Showing posts with label आठवणींची आंदोलने. Show all posts
Showing posts with label आठवणींची आंदोलने. Show all posts

Sunday, October 6, 2013

रिती ओंजळ !

झुळूक वाऱ्याची दुरुनी  अलवार आली
मनातील आठवणींची  तार झंकारली

जरी भेटलो होतो नुकताच तिला मी
वाटत राहते  जणू युगे युगेच लोटली

आज स्वप्नात येत तिने जागविले
डोळ्याची कड होती ओथंबली

वाटले वाट पाहील त्याच वळणावरी
म्हणुनी पावले आपोआप वळाली

पाठमोरी सहजच  जाता पुढे ती
माळलेला गजरा ओघळून गेली

परिमल त्या सुकलेल्या बकुळीचा
मनीचा परिसर गंधाळून गेली

कधी  गुंतलो कसे गुंफलो
या कोड्यातच मने आक्रंदली

तिचे घेवूनी  दान सर्वस्वाचे
ओंजळ माझी रितीच  राहिली

Thursday, April 26, 2012

गुलमोहर


चैत्र सरला, वैशाखाचा वणवा फुलला 
वाटेवरचा 'तो' गुलमोहर 
'तिला' पाहुनी थोडा डोलला, आतून हलला 
सळसळ त्याची वादळी भासली,
तळमळ त्याची तिजला दिसली

एक फांदी किंचित कलली 
झुकून  तिच्या  कानी गुजली
" कोणा वाटेल बहर 
कोणी वदेल आरक्त 
डोळ्यातून सांडतेय माझ्या 
मलाच जाळणारे माझेच रक्त "

त्यावर 'ती' 'त्याला' वदली 
" किती रे तू मनी तडफडशी
आक्रंदित तू का धडपडशी  
रणरणत्या या भर दुपारी 
कोणता सल ठेवलायस उरी "

प्रश्नाने तो मनी चुटपुटला 
पानगळी सम सहजच बोलला,
" राहू दे मजला असेच जळत 
स्पर्शाने तुझ्या कोसळेन नकळत "

त्यावर 'ती''त्याला' वदली 
" आलेय  मी झुळूक बनून 
फुंकर घालीन तुझीच होऊन
 सांडल्यात तुझ्या पाकळ्या थोड्या 
मजसाठी आहेत त्या पायघड्या
सप्तपदीचे फेर गुंफिन  
सळसळीवर ताल धरीन 
वैशाखाचा शिशिर करीन "

ऐकून तिची ती कुजबुज 
मनोमनी तो गेला वरमून 
सळसळ देखील झाली निशब्द 
माथ्यावरची उन्हे हि स्तब्ध

अजूनही जेंव्हा वैशाख येतो 
वादळ वारा झुळूक बनतो 
वाटेवरचा 'तोगुलमोहर 
फक्त ' तिचीच तर वाट पाहतो 




Tuesday, April 5, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले - डायरीच्या नोंदीतून. भाग आठ

डायरीतील नोंद -- असलेली
 श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या धर्मशाळेत मुक्काम. समोरील दोन्ही तळ्याची स्वच्छता वाटली नाही. शेवाळ्याने झाकून हिरवट. चुळ. एक प्रकारचा वास.पुढे उन पाण्याच्या झऱ्यावर स्नान,काल उपवास अतिशय थकवा.स्नानोत्तर ग्लानी जवळ श्री विठ्ठल रुखमाई च्या देवळात दर्शन व जवळ हॉटेल मध्ये लाडू. जेवणाची सोय ( साधे) नसल्याचे सांगितले.सावकाश बल्लाळेश्वर मंदिरात जावून साष्टांग नमस्कार व बंगालला जाण्यास आशीर्वाद मागितला. पुराणीकांच्या जेवणाची आयत्यावेळी सोय नाही. संन्यासी,अथिती, अभ्यागतांची देवस्थानातर्फे काही व्यवस्था होते किंवा नाही, याची चौकशी न करिता तेथल्या पेटीत मूलतः निवृत्तीची प्रेरणा होवून आलेले,रानटी वाघ माणसाळविता येत नाहीत अशा अर्थाचे व शक्यतो राम कृष्ण परम हंसाच्या मार्गाने जाण्याबाबतचे पत्र रवाना करून बाहेर. राइस प्लेट भागवत एक नमुना (धंदा करावयाचा तो कठोर वृत्तीने . भोजनगृह प्रोप्रायटर) दुपारी पुन्हा प्रवासास सुरवात.सुमारे पाच मैलावर मुक्काम. आजच्या यजमानाचा मोठा विलक्षण अनुभव आला. संध्याकाळ संपून निरव रात्रीला सुरवात.रस्त्यावरील एकमेव झोपडीत मी एक वाटसरू असून सोय होईल का?म्हणून विचारल्यावर माझ्याकडे ढुंकूनही न बघता आपल्याच उद्योगात मग्न असताना हुं केले.नंतर माझ्या जवळचे तांदूळ शिजवून द्याल का, त्यावर काय बुवा का? हो बुवाच म्हटल्यावर पातेल्यात भाताची हंडी चढवून त्याकडे मला पहावयास सांगून बुवा कसे? बायको मुले असता विरक्त वृत्तीचा त्याला भयंकर संताप येवून मी बरे केले नाही असी त्याची भावना.त्याला स्वतःला ९ मुले असून एक मँट्रिक गावातला कार्यकर्ता, कॉंग्रेसशी संबंधी शिव शंकराचा भक्त. त्याची प्रथम ओळखच आज होला मारून आणलाय या शब्दाने प्रांजळ मला निदान महिन्यातून एकदा बायको पाहिजे. मी थापड्या बुवा असून थापेबाजी चालणार नाही संपूर्ण नाव व पत्ता लिहून हि हकीगत पोलीस पाटलांना कळविणार आहे.बुवा होऊन देशाचे कल्याण म्हटल्यावर तुम्ही आणि देशाचे कल्याण करणार म्हणून, उपहासाने तुम्ही जेवून घ्या जेवल्यावर तुम्हाला बांधून घालतो, गडबड कराल तर कोयत्याशी गाठ आहे,अशा वातावरणात जेवणाची सुरवात झाली. माझी वृत्ती शांत होती. त्याला बिडी प्यायचीही सवय जेवतांना स्थिर वृत्ती.भात तुम्ही घेवू शकता. त्याने  आपली भाकरी कालवणासह आग्रहाने मला दिली.तिथे असलेली गावातली माणसे गेल्यावर एक कातकरी फरारी असून त्याला पकडण्याकरिता पोलीस फिरताहेत त्याला आश्रय मी देतो हि समजूत (गावकऱ्यांची )असून तुम्ही शांतपणे जेवा.तुम्ही शिव शंकरच आहात. परंतु मला वाटते तुमच्या डोक्यावर काहीतरी नक्की परिणाम झाला आहे.त्याकरिता तुमच्या कपाळावर डाग दिला पाहिजे. स्वतःला झालेली दुःखे व त्याकरिता त्याने हाता पायावर घेतलेले डाग पाहून,त्याच्या शूरत्वाचा प्रत्यय.जेवण झाल्यावर आता तुम्ही बाहेर अंगणात झोपा, अशी माझी रवानगी. अंगावर पांघरूण नाही.वरील वातावरणात हि मी येथेच झोपणार.गृहस्थाने त्याच्या वृत्तीत पालट होऊन एक पोते पांघरावयास दिले.नाथाच्या पोथीतल्या कथा ( बाळासाहेब) पोराला रसाळपणे सांगत होता.सकाळी निरोप घेतला. बंद दाराशी पोते ठेवले आभार मानले व विचारून निघालो.
-------------------x ------------------------
वार दिनांक खोपोलीच्या दिशेने उजाडण्या पूर्वी वाटचाल सुरु. सुमारे तेरा मैल चालल्यावर खाण्याची हालचाल. वाटेत कोयना पुनर्वसहातींची गावे. शिमडी, कारगाव . एके ठिकाणी मारुतीचे देऊळ . मुळ ठिकाणाहून त्यांनी श्रद्धेने आणला असला पाहिजे. जवळचे तांदूळ कुठे शिजवून मिळतील का?
अलीकडच्या गावच्या म्हातारीने सून बाहेर गेली आहे. पुढील गावी वस्ती आहे. पुढील गावी आई मला तांदूळ शिजवून मिळतील का?म्हणून विचारल्यावर तिने शेजारच्या म्हातारीकडे बोट दाखवले.२-५ जण भोवती जमा झाले. परंतु कोठे सोय होण्यासारखी दिसली नाही.प्रवास चालू शीळ फाट्याला रात्र. पूर्व इतिहास जेंव्हा घरावर जप्त्ती आली तेंव्हा आईने मला पोटाशी धरून " तुझा सांभाळ आता प्रत्यक्ष परमेश्वर करील" त्याची प्रचीती.राम कृष्णांना भावना नसतात त्यांना इतिहास ऐकावयाचा आहे हि भूमिका.
-------------------------- x --------------------------
वार दिनांक शीळ फाटा ते खोपोली. दैनंदिन संगीत भजनांची जोड देऊन खर्च भागवण्याची व रेल्वेने पुढील प्रवासाची कल्पना. खोपोली कर्जत (अंबरनाथला शहादे येथे न जाता) रेल्वेने प्रवास.कर्जतला मध्यान्हीच्या वेळी हेतू सांगून अथिती म्हणून आलो आहे. स्टेशन जवळच्या बंगल्यात शेट लोक झोपलेले आहेत असे उत्तर. दुसरीकडे वयस्क ब्राह्मणाकडे गेलो असता जात पोटशाखा चौकशी केली. देशस्थ यजुर्वेदी म्हटल्यावर मी तुम्हाला ५० पैसे देतो तुमची अपेक्षा काय? संग्रह नाही हे सूत्र सांगितले. पुढे तुम्ही येथील श्रीराम मेढी ५ लाखांची असामी आहे, दिलच अस काही मी सांगत नाही परंतु तुम्ही त्यांच्या कडे जावू शकता गाडी २.४५ थांबावयाचे नाही म्हणून मध्ये हॉटेलमध्ये खावून कल्याणकडे रवाना. कल्याणला हितगुज स्वतःची कुवत किती अदमास घे.जेवणाचे भान नाही स्टेशनवर खाऊन पाणी पिऊन वेटिंग रूम मध्ये झोप. बाकावरील जागा.पाय लागणे असे वादाचे विषय.छोटा मुलगा वय ८ते १० बाकावर झोपायचे नाही, असे पोलीस म्हणतात ,हि थाप देवून खाली झोपण्याची सूचना देई. हमाल हितसंबंधी असावा असे पाहटे दिसले.शहादे विठ्ठल मंदिरात जाऊन वेडावाकडा गाईन, परंतु तुझाच म्हणवीन अशी योजना. दक्षिणेश्वराचे ओढीने टाळली.निवांत जागी पुस्तकावरील विठ्ठलाला साक्षी ठेवून भजने म्हटली. (क्रमशः)
डायरीतील नोंद-मला समजलेली -- माणूस देव शोधण्याचे मागे धावतो. पण त्या मागे त्यागाची भावना ठेवत दिनक्रम आचरला,तर अनंत अडचणीत देखिल मार्ग सापडतो. आणि मला वाटतेय कि पाली पासून कर्जत पर्यंतच्या प्रवासातील अनुभव याचीच साक्ष देतात. उपवासाची तयारी आणि जिद्द असली तरी उपवास आणि पायी चालत राहणे यातून आलेला थकवा नोंदवताना, देवस्थानात जेवणाची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्याचा निषेध लेखी पेटीत टाकून पुढील प्रवास सुरु ठेवला. मुक्कामासाठी झोपडीत मागितलेला आश्रय आणि तेथील घटना क्रम हा आलीप्तपणे पाहिल्यास संकटास तटस्थतेने सामोरे जाणे, हे त्यांनी अंगवळणीच पडून घेतले होते असे वाटते. जेवण तयार करून मिळावे म्हणून अपरिचित ठिकाणी प्रयत्न करताना,झालेली भावना विवशता आईची आठवण येण्यास कारणीभूत ठरली. तर आजूबाजूस नतद्रष्ट वृत्ती दिसल्यास त्यातून संताप उफाळून येवू नये म्हणून भजनाचा आधार घेत त्यांनी त्याचा प्रवास सुरु ठेवल्याचे दिसत आहे.

Tuesday, March 1, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग चार.

डायरीतील नोंद -- असलेली
काही तरी विचित्र घडते आहे,कि जे आपण रोखू शकणार नाही;अशी माझ्या थोरल्या चिरंजीवांची भावना झाली असावी. आई घरात नाही आणि अण्णांची तर गावाला जावयाची तयारी चाललेली दिसते,बरे पूर्वसूचना,तीही नाही.माझी प्रत्येक हालचाल,जणू अगतिक बनून,तो डोळ्यांनी टिपीत होता. तयारी पूर्ण होताच आईजवळ देण्याकरिता,एका बसच्या तिकिटा पाठीमागे,त्याचेजवळ निरोप लिहून ठेवला "मी लवकरच परत येण्याकरिता दूर जात आहे."आणि काय घडणार याची कल्पना येवून,त्याचे डोळे पाणावले.शब्द मुके झाले होते, संयम आणि भावना यांचे ओढाताणीत,यावेळी कोणती हालचाल करेल.आई वडील यांना सारखेच पणाने,खुश करण्याच्या तारेवरच्या कसरतीवर,आम्ही दोघेही खुश होतो.स्वतःच्या मनाचा थांग पत्ता लागू न देण्याच्या,लहान वयातील धूर्तपणावर,कौतुकाचे पांघरूण घालत होतो.थोडक्यात आमची मुले,त्यांच्या गुण दोषांसह ती जशी आहेत तशी,आम्हाला आवडत होती आणि याचेच दुसरे नाव माया होय.
ती कदाचित मागे पळत येवून,हाताच्या बोटाला धरून,"अण्णा कुठ्ठे कुठ्ठे जावयाचे नाही,चला घरी आई तुमची वाट पाहील" आणि मग तिला ढकलून जावे म्हटले,तर सूर्यवंशी उत्तानपाद राजाची ..... गोष्ट आठवून,न जाणो माझ्या अगोदरच हि हट्टी बया,आपला अपमान झाला म्हणून रुसून फुगून,जंगल जवळ करावयाला पाहणार नाही.आणि तशी वेळ येवू नये म्हणून,निर्णय तिच्या पासून तिच्या आई पासून,साऱ्या साऱ्या पासून गुप्त ठेवला होता.प्रत्यक्ष तशा प्रसंगाला तोंड द्यावयाच्या वेळी,कसे वागावयाचे याची मनाच्या मनी अनेकवेळा कवायत करून घेत होतो.
अण्णा आता सौभाग्यवतीच्या लाघवी हास्याला भुलणार नव्हते.छोट्या छबकडीने घातलेल्या विळख्याला,वत्सलतापूर्वक बळी पडणार नव्हते.आपले घर,आपली पत्नी आपलीच कच्ची बच्ची लेकरे,हे सारे काही आपलेच,असता तू कुठे निघालास? वासरांना बघूनही वात्स् लतेचा पान्हा तुझ्या हृदह्यात दाटत नाही का? पंछी ना कर इतना प्यार प्यार है . . . पाखरांनो मी तुमच्यावर मला स्वतःला विसरून प्रेम केले.त्याची परत फेडही तुम्ही आपल्या शक्ती बुद्धी नुसार केली.आणि तुमची आई तुम्हाला म्हणाली,तुमचा बाप भ्याड आहे तर तुम्ही कोणाची बाजू घ्याल. तुम्हाला माझे खरे मनोगत समजेल का? हा शुरांत शूरपणाचा निर्णय राबविताना,माझ्या मनाच्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या उडणार आहेत. सहधर्मचारिणीला एकटे टाकून जावयाचे,तिच्या सुखदुखांत वास्तविक वाटेकरी व्हावयाचे टाकून होय, कुटुंबासाठी व्यक्तीने, गावासाठी कुटुंबाने. साठी गावाने प्रसंगी मोठा त्याग करण्याची वेळ हीच खरी कसोटीची वेळ असते,माझ्यातील विवेक जागा होवून बोलला.
तानाजी लग्नाची अक्षत घेवून महाराजांकडे आला आहे.परंतु महाराज सचिंत आहेत.हि अवघड कामगिरी पार पाडील तर,तो माझा तान्याच परंतु बोलांव कि न बोलांव.प्रसंगाला शोभेल? महाराजांच मन हेलकावे खातेय.आणि निर्णय पक्का झाल्यावर,"आधी लगीन कोंडाण्याच मग रायबाच" असे दिलासा देणारे वाक्य.वृद्ध शेलारमामा उदयभानूशी लढताना हरला नाही,इतक्या वृद्ध वयात कशासाठी लढायच? देव देश अन धर्मासाठी .. प्राण घेतले आपुल्या हाती.
चक्रव्यूह भेदायला तर हवा.तात इथे नाहीत,तू तर सिंहाचा छावा अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. सीतेच्या वनवासाच्या झळा,पती सानिध्याने सुसह्य,तर तरुणपणी एकलेपणाची व्यथा,मनाच्या मनी बोलावयाची चोरी. राजघराण्यातील स्त्रीचे कर्तव्य.किती एक दोन म्हणून सांगू,या साऱ्यांनी आपल्या विशिष्ठ श्रद्धेने,प्रचलित प्रसंगावर मात केली होती. तुलाही त्यांच्याच मार्गाने गेले पाहिजे.मनातल्या विचारांबरोबर घराबाहेर पडलेले पाऊल आता पुढेच पडावयाचे होते. थांबायचे नव्हते मागे वळून पहावयाचे नव्हते.
डायरीतील नोंद-मला समजलेली –वडिलांनी घर सोडतानाचा प्रसंग डायरीत लिहताना,घरी काय वातावरण होते ते इतके अचूक उभा केले आहे कि,मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी नसलो तरी,काय घडले असेल,याचा चल चितपटच डोळ्यासमोर उभा राहतो. माझे वडील तसे थोडे संतापीच होते. मुलांनी प्रगती करावी,हि भावना मनात बाळगताना,कधी कधी शिस्तीचा अतिरेक होत असे.पण त्या मागे मुलांचे हितच अधिक असे.एकदा घरी माझा भाऊ जेंव्हा तो जेमतेम आठ /नऊ वर्षांचा होता,तेंव्हा आरशा समोर उभा राहून बहिणीसाठी आणलेली,पावडर लावीत होता. तेंव्हा ती बाब न आवडल्याने,वडिलांनी सरळ तो डबा उचलला,आणि तिसऱ्या मजल्यावरून समोरील शेतात फेकून दिला.वेळ पाळणे या बाबत देखील,त्यांचा स्वभाव कमालीचा कडक होता. आम्ही लहान असताना,एका रविवारी दुपारी सिनेमास जाण्याचे ठरले. बस आणि सिनेमा वेळेत गाठण्यासाठी,घर दुपारी दोन वाजता सोडणे जरुरीचे असूनही,आईने घरातील अवराआवरीत उशीर केला.एकदा आईस पाच मिनिटात बाहेर पडायचे असे सांगून,वडिलांनी पाच मिनिटे वाट पहिली. त्यावेळी आई जेवणानंतरची भांडी घासत राहिली,त्यावेळी वडिलांनी घरातील टेबलावर ठेवतात ते घड्याळ उचलले,आणि आईसमोर फरशीवर आपटून फोडले.त्या कृतीत अतिरेकि संताप असला,तरी वेळेचे आणि शिस्तीचे महत्व होते. असे आज मला मागे वळून पाहताना वाटते.
अशा संतापी वडिलांनी बसच्या तिकिटावर,जेंव्हा आईसाठी मी घर सोडून जात आहे,असा निरोप ठेवला असेल तेंव्हा,भावाच्या जागी मी असतो तरी,त्या क्षणी त्यांना थांबवू शकलो असतो का? याचे उत्तर आजही मला नक्की देता येत नाही.आणि आता त्यांच्या डायरीतील तो भाग वाचताना,त्यांचा निर्धार आणि मनाच्या निग्रहाची,त्यांनी केलेली ध्रुवाच्या अढळवृत्तीशी तुलना पाहता,मी तिथे असण्याने परिस्थिती बदलू शकलो असतो का ? याचे उत्तर आजही देता येत नाही,हेच खरे.पण हे नक्की कि,त्यांची ती कृती म्हणजे, जबाबदारी झटकून केलेला भ्याड पणा नक्कीच नव्हता. त्या बाबतीत मी,झ्या वडिलांची एक धाडसी पुरुष म्हणून कायमच बाजू घेईन. (क्रमशः)

Saturday, February 19, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग तीन

डायरीतील नोंद -- असलेली
अनासक्त योग पाण्यात राहून कमलपत्र लिप्त होत नाही, भाषा समजायला सोपी,पण आच्रायला अवघड. एरवी संथ असणाऱ्या सागरावर ६०-६० फुट उंचीच्या लाटा  उठाव्यात,त्या वादळग्रस्त मनस्थितीत नव्हे,तर सदाच समुद्र सपाटी पासूनची उंची मोजली जावयाची, त्या पृष्ठभागावरचा स्थिर बुद्धीचा,जीवनाची उलथापालथ घडवून आणणारा निर्णय अविवेकी, वादळातील स्थिर मनो वृत्तीचा नसून वादळाला हाक मारून अंगावर घेण्याचा.काही जणांना वाटणे आणि नाही तरी कोलंबसाचा बेभान साहसी पणा, पक्व मुरब्बी खलाशांच्या दृष्टीने. कदाचित मूर्खपणा,म्हणून मूल्यमापन होण्याची,सारी क्षणचित्रे नजरे समोरून सरकवत निर्णयाशी स्थिर होत,कारण हो अखेर स्वतःच घ्यावयाचा असतो.
भोवतालच्या साऱ्या पसाऱ्याची वाढ,जणू आपल्यालाच घुमारे फुटून झाली आहे हे माझे, मी,माझे, आप्त स्वजन कोणी नव्हेत व याहून हि मोठी निष्ठा असणे शक्य आहे अशी शिकवण ,श्रद्धा होती तरी तसा प्रसंग आचरून अनुभवणे म्हणजे "अपुले मरण पहिले म्या डोळा" आणि ती निष्ठा म्हणजे... माता,पिता,बंधु जीवांचा जिव्हाळा तू एक गोपाळा माता, तो मायापाश तिच्या मृत्यूनंतरही अमरत्वाने बांधू पाहणारा.पिता वृद्ध ज्याची काठी आपण व्हावयाचे ज्याची कावड आपण वाहवयाची त्यालाच श्रावणबाळाने पाणी पुरवण्यास सांगण्यासारखे बंधू जो उर्मिलेलाही प्रसंगी डावलून रामाच्या साथीचा जाणूनबुजून निर्णय घेण्यास स्वतः सिद्ध.
सौ. कुलवंताची कन्या,नाहीं भूलणे वैभवाला,अयोध्येची राणी लाडकी गेली वनवासाला,पती करता कोणतेही आग्निदिव्य करावयाला (सिद्ध) तयार,चिमणी पाखरे .... दोन पुत्र,एक कन्या जरा लाडावलेली आत्मज.
घे कुढार, चल उगार,घाव आता घाली चल , कुऱ्हाड आपली आपल्यावरच चालवायची आहे. उडी अंधारात घ्यावयाची आहे.नाही, आतला आवाज म्हणत होता तू सुखाच्या शोधार्थ निघालेला सिद्धार्थ आहेस . आता मागे फिरू नकोस.खरच, आयुष्यात मी सुखी आहे का? का असमाधानाची अतृप्त भावना माझा पाठलाग करते आहे .सारी पृथ्वी हिरवीगार सस्यशामाल आहे आणि माझ्या मनात समाधाना- बरोबर असमाधान तुडूंब भरून वाहत आहे.एका कोळियाने नाउमेद न होता , न खचता प्रपंच आकारावयास आणावयाचे नाना तऱ्हेने नाना यत्न केले होते. परंतु तेच,तेच ध्येय मात्र ठेवले नव्हते.complete detachment या प्रयोगात्मक अवस्थेने भारावून तिचा जबरदस्त  पगडा मनावर घेऊन हालचाल होत होती. या हालचालीत हरीवर हवाला अशी निर्भयता होती. व्यथितता मनाला स्पर्श करीत नव्हती आणि ३१ डिसेंबरचा पगार हातात घेऊन,उद्यापासून मी कामावर येणार नसल्याचे,मालकांना सूचित केले.त्यांनी कारण विचारले ? कारण काय सांगावयाचे ? अखेर राजीनाम्याचा पर्याय पुढे आला.
नोकरीवर हक्क ठेवण्याची कल्पना,दुरूनही मनात प्रवेश करू शकली नाही.स्वखुशीने राजीनामा,बंधमुक्त, पाशरहित याने प्रभावित होउन घराची वाट धरली. नोकरी करीत असता त्तुझ्या डोक्यावर काही बोजा होता? आता कसे? आसे विचारीतच घरी आलो.
स्वभाव तसा शांत, समजूतदार परंतु या मानस सरोवरातून,शीघ्रकोपित्वाचा मासा कसा अलगद उडी मारावा,याची कल्पना वर्षा ऋतू संपल्यावर,रंकाळा तुडूंब भरलेला असावा आणि कित्येक हंगामातही घीवाराच्या हाती न गवसलेली,छोटीशी मछली नकळत पुरेशी मोठी व्हावी आणि तिच्या संचारला तो तलावही अपुरा पडावा.तसे पहिले तर एकदा दोनदा तीनदा संधी देऊनही,सुधारणा घडली नाही तर अंतर्यामी शांत असूनही,जगावर सात्विक संतापाचा हक्क बजावण्याचा,अधिकार सोडावयाची तयारी नाही.कारण जगाचा अनुभव हि काही वेळा It is dangerous to be too good असा आलेला. प्रयोगाकरिता घर सोडावयाचे ठरले.परंतु ते कसे सोडावयाचे ? सुऱ्ह्दांचा निरोप घ्यावयाचा, परंतु कसा ? भरीत भर घरी पाहुणे आलेले. साऱ्यांशी व्यवहार कसे करावयाचे ?
Water tight compartments. सार, मन एकच परंतु एका भिंती पलीकडील हालचाल,दुसरीकडे कळता कामा नये. बेत अंमलात येण्यापूर्वी फुटला तर,सुभाष बाबू काबुलमार्गे जर्मनी जपानला जाणार कसे. आमच्याच कंपनी सरकारच्या सक्त नजरकैदेत,चौकी पहाऱ्यात आम्ही अडकून पडण्याची हुकमत. दुसऱ्यावर तो तारो व मारो,अशा विश्वासाने विसंबून राहण्याचा धोका जाणून बुजून पत्करण्याचा पत्नीचा स्वभाव.ती नसतानाच दूर जाण्याचा निर्णय अमलात आणावा, आणि म्हणतो ती वेळ जवळ येवून ठेपली.
डायरीतील नोंद-मला समजलेली --
आपल्या समाज रचनेत दुर्दैवाने,माणूस गरीब कि श्रीमंत,यावर त्याची यशस्विता मोजली जाते, पण त्याच्या कुटुंबाबाबत असणाऱ्या आपुलकीच्या भावना,या काही पैशात मोजल्या जात नाहीत. आणि म्हणूनच,दोन वेळचे जेवण हि सुद्धा जिथे कसरतच होती ते घर सोडताना,माझ्या बाबांची झालेली घालमेल,या नोंदीतून ठायी ठायी दिसते. आणि यामुळेच मनाची घालमेल नोंदवताना त्यांनी त्यांच्या निर्णयाचे परिणाम,ज्याज्या नाते संबंधांवर होणार होते,त्या नात्याची निरीक्षणे सहजच नोंदवली आहेत.त्यामुळेच,हि नाती नोंदविताना खरोखरच त्यांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष पटते.
त्यामुळे घर सोडण्याचा निर्णय मनाशी झाला तरी,त्याचे परिणाम थेट ज्या नात्यांवर होण्याची शक्यता आहे,त्याबाबत लिहताना त्यांनी, त्यांच्या वाचनातील आठवणी व संत साहित्याचा वापर केल्याचे दिसून येते. आणि म्हणूनच ते म्हणतात -"अपुले मरण पहिले म्या डोळा" आणि ती निष्ठा म्हणजे... माता,पिता,बंधु जीवांचा जिव्हाळा, तू एक गोपाळा.
आणि पुढे जावून त्यांची आई, जी त्यांच्या लहानपणीच गेली होती,तिच्या आठवणीने हळवे होत,ते म्हणतात,"तिचा मायपाश अमरत्वाने बांधु पाहणारा आहे." त्यांच्या नोंदीत असणारे,छोटे छोटे संदर्भ इतके अर्थपूर्ण आणि अंतर्मुख करणारे आहेत कि, खरोखर त्यावरून घर सोडून संसाराकडे पाठ फिरवून चालू लागणे म्हणजे,जगाच्या दृष्टीने तो जरी पळपुटेपणा वाटत असला असला तरी, तो निर्णय इतका अविवेकी नक्कीच नव्हता. आणि त्यामुळेच,त्यांना वडिलांना आधार देण्याचे काळात दूर जाणे,लक्ष्मणा सारख्या भावाची आठवण येणे,पत्नी व मुले यांच्या अस्तित्वानेच व्याकूळ होणे,याच बरोबर आता मागे फिरणे नाही, हा मनाचा निग्रह देखील त्यांनी तितक्याच ठामपणे नोंदवलेला दिसतो. मनाची हि अवस्था स्पष्ट करताना,त्यांनी स्वतःची तुलना नकळत सिद्धार्थ आणि सुभाष बाबू या व्यक्तीमत्वांशी केली आहे. मला पूर्ण जाणीव आहे कि सिद्धार्थ आणि सुभाष बाबू हे किती थोर आहेत,त्यांचे कार्य किती मोठे आहे,पण म्हणून माझ्या बाबांच्या मनातत्याची आठवण येण्याने, मनाच्या घालमेलीची उंची समजते.
सरकारी नोकरी असून ती न टिकणे, नवे शहर,नवी नोकरी,यातून मार्ग शोधत संसाराची घडी बसवणे,हे सुरु असताना,पुन्हा एकदा नवी नोकरी सोडून देण्याचा,निर्णय घेताना देखील त्यांनी स्वतःचा,निर्णय ठाम ठेवला होता असे दिसून येते. आणि सर्वात मोठा अडसर म्हणजे,सर्वात नाजूक असे पती पत्नीचे नाते. त्याची जाणीव असल्याने प्रत्यक्ष घराबाहेर पडताना,त्यांनी माझी आई घरी नसण्याची वेळ निवडली. एकूणच हा सर्व भाग वाचताना वर वर,शांतपणाने घर सोडून चाललेले,माझे बाबा,किती म्हणून अस्वस्थ होते याची साक्ष ठायी ठायी दिसून येते. (क्रमशः)

Friday, February 11, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग दोन

आज तुमच्या समोर माझ्या बाबांची डायरी ठेवताना त्यांच्या हस्तलिखित डायरीतील शब्द रचना जरासुद्धा बदललेली नाही,त्यामुळे त्यात काही ठिकाणी कवितेच्या ओळी, काही ठिकाणी इंग्लिश वाक्ये आलेली आहेत. यापुढील भागात "डायरीतील नोंद- असलेली" म्हणजे माझ्या बाबांची मुळ डायरी आहे. तर या डायरीच्या वाचनातून ते मला कसे वाटले किंवा कसे उगडत गेले त्याविषयी माझ्या भावना म्हणजे "डायरीतील नोंद-मला समजलेली" हा भाग आहे.
डायरीतील नोंद-- असलेली-

कुण्या एका कलंदराची भ्रमण गाथा.
पुणे गाठले ....
सुमारे ३६ वर्षापूर्वी या पुण्यनगरीत पडलेले जाणतेपणाचे पहिले पाऊल ...
ग्रीष्म ऋतू चंड प्रतापी रविराजाच्या सहस्त्र सहस्त्र किरणांनी पृथ्वी भाजून निघत होती.अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. घशाला तहनेचा शोष जाणवत होता.आणि माझ्या आसऱ्याकरिता मी व माझे वडील तथाकथित सज्जनांचे उंबऱ्या मागून उंबरे झिजवत होतो. कोणी नावाचेच "महाजन" होते.उंची आदर सत्काराची सवय असलेल्या माझ्या वडिलांकडे मी पाय भाजत असतानाही रोखून पाहत होतो.कारण त्यातील उंची कमी झाली होती.त्याचा परिस्थितीमुळे आलेला अगतिकपणा, या कोवळ्या अंकुराचे भवितव्य काय? या व्यथेने आलेली व्याकुळता, दारिद्र्यात मरण बरे व दारिद्र्यता खोटी, म्हणतच फिरणारा चारुदत्त तर काही ठिकाणी नाकारल्या जाणाऱ्या वधूच्या भावनेशी समरस होऊन अधीर उत्सुकपणाचा शेवट जाणून घेणेच नको.आणि आता पेटत्या भूकेनेही थैमान घातले होते.
अवेळी आलेल्यांनाही आमच्या आईने रांधून वाढले होते,परंतु असे सज्जन जेवायचे वेळीही जेवून जा म्हणावयास तयार नसलेले. कवडी कफल्लक निष्कांचनाला आता हो म्हटले तर न जाणो हि ब्याद आपल्याला कायमच चिकटायची या गृहिणीच्या व्यवहारी सल्ल्याची
पकड बसलेले ते महाभाग, व खमंग पदार्थांचा मध्यान्हीला सुवास दरवळत असताही अभूक्तपणे "येतो आता" म्हणणारे व तोंड देखले या या म्हणणारे यजमान यांचा निरोप आमची पावले ज्या घरच्या आतीथ्याने केवळ त्याच दिवशी नव्हे तर जीवनात कायमची स्थिरावली त्या घरी मी आता पुणे सोडताना जाऊ कि नको ? हे घर माझ्या चुलत चुलत चुलत्यांचे. इथे भर दुपारी बारा वाजता व रात्री बेरात्री हि जाण्यास मला प्रत्यवाय नव्हता. कारण इथेच माझे लालन पालन पोषण झालेले.चुली कोसळून पडल्या होत्या आणि एकतेचे अकृत्रिम बंध निर्माण झाले असताही आज मी या घरी जाणार नव्हतो. उदास असता मुक्त्तपणे खळाळून हास्याचा निर्झर वाहवा अशी जादू, वेदनांवर फुंकर घालण्याची शक्ती असलेले हे घर ,त्यातील चालते बोलते घराला घरपण देणारे यांचा मी आज मूकपणेच निरोप घेणार होतो व घेतलाही.बस स्वारगेटकडे याच घरावरून पुढे गेली आणि पुढे साताऱ्याच्या वाटेला लागलीही. पार्वती नजरेआड झाली आणि अशा तऱ्हेने जल स्थळ काष्ठ पाहन आदी तदंगभूत वस्तू सुद्धा मी पुण्याचा निरोप घेतला. जाताना एक मोठ्या अक्षरातली जाहिरात Lead असा संदेश देत होती. त्या आशय गर्भ शब्दांनी मनाची पकड घेतली आणि अंतर्मुख झालो. मी,माझे वडील, आजोबा पणजोबाजा आणखी किती मागे जाता येईल तितका जा. शिवाजी,चंद्रगुप्त, कृष्ण राम काळाच्या विशाल उदरातले आठवणारे टप्पे. ऋषीचे कुळ आणि नदीचे मुळ . तुझे गोत्र वसिष्ठ प्रवर तीन पण कोणते माहित नाही. तुझी परंपरा कुठे भिडते आहे, आहे माहित? रामगुरु वासिष्ठापर्यंत आणि मग राजर्षी आणि ब्रम्हर्षी यांचा झगडा. वसिष्ठ विश्वामित्र असा थोर परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी आहे का? पात्रते शिवाय नेतृत्व करणारे आजचे पुढारी ज्यांना नक्की कुठे जावयाचे आहे ते हे त्यांचे त्यानंच माहित नाही त्यात आणि तुझ्यात काही फरक आहे का ?
डायरीतील नोंद-मला समजलेली-
वरील नोंदीने ज्या रोजनिशीची सुरवात झाली आहे ती रोजनिशी माझ्या बाबांनी लिहिली आहे सन १९७१ च्या वर्षारंभी. सन १९६८ मध्ये नोकरीवर आरिष्ट, कोल्हापुरातील हलाखीत जेंव्हा तीन मुले व पत्नी यांची रोजची पोटाची खळगी कशी भरावी या प्रश्नांनी मन उद्विग्न तेंव्हा पर्याय म्हणून पुण्यास मुक्काम हलवलेला, पुढील वर्षभरात कुटुंब स्वास्थ्याची कोणतीही निशाणी समोर दिसत नाही, त्यावेळी माझ्या बाबांच्या मनाने अचानक परमार्थाकडे ओढ घेतली. राम कृष्ण परमहंस हाच त्यांचा जगण्याचा मार्ग ठरला. कोथरूडहून डेक्कन पर्यंत येण्यासाठी खिशात पैसे नसताना त्यांचा ' देवाचा शोध' घेण्याचा निश्चित ध्येयाचा पण अनिश्चित मार्गाने जाण्याचा प्रवास सुरु झाला. आणि या प्रवासाची सुरवात करताना प्रथम त्यांच्या मनाने मागे जावून ३५ वर्षापूर्वीचा पुण्यातील प्रथम दिवसापासूनचा प्रवास केला.
माझ्या वडिलांना त्यांच्या आईचे छत्र लहानपणीच गमवावे लागले. माझ्या आजोबांचा परंपरागत सराफीचा व्यवसाय खरे तर माझे आजोबा हे प्रतिथ यश रत्नपारखी. चांगले भविष्याचे जाणकार. त्यामुळे व्यवसाय भरभराटीस आलेला. पण रत्नांची पारख करणारे डोळे जवळची माणसे ओळखण्यात निरुपयोगी ठरले भागीदार गोत्यात आणेल हे स्वतःचे भविष्य ते पाहू शकले नाहीत. व्यवसाय आणि घरदार देशोधडीला लागले. पदरात चार मुले,पत्नीने नैराश्याच्या झटक्यात मृत्यूला आपलेसे केलेले.
या पार्श्वभूमीवर अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी माझे आजोबा पुण्यातील नातेवाईकांचे उंबरे झिजवत होते. पण पदरी येत होता तो अनुभव म्हणजे गदिमांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ... लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई .. असा होता आणि त्यांचा उल्लेखच प्रथमच्या नोंदीत आढळतो. पण अशी कटू आठवण देणारे अनुभव असूनही त्यांनी फक्त त्याच आठवणी जपल्यात असेहि नाही, तर त्यावेळी आसरा देणाऱ्या घराबाबतची त्यांची जाण देखील तितकीच भावूक असल्याचे दिसते.
फक्त संदर्भासाठी ते घर ' चुलत चुलत चुलत्यांचे ' पण त्याच्या गतस्मृतींसाठी ते मायेची शाल पांघरणारे सख्खेच घर होते. आणि अशी उदारता माझ्या ज्या आजोबांच्या घराने दाखवली ते घर म्हणजे गणित तज्ञ प्रा. नी. वा. किंकर यांचे लिमयेवाडी, सदाशिव पेठ पुणे.येथील पेरुगेट भावे हायस्कूलच्या पाठीमागचे घर.जे माझ्या बाबांच्या पाठीशी गडकोट किल्याप्रमाणे उभे राहिले.

स्वतःची दोन मुले व एक मुलगी यात आणखी एका मुलाची भर पडली आहे असे अगदी सहजतेने मानून त्यांनी माझ्या वडिलांना घरात आसरा दिला,खरे तर आसरा दिला असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल कारण आपल्याच मुलातील एक समजून त्यांनी वडिलांना सामावून घेतले. माझे हे चुलत आजोबा हे पेरुगेट भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक. त्यामुळेच की काय पण सतत मुलांच्यात राहून आतून एक बाल्यच त्यांनी जपले असावे आणि म्हणूनच घरात नव्याने आलेला एक मुलगा त्यांनी सहजतेने ठेवून घेतला. त्याची निरागसता जपली. वडिलांना फक्त ठेवून घेण्याची जबाबदारी त्यांनी पार पडली असे नाही तर त्यांना आधार,संस्कार आणि आकार दिला.
ज्या भावंडात राहून माझ्या वडिलांचे बालपण बहरले त्या भावंडांमध्ये निर्माण झालेली आपुलकी आमच्या पिढीने देखील तितक्याच सहजतेने अनुभवली. वडिलांनी घर सोडून देवदर्शनाच्या ओढीने प्रयाण केल्यावर त्यांच्या शोधासाठी केलेली धडपड असो किंवा माझ्या वडिलांचे अखेरचे आजारपण असो किंवा त्यांच्या मृत्युनंतर दिलेला मदतीचा हात असो.या घराची सावली कधीच आकसली नाही याचे कारण म्हणजे त्या आजोबांचे संस्कार आणि आमचे भाग्य होय. मला आठवतय हे माझे आजोबा श्री. नीलकंठ वासुदेव किंकर उर्फ नी. वा. किंकर प्रसिद्ध गणित तज्ञ म्हणून पुण्यात नामवंत होते पण आम्हाला ते आमच्या घरचे वडिलधारे म्हणूनच माहित. शाळेमध्ये धोतर ,काळा कोट डोक्यावर काळी गोल टोपी आणि खांद्यावर उपरणे या वेशात शाळेत प्रवेश करते झाले कि विद्यार्थ्यांसाठी दरारा व सहकाऱ्यांसाठी आधार निर्माण होत असे. पेरुगेट भावे हायस्कूल या नामवंत शाळेसाठी त्यांनी मुख्याधापक पद सांभाळून शाळेचे नाव आणि परंपरा नक्कीच उज्वल केली आणि त्याचा आम्हाला आज हि सार्थ अभिमान आहे. आणि यामुळेच स्वारगेटकडे बस जाताना बसने घर ओलांडले आणि माझ्या वडिलांच्या मनात त्यांच्या घर सोडून जाण्याविषयी निर्माण झालेल्या वादळाची चाहूल त्या डायरीत उमटली.पुढे जावून ते लिहतात ... (क्रमशः)