नवे वर्ष ,नवा दिवस, नवे संकल्प .... हे तर सारे नेहमीचेच पण तरीही एक अनामिक हुरहूर का ? आणि ती कसली याचा उलगडाच होत नाही अशी वेगळीच मनःस्थिती का ?
अर्थात लगेचच अनेकांच्या मनात पहिला विचार आला असेल ,कालची उतरली नसेल त्यामुळे असले काहीतरी लिहीत बसलाय . पण कालचे आमचे नव वर्ष स्वागत तिच्या एका थेंबाला स्पर्श न करता केले होते. मग आज विचारांच्या या साखळीत मन का गुंतून गेले ?
३१ डिसेंबर मागे पडला आणि , किती वेगाने दिवस संपतात ?कुठे होतो कुठे आलो ? आज पर्यंतच्या जीवनात काय कमावले काय गमावले ? नातेसंबंध आणि संबंधातील नाती त्यांचे गुंते या सारख्या प्रश्नांच्या जंजाळात मन भरकटत गेले.
मागे वळून पाहताना काळाचा संदर्भ देखील संदर्भहीन वाटावा इतक्या वेगाने मन गत आठवणींना स्पर्श करून आले. त्यावेळची काही नात्याची ओढ आणि आज त्यामुळे होणारी ओढाताण याची सरमिसळ इतक्या वेगाने झाली कि हा मानसिक आंदोलनाचा रोलर कोस्टर आहे का गत जीवनाच्या कॅनव्हास वरील चित्रातील शून्यमनस्कता आहे याचा उलगडाच झाला नाही.
सगळं कस अबस्ट्रॅक्ट चित्रासारखे - चित्रातील गुंता खरा का गुंत्यातीळ चित्र खरे ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे हेच नव वर्षाचे ध्येय असे ठरवूनच आता थांबावे हेच बरे ....
No comments:
Post a Comment