संत तुकारामांच्या कालखंडाचा विचार केला तर उच्च नीच , ब्राह्मण ब्राह्मणेतर , या गोष्टी किंवा बलुतेदारी पद्धतीचा पगडा असणारा कालखंड . त्यामुळे धर्मपरायणतेच्या नावाखाली विधी, संस्कार याचे स्तोम कुलधर्म कुळाचार यांचे अवाजवी महत्व असणारा असा तो काळ होता.
त्यामुळे भक्ती मार्गात येणाऱ्या अडचणी व त्यांचा सर्व सामान्यांना होणार उपसर्ग याबाबत तुकाराम महाराज सर्व परिस्थिती जाणून होते . या अनंत अडचणींवर मात करीत विठ्ठल भक्ती करताना तुकोबा म्हणतात -
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ।।१।।
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारुं ।उरतील पारू भवनदीचा ।।ध्रु ।।
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ।।२।।
विठ्ठल हे जन विठ्ठल माझे मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ।।३।।
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरीत गांवा जाइन त्याच्या ।।४।।
जर या रचनेकडे आपण काळजीपूर्वक बघितले तर असे लक्षात येते कि , भक्तिसारखी एखादी गोष्ट मनापासुन करताना ती विधिवत षोडोपचार पद्धतीने पूर्ण करणे प्रत्येकास जरी शक्य नसले तरी ती गोष्ट जीवा भावाची मानून करणे जरुरीचे आहे.म्हणजे कुळाचार कुळधर्म यांचे अवडंबर न करता देखील विठ्ठल भक्तीत रममाण होता येईल. खरेतर अवडंबराची गरज नसते आणि खरी भक्ती मनःशांती देते हेच तुकोबा नमूद करतात.
जेंव्हा महाराज अशा सहज सोप्या दाखल्यातून जनसामान्यांना भक्ती आणि नीती यांचे नाते दृढ करून सांगत तेंव्हा समाजातील दांभिक त्यांच्यावर सातत्याने टीकेचा भडीमार करत असत , त्याबाबत त्यांना गुरु नाही स्वतःला शहाणे समजणारे असा टीकेचा सूर असे . घरी लक्ष देत नाही म्हणून धर्मपत्नी इतर नातलग यांची नाराजी असे . तर समाजातील उच्च पदस्थ ते जनरीत पाळत नाहीत या कारणास्तव त्यांना सत्याने घालून पडून जिव्हारी लागेल अशी टीका करीत
या सर्वच परिस्थितीत नाउमेद न होता या टीकेला उत्तर देताना या सर्वावर माझी माउली आणि तिची भक्ती हाच सर्वोत्तम तोडगा आहे हे सांगताना त्यांनी -
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारुं ।उरतील पारू भवनदीचा ।।ध्रु ।।
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ।।२।।
विठ्ठल हे जन विठ्ठल माझे मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ।।३।।
इतक्या सहज सोप्या शब्दात टीकाकारांना निरुत्तर केले आणि भक्तांना प्रोत्साहित केले आहे आणि या रचने शेवट करताना -
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरीत गांवा जाइन त्याच्या ।।४।।
या शब्दात त्यांचे विसाव्याचे ठिकाण देखील विठ्ठलच आहे आणि माझे सर्वस्व पणाला लावून त्याच्या प्राप्तीसाठी मी धडपडत राहीन हेच सांगितले आहे.
विठ्ठल हाच त्यांच्या समाज प्रबोधनातील गुरु कसा होता याचेच प्रत्यन्तर आपणास या रचनेतून मिळते असे मला वाटते
No comments:
Post a Comment