आज अचानक माझे एक मित्र श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी 'सहज सप्रेम' म्हणून भेट दिलेले,
थोर रचनाकार श्रेष्ठ कवी गुलजार यांचे त्रिवेणी हे पुस्तक हाती आले.
दहा वर्षांपूर्वी वाचून हातावेगळे केलेले हे पुस्तक,आज गतस्मृतींना उजाळा देवून गेले.
पुस्तकात गुलजार यांच्या रचनांचा भावानुवाद कवियत्री शांता ज. शेळके यांनी केलेला आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या या प्रकाशनाच्या मलपृष्ठावर -
'त्रिवेणी' हा गुलजारांनीच निर्माण केलेला कवितेचा नवा आकृतिबंध.
कोणत्याही भारतीय भाषांतील कवितेत हा रचनाबंध नाही.
हि त्यांची कवितेला देणगीच ! या अल्पाक्षरी कवितेत
पहिल्या दोन कवितापंक्तींचाच गंगायमुनेप्रमाणे संगम होऊन कविता पूर्ण होते.
मात्र या दोन प्रवाहाखालून जी सरस्वती गुप्तपणे वाहते,
ती ते अधोरेखित करतात, तिसऱ्या काव्यपंक्तीने.
गुलजरांच्या कवितेतून प्रामुख्याने भिडते ती त्यांच्या अंतरातील 'खामोशी'.
या 'खामोशी'च अंगभूत सामर्थ्य असं,
की ती त्यांच्या अनुभूतींतूनच पुर्णत्वानं व्यक्त होते:
त्यांची कविता यामुळेच मिताक्षरी व तरल आहे.
कधी प्रिय व्यक्तीच्या हरवण्यानं व्याकूळ असते, तर कधी
सामाजिक विसंगतींची खंत करते.
सोबत असतं समृद्ध आकलनातून येणारं भाष्य आणि
जगण्यातलं निखळ सत्य !
याप्रमाणे छापलेला परिच्छेद पुस्तकात डोकावण्यास आपल्याला उद्रूक्त करतो.
मीही असेच या पुस्तकात सहज म्हणून डोकावले खरे, पण केंव्हा त्यात बुडून गेलो हे माझे मलाच कळले नाही.
“एक शब्द नको बोलूस”,म्हणत ती फिरली माघारी.
तेंव्हाच त्याने केली आपल्या प्रपंचाची तयारी
आजही तो गप्पच असतो, कारण त्याला आवाजच नसतो.
..................................................
मला यावर काहीच नाही बोलायचे
तूच ठरव आता पुढे कसे वागायचे
ऐकता त्याचा त्रागा, तिने नक्की केले लग्नाचे.
.................................................
तो म्हणाला तिला " नको पाहूस कधीच वाट माझी,
आहेत आता तुझे माझे मार्ग वेगळे "
तेंव्हा ओठी तिच्या शब्द आले, "सुरु होण्या आधीच का संपले सगळे "
.......................................
तिच्या गालीचा रक्तिमा सांडला क्षितिजावर
थकून भागून परतणारा 'मित्र'थबकला वाटेवर
पाहून रूप तिचे तोच लपला ढगाआड,फांदीवरून झेपावले एक पाखरू उनाड.
............................................
आज पुन्हा पाऊल वळले त्या नेहमीच्या वळणावर
वाट पहात उभी ती पलीकडच्या किनाऱ्यावर
रस्ता त्याचा तोच होता, पण मधला पूल कोसळला होता.
................................................
उचलत प्याला तो बोलला, मी नेहमीच नाही घेत काही,
विसरण्या तिला याहुन सुंदर पर्याय नाही
रिचवून पहिला पेला, आठवणीत तिच्या तो बुडून गेला.
...............................................
सांजवेळी नेहमीचा रस्ता झाला धूसर
परतणाऱ्या पाखरांनी केले त्याला कातर
परतीच्या पाऊलखुणा दिसतात का याची खात्री कर फारतर.
......................................
मित्रहो,
आपण कवी गुलजार यांचा हा थोडा हटके असलेला आकृती बंध जरूर वाचा.
कवी गुलजार आणि त्यांचा रचनांचा भावानुवाद करणाऱ्या कवियत्री शांता ज. शेळके यांना,
विनम्र अभिवादन करून माझा हा प्रयत्न आपणास आवडेल अशी आशा करतो..
No comments:
Post a Comment