Monday, April 27, 2020

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो

खरतर पियानो आणि हिंदी सिनेमा यांचे नाते बरेच जुने . विशेषतः ती हैसियत का काय जेंव्हा दाखवणे अतिशय जरुरीचे असते तेंव्हा एकवेळ नायक बी ए पास नसला तरी चालेल किंवा त्याच्या साठी गाजर का हलवा पण नको पण श्रीमंती थाटाचे प्रतीक म्हणून पियानो हवाच.

तसा याही चित्रपटात पियानो आहे पण तो खानदानी घरात  नाही तर आहे क्लब मध्ये आणि त्याचा वापर नायक किंवा नायिका यांच्या पैकी कोणी नाही तर चक्क सहनायिकेने केला आहे .

 कथा साधीच प्रेम झाले लग्न झाले मग अडचण कसली तर लग्न सासूच्या मनाविरुद्ध . मंगळीक असणारी ( हे खानदानी घराण्याच्या गुरुजींनी सांगितलेले ) सून म्हणून नाराजी.

मग व्यवसायात जुन्या जाणत्या लोकांनी केलेली फसवणूक , घरात अशांती मग काय आता हि सारी दुःख बुडवायला नायक क्लब मध्ये येऊन एकटाच ढोसत बसलाय आणि त्याच वेळी तिथे त्याची बालपणीची मैत्रीण ( जिला आपले लग्न नायकाशी व्हावे असे वाटत असत पण झालेले नसत ) तिथे अचानक (अवतरते ) येते.

मग अरे ,"असा का बरे स्वतःचा सर्वनाश करून घेतो आहेस ?" असं काकुळतीने विचारते . नायक आपल्या दुःखाचे मीटर किती हाय आहे हे सांगण्यासाठी प्रथम पेग भरतो आणि  मी काय सांगू असे म्हणत  मग काहीतरी बोलतो .

आणि त्यानंतर आपला म्हणजेच प्रेक्षकांचा ताबा खय्याम यांचे संगीत , त्याची पत्नी जगजीत कौर यांचा स्वर आणि शब्द रचना  साहिर या त्रयींकडून घेतला जातो.

या गाण्याचे सादरीकरण देखील इतके सुंदर केले आहे कि , सर्वसाधारण कथानक आणि दुःख व्यक्त करण्याचा पारंपरिक पद्धतीनुसार नायक त्याचे दुःख शब्दशः रिचवत  असूनही कॅमेरा प्रथम (निवेदिता )सहानायिकेच्या  नाजूक बोटांच्या वर येत पियानो वादनातील सहजता दाखवतो आणि तिथून थेट नायकाला प्रथम पाठमोरे दाखवत गीत सुरु होते.

अर्थात त्याला कारण आहे साहिर.....  सहनायिकेचे मनोगत मांडताना ती गीतांमधून नायकास विनंती करते ती खूप वेगळी आहे, तिच्या प्रेमाची जाणीव नायकास देताना ती म्हणते -

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो  
तुम्हे ग़म की कसम इस दिल की वीरानी मुझे दे दो .... 

जसे जसे सहानायिका आपले मनोगत मांडत जाते तसे गीतातील जीवघेणी विनंती आपले लक्ष वेधून घेते.
याठिकाणी मनोगत सहनायिकेचे असले तरी शब्दांची ताकद साहिरजींची आहे,. प्रत्यक्ष जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या प्रेमाचे वेगळ्याप्रकारचे अमृतानुभव पाठीशी असलेल्या या तरल कवीने आपलेच म्हणणे या सहानायिकेच्या तोंडी उतरवले आहे असे वाटते.

 गीतातील प्रत्येक कडव्यामध्ये नायकाकडे मागणी करताना ती काय काय मागते आहे ते पाहिले कि आपण जेंव्हा एखाद्यावर तरल प्रेम करणारी व्यक्ती कशाची मागणी करेल याचा नेम नाही त्यामळे  सहनायिका नायकाकडे  त्याची परेशानी,विरानी ,हैरानी मागतेच पण पुढे जात जर तुला समाज सतावत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याचे काम ( पाहरेदारी )निगेबानी , आणि शेवटी जर काही चुकीचे केल्याचे शल्य असेल तर ते म्हणजेच पशेमानी याची पण मागणी करते. म्हणजेच या ठिकाणी हे शब्द फक्त यमक आणि ताल जुळवण्यासाठी आलेत असे वाटतच नाही धन्य तो साहिर ..
.
इतक्या सुंदर रचनेला दिलेले खय्यामजींचे संगीत तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल. हे गाणे त्यांनी पहाडी रागात बांधताना त्यांची हिमाचल आणि परिसर याच्याशी असलेली जवळीक सहज अधोरेखित केली आहे. एखाद्या उतुंग पर्वत रांगेत एखाद्या छोट्याश्या पठारावर एखादे शांत तळे आहे आणि एखाद्या निवांत संध्याकाळी त्या काठावर विचार मग्न अवस्थेत असताना त्या तळ्यात एखादा छोटासा दगड सहज भिरकावून दिल्यावर जसे तरंग उठतात तसे प्रत्येक कडव्यानंतर तिच्या भावना आपल्या मनात उतरतात असे वाटत राहते

या गीतासाठी त्यांनी निवडलेला आवाज इतका योग्य आहे कि पहाडी खर्ज आणि मार्दवता यांचा मिलाप असलेला हा आवाज त्यांच्या पत्नीचा आहे म्हणून नाही तर चपलख आहे म्हणून नितांत सुदर वाटतो आणि इतकी सुंदर रचना अशीच ऐकत राहावे असे वाटत असतानाच गीत संपून जाते मनात एक हुरहूर ठेवून
ती म्हणजे खरच सुंदर प्रेमाची प्रत्येक कहाणी अधुरीच असते का ?
ऐका एक  साहिर प्रेमाचे व्यक्त होणे -

No comments:

Post a Comment