दिशाच तिची दिशा हरवते,
रस्ता आपली वाट चुकतो,
ऊनच भरकटून घामाघूम होते,
अन विसाव्यासाठी सावलीत शिरते.
कधी कधी काय होते....
पाऊस भिजून चिंब होतो.
थंडीच गारठून काकडू लागते,
अन उब शोधत शेकोटीत शिरते
कधी कधी काय होते ...
पुस्तक गोष्ट वाचत बसते.
कथेमध्ये गुंतून जाते,
वाचता वाचता डोळ्यामध्ये झोप येते,
अन गोष्टच वाचायची राहून जाते.
कधी कधी काय होते ...
आवाजाचे बोलणे बंद होते,
भूकेचेच पोट भरते,
अश्रुंनाच रडू येते,
अन मनाचे मन भरून येते
कधी कधी काय होते.....
गालावरची खळी रुसते,
शहाऱ्याचे अंग शहारते
जखमच जखमी होते,
नजरच आंधळी होते
हे असे का होते
आठवणच विसरून जाते,
आठवणीला आठवण होते
तिला विसरायचेच विसरून जाते
No comments:
Post a Comment