आज काय करावे सुचत नाही. वाचायला पुस्तक घेतले तर डोळे नुसतेच अक्षरावरून फिरतात. शब्द दिसतो पण शब्दार्थ हरवतो. टी. व्ही. लावला तर मनासारखा कार्यक्रम नसतो. काहीच न करता शांतपणे बसावे तर आपण शहरी गोंगाटाचे केंद्रस्थानी आहोत याची पुरती जाणीव कर्णेन्द्रीये देतात. आणि मन आणि शरीर हतबुद्ध होते. असा अनुभव आपण कधीतरी घेतलाच असेल. हि सैर भैर मनस्थिती पटकन जात नाही आणि बघणाऱ्याला वाटत असते. काय हा वेडा, जणू काही सुख दुखतेय.कोणी काही म्हणो पण कधी कधी माझी हि अवस्था होते हे मात्र खरे. आजही माझे मन असे अस्वस्थ झाले कि मी मागे जातो आणि अशा मनस्थिती तून बाहेर येण्यासाठी जुने पण निसर्गाने दिलेले शिंपल्यातील मोती उघडून पाहतो.आज ते शिंपले तुमच्यासाठी उघडून त्या अनुभवाची अनुभूती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मला आठवतेय १९९४ सालची दिवाळी. त्यावर्षी माझे सासरे श्री. विनायक भा.देव यांचे नुकतेच निधन झाले होते. घरी दिवाळी करणार नव्हतोच. म्हणून दिवाळीचे पहिल्याच दिवशी पुण्यातून बाहेर पडलो. आणि वाई मार्गे पुढे धोम धरणाच्या बाजूस एक जोर नावाचे एक नितांत सुंदर खेडे आहे तिथे एक आश्रम होता तिथे गेलो. रस्त्या पासून थोडे आत एका छोट्या डोंगर उतारावर लहानसे पठार तेथे ते चौसोपी कौलारू घर पुढे स्वच्छ सोपा असा तो नेटका आश्रम होतो. कसलेही विशिष्ठ नियम कि उपासना असे न करता फक्त निसर्गात राहा, मनस्वास्थ जपा एवढेच सांगणे असणारा तो एक नैसर्गिक ठेवा होता. त्याठिकाणी दुपारी २.३० वाजता आम्ही पोहचलो. तिथल्या शेतातील ताजी भेंडीची भाजी आणि भाकरी असे जेवण घेतले. वातावरणामुळे म्हणा किंवा मनस्थितीमुळे म्हणा पण त्या चवीची भेंडी पुन्हा कधी खाल्ली नाही.जेवणानंतर समोरचा डोंगर चढून शब्दशः कडेकपारीतून फिरलो. सुमारे ३ तासाचे भटकंती नंतर परत आलो. पुन्हा एकदा सपाटून लागलेली भूक साध्याशा मेनुने शमवली. आणि आश्रमा समोरच्या स्वच्छ अंगणात सतरंज्या टाकून निवांत गप्पा हा एक कलमी कार्यक्रम सुरु केला. दोन तास मजेत गेले आणि त्यानंतर त्याच बैठकीवर आडवे झालो.त्यावेळी माझी नजर आकाशाकडे गेली आणि समोरच्या दृश्याने मी अक्षरशः रोमांचित झालो. मुळात तो आश्रम दोन उंच डोंगरांच्या मधल्या छोट्या डोंगरावर होता. संपूर्ण परिसरात कोणताही कृत्रिम उजेड नाही.
दिवाळीची पहिली रात्र म्हणजे आमवस्या. त्यामुळे ब्रह्मदेवाची संस्कार भारती- रांगोळी आसमंतात रेखाटली होती. निरव शांतता, टिपूर चांदण्याचा ओसंडून वाहणारा उजेड मंद अल्हाददायक अशी थंडी, खरेतर त्या क्षणाचे वर्णन करताना आज देखील रोमांच उभे राहतात.अवकाश, विश्व, आकाशगंगा टिपूर चांदणे यांची ओढ कोणास नसते. त्याची मोहक वर्णने मी त्या दिवसापर्यंत फक्त वाचली होती पण त्या दिवशी ती अनुभवली. मग त्या अनोख्या रांगोळीतील ठिपके व परिचित अकार शोधण्याची आमची धडपड सुरु झाली. आमचे ते सगळे अप्रूप बघून तेथील स्थानिक शेतकरी जवळ आला आणि म्हणाला, "पावण, अजून एक दोन तास थांबा, अन मग बघा तारे कसे तुटतात ते" प्रथम काही उलगडा होईना पण इतक्यात एक उल्का कोसळताना त्याच्या सह आम्ही सर्वांनी पहिली आणि तो म्हणाला,"ते बघा,आता तारे कसे तुटतात ते." आणि उत्तररात्री चांदणे, ताऱ्यांचा लुकलुकाट , नाही खरे तर लखलखाट आणि उल्कापात असा त्रिवेणी सोहळाच आम्ही अनुभवला.
घरी, कृत्रिम उजेड आणि गर्दी यातून बाहेर पडून त्या दिवाळीला आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि देवाने आम्हाला देव दिवाळीचाच अनुभव दिला. आज इतक्या वर्षांनतर देखील दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी मनात स्मरते ती निरव शांतातेतील निसर्ग दिवाळी. म्हणूनच आपणा सर्वांना एकच सांगणे आहे, जर कधी मनस्थिती बिघडली तर अशावेळी काय करावे तर उठून निसर्गाचे जवळ जावे तो तुम्हाला सगळ्या पलीकडे नेवून सोडतो.
No comments:
Post a Comment