Showing posts with label कविता.. Show all posts
Showing posts with label कविता.. Show all posts

Thursday, April 26, 2012

गुलमोहर


चैत्र सरला, वैशाखाचा वणवा फुलला 
वाटेवरचा 'तो' गुलमोहर 
'तिला' पाहुनी थोडा डोलला, आतून हलला 
सळसळ त्याची वादळी भासली,
तळमळ त्याची तिजला दिसली

एक फांदी किंचित कलली 
झुकून  तिच्या  कानी गुजली
" कोणा वाटेल बहर 
कोणी वदेल आरक्त 
डोळ्यातून सांडतेय माझ्या 
मलाच जाळणारे माझेच रक्त "

त्यावर 'ती' 'त्याला' वदली 
" किती रे तू मनी तडफडशी
आक्रंदित तू का धडपडशी  
रणरणत्या या भर दुपारी 
कोणता सल ठेवलायस उरी "

प्रश्नाने तो मनी चुटपुटला 
पानगळी सम सहजच बोलला,
" राहू दे मजला असेच जळत 
स्पर्शाने तुझ्या कोसळेन नकळत "

त्यावर 'ती''त्याला' वदली 
" आलेय  मी झुळूक बनून 
फुंकर घालीन तुझीच होऊन
 सांडल्यात तुझ्या पाकळ्या थोड्या 
मजसाठी आहेत त्या पायघड्या
सप्तपदीचे फेर गुंफिन  
सळसळीवर ताल धरीन 
वैशाखाचा शिशिर करीन "

ऐकून तिची ती कुजबुज 
मनोमनी तो गेला वरमून 
सळसळ देखील झाली निशब्द 
माथ्यावरची उन्हे हि स्तब्ध

अजूनही जेंव्हा वैशाख येतो 
वादळ वारा झुळूक बनतो 
वाटेवरचा 'तोगुलमोहर 
फक्त ' तिचीच तर वाट पाहतो 




Sunday, February 19, 2012

कविता माझीच.

लिहीन म्हटले,माझ्यावरती मीच कविता 
शब्द नाचले पुढ्यात माझ्या,अर्थहीन मी दमलो पुरता 

बोलू भोगावर कि उपभोगावर,सांगू सत्य कि मांडू वंचना 
कसे सोडवू कोडे माझे,हीच मज पडली विवंचना 

जखमेवरची हालली खपली,घाव बसता मम वर्मावर 
दिसला नाही ओघळ कोणा,काय लिहू मी मम कर्मावर 

नव्हते मजला कधी धिक्कारले , पण नव्हते तसे कधी अव्हेरले 
मूक संवादाचे अर्थ तिच्या त्या, नाही का मज तेंव्हाच गवसले 

आजही स्मरते,तिच्या सहवासातील प्रत्येक क्षण होता आश्वासक 
नाही उमगले मर्म मज त्यातील,आज म्हणून मी आक्रंदतो नाहक 

लिहीन म्हणतो कविता माझी, दखल घेण्या मम सत्वाची 
ठणकता व्रण मम जखमेचा, राही मूर्त उभी तिज अस्तीवाची 

Thursday, April 21, 2011

झिंगलेला साप .......

वारुळातून आला साप,चालू लागला सरळ
मधेच त्याने थांबून,टाकली थोडी गरळ
पाहून त्याची चाल जो तो गाली हसतो
बघून त्याची थेर, वयस्कर साप पुटपुटतो...
वेळ काळाचे भान नाही याला, केंव्हाही हा लावतो.

झिंगून सरळ चालल्यावर सारेजण हसणारच
घ्यावी इतकी थोडीच कि चाल राहावी वळणदार
वाढले जरी उन तरी, आतून वाटेल गार गार.

थोडा वेळ सरळ चालून,साप आला भानावर
फार नव्हती चढली,म्हणत डोलू लागला वाऱ्यावर
ते पाहून आजोबा सापांनी फुत्कारले त्याला ...
खूप झाला तमाशा,आता वारुळात जावून डोला

हो हो निघालोच म्हणत,पुन्हा सरळ गेला वारुळात
पाहून त्याची सरळ चाल सापिण बाईच्या डोळा पाणी
कधी संपणार वनवास म्हणत, उगारली तिने फुंकणी

पाहून तो अवतार,पुरेपूर उतरली सापाची
कात टाकीत तिला म्हणाला ,यापुढे पिईन फक्त विदेशी छापाची

Friday, April 8, 2011

माझ्यासाठी नव निर्मिती.....

आज बसलो लिहायला कविता, लेखणीत भरली ठासून शाई
जुळवण्यासाठी यमक, कानामात्रे शोधताना,वेलांटीच उलटी होई

आठवेनात नवीन शब्द,सुचेनात विचार
अकार उकार हवेत कोणाला,नुसतेच मारू रफार

मग पुन्हा पुन्हा उचलले,भोवतीचे कागदांचे बोळे
कडव्याच्या जुळवा जुळवी साठी ,फिरवले त्यावरून डोळे

ताल  नाही, सूर नाही, नाहीत अलंकार,अनुप्रास
त्यासाठी सुचावे लागते,आतून विनासायास

आडातच काही नाही,तर येईल कसे पोहऱ्यात
छंद बद्ध झाली नाही,तरी मीच माझ्या तोऱ्यात

अशी हि माझी कविता,मीच पुन्हा पुन्हा वाचून पाही
माझ्यासाठी नव निर्मिती, बाकी म्हणती काहीच्या काही

Saturday, March 19, 2011

मज भेटला ईश्वर ...

कलता सूर्य डोंगरामागे, पाऊले चालती झपा झपा

ओढ घराची लागता, चढ वाटे सोपा सोपा
सरकली झाडामागे उन्हे,जशी ललाटीची बट
उतरली कातर सांज, जणू काजळीचा घट

दाटणाऱ्या अंधाराला, लूक लुकत पाही चांदणी .
पाऊले घराकडे धावती, पोर वाट पाही अंगणी.
क्षिताजापार उडाली पाखरे, सांडत चांदणे वाटेवर
कसे तुडवू याला म्हणत,वारा धावे सभोवार

वाजता पाउल झोपडीशी,झेपावले ते तान्हुले
चुली समोरुनी मंद हास्य,मनोमनी सुखावले
अन तिरपा कटाक्ष,सांडला डोळ्यातून
सरला दिवस कष्टाचा,फुलला भाकरीचा भास्कर
मी निरोप दिला काळजीला,
अन माझ्या लक्ष्मीत मज भेटला ईश्वर

Tuesday, February 22, 2011

काय घडते कशासाठी ?

फुल फुलते, गंधित होते,सुगंध त्याचा लुटण्यासाठी
भुंग्यांची मग होते धावपळ, त्यातला मध वेचण्यासाठी

नभातुनी सर बरसते, दाह धरतीचा शमवण्यासाठी
आमची नाहक धावपळ होते, मृदगंधाच्या वासासाठी

मीरा भजनी तल्लीन होते, शाम सुंदरा वरण्यासाठी
वेणूतुनी धून लहरते, बावऱ्या राधेस शाहरण्यासाठी

मीरा  आणि राधा वाहती, आपुले सर्वस्व जगदिशासाठी
कालचक्र पुढे सरकते, घाव जिव्हारी झेलण्यासाठी