यंदा एकूणच कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावर बर्फाची पांढरी शुभ्र शाल लपेटून थंडीने आपला मुक्काम ठेवलाच नाही असे वाटले. माहेरी खूप दिवस राहयचे असे ठरवून आलेली नव परिणीत वधु जसे लगेचच पुन्हा सासरी निघते, त्याप्रमाणे कडाक्याच्या थंडीने थोडा लवकरच काढता पाय घेतला. चैत्र पालवी हळूहळू उमलू लागली आणि त्याच बरोबर पुढील चार/सहा वीक एन्ड्सना काय काय करायचे याचे मनसुबे रचले जाऊ लागले. पण हा हवामानातील बदल आणि एप्रिल मध्येच थंडीचे एप्रिल फुल, यामुळे महिन्याच्या उत्तरार्धातील पहिलाच वीक एण्ड इतका आनंददायी ठरेल, याची आम्हा टोरोंटोवासियांना जराही कल्पना नव्हती.
मात्र काल सुरु झालेला वीक एण्ड अनपेक्षितपणे आम्ही आणि आमचा मित्र परिवार यांना आनंदाची पर्वणीच ठरला. त्याला कारणही तसेच घडले. भारतातून कॅनडाच्या झंजावती दौऱ्यावर असलेली नामवंत कलाकार त्रयी सर्वश्री मिलिंद तुळाणकर (जल तरंग वादक),पंडित रामदास पळसुले (तबला), डॉ.हरविंदर शर्मा (सतार) ह्या मंडळीनी आमच्या व आमच्या मित्र परिवारासाठी पूर्णतः घरगुती मैफिलीत सप्तसुरांची मेजवानी देऊन आम्हाला भरभरून त्यांच्या कलेचा आनंद दिला.
शुक्रवारी सायंकाळी आपापली आठवड्याची धावपळ संपवून, कार्यक्रमासाठीचे निमंत्रित सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत आमच्या घरी पोहचून, त्यातल्या त्यात मोक्याची जागा पकडून बसले. तिन्ही कलाकार वेळेवर आले होतेच, पण तरीही त्यांनी लांबवरून येणाऱ्या रसिकांसाठी थोडे थांबत, वेळेवर आलेल्या रसिकांबरोबर गप्पांची मैफिल सुरु केली.
कलाकार त्रयींनी पूर्वतयारी करता करताच ग्रीन रूम थीम सर्वांना खुली करून सांगितली. सतारीच्या तारा जुळवीत डॉ.हरविंदरशर्माजींनी रसिकांच्या मनाशी सहजच तार जुळवली. दुसऱ्या बाजूला मिलिंदजी यांनी भारत आणि भारताबाहेर दुर्मिळ होत चाललेले जलतरंग हे वाद्य कसे जुळवतात, प्रत्येक पाण्याची काचेची वाटी सप्तसूर छेडण्यात कशी सहभागी होते, वापरण्यात येणारे पाणी तसेच पाण्याच्या प्रतीमुळे सुरावर कसा परिणाम होतो, त्याची पातळी व त्यातून सूर छेडताना त्यावर केला जाणारा आघात यांचा परस्पर संबंध याची माहिती देत प्रात्यक्षिकही दाखविले. बाजूलाच तबल्याचा ठेका पकडताना पंडित रामदासजी पळसुले यांनी सहजच वाजवलेले तुकडे काळजाचा ठोका चुकवणारे होते.
यात गेलेला अर्धा तास थोड्या उशिराने येणाऱ्या रसिकांना लाभदायी ठरला. बघता बघता उपस्थिती चाळीसच्या वर पोहचली, आणि बरोबर आठच्या ठोक्याला प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरवात झाली. कालका, हरियाना येथील डॉ. हरविंदर शर्मा यांचा हात सहजतेने सतारीच्या तारा छेडू लागला. राग यमन वातावरणात भरून गेला. एक तालातील त्या सुरेल विलंबित आलापींना पंडित रामदासजींनी तालबद्ध साथ देत मैफिलीची सुरवातच एका वेगळ्याच उंचीवर नेली. मध्यलयीत बहरत गेलेल्या राग विस्ताराने ती प्रसन्न सायंकाळ सुरांनी भरून गेली. त्यानंतर हरविंदरजींनी हंसध्वनीचे मोहक सूर छेडले आणि उपस्थितांची मने अक्षरशः रोमांचित झाली. तब्बल चाळीस मिनिटांनी जेव्हा सतारीचे सूर थांबले तेव्हा कुणालाच ते थांबावेत असे वाटत नव्हते.
पण त्याठिकाणी पुन्हा हंसध्वनीचेच सूर मिलिंदजींनी जल तरंगावर छेडले. मध्य आणि द्रुत लयीत हंसध्वनी वाजवीत त्यांनी रसिकांच्या मनावर सुरांची बरसातच केली. त्या सुमारास बाहेरही हलका पाऊस सुरु झाला - जणू जलतरंगाचे सूर जसे ऐकणाऱ्यांना चिंब भिजवत होते तसेच निसर्गाशीही संवाद साधत होते! जलतरंगाच्या सुरांनी अंतरंगाचा ठावच घेतला. या टप्यावर कलाकारांच्या विश्रांती साठी मध्यंतर करण्यात आले. कारण रसिकांना थांबायचेच नव्हते.
दहाच मिनिटाच्या अल्पशा विश्रांती नंतर मैफिल सुरु झाली. या उत्तरार्धाची सुरुवात करताना प्रथम श्री. मिलिंद गोठोस्कर यांनी कलाकारांचा अल्पसा परिचय रसिकांना करून दिला. पंडित रामदासजी पळसुले हे तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य आहेत. श्री.मिलिंद तुळाणकर यांनी जलतरंग या दुर्मिळ होत चाललेल्या वाद्याचे प्राथमिक शिक्षण त्यांचे आजोबा आणि नामवंत जलतरंग वादक पंडित श्री.शंकर कान्हेरे यांच्याकडे घेतले आहे आणि आजच्या मैफिलीत वापरला गेलेला जलतरंगाचा हा संच म्हणजे त्यांच्या आजोबांच्या कडून हस्तांतरित झालेला सत्तर वर्षे जुना वारसा आहे. डॉ. हरविंदर शर्मा हे कालका येथील संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा भारताबाहेरील पहिलाच दौरा आहे आहे. तर पंडित रामदासजी आणि मिलिंदजी यांनी दुबई, श्रीलंका, ऑस्ट्रिया, फ्रान्स, स्विझर्लंड, जर्मनी ,न्यूझीलंड, अमेरिका इत्यादी देशांना भेटी देत जणू सुरमयी पृथ्वी प्रदक्षिणाच पार पडली आहे अशी माहिती देत रसिकांना आपण किती उच्च श्रेणीच्या कलाकारांच्या सहवासात आहोत याची साक्ष दिली. अर्थात पुढील कार्यक्रमाची रसिकांना असलेली ओढ लक्षात घेवून त्यांनी आपले ओघवते निवेदन पूर्ण केले.
आता मैफिल अंतिम चरणाकडे सरकू लागली होती. तिघांनी एकत्र येऊन राग किरवाणी मध्ये जुगलबंदी सदर केली.सुरुवातीला मिलिंदजींनी मूळ बंदिश गाऊन दाखवीत राग विस्तार केला. त्यानंतर रंगलेल्या जलतरंग आणि सतार जुगलबंदी मधील तिन्ही कलाकारांमधील परस्पर सामंजस्य इतके अप्रतिम होते कि, त्या सुरेल वळणावर रसिकांनी जणू सुरांच्या त्रिवेणी संगमात स्वतःस झोकून देत चिंब भिजून घेतले.
आणि या बरोबरच तब्बल अडीच तास रंगलेली मैफिल रसिकांचे कान आणि मन तृप्त करीत पूर्णत्वास जावून पोहचली.एकूणच काय तर मायभूमी पासून कोसो मैल दूर असून हि अस्सल भारतीय अभिजात संगीताचा ठेवा आमच्या समोर असा उलगडला गेला कि , या कलाकारांच्या ऋणात आम्ही कायमचे बांधले गेलो.
No comments:
Post a Comment