Tuesday, January 17, 2012

प्राक्तनाचे नशीब

एका भरकटलेल्या सायंकाळी,माझी फरफट चालली होती 
काट्या कुट्यातून धावणारी,वाकडी वाट संपत नव्हती 
अचानक समोरच्या वळणावर,मन जरासे रेंगाळले,
आणि तिथेच माझ्या प्राक्तनाला,आज अचानक नशीब भेटले,
पाहून त्याला प्राक्तन बोलले  
"चाललो होतो  मी नाकासमोर ,तर का तू असा उभा ठाकला?
आता, आलाच आहेस आडवा तर किमान मला साथ दे.
येणाऱ्या अडचणींवर तूच आता मात दे"
थकून भागून वाटेवर, मन जरासे  विसावले  होते   
तर डोळा चुकवून झोपेतच, स्वप्नांनी मला गाठले होते 
आनंदाच्या महासागरात चिंब मला भिजवले होते 
जाग येताच मला समजले, जगणे हेच स्वप्न होते 
रस्ता नव्हता संपलेला,चालणे माझेच  थांबले होते 
ऐकून सारे त्याचे म्हणणे, नशीब  माझे झाले बोलते 
नको धरूस माझी अपेक्षा, उगाच होत राहील उपेक्षा  
आहेस तू धट्टा कट्टा मी कशाला करू थट्टा
माझे आहे एकच सांगणे 
असाच तू चाललास तरच  होईल नवी पायवाट 
चालून चालून खाशील खस्ता, 
पण बाकीच्यांना सापडेल रस्ता 
ऐकून त्याचे म्हणणे तसाच पुढे जात राहिलो 
सरली रात्र झाली पहाट
प्रातःकालच्या किरणांनी उजळली माझी वहिवाट 


2 comments:

  1. सौ. गीतांजली शेलार - आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

    ReplyDelete