Wednesday, February 28, 2018
मला समजलेले तुकाराम -२
संत तुकाराम म्हटले कि भागवत धर्म आणि त्यांनी केलेला लोकजागर या दोन गोष्टी आपण विसरूच शकत नाही . पंढरीचा विठुराया हे जनसामान्यांचे आराध्य दैवत आहे ,आणि जनजागृतीसाठी विठलचरणी लिन होण्यासारखे प्रभावी साधन नाही याची जाण तुकाराम महाराजांना पुरेपूर होती . मात्र या विठ्ठल भक्तीचा त्यांनी जनजागृतीसाठी वापर केला असे न म्हणता मी म्हणेन कि त्यांनी लोकांच्या विठ्ठल भक्तीचा आदर केला .
विठ्ठल महात्म्य जनसामान्यांना समजावण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक अभंगाबाबत आपण अभ्यास करू शकतो.. पण तुकारामांनी आपले विठ्ठलाशी असलेले नाते समजावून सांगताना विठ्ठलास इतक्या विविध रूपात पहिले आहे कि , तुकाराम आणि विठ्ठल यांना आपण वेगळे करूच शकत नाही .
त्यांच्या एका रचनेत ते म्हणतात -
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी !विठ्ठल तोंडी उच्चारा !!१!!
विठ्ठल अवघ्या भांडवला ! विठ्ठल बोला विठ्ठल !! ध्रु !!
विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद विठ्ठल !! २!!
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा ! तुकया मुखा विठ्ठल !! ३!!
याठिकाणी टाळातील लय त्यांना विठ्ठलात दिसते, आणि दिंडीतील भान हरपून समरसणे त्यांना अचूक टिपता येते . वारीतील सहभाग त्यांना अशारीरिक पातळीवर अभिप्रेत असावा असे मला वाटते. म्हणून तोंडी विठोबाचे नाव असावे असे सांगता सांगता त्यांनी विठ्ठल भक्तीची पुढची पायरी नाद पार करून तुम्ही
या भक्तीच्या छंदात रममाण होण्याचा सल्ला ते सहजतेने देतात.
कधीकधी एखादे लहान मुल भवताल विसरून जेंव्हा स्वतः मध्ये रममाण होते आणि आपलेच भान विसरून जाते आणि त्याच्या त्या कृतीला त्या बाळाची आई सहजतेने म्हणते ,"नादिष्ट आहे अगदी ! " तो नाद तुकोबांना विठ्ठल भक्तीत हवा आहे . आणि वाढत्या वयानंतर माणसाला आपल्या उपजीविकेच्या पलीकडे कुठेतरी स्वानंद देणाऱ्या आणि समाजप्रिय कार्यात गुंतवून घेण्याच्या वृत्तीस छंद म्हणवून घेता आले पाहिजे असे काहीतरी तुकोबांना वाटले आणि म्हणून त्यांनी -विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद विठ्ठल ! असे सांगितले असावे असे वाटत राहते.
कारण शेवटी जगण्याच्या धडपडीत सुख आणि दुःख हे व्यक्तिसापेक्ष आणि बदलते असले तरी ते प्रत्येकास अनुभवावे लागतेच . मात्र हा जीवनानुभव घेताना त्यास सामोरे जाताना तुमच्या जगण्यात सहजता यावी म्हणून विठ्ठलाचे स्मरण ठेवा हे सांगताना आधी केले मग सांगितले या तत्वा नुसार या रचणे सांगता करताना तुकोबा म्हणतात - तुकया मुखा विठ्ठल !! ३!!
म्हणजेच तुम्हाला कोणी नादिष्ट कोणी छंदिष्ट म्हटले तरी स्वानंद घेण्यासाठी समाजहित साधने हीच खरी साधना हाच अर्थ मला या रचनेत दिसला .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment