संत तुकाराम यांनी भागवत धर्म आणि त्याचे आचरण यांचे महत्व सांगताना, सामान्य वारकरी सतत डोळ्यासमोर ठेवला होता. आणि नामस्मरण, एकाग्र चित्त याद्वारे आपला दिनक्रम पार पडताना विठ्ठल भक्तीतून सरळ मार्गी जीवन आणि त्यामुळे मिळणारे सात्विक समाधान याचे महत्व सातत्याने नमूद केले आहे . त्यामुळे आपल्यात विठ्ठल किंवा विठ्ठल भक्त्तीत आपण कसे मग्न झाले पाहिजे हे सांगताना ते म्हणतात -
विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती । विठ्ठल विश्रांती भोग जया ।।१।।
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनी । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ।।ध्रु ।।
विठ्ठल जागृतीस्वप्नी सुषुप्ति । आन दुजे नेणती विठ्ठलेंविण ।।२।।
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरा ।।३।।
तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुरालें दुजेपणें ।।४।।
या अभंग रचनेतून आपण ज्याची भक्त्ती करतो तो ईश्वर चराचरात आहे हा मुद्दा पटवून देण्यासाठी जणू त्यांनी ठायी ठायी विठ्ठलाचे भान ठेवा असा आग्रहाचा सल्ला दिला आहे .त्याचे स्मरण गाण्यात असुदे ,मनात असुदे , आयुष्याचा उपभोग घेताना विठ्ठलाची आठवण विसावा घेताना राहूदे .
उठता बसता ,झोपेत जागेपणी खाता पिता या सर्व जाणिवेच्या क्रिया करताना विठ्ठल आठवा हे ते सांगतात . पण त्या पलीकडे जाऊन नेणिवेत देखील विठ्ठल हवाच हे सांगताना त्यांनी सुषुप्ती या शब्दाचा केलेला वापर खरोखर स्तंभित करणारा आहे .
कारण सुषुप्ती या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ संपूर्ण निसर्ग रचने आत्मभान ठेवत जाणीव जपणारी परिपूर्ण अवस्था असा आहे तर या अवस्थेत देखील त्याची आठवण ठेवणे म्हणजेच जाणिवेतून नेणिवेकडे जाणे आहे हे त्यांनी समजावून दिले आहे .
माणूस जसा आभूषणे अलंकार यांनी नटला कि सुखावतो तसे तुम्ही विठ्ठल भक्तीत भरून जाता . आणि या विठ्ठल भक्त्तीचे असामान्यत्व अधोरेखित करताना ते म्हणतात , अशी मनपूर्वक जे त्याचे स्मरण ठेवतात ते माझ्या साठी विठ्ठलच आहेत . आणि दुसऱ्या कोणत्या विठ्ठलाची आस उरलीच नाही .
अर्थात हे मला भावलेले मी आपणासमोर मांडले , आणि हेच माझे तुकोबाच्या नजरेतील विठ्ठल दर्शन आहे .
No comments:
Post a Comment