Monday, February 19, 2018
मला समजलेले तुकाराम
नुकताच माझा वाढदिवस झाला , किती जगलो ,किती वय झाले हे महत्वाचे, कि कसा जगलो ते महत्वाचे,असा विचार मनात आला . म्हणजे आता वय झाले असे नाही तर आपण नक्की काय साधले ? काय मिळवले ? असा स्वतःला प्रश्न विचारला .
मग गेल्या अनेक वाढदिवसांच्या निमित्ताने आलेल्या भेटवस्तूंची पाहणी केली , आणि त्यातील एका पुस्तकरूपी भेटीपाशी मन थबकले , कारण माझ्या एका सहकारी मित्राने मला माझा वाढदिवस होता आणि मी माझी पी. एचडी पूर्ण केली म्हणून भेट दिली होती , ते पुस्तक म्हणजे संत तुकाराम यांचे - ' अभंगाचा गाथा '
अर्थात गेले अनेक दिवस ते पुस्तक वाचावयास घेणे राहून जात होते, कारण ते पुस्तक हातात घेतले कि, मला माझ्या त्या मित्राची आठवण येते आणि आज तो या जगात नसल्याने मन त्याच्या आठवणींनी विचलित होते. पण नंतर जेंव्हा या पुस्तकाचे वाचन सुरु केले तेंव्हा बुवांच्या अफाट बुद्धिमत्तेने स्तंभित झालो .
गाथेतील अभंग वाचताना मन नतमस्तक होते. संत परंपरेतील प्रत्येक संत महानच आहेत पण विठ्ठल रुपी प्रबोधनाच्या मंदिर उभारणीतील या संतांचा सहभाग सातत्याने अधोरेखित होतो. आणि ' ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस । ' या वाक्याची प्रचिती पदोपदी येते .
संत तुकारामांनी भागवत धर्म आणि विठ्ठल भक्ती यातून समाज प्रबोधन करताना जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे . आणि या समाज परिवर्तनाच्या कार्याची अफाट ताकद जेंव्हा त्यावेळच्या तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या लक्षात आली तेंव्हा त्यांनी तुकाराम महाराज यांच्या या कार्यास विरोध केला . त्यातून त्यांनी त्यांच्या हस्तलिखित प्रति इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या .
तेंव्हा त्या डोहात त्या हस्तलिखित प्रति बुडाल्या, पण महाराजांनी प्रबोधनातून केलेला जनमानसावरील ठसा कधीच पुसता आला नाही त्यामुळे गाथेतील संदेश कायमचा टिकून राहिला .अशा या अभंगांमधील काही निवडक काही परिचित काही अपरिचित अभंगांचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे . म्हणूनच या लेख मालेचे शीर्षक आहे - मला समजलेले तुकाराम .
प्रत्यक्ष गाथा वाचन आणि अभंगांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सुरु करण्या पूर्वी , या घटनेच्या इतिहासाचा मागोवा घेताना अचानक मनात पुढील ओळी आल्या -
बुडविली गाथा डोही । इंद्रायणीस भार नाही ।
दुभंगली पाने शाई। प्रत्येक मनी आक्रोश राही ।।१।।
दांभिक पंडित चेकाळले । बुवा मनी थरारले ।
घातले विठुरायास साकडे । गाथा आली तुजकडे ।।२।।
विठ्ठल मनी आठवता । गाथाच झाली सरिता ।
गाथा स्थिरावली डोही । अभंग झाले प्रवाही ।।३।।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment