारे हैं

या ओळी जेव्हा उस्तादजींच्या गळ्यातून उतरतात तेंव्हा का कोण जाणे पण सुमनजींनी गायलेल्या एका मराठी गाण्यातील या दोन ओळी मला सारख्या कानात गुंजत राहतात. ते गाणे आहे -- केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर ..., पण नैना तेरे कजरारे हैं या शब्दापाठोपाठ

गहिवरला  मेघ नभी,  सोडला ग धीर याच ओळी येतात आणि पराभूत प्रेमाची आर्तता  आणि मनोमन कोसळणे यांचा मिलाप होतो आहे असेच वाटत राहते



 काही गीत रचना अशा असतात कि प्रत्येक कडवे जीवनाचा नवा नवा अर्थ आपल्या समोर उलगडून, त्यातून जणू वेगवेगळ्या  भावनांच्या रेशीम लडीच आपल्यासमोर उलगडत असतात. आणि तरीही मन मात्र सारखे  गीताच्या ध्रुव पदाकडे धाव घेत राहते. त्यामुळे हे गीत ऐकताना मन सारखे -

बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे.... इकडेच धाव घेत राहते

आणि उस्ताद रशीद खान यांचे या गीताचे सादरीकरण देखील असेच आहे संपूर्ण गाणे जरी एक गायक गात  असला तरी, स्त्री मनाची घालमेल व्यक्त करणारी अगदी नाजूकातली नाजूक भावना  आवाजातील चढ उतारातून त्यांनी अलगद टिपली आहे. पण त्या ताना आलापी आपल्याला पुन्हा पुन्हा ध्रुव पदाकडे खेचत राहतात .

हि रचना ऐकताना नेहमी मला हे मनोगत जरी अगतिक प्रेमिकेचे असले तरी ती पराभूत वाटत नाही आणि या नाजूक स्थिती देखील आपले प्रेम नक्कीच यशस्वी होईल या आशावादावर ती जगते आहे  असे मला वाटते आणि त्यामुळेच शेवटी तिच्या ओठी शब्द येतात -
सपनों का जहाँ
होगा खिला खिला
बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे ...
तर मग डोळे मिटून शांतपणे एकदा ऐकुया -https://www.youtube.com/watch?v=WPwTPhFMm3k

No comments:

Post a Comment