Monday, April 27, 2020

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो

खरतर पियानो आणि हिंदी सिनेमा यांचे नाते बरेच जुने . विशेषतः ती हैसियत का काय जेंव्हा दाखवणे अतिशय जरुरीचे असते तेंव्हा एकवेळ नायक बी ए पास नसला तरी चालेल किंवा त्याच्या साठी गाजर का हलवा पण नको पण श्रीमंती थाटाचे प्रतीक म्हणून पियानो हवाच.

तसा याही चित्रपटात पियानो आहे पण तो खानदानी घरात  नाही तर आहे क्लब मध्ये आणि त्याचा वापर नायक किंवा नायिका यांच्या पैकी कोणी नाही तर चक्क सहनायिकेने केला आहे .

 कथा साधीच प्रेम झाले लग्न झाले मग अडचण कसली तर लग्न सासूच्या मनाविरुद्ध . मंगळीक असणारी ( हे खानदानी घराण्याच्या गुरुजींनी सांगितलेले ) सून म्हणून नाराजी.

मग व्यवसायात जुन्या जाणत्या लोकांनी केलेली फसवणूक , घरात अशांती मग काय आता हि सारी दुःख बुडवायला नायक क्लब मध्ये येऊन एकटाच ढोसत बसलाय आणि त्याच वेळी तिथे त्याची बालपणीची मैत्रीण ( जिला आपले लग्न नायकाशी व्हावे असे वाटत असत पण झालेले नसत ) तिथे अचानक (अवतरते ) येते.

मग अरे ,"असा का बरे स्वतःचा सर्वनाश करून घेतो आहेस ?" असं काकुळतीने विचारते . नायक आपल्या दुःखाचे मीटर किती हाय आहे हे सांगण्यासाठी प्रथम पेग भरतो आणि  मी काय सांगू असे म्हणत  मग काहीतरी बोलतो .

आणि त्यानंतर आपला म्हणजेच प्रेक्षकांचा ताबा खय्याम यांचे संगीत , त्याची पत्नी जगजीत कौर यांचा स्वर आणि शब्द रचना  साहिर या त्रयींकडून घेतला जातो.

या गाण्याचे सादरीकरण देखील इतके सुंदर केले आहे कि , सर्वसाधारण कथानक आणि दुःख व्यक्त करण्याचा पारंपरिक पद्धतीनुसार नायक त्याचे दुःख शब्दशः रिचवत  असूनही कॅमेरा प्रथम (निवेदिता )सहानायिकेच्या  नाजूक बोटांच्या वर येत पियानो वादनातील सहजता दाखवतो आणि तिथून थेट नायकाला प्रथम पाठमोरे दाखवत गीत सुरु होते.

अर्थात त्याला कारण आहे साहिर.....  सहनायिकेचे मनोगत मांडताना ती गीतांमधून नायकास विनंती करते ती खूप वेगळी आहे, तिच्या प्रेमाची जाणीव नायकास देताना ती म्हणते -

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो  
तुम्हे ग़म की कसम इस दिल की वीरानी मुझे दे दो .... 

जसे जसे सहानायिका आपले मनोगत मांडत जाते तसे गीतातील जीवघेणी विनंती आपले लक्ष वेधून घेते.
याठिकाणी मनोगत सहनायिकेचे असले तरी शब्दांची ताकद साहिरजींची आहे,. प्रत्यक्ष जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या प्रेमाचे वेगळ्याप्रकारचे अमृतानुभव पाठीशी असलेल्या या तरल कवीने आपलेच म्हणणे या सहानायिकेच्या तोंडी उतरवले आहे असे वाटते.

 गीतातील प्रत्येक कडव्यामध्ये नायकाकडे मागणी करताना ती काय काय मागते आहे ते पाहिले कि आपण जेंव्हा एखाद्यावर तरल प्रेम करणारी व्यक्ती कशाची मागणी करेल याचा नेम नाही त्यामळे  सहनायिका नायकाकडे  त्याची परेशानी,विरानी ,हैरानी मागतेच पण पुढे जात जर तुला समाज सतावत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याचे काम ( पाहरेदारी )निगेबानी , आणि शेवटी जर काही चुकीचे केल्याचे शल्य असेल तर ते म्हणजेच पशेमानी याची पण मागणी करते. म्हणजेच या ठिकाणी हे शब्द फक्त यमक आणि ताल जुळवण्यासाठी आलेत असे वाटतच नाही धन्य तो साहिर ..
.
इतक्या सुंदर रचनेला दिलेले खय्यामजींचे संगीत तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल. हे गाणे त्यांनी पहाडी रागात बांधताना त्यांची हिमाचल आणि परिसर याच्याशी असलेली जवळीक सहज अधोरेखित केली आहे. एखाद्या उतुंग पर्वत रांगेत एखाद्या छोट्याश्या पठारावर एखादे शांत तळे आहे आणि एखाद्या निवांत संध्याकाळी त्या काठावर विचार मग्न अवस्थेत असताना त्या तळ्यात एखादा छोटासा दगड सहज भिरकावून दिल्यावर जसे तरंग उठतात तसे प्रत्येक कडव्यानंतर तिच्या भावना आपल्या मनात उतरतात असे वाटत राहते

या गीतासाठी त्यांनी निवडलेला आवाज इतका योग्य आहे कि पहाडी खर्ज आणि मार्दवता यांचा मिलाप असलेला हा आवाज त्यांच्या पत्नीचा आहे म्हणून नाही तर चपलख आहे म्हणून नितांत सुदर वाटतो आणि इतकी सुंदर रचना अशीच ऐकत राहावे असे वाटत असतानाच गीत संपून जाते मनात एक हुरहूर ठेवून
ती म्हणजे खरच सुंदर प्रेमाची प्रत्येक कहाणी अधुरीच असते का ?
ऐका एक  साहिर प्रेमाचे व्यक्त होणे -

Saturday, April 25, 2020

आओगे जब तुम ओ साजना

आयुष्यात प्रेम , ममता , आपुलकी सर्व काही गमावलेला एक तरुण, आर्थिक आघाडीवर भरपूर पैसे यश असूनही पराभूत आणि मनाच्या उद्विग्न अवस्थेत भरकटून सर्वस्व सोडून दिशाहीन जात असतो.

आणि जीवनावर भरभरून प्रेम करणारी एक अल्लड युवती, जिने तिच्या मनातल्या राजकुमाराशी लग्न  करून संसार थाटण्याचे नक्की केलेले असते आणि त्या  स्वप्नवत अवस्थेत आपल्या घरी जात असते.

आयुष्याच्या अशा अगदी  भिन्न मनस्थितीत ते दोघे जण एकमेकांना भेटतात. भेट एका रेल्वेच्या डब्यात झाली असल्याने रेल्वे  आणि ....... अर्थात जब वुई मेट या चित्रपटाची कथा पुढे सरकू लागते . एकूणच या चित्रपटाच्या कथेला वेग आहे . दोघांच्या आयुष्यातील  गतकाळ आणि भविष्य यांची सांगड घालत आपले अनुभव परस्परांना सांगत प्रवास पुढे चालू ठेवतात.

या अशा एका वेगवान कथानकात एका वळणावर  संपूर्ण चित्रपटाला कलाटणी देणाऱ्या क्षणी, कथानकात अतिशय सहज सामावून जाणारे हे गीत पडद्यावर इतक्या तरलतेने सुरु होते कि बस्स ....

उस्ताद रशीद खान यांनी ज्या ताकतीने पहिली आ आ आ  हि तान  घेतली आहे कि जणू त्या आर्ततेतूनच पुढील परिस्थिती काय असेल याचा अंदाज यावा.

पडद्यावर कॅमेरा पुढील दृश्यावर नेण्यासाठी या आलापी पाठोपाठ येणारे बासरीचे स्वर गीतातील आर्तता सुरवातीसच अधोरेखित करतात.


आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे .... हि रचना. हे गीत मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा त्यातून नवीन नवीन अर्थ उलगडतात असे मला नेहमीच वाटते.

नैना तेरे कजरारे हैं
नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने
वादे किए कई सारे हैं

या ओळी जेव्हा उस्तादजींच्या गळ्यातून उतरतात तेंव्हा का कोण जाणे पण सुमनजींनी गायलेल्या एका मराठी गाण्यातील या दोन ओळी मला सारख्या कानात गुंजत राहतात. ते गाणे आहे -- केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर ..., पण नैना तेरे कजरारे हैं या शब्दापाठोपाठ

गहिवरला  मेघ नभी,  सोडला ग धीर याच ओळी येतात आणि पराभूत प्रेमाची आर्तता  आणि मनोमन कोसळणे यांचा मिलाप होतो आहे असेच वाटत राहते



 काही गीत रचना अशा असतात कि प्रत्येक कडवे जीवनाचा नवा नवा अर्थ आपल्या समोर उलगडून, त्यातून जणू वेगवेगळ्या  भावनांच्या रेशीम लडीच आपल्यासमोर उलगडत असतात. आणि तरीही मन मात्र सारखे  गीताच्या ध्रुव पदाकडे धाव घेत राहते. त्यामुळे हे गीत ऐकताना मन सारखे -

बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे.... इकडेच धाव घेत राहते

आणि उस्ताद रशीद खान यांचे या गीताचे सादरीकरण देखील असेच आहे संपूर्ण गाणे जरी एक गायक गात  असला तरी, स्त्री मनाची घालमेल व्यक्त करणारी अगदी नाजूकातली नाजूक भावना  आवाजातील चढ उतारातून त्यांनी अलगद टिपली आहे. पण त्या ताना आलापी आपल्याला पुन्हा पुन्हा ध्रुव पदाकडे खेचत राहतात .

हि रचना ऐकताना नेहमी मला हे मनोगत जरी अगतिक प्रेमिकेचे असले तरी ती पराभूत वाटत नाही आणि या नाजूक स्थिती देखील आपले प्रेम नक्कीच यशस्वी होईल या आशावादावर ती जगते आहे  असे मला वाटते आणि त्यामुळेच शेवटी तिच्या ओठी शब्द येतात -
सपनों का जहाँ
होगा खिला खिला
बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे ...
तर मग डोळे मिटून शांतपणे एकदा ऐकुया -https://www.youtube.com/watch?v=WPwTPhFMm3k

Friday, April 24, 2020

बंदिवासातील रोजनिशी अर्थात लॉक डाउन डायरी -3

आजीच्या वडिलांच्या नावाचा शोध

जसा हा बंदिवासाचा काळ वाढत चाललाय तसा  वेळ कसा काढावा ? या जटील  प्रश्नांवर इतके उपाय आले कि काही विचारू नका. आवडीचे छंद जोपासा , वाचन करा ,जुनी नाटके बघा , संगीत ऐका , यासारखे अनेक. काहींनी काही प्रयोग केले देखील.
पण परत कंटाळा आला आणि व्हाट्स ऍप काही नवीन सांगताय का ? याच्या शोधात नाहीतर फेसबुक ते इंस्टाग्राम आहेच. या सर्वातून मला एक असा विचार सुचला कि , आपण -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान '  याचा शोध घ्यावा.

आता तुम्ही म्हणाल हे काय एखाद्या पी. एच डी च्या प्रबंधा  सारखा विषय मांडला आहे  अगदी खरे आहे पण या द्वारे आज मी तुम्हाला एक अवघड परंतु खूप दिवस पुरेल असा एक उपक्रम सांगत आहे . प्रयोग करून तर पहा. आता या विषयाचे महत्व समजावे म्हणून मी आपलयाला  प्रथम एक छोटासा प्रयोग करायला सांगतो.

घरातील शाळेत जात असणारा आणि सर्वात लहान सदस्य याची निवड करा आणि त्याला एक प्रश्न विचारायचा  ? तुझ्या आजीच्या वडिलांचे संपूर्ण नाव काय ? यात दादी ( वडिलांची आई ) किंवा नानी ( आईची आई ) कोणीही चालेल.

किती जण याचे अचूक उत्तर देतात पाहायचे . आता तुम्ही म्हणाल याचा आणि वर मांडलेल्या विषयाचा संबंधच काय ?

तर तो संबंध खूपच जवळचा आणि नाजूक आहे. एकत्र कुटुंब ते  चौकोनी कुटूंब पासून ते मी माझा किंवा मी माझी या व्याख्येत आलेले एक खांबी कुटुंब यात आपण अक्षरशः फरफटत तर नाही ना ? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत . आणि जे प्रश्न प्रथम कुटुंबाचे असतात तेच वाढत वाढत नंतर समाजाचे बनतात.
म्हणूनच आपण आपल्या कुटुंबाचा शोध घेण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.

यासाठी सध्या तुम्ही उपलब्ध असलेला वेळ असा वापरा कि ज्यातून आपणच आपल्यासमोरून हरवत चाललेली माहिती  जतन  करून ठेवू शकाल. त्यासाठी काय करायचे तर एक माहितीचा तक्ता  तयार करू या. त्यात संपूर्ण नाव ,जन्मदिनांक , जन्म ठिकाण , नोकरी /व्यवसायाचे स्वरूप आणि कालावधी अशी प्राथमिक माहिती प्रथम पूर्ण करावी.
त्यानंतर घर ,शेती वाडी, जमीन जुमला याची माहिती घ्यावी. सदर मिळकत कशी वाढली किंवा कशी कमी झाली याची माहिती घ्यावी.. तुम्ही म्हणाल आज इतका खटाटोप करून काय साधणार ? तर इथेच -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान ' या विषयाची सांगड बसणार आहे कशी ते पहा.

आज तुमच्या घरातील सर्वात लहान सदस्याला त्याच्या पंजोबांचे संपूर्ण नाव  सांगता आले नाही तर तो त्याचा पराभव नसून आपला पराभव आहे असे समजून त्याकडे पाहणे जरुरीचे आहे . आपला आपल्या आधीच्या पिढीशी तुटत चाललेल्या संवादाचे ते प्रतीक आहे. आज निर्धार करणे जरुरीचे आहे कि, नाही हि माहिती मी मिळवीन . माझ्या मुला  बाळांना माझ्या कुटूंबाचे जे लागेबांधे आहेत त्याची माहिती देईन.
एकदा आपण हा निर्धार केलात कि त्याची सुरवात प्रथम घरात करा. घरातील जे जेष्ठ आहेत त्यांना वेळ द्या. सहज गप्पा मारत त्यांना बोलते करा . त्यांच्या धडपडीचा काळाची माहिती घ्या. यातून काय होईल तर त्यांना त्यांची दखल घेतल्याचा आनंद मिळेल. त्यांनी केलेल्या कष्टाची किंमत आपल्याला आज घर बसल्या समजेल. त्यांच्या आयुष्याच्या चढउतारांवरून त्यांच्या बरोबर तुम्हाला प्रवास करायला मिळेल
यातून तुम्ही जे तयार कराल ते असे पुस्तक असेल कि, काही प्राथमिक माहिती तुम्ही कुलवृत्तांत म्हणून जतन कराल पण त्याच्या अनुभवाच्या शिदोरीतून तुम्हाला असे एखादे कथाबीज सापडेल कि त्याची गोष्ट होईल किंवा अगदी एखादे सनसनाटी कथानक होईल. कुणी सांगावे त्या वरून  एखादी चित्रपट कथा आज तुम्हाला नव्या वाटेवर उभे राहण्यास मदत करेल.
या प्रेरणेतून  -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान ' हा विषय तुम्ही काल  आज आणि येणाऱ्या पिढीसाठी म्हणून उद्या असा त्रिमिती मधून त्रिकालाबाधित म्हणून बघण्या इतके सक्षम व्हाल. कारण शेवटी समाज म्हणजे कोण तर आपण आणि आपले कुटूंबच ना !
तर मग आता आले ना लक्षात कि लॉक  डाउन  आज ना उद्या नक्कीच संपेल जीवनाचे रहाटगाडगे सुरु होईल.  पण तरीही मला आता वेळच पुरणार नाही कारण मला देखील माझ्या आजीच्या/आजोबांच्या  वडिलांचे संपूर्ण नाव नाही तर संपूर्ण कर्तृत्व जाणून घ्यायचे आहे

काय मग घेणार ना आपल्याच भोवती असून हि आपल्या पासून कोसो दूर चाललेल्या या कुटूंब विश्वाचा शोध.

Thursday, April 16, 2020

जिंदगी ! तेरे बिना ....

खरे तर मातृभाषेत व्यक्त होणे हे नेहमीच सहज सुंदर असते . पण प्रत्येक भाषेत स्वतःचे एक सौंदर्य स्थान नेहमीच आबादित असते. काही शब्द तेच पण प्रेम प्रतारणा ,गेल्या दिवसांच्या संदर्भातील आठवणी या सर्वांभोवती फिरणारे काही शब्द आणि हिंदीत व्यक्त होताना त्यात दिसणारी लय काही अजबच असते.

जिंदगी गुलज़ार है ! असे म्हणताना गुलज़ार यांच्या काही रचना वाचून ,त्या प्रेरणेतून सुचलेल्या काही रचना. अर्थात हि तुलना नाही फक्त पार्शवभूमी म्हणूनच सांगितली . एकच परिस्थिती आणि त्याकडे बघण्याच्या त्याचा दृष्टिकोन तिच्या वागण्याच्या संदर्भात कसा आहे ते पहा -

साथ !

वो उनके  साथ चलने  के  वादे , कस्मे निभाने के तरीके ,
मोड़पर आज मुड़कर देखे तो हम नहीं रहे कहीं के. 

इंतजार !

जब उनको करना था तो वक्त होता  ही नहीं था !
जब हम कर रहे है , तो वक्त गुजरता ही नहीं है.

पहचान !

कहां हुई थी, कैसी  हुई थी ! ये कैसे सवाल  हैं ?
तेरे बिना मेरी तो पहचान हीं अधूरी हैं

वादे !

भूलाना ही पसंद किया उन्होंने निभानेसे ,
कैसी बीतेगी जिंदगी उनसे मुकरनेसे .

इन्कार !

जब भी उन्होंने किया मुझे पहचानने से ,
मेरा दिल भी मुकर गया है उनको भुलने  से।

अजनबी !

आप मिलनेसे पहले था सारा जहाँ
आप चले गये तो हम ही बने अजनबी


जिंदगी !

तेरे बिना कट जायेगी कभी सोचा  हि  नाही था
आज सोचा तो पता चला  वो तो कट रही है ,
लेकिन हम जिंदा कहाँ  है ?



Tuesday, April 14, 2020

मोतियांचा हार

साथ संपली  हात निसटला, आज कसा काळ थांबला
काल पर्यंत गुंफलेला धागा आज कसा कचकन तुटला

क्षणोक्षणी वाट पाहणारे डोळे, आज म्हणाले ,"तू कोण कुठला ?"
या प्रश्नाच्या भडिमाराने पापण्यांच्या बांध फुटला

प्रथम भेटीतील ओढ, एकमेकांना सांभाळण्याची धडपड
ना कसल्या आणाभाका, ना कसले वचन
न बोलताही वाहिलेली अनासक्त प्रेमाची कावड

अनेकदा भेटलो ,आवेगात वेढलो ,एकमेकात गुंतलो
फुलपाखराच्या नाजूकतेने एकमेकात मिटलो

असे असूनही आज ओळख का टाळलीस !

प्रश्न आहे ओळख टाळून आठवणी टाळशील का ?
जे विसरु पाहते आहेस तेच पुन्हा आठवशील का ?

जा एखाद्या सागरतीरी आरक्त सायंकाळी
विसरून जाण्या गत आठवाची मांदियाळी
साठव स्मृतींचे शिंपले तूच तुझ्या ओंजळी !

त्यातील मोतियांचा बनव तू हार
हीच माझी अखेरची भेट ....
आज तुला साभार !

स्मृती गंध -


नजरेला भिडली नजर पण लपवला कटाक्ष
डोळ्यांच्या पापण्यात ओथंबला सागर , त्याचीच ही साक्ष

कोणीच बरोबर नसताना ओळख का टाळली !
विचारत राहिली स्वतःला केंव्हा होते भाळली ?

दूर दूर जात राहिली पण पावलांची गती मंद
आठवांची झुळूक करीत नसेल ना  आज तिला धुंद

आज तिचे परकेपण मला आपलेसे वाटले
अचानक मला पूर्ण विसरण्यासाठी ...

तिने गतस्मृतींना गाठले

Friday, April 10, 2020

बंदिवासातील रोजनिशी - अर्थात लॉक डाऊन डायरी -2

नाते संबंधातील लॉक डाउन -
आज आपण सगळे बंदिवासात आहोत पण त्यात देखील स्वार्थ दडलेला आहे , आज बंदिवासात राहिलो, तर उद्या स्वछंद भटकता येईल हा . आजचा शारीरिक बंदिवास काही काळानंतर नक्की संपून जाईल आपण मोकळा श्वास घेऊ. जीवन नव्याने सुरु होईल आणि आपण पुन्हा एकदा रहाटगाडग्याला जुंपले जाऊ.
म्हणजे आपण शारिरिक पातळीवर बंदिवास संपवण्यात नक्कीच यशस्वी झालेले असू .

माझा प्रश्नआहे तो त्या लॉक डाउनचा  नाही तर आपल्या मनातील लॉक  डाउनचा आहे. एखादा मित्र , नातेवाईक यांचे येणे जाणे, गप्पा ज्या सहजतेने झाल्या पाहिजेत त्या होत नाहीत. कधी  वेळ आडवा येतो तर  कधी अहंम !
फेसबुक,  व्हाट्स  अप पासून  ते फोन इंटरनेट पर्यंत सर्व हाताशी असून आपण दुरावत आहोत. एखाद्याने त्याचे आनंदाचे क्षण फेसबुक वर शेअर केले तर त्यात माझी आठवण  नाही असा विचार करत अभिनंदन करण्या ऐवजी दूरच राहतो . मीच का आधी बोलू ? मीच का पडते घेऊ ? या चक्रात आपण दुरावातच जात नाही का ?
या प्रकारात काय होते माहित आहे कि वेळ निघून जाते पुलाखालून नुसतेच पाणी वाहून जाते असे नाही तर कधी कधी पुलच  वाहून जातात . आज हे तळमळीने लिहण्याचे  कारण कि , जर असे काही मागे पडलेले संवाद असतील तर ते जरूर पूर्ण करा.
मला भारत सोडून  बघता बघता १५ वर्षे झाली त्यावेळच्या अनेक मित्र , नातेवाईक  यांच्या संपर्कात बराचसा आहे पण तरीही कधी कधी मन विषण्ण होते. चार सुख दुःखाच्या गोष्टी हक्काने मांडाव्यात अशी ठिकाणे कमी होताना त्याच्या यातना मनास त्रास देतात .

परवाचीच गोष्ट, असेच एक परिचित . खूप दिवसात बोलणे नाही म्हणून फोन लावला. फोन त्यांच्या  मिसेसनी उचलला. मी प्रथम कोण बोलतोय हे सांगून फोन मित्राला देण्याची विनंती केली. तर त्या म्हणाल्या , " फोन करायला खूप उशीर केलात ." मला आधी वाटले वेळेचा अंदाज चुकला ,आणि  आपण  अवेळी बोलतोय कि काय ? आणि पुढील शब्दांनी मन सुन्न केले. " त्यांना जाऊन चार वर्षे झाली . अधून मधून तुमची आठवण काढायचे, पण तुमचा फोन नंबर हाताशी नव्हता . त्यामुळे बोलणे झाले नाही " 
या घटनेने मला खूपच अंतर्मुख केले. का नाही आपण पूर्वीच फोन केला ? तर या निमित्ताने आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे , आपल्या परिचित नातेसंबंधातील असे मागे पडलेले संपर्क जरूर करून आपल्या सहज संवादातील लॉक डाउन लगेचच तोडा.

Wednesday, April 8, 2020

बंदिवासातील रोजनिशी - अर्थात लॉक डाऊन डायरी

बंदिवासातील  रोजनिशी - अर्थात लॉक डाऊन डायरी 

a situation in which people are not allowed to enter or leave a building or area freely because of an emergency:

या परिस्थितीतून आपण नक्कीच बाहेर पडू , पण त्या साठी या परिस्थितीत मी  बाहेर पडणार नाही अशी बंदी स्वतः वर स्वेच्छेने घालून घेतली तर ...
.
मग करायचे काय वेळ कसा घालवायचा ?  हाच हाच तो चुकीचा प्रश्न. कारण मला वाटते हा प्रश्न स्वतः ला विचारताना -

मग करायचे काय वेळ कसा वापरायचा  ?  असा विचारला कि उत्तर सापडेल कारण तुम्ही मनाने मी या वेळेत काय केले पाहिजे हे स्वतः ला प्रामाणिक पणे विचाराल .

एक दिवस त्यातील चोवीस तास त्यात सहा ते दहा तास झोप  या पासून सुरु होणारे वेळापत्रक तुम्हाला चोवीस तास  विभागून देईल मग असे वेळा पत्रक आज घरी असलेल्या प्रत्येक सदस्याचे बनवले तर

आई अथवा बायकोसाठी - वेळ पुरता पुरेना

वयोवृद्ध मंडळींसाठी - वेळ जाता जाईना

लहानपणाची देणगी अद्याप शाबूत असलेल्या  गोजिऱ्यांसाठी -  रोजचे वेळेचे नियोजन म्हणजे आता मी काय करू ? या सतत येणाऱ्या प्रश्नाला आपले उत्तर तयार ठेवणे

घरातल्या तरुणाई साठी - अरे तुम्ही थोडा तरी वेळ घरच्यांसाठी देणार कि नाही ? असा कधी प्रेमाने तरी कधी त्राग्याने विचारलेला प्रश्न

म्हणजे एकच वेळापत्रक पण त्याची विविध रूपे. त्यातील बाल गट ज्यांचे वेळापत्रक सांभाळणे हा आपल्याच वेळापत्रकाचा भाग आणि वयोवृद्ध मंडळींसाठी त्यांचे वेळापत्रक सांभाळणे हा आपल्याच जबाबदारीचा भाग

या सर्व गुंतागुंतीकडे मी कोठे आहे आणि मी स्वतः काय करू शकतो घरासाठी आणि स्वतः साठी ? या प्रश्नांच्या उत्तरासाठी मला तयार होणे जरुरीचे आहे.
तर मग तोडा वैचारिक लॉक डाऊन आणि ठरवा मी इतरांसाठी काय करणार आत्ता  आणि लॉक डाऊन संपल्यावर देखील .... 


Friday, January 10, 2020

प्राक्तनाचे ओझे .... ( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )



कुठून सुरु करू माझी गोष्ट ? आज १० जानेवारी २०२० म्हणजे आता त्या घटनेला चार दशके आणि चार वर्षे होऊन  देखील तो दिवस मला लख्ख आठवतोय .....

"जा रे, दिपकच्या आई कडून एक वाटी साखर घेऊ ये " आजी ने फर्मान सोडले. मला नेमके न आवडणारे काम माझ्या समोर आले . खरे तर दिपकची आई मला कधीच रागवत नसे. पण कोणाकडे जाऊन काही मागून आणायचे म्हटले कि माझ्या अंगावर काटा  येत असे.

या लोकांना इतके पण कसे समजत नाही,घराशेजारी भरभरून वाहणारे किराणा मालाचे दुकान असताना रस्ता ओलांडून दिपकच्या आईकडून साखर कशाला हवी.
मग मी आजीला म्हणत असे -" आजी मला पैसे दे मी दुकानातून तुला पावशेर साखर लगेच आणून देईन. "

त्यावर आजी म्हणे - " अरे आज चार तारीख अजून चार दिवस आहेत पेन्शन मिळायला , मी काय पैसे कनवटीला लावून तुला दीपकच्या आईकडे पाठवतेय का ? " मग मला पुढचा प्रश्न पडे ,  जर अजून चार दिवसांनी पेन्शन येणार हे माहित होते तर मग आधीच थोडी जास्त साखर का नाही विकत घेता येत दुकानातून ?

" अरे अजून काय सुंभा सारखा उभा आहेस , बाहेर तुझ्या मामाचे मित्र आलेत, इकडे आधण उकळतेय आणि घरात साखरेचा पत्ता नाही , जा कि पटकन . " आता आजीच्या फर्मानात वचक नव्हता पण अगतिकतेची  झाक होती. मग मात्र मी पटकन वाटी शर्टाच्या खाली लपवली आणि दिपकच्या आई कडे निघालो.

माझी वाटी लपवण्याची धडपड बघून त्याही गडबडीत आजी पटकन म्हणाली - " जा कि आता ताकाला जाताना भांडे कशाला लपवतोस ? "
" मी जातोय ना साखर आणायला ! आता मध्येच ताकाचे भांडे कशाला काढतेस ? " असे म्हणत मी बाहेर पडलो. आणि मागे आजी पुटपुटली , आताच्या पोरांना शाळेत काही शिकवतात का मास्तरच आडाणी राहिलेत काय माहित , जाऊ दे  'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार.  '

मी दिपकच्या घरात ,त्याची आई वामकुक्षी घेत पडली होती पडल्या पडल्याच ती म्हणाली - " येरे आत्ता दुपारचा कारे आलास ? "  मी एक हात शर्टाच्या आत ठेवून नुसताच चुळबुळत उभा. अरे दीपक त्यांच्या मित्रांकडे गेलाय.

"म .. मला आजीने पाठवलय, थोडी थोडी ... " असे चाचरत उभा राहिलो . आता दिपकची आई उठून बसली आणि म्हणाली - " अरे  काय पाहिजे होते तुझ्या आजीला ? "

" साखर " जवळ जवळ मी ओरडलोच आणि धाडकन वाटी खाली पडली. आतल्या खोलीतून दिपकची धाकटी बहीण नंदा धावत बाहेर आली . आणि माझी एकूण उडालेली त्रेधातिरपीट पाहत आईला म्हणाली - " ये आई काय झाले ? "

त्यावर त्या म्हणाल्या 'अग याच्या आजीने साखर मागितली आहे ,बरे झाले आता तू आली आहेस तर त्याला आत स्वयंपाकघरात घेऊन जा आणि एक वाटीभर साखर दे '

नंदा माझ्या कडे वळून म्हणाली -"चल रे वाटी उचल आणि आत ये." माझे सगळे ताण संपले, जणू काही मीच एखादा गड जिंकल्याच्या  आनंदात तिच्या मागून आत गेलो. तिने साखरेचा डबा उघडून समोर धरला आणि म्हणाली - ' घे तुला हवी तेव्हढी.'

 डब्यातून साखर  घेताना तिच्या दोन्ही हातांच्या मधून वाटी डब्यात घालून साखर  काढताना माझा कोपर तिच्या नाजूक गालांना घासला आणि एक झटका बसून वाटी पुन्हा डब्यात  पडली .

" अरे सांडशील ना साखर , थांब मीच देते काढून असे म्हणत डबा जमिनीवर ठेवला आणि वाटी उचलायला ती वाकली आणि नेमके तिचे डोके माझ्या छातीवर आदळले. मगाशी हलका झटका होता तर आता वीजच कडाडली . साखरेची वाटी तिच्या हातातून घेताना या गडबडीत मी तिचे दोन्ही हातच धरले. " अरे हात सोड वाटी धर . " या तिच्या सूचनेप्रमाणे पटकन वाटी घेतली , आणि तिथून धूम ठोकली.

वाटी आजीच्या समोर जवळ जवळ आपटली आणि माझ्या माडीवरच्या खोलीत पळालो. सर्व अंग शहारले होते एक वेगळीच लहर उठली होती. नक्की काय झाले ? मी स्वतः लाच प्रश्न विचारले ? पण उत्तर कुठेच नव्हते . तो दिवस होता १० जानेवारी १९७६.

हो ती तारीख आणि तो दिवस आजही लक्षात आहे कारण तो माझ्यातील चेतनांना नेणिवेतून जाणिवेत नेणारा दिवस होता . माझ्या आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले होते आणि या लहरी माझ्यापर्यंत पोहचवणारी लहरी नंदा यात कुठे होती ?

आता तुम्हाला सांगतो हे घडले तेंव्हा मी असेन जेमतेम पंधरा वर्षांचा तर नंदा अकरा वर्षांची. मी तिला लहरी नंदा म्हणतो कारण , साखर घोटाळा तिच्या गावीही न्हवता.  आणि माझ्या साखरेचे पाणी पाणी झाले होते . नंदाचे आणखी एक घर गावाबाहेर मळ्यात होते ती तिकडे राहायला गेली. साखर डबाबंद झाली .  ते वर्ष माझे दहावीचे वर्ष होते, पुढील वर्षी अकरावी त्यात पास होणे हेच प्रमुख ध्येय होते त्यामुळे असेल पण माझ्या साखर प्रकरणातील गोड आठवणी तात्पुरत्या विरघळून गेल्या.

मी मामाकडे राहणे म्हणजे आजीला सोबत, थोडी घरात मदत, अशी कारणे समाजाला सांगण्यासाठी होती. पण खरे  कारण घरची गरिबी , वडिलांची सरकारी नोकरी संपलेली , तीन मुलांचे पालन पोषण एक मोठे आव्हान आणि त्यामुळे अस्मादिक घरापासून दूर. अर्थात तेंव्हा इतके सारे समजत होते असे नाही पण शिक्षण हाच आपला आधार याची जाणीव मात्र पूर्णतः झाली होती. आणि त्यामुळंच साखर प्रकरणाची गोडी चाखत बसणे  म्हणजे आपलेच थडगे आपणच खणणे असे होते

त्यामुळे ते वर्ष संपून गेले, आणि पुढील वर्षी शाळा संपली आणि प्रथमच महाविद्यालयाची पायरी चढलो.  सकाळचे कॉलेज संपले कि दिवस तास रिकामा असे

आणि अशाच एका दुपारी घरी एकटाच होतो सहजच समोर नजर गेली तर काय दारात नंदा उभी होती. मळ्यातल्या घरातून गावातल्या घरी आली होती. शाळेच्या ड्रेस मध्ये खूपच गोड दिसत होती .

प्रथम नुसतीच हसली, मग तिला "कसे काय ? "असा सहजच प्रश्न केला तर उत्तरादाखल पुन्हा नुसतीच लाजली. मी काहीतरी विचारायांचे म्हणून -"शाळातून केंव्हा आलीस?"  असे विचारले. पण रस्त्यावरच्या रहदारीच्या गोंगाटात तिला प्रश्नच कळला नाही . मग ती पटकन घरात आली आणि मला म्हणाली "कशाला बोलावलेस ? " मी पुरता संभ्रमात पडलो.

तिला म्हटले -"अगं शाळेतून कधी आलीस असे विचारले ?" तेंव्हा ती म्हणाली -" बराच वेळ झाला , केव्हाची तुला पाहतेय पण लक्षच नसते तुझे. बघावे तेंव्हा आपल्याच तंद्रीत "

" म्हणजे तू मला पाहतेस आणि मी दुर्लक्ष करतो का ? "

तसे नाही," पण साखरेची गोडी कमी नाही ना झाली ? " आज १० जानेवारी आहे आहे का काही आठवणीत का गेले सगळे सांडून !"

आणि एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला.एक वर्षांपूर्वीचा तो निसटता स्पर्श तिने अजूनही निसटून जाऊ दिलेला नाही तर. आणि त्या आठवणीने मधला काळ एकदम पुसला गेला.

 तो प्रसंग पुन्हा आठवला, त्यातील आवेग क्षणात उफाळून आला आणि मी तिला एकदम मिठीत घेतले तिच्या गोऱ्या पान मांड्यांच्या  वरचा निळा स्कर्ट वर करून मी तिला अक्षरशः ओढून जवळ घेतलेआणि  तिच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत, तिच्या वर चुंबनांचा वर्षाव केला.  सर्व गात्रे पेटून उठणे म्हणजे काय ? स्त्री स्पर्शातील आगळी वेगळी ताकद मी प्रथमतः त्या दुपारी अनुभवली .....

आणि ती लहरी नंदा ज्या वेगाने आली त्याच वेगाने निघून गेली , आम्हा दोघांची वये त्यावेळी अजाणती होती. भेटीत कसलाच स्वार्थ दडलेला नव्हता. यात काही फसवणूक असू शकते याची जाणीव देखील नव्हती. जे घडले ते पुर्णतः आजणता झाले होते

पण त्या नंतर आज चव्वेचाळीस वर्षानंतर देखील पुन्हा कधीही १० जानेवारी हि तारीख कॅलेंडरवर आली कि ती दुपार मला अपराधी करते कारण पुन्हा कधी भेटण्याचा योगच  आला नाही.

 तिच्या बाबांची बदली झाली. मामाचे गाव सोडून पोटापाण्यासाठी मीही दुसऱ्या गावी निघून आलो. काही वर्षांनी आजी निवर्तली आजोळ संपले, वाटा  भिन्न झाल्या. जे दिले ते सर्वस्वाचे दान घेऊन देखील आज माझी ओंजळ रितीच राहिली. तिची इच्छा जाणून घेण्याची संधी प्राक्तनाने मला कधीच का दिली नाही ? या अनुत्तरित प्रश्नाचे ओझे आयुष्यभर सांभाळत   तिने जे काही दिले ते दान मी माझ्या फाटक्या झोळीत अजूनही जपून ठेवले आहे.

( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )






Wednesday, January 1, 2020

शून्यमनस्कता -

आज इंग्लिश कॅलेंडर नुसार कालगणनेतील पुढील वर्ष सुरु झाले. आणि ते सालाबादाप्रमाणे यंदाही मित्र परिवारांबरोबर साजरे केले. पण एक जानेवारी दोन हजार वीस ( १. १. २०२० )  च्या सकाळी मन एका वेगळ्याच विचारात गुंतून गेले.

नवे वर्ष ,नवा दिवस, नवे संकल्प .... हे तर सारे नेहमीचेच पण तरीही एक अनामिक हुरहूर का ? आणि ती  कसली याचा उलगडाच होत नाही अशी वेगळीच मनःस्थिती  का ?

अर्थात लगेचच अनेकांच्या मनात पहिला विचार आला असेल ,कालची उतरली नसेल त्यामुळे असले काहीतरी लिहीत बसलाय . पण कालचे आमचे नव वर्ष स्वागत तिच्या एका थेंबाला स्पर्श न करता केले होते. मग आज विचारांच्या या साखळीत मन का गुंतून गेले ?

३१ डिसेंबर मागे पडला आणि , किती वेगाने दिवस संपतात ?कुठे  होतो कुठे आलो ? आज पर्यंतच्या जीवनात काय कमावले काय गमावले ? नातेसंबंध  आणि संबंधातील नाती त्यांचे गुंते या सारख्या प्रश्नांच्या जंजाळात मन भरकटत गेले.

मागे वळून पाहताना काळाचा संदर्भ देखील संदर्भहीन वाटावा इतक्या वेगाने मन गत  आठवणींना स्पर्श करून आले. त्यावेळची  काही नात्याची ओढ आणि आज त्यामुळे होणारी ओढाताण याची सरमिसळ इतक्या वेगाने झाली कि हा मानसिक आंदोलनाचा रोलर कोस्टर आहे का गत  जीवनाच्या कॅनव्हास वरील चित्रातील शून्यमनस्कता आहे याचा उलगडाच झाला नाही.

सगळं कस अबस्ट्रॅक्ट चित्रासारखे - चित्रातील गुंता खरा का गुंत्यातीळ  चित्र खरे  ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे हेच नव वर्षाचे ध्येय असे ठरवूनच आता थांबावे हेच बरे ....

Wednesday, April 24, 2019

मला समजलेले तुकाराम -४

संत तुकारामांच्या कालखंडाचा विचार केला तर उच्च नीच , ब्राह्मण ब्राह्मणेतर , या गोष्टी किंवा बलुतेदारी पद्धतीचा पगडा असणारा कालखंड . त्यामुळे धर्मपरायणतेच्या नावाखाली विधी,  संस्कार  याचे स्तोम कुलधर्म कुळाचार यांचे अवाजवी महत्व असणारा असा तो काळ होता.

त्यामुळे भक्ती मार्गात येणाऱ्या अडचणी व त्यांचा सर्व सामान्यांना होणार उपसर्ग याबाबत तुकाराम महाराज सर्व परिस्थिती जाणून होते . या अनंत अडचणींवर मात करीत विठ्ठल भक्ती करताना तुकोबा म्हणतात -

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ।।१।।

विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारुं ।उरतील पारू भवनदीचा ।।ध्रु ।।

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ।।२।।

विठ्ठल हे जन विठ्ठल माझे मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ।।३।।

तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरीत गांवा जाइन त्याच्या ।।४।।

जर या रचनेकडे आपण काळजीपूर्वक बघितले तर असे लक्षात  येते कि , भक्तिसारखी एखादी गोष्ट मनापासुन करताना ती विधिवत षोडोपचार पद्धतीने पूर्ण करणे प्रत्येकास जरी शक्य नसले तरी ती गोष्ट जीवा भावाची मानून करणे जरुरीचे आहे.म्हणजे कुळाचार कुळधर्म यांचे अवडंबर न करता देखील विठ्ठल भक्तीत रममाण होता येईल. खरेतर अवडंबराची गरज नसते आणि खरी भक्ती मनःशांती देते हेच तुकोबा नमूद करतात.

जेंव्हा महाराज अशा सहज सोप्या दाखल्यातून जनसामान्यांना भक्ती आणि नीती यांचे नाते दृढ करून सांगत तेंव्हा समाजातील दांभिक त्यांच्यावर  सातत्याने टीकेचा भडीमार करत असत , त्याबाबत त्यांना गुरु नाही स्वतःला शहाणे समजणारे असा टीकेचा सूर असे . घरी लक्ष देत नाही म्हणून धर्मपत्नी इतर नातलग यांची नाराजी असे . तर समाजातील उच्च पदस्थ ते जनरीत पाळत  नाहीत या कारणास्तव   त्यांना सत्याने घालून पडून जिव्हारी लागेल अशी टीका करीत

या सर्वच परिस्थितीत नाउमेद न होता या टीकेला उत्तर देताना या सर्वावर माझी माउली आणि  तिची भक्ती हाच सर्वोत्तम तोडगा आहे हे सांगताना त्यांनी -

विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारुं ।उरतील पारू भवनदीचा ।।ध्रु ।।

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ।।२।।

विठ्ठल हे जन विठ्ठल माझे मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ।।३।।

इतक्या सहज सोप्या शब्दात टीकाकारांना निरुत्तर केले आणि भक्तांना प्रोत्साहित केले आहे आणि या रचने  शेवट करताना -

तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरीत गांवा जाइन त्याच्या ।।४।।

या शब्दात त्यांचे विसाव्याचे ठिकाण देखील विठ्ठलच आहे आणि माझे सर्वस्व पणाला लावून त्याच्या प्राप्तीसाठी मी धडपडत राहीन हेच सांगितले आहे.

विठ्ठल हाच त्यांच्या समाज प्रबोधनातील गुरु कसा होता याचेच प्रत्यन्तर आपणास या रचनेतून मिळते असे मला वाटते

Saturday, March 31, 2018

मला समजलेले तुकाराम -३

संत तुकाराम यांनी भागवत धर्म आणि त्याचे आचरण यांचे महत्व सांगताना, सामान्य वारकरी सतत डोळ्यासमोर ठेवला होता. आणि नामस्मरण, एकाग्र चित्त याद्वारे आपला दिनक्रम पार पडताना विठ्ठल भक्तीतून सरळ मार्गी जीवन आणि त्यामुळे मिळणारे सात्विक समाधान याचे महत्व सातत्याने नमूद केले आहे . त्यामुळे आपल्यात विठ्ठल किंवा विठ्ठल भक्त्तीत आपण कसे मग्न झाले पाहिजे हे सांगताना ते म्हणतात -

विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती । विठ्ठल विश्रांती भोग जया ।।१।।
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनी । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ।।ध्रु ।।
विठ्ठल जागृतीस्वप्नी सुषुप्ति । आन दुजे नेणती विठ्ठलेंविण ।।२।।
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरा ।।३।।
तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुरालें दुजेपणें ।।४।।

या अभंग रचनेतून आपण ज्याची भक्त्ती करतो तो ईश्वर चराचरात आहे हा मुद्दा पटवून देण्यासाठी जणू त्यांनी ठायी ठायी विठ्ठलाचे भान ठेवा असा आग्रहाचा सल्ला दिला आहे .त्याचे स्मरण गाण्यात असुदे ,मनात असुदे , आयुष्याचा  उपभोग घेताना विठ्ठलाची आठवण विसावा घेताना राहूदे .
उठता बसता ,झोपेत जागेपणी खाता पिता या सर्व जाणिवेच्या क्रिया करताना विठ्ठल आठवा हे ते सांगतात . पण त्या पलीकडे जाऊन नेणिवेत देखील विठ्ठल हवाच हे सांगताना त्यांनी सुषुप्ती या शब्दाचा केलेला वापर खरोखर स्तंभित करणारा आहे .
कारण सुषुप्ती या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ संपूर्ण निसर्ग रचने आत्मभान ठेवत जाणीव जपणारी परिपूर्ण अवस्था असा आहे तर या अवस्थेत देखील त्याची आठवण ठेवणे म्हणजेच जाणिवेतून नेणिवेकडे जाणे आहे हे त्यांनी समजावून दिले आहे .
माणूस जसा आभूषणे अलंकार यांनी नटला कि सुखावतो तसे तुम्ही विठ्ठल भक्तीत भरून जाता . आणि या विठ्ठल भक्त्तीचे असामान्यत्व अधोरेखित करताना ते म्हणतात , अशी मनपूर्वक जे त्याचे स्मरण ठेवतात ते माझ्या साठी विठ्ठलच आहेत . आणि दुसऱ्या कोणत्या विठ्ठलाची आस उरलीच नाही .

अर्थात हे मला भावलेले मी आपणासमोर मांडले , आणि हेच माझे तुकोबाच्या नजरेतील विठ्ठल दर्शन आहे .

Wednesday, February 28, 2018

मला समजलेले तुकाराम -२



          संत तुकाराम म्हटले कि भागवत धर्म आणि त्यांनी केलेला लोकजागर या दोन गोष्टी आपण विसरूच शकत नाही . पंढरीचा विठुराया हे जनसामान्यांचे आराध्य दैवत आहे ,आणि जनजागृतीसाठी विठलचरणी लिन होण्यासारखे प्रभावी साधन नाही याची जाण तुकाराम महाराजांना पुरेपूर होती . मात्र या विठ्ठल भक्तीचा त्यांनी जनजागृतीसाठी वापर केला असे न म्हणता मी म्हणेन कि त्यांनी लोकांच्या विठ्ठल भक्तीचा आदर केला .

          विठ्ठल महात्म्य जनसामान्यांना समजावण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक अभंगाबाबत आपण अभ्यास करू शकतो.. पण तुकारामांनी आपले विठ्ठलाशी असलेले नाते समजावून सांगताना विठ्ठलास इतक्या विविध रूपात पहिले आहे कि , तुकाराम आणि विठ्ठल यांना आपण वेगळे करूच शकत नाही .
त्यांच्या एका रचनेत ते म्हणतात -

विठ्ठल टाळ  विठ्ठल दिंडी !विठ्ठल तोंडी उच्चारा !!१!!
विठ्ठल अवघ्या भांडवला ! विठ्ठल बोला विठ्ठल !! ध्रु !!
विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद  विठ्ठल !! २!!
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा ! तुकया मुखा  विठ्ठल !! ३!!

         याठिकाणी टाळातील लय त्यांना विठ्ठलात दिसते, आणि दिंडीतील भान हरपून समरसणे त्यांना अचूक टिपता येते . वारीतील सहभाग त्यांना अशारीरिक पातळीवर अभिप्रेत असावा असे मला वाटते. म्हणून तोंडी विठोबाचे नाव असावे असे सांगता सांगता त्यांनी विठ्ठल भक्तीची  पुढची पायरी नाद पार करून तुम्ही
या भक्तीच्या छंदात रममाण होण्याचा सल्ला ते सहजतेने देतात.

        कधीकधी एखादे लहान मुल भवताल विसरून जेंव्हा स्वतः मध्ये रममाण होते आणि आपलेच भान विसरून जाते आणि त्याच्या त्या कृतीला त्या बाळाची आई सहजतेने म्हणते ,"नादिष्ट आहे अगदी ! " तो नाद तुकोबांना विठ्ठल भक्तीत हवा आहे . आणि वाढत्या वयानंतर माणसाला आपल्या उपजीविकेच्या पलीकडे कुठेतरी स्वानंद देणाऱ्या आणि समाजप्रिय कार्यात गुंतवून घेण्याच्या वृत्तीस छंद म्हणवून घेता आले पाहिजे असे काहीतरी तुकोबांना वाटले आणि म्हणून त्यांनी -विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद  विठ्ठल ! असे सांगितले असावे असे वाटत राहते.

        कारण शेवटी जगण्याच्या धडपडीत सुख आणि दुःख हे व्यक्तिसापेक्ष आणि  बदलते असले तरी ते प्रत्येकास अनुभवावे लागतेच . मात्र हा जीवनानुभव घेताना त्यास सामोरे जाताना तुमच्या जगण्यात सहजता यावी म्हणून विठ्ठलाचे स्मरण ठेवा हे सांगताना आधी केले मग सांगितले या तत्वा नुसार या रचणे सांगता करताना तुकोबा म्हणतात -  तुकया मुखा  विठ्ठल !! ३!!

       म्हणजेच तुम्हाला कोणी नादिष्ट कोणी छंदिष्ट म्हटले तरी स्वानंद घेण्यासाठी समाजहित साधने हीच खरी साधना हाच अर्थ मला या रचनेत दिसला . 

Monday, February 19, 2018

मला समजलेले तुकाराम


नुकताच माझा वाढदिवस झाला , किती जगलो ,किती वय झाले हे महत्वाचे, कि कसा जगलो ते महत्वाचे,असा विचार मनात आला . म्हणजे आता वय झाले असे  नाही तर आपण नक्की काय साधले  ? काय मिळवले ?  असा स्वतःला प्रश्न विचारला .

मग गेल्या अनेक वाढदिवसांच्या निमित्ताने आलेल्या भेटवस्तूंची पाहणी केली , आणि त्यातील एका पुस्तकरूपी भेटीपाशी मन थबकले , कारण माझ्या एका सहकारी मित्राने मला  माझा वाढदिवस होता आणि मी माझी पी. एचडी पूर्ण केली म्हणून  भेट  दिली होती , ते पुस्तक म्हणजे संत तुकाराम यांचे - ' अभंगाचा गाथा '

अर्थात गेले अनेक दिवस ते पुस्तक वाचावयास घेणे राहून जात होते, कारण ते पुस्तक हातात घेतले कि, मला माझ्या त्या मित्राची आठवण येते आणि आज तो या जगात नसल्याने मन त्याच्या आठवणींनी विचलित होते. पण नंतर जेंव्हा या पुस्तकाचे वाचन सुरु केले तेंव्हा बुवांच्या अफाट बुद्धिमत्तेने स्तंभित झालो .

गाथेतील अभंग वाचताना मन नतमस्तक होते. संत परंपरेतील प्रत्येक संत महानच आहेत पण विठ्ठल रुपी प्रबोधनाच्या मंदिर उभारणीतील या संतांचा सहभाग सातत्याने अधोरेखित होतो. आणि  ' ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस । ' या वाक्याची प्रचिती पदोपदी येते .

संत तुकारामांनी भागवत धर्म आणि विठ्ठल भक्ती यातून समाज प्रबोधन करताना जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे . आणि या समाज परिवर्तनाच्या कार्याची अफाट ताकद जेंव्हा त्यावेळच्या तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या लक्षात आली तेंव्हा त्यांनी तुकाराम महाराज यांच्या या कार्यास विरोध केला . त्यातून त्यांनी त्यांच्या हस्तलिखित प्रति इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या .

तेंव्हा त्या डोहात त्या हस्तलिखित प्रति बुडाल्या, पण महाराजांनी प्रबोधनातून केलेला जनमानसावरील ठसा कधीच पुसता आला नाही त्यामुळे गाथेतील संदेश कायमचा टिकून राहिला .अशा या अभंगांमधील काही निवडक काही परिचित काही अपरिचित अभंगांचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे . म्हणूनच या लेख मालेचे शीर्षक आहे - मला समजलेले तुकाराम .

 प्रत्यक्ष गाथा वाचन आणि अभंगांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सुरु करण्या पूर्वी , या घटनेच्या इतिहासाचा मागोवा घेताना अचानक मनात पुढील ओळी आल्या - 


                                   बुडविली गाथा डोही । इंद्रायणीस  भार नाही ।

                                   दुभंगली पाने शाई। प्रत्येक मनी  आक्रोश राही ।।१।।

                                   दांभिक पंडित चेकाळले । बुवा मनी  थरारले ।

                                   घातले विठुरायास साकडे । गाथा आली तुजकडे ।।२।।

                                    विठ्ठल मनी आठवता  । गाथाच  झाली सरिता  ।

                                    गाथा स्थिरावली डोही । अभंग झाले प्रवाही ।।३।।

Wednesday, January 31, 2018

ऐसे ही किसी रोज ना जाने के लिए आ ....

ऐसे ही किसी रोज ना जाने  के लिए  आ ....

दूरवर हलकेसे वरील शब्द कानावर पडले आणि कुठेतरी खोलवर तिच्या आठवणीने गलबलून आले . तिच्या माझ्यातील नाते संबंध आणि हि गझल किती समांतर आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येत गेली .

खरे तर तिची माझी भेट झाली त्याला आता तीन दशके संपून गेलीत , जगासाठी ती कुमारी ,सौभाग्यवती आणि आता विधवा अशा अनेक रूपात माहित असेल पण माझ्या साठी मात्र ती या नितांत सुंदर गझलेतील प्रेयसीच आहे .

पहिली सुरवातीची तिची ओढ म्हणजे सगळे जग सोडून धावत येऊन गळ्यात पडणे म्हणजे काय असते याची प्रचती होती . काळ पुढे धावत होता ,प्रेमा पलीकडे असलेल्या वास्तव जगाचे प्रश्न समोर आले होते , जीवनात किमान स्थैर्य येण्याची धडपड सुरु असतानाच तिला घरच्यांच्या दबावाला झुकून लग्नासाठी उभे राहावे लागले होते .

त्यावेळी तिने तिची अगतिकता एका छोट्या पत्राने मला कळवली होती . त्याचे पाठवलेले उत्तर तिला कधीच मिळाले नाही . माझा होकार माझ्या मनात तसाच राहिला .  तिचा साखरपुडा झाला आणि एकदा तिच्या नियोजित वरा  बरोबर फिरावयास बागेत आलेली नजरेस पडली ती दुरून झालेली नजर भेट तिने स्वीकारलेला निर्णय किती अगतिकतेमधून आहे हेच सांगत होती .पण आता मागे वळून येणे तिला शक्य नव्हते ,ती तिच्या मार्गाने पुढे गेली  आणि ती सौभाग्यवती झाली पण अन्य कोणासाठी तरी ....

आणि मी तिच्या समोर असताना काहीही ओळख दिली  नाही कारण मला तिच्या जीवनात जरासुद्धा दुःख असावे असे कधीच वाटले नाही पण मन मात्र आक्रनंदुन म्हणत होते -----

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ।

कारण असे वाटायचे अजूनही काहीतरी असे घडेल , ती येईल प्रेम करण्यासाठी नाही तर माझ्या प्रेमाला धक्का देण्यासाठी येईल एकदाच भेटून ती का दुसऱ्याची झाली हे डोळ्यात पाणी आणून सांगेल आणि मला त्या गझलेतील पुढील शब्द माझी आर्तता तिला पोहचवत आहेत  असे वाटून ओठावर  शब्द आले .....


रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

मन जरी म्हणत असले तुला त्रास नको तू आता माझी नाहीसच तर मी का तुझा हट्ट धरावा , म्हणून समाजासाठी ये ,सोडून जाण्यासाठी ये , असे  प्रेयसीला मन म्हणत असले तरी हृदयाचा आवाज तिला इतकेच सांगू इच्छित आहे कि ....

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ


रंजिश ही सही... ( एक कल्पना चित्र - मनातल्या काल्पनिक प्रेयसीचे )


Thursday, January 25, 2018

भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

दिनांक ३१ डिसेंबर २०१० या दिवशी मी ' मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने ' या ब्लॉग लिखाणास सुरवात केली . प्रथम लेखांचा / कवितांचा किंवा काहीतरी लिहीत राहण्याचा वेग बरा होता. पण गेली दोन तीन वर्षे लिखाण जवळ जवळ थांबलेच .

पण आता पुन्हा काही तरी लिहीत राहावे . जरा मनमोकळेपणाने व्यक्त व्हावे असे वाटायला लागलेय म्हणून पुन्हा सुरवात करायचे ठरवलंय . बघू कसे जमतेय . बरेच दिवस  कोरा असलेला कॅनव्हास काही रंग भरले तर बोलेल का ? त्यावरचे चित्र मनोगत उलगडून दाखवण्यास समर्थ ठरेल का ? अशा काही शंकांनी मन भरून गेले आहे . पण रेखाटन केल्याशिवाय जसे चित्र पूर्ण होत नाही तसे मनातील  भावनांना शब्दरूप दिल्याशिवाय मनास . हलके वाटत नाही हेच खरे .

जेंव्हा ब्लॉग लिखाण सुरु केले तेंव्हा आपला ब्लॉग कोणी वाचेल का ? अशी एक पुसटशी शंका मनात होतीच . नियमित लिखाण असताना एक ते आठ हजार पर्यंत वाचकांच्या भेटी टप्या टप्याने होत गेल्या पण लिखाण थांबल्यानंतर देखील होणाऱ्या वाचक भेटीने अकरा  हजार  भेटीचा टप्पा गाठला आणि पुन्हा काहीतरी  लिहावे  या विचारांनी उचल खाल्ली .

तर मग आता किमान महिन्यातून दोनदा मी आपणास  भेटणार ,  म्हणजे मी आता पुनर्भेटीस येत आहे . कधीआनंद देणार तर कधी कंटाळून टाकणार ( बोअर करणार ), बघू आता त्यात तरी नियमीत पणा ठेवता येतोय का ?

कारण आपल्या पुनर्भेटीची ओढ मलाच स्वस्थ बसू देत नाही म्हणून मी पुन्हा ब्लॉगकडे वळालोय , तर करणार ना स्वागत माझ्या स्वनिमंत्रित भेटीचे ?

Thursday, July 9, 2015

ओढ पंढरीची ।

बोलविता 'तिने' धावलो मनाने ।
चालला देह वारीसंगे ।
खुण गाठ मनाशी। पोचता  पंढरीशी। 
घेईल 'माउली' मजशी उराशी ।।१।।

गेला जन्म दुखः भोग यात ।
संपली हयात हीच यातायात ।
तरी त्याची आस असते मनात । 
देईल 'बाप' सावली जराशी ।।२।।

वारीचा अट्टहास । घडवितो उपवास ।
गजर नामाचा हाच एक श्वास ।
संपता खडतर वाट  कैवल्याची ।
दिसे  'मायबाप' मज पंढरीशी ।।३।।

Wednesday, April 29, 2015

असा हा प्रतिभावंत संगीतकार - श्रीनिवास खळे

 सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..तालुक्याच्या गावी पदवी पर्यंतचा शिक्षणाचा  टप्पा अंतिम पर्वात आला होता . पदवी परीक्षा काही दिवसांवर आली होती . महाविद्यालयास कायमचे सोडून जाण्याचे दिवस अगदी जवळ आले होते.
                            आसपासचे अस्सल ग्रामीण वातावरण, पदवीनंतर स्वतःच्या शेतीवाडी कडे वळणारा मोठा विद्यार्थी वर्ग असलेला, आमचा वाणिज्य शाखेचा तो वर्ग होता . पण त्यातही कलागुण, भाव भावना यांची जपणूक करणारा शिक्षक वर्ग होता, त्यांच्या  कृपेने आमचा निरोप समारंभ नक्की झाला होता.
                        त्या अखेच्या दिवशी आमच्या वर्गातील एका सुरेल गळा लाभलेल्या मित्राने आमच्या कार्यक्रमास साजेसे एक भावगीत सादर केले, त्या गीताचे शब्द होते ...
       वेगवेगळी फुले उमलली रचुनि त्यांचे झेले
       एकमेकांवरी उधळले
       गेले, ते दिन गेले !
                     त्या दिवशी त्या गाण्यानी मला इतके अंतर्मुख केले कि ,ते स्वर आणि ते सूर मी पुढे कधीच विसरू शकलो नाही.माझी आणि श्रीनिवास खळे ( खळे काकांची ) यांची हीच पहिली  ओळख. आणि त्यानंतर माझी आणि खळे काकांची मैत्री दृढ झाली ती त्यानंतर आजतागायत
                     अगदी काका आपल्यातून जावून सुद्धा, माझी आणि खळे काकांची मैत्री तशीच टिकून आहे.कारण हि मैत्री निर्गुणी निर्मोही अशी आहे.
                     अहो आमची मैत्री म्हणजे जगाला सांगण्यासाठी किंवा फोटो, सत्कार या प्रकारातील नव्हतीच, मुळातच ती मैत्री म्हणजे कलाकार आणि रसिक यांच्यातील मैत्र होते. हे मैत्र म्हणजे नात्याचा वीण जो सुरांनी गुंफलेला  एक घट्ट पीळ आहे. आणि त्यामुळेच तो त्यांच्या जाण्याने पण संपलेला नाही.
                      खरेतर खळे यांनी दिलेली प्रत्येक रचना, त्या गीतातील शब्द सामर्थ्य, सुरांच्या संगतीने अनेक पटीने सहजतेने वाढविते. आणि मग ते गीत प्रत्येक रसिकास अगदी आपलेच वाटू लागते.आणि हा आपलेपणा देणाऱ्या संगीतकारास मी माझा मित्र मानले ते त्यांच्यावरील अपरंपार भक्तीतून.
                      आज 30 एप्रिल श्रीनिवास विनायक खळे या संगीतकाराची जयंती. खळे काका आपल्यात नाहीत त्याला आता चार वर्षे झाली .पण त्यांच्या संगीत रचनेने त्यांना दिलेले अमरत्व हे त्यांच्या संगीत सुरातील अमृताच्या गोडीत दडलेले आहे. मला खळे हे सहानभूतीने शब्दांना सूर देणारे संगीतकार आहेत असे नेहमीच वाटते
                      या ठिकाणी मी वापरलेला सहानभूती हा शब्द सह + अनुभूती  या अर्थाने म्हणजेच आपल्या मनातील अनुभूती सह स्वरांना सूर देणारा संगीतकार म्हणून मी त्यांच्या रचनांकडे पाहतो.त्यांच्या रचनांमधील भक्ती गीते आणि भाव गीते ऐकतांना नेहमीच मला असे वाटते कि, त्यांच्या प्रत्येक भक्ती गीतात भाव आहे आणि प्रत्येक भाव गीतात भक्ती आहे.
                        प्रेम भाव हा प्रत्येक मानवी मनाचा ठाव घेणारे  एक न उलगडलेले कोडे आहे. प्रियकर आणि प्रेयसी  यांच्या भाव भावना शब्द बद्ध करणाऱ्या अनेक रचना आज मराठीत आहेतच, पण त्या रचनेला जर खळे टच मिळाला तर शब्दा मागचे भाव वेगळाच भाव खावून जातात.
                       श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले कि प्रेम गीते हि केवळ दोघांचीच उरतात.त्यांचे स्वरूप हे जणू एकांत गीते असे होते. युगल गीतात एकाच कडव्यातील पहिल्या दोन ओळी एकाने आणि तिसरी ओळ एकाने म्हणत जणू हे विश्वच फक्त दोघांचे आहे असे वातावरण त्यांचे संगीत निर्माण करते. प्रियकर आपल्या प्रेयसीस आर्ततेने म्हणतो -
हात तुझा हातातुन धुंद ही हवा ....
त्यावर उत्तर देत प्रेयसी म्हणते -
रोजचाच चंद्र आज भासतो नवा...
                            मग या भारल्या वातावरणात  प्रेयसी भानावर येत आपल्या प्रियकरास विचारते, आज जरी हे सर्व तुला धुंद नवे नवे आणि हवे हवे असे वाटत आहे तरी जर आपण दुरावलो भेटी गाठी अशक्य झाल्या तर तेंव्हा-
तू जिथे कुठे असशील
स्वप्‍नांत मला दिसशील
तुज कळेल पण हे का रे ?
विसरशील तू सारे
                            प्रेयसीची हि मनातील अनामिक भीती किंवा वास्तव परिस्थितीतील दुरावा जेंव्हा वरील शब्दात येतो, तेंव्हा प्रियकर जे काही घडलेय ते एकाच बाजूने नाही, आज निर्माण झालेला दुरावा आणि हि परिस्थिती आपल्यातील अंतर यावर तो म्हणतो -
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?
हा जो शब्दातील सल आहे तो खळे यांनी त्याच्या संगीतातून नेमका आत पोहचवला आहे.
                             श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असतात, त्यामुळे खळे  यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?
                             त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून  गाऊन घेतल्या.
'अभंग तुक्याचे ' यासाठी लता मंगेशकर आणि 'अभंगवाणी ' यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला .याशिवाय या दोघांना एकत्रित गायला लावून ' राम श्याम गुण गान ' साठी त्यांनी संगीत दिले.
त्यांनी संगीत दिलेल्या,
पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील - 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
                                                       रविशशिकळा लोपलिया ॥१॥'
आणि ,लताजींच्या आवाजातील - 'सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
                                              कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ '
या दोन रचना  अशा आहेत कि त्यातील स्वरांची  आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही
                                           श्रीनिवास खळे यांच्या वाट्याला उमेदवारीच्या काळात कलाकारांच्या वाट्याला येणारे भोग त्यांच्याही वाट्यास आले. बडोदा सोडून नशीब अजमावण्यासाठी मायानगरीचा रस्ता धरला.
                                          ओळखी ओळखीतून राहण्याची तात्पुरती व्यवस्था, नवीन म्हणून होणारी उपेक्षा , यासारख्या अडचणी त्यातून आलेले नैराश्य, यामुळे काही काळ ते इतके हतबल  झाले  होते कि स्वतःची हार्मोनियम विकून परतीचा रस्ता धरावा असा निर्णय पण घेतला होता.
                                          पण या कठीण प्रसंगी त्यांना त्याच्या पत्नीने मानसिक बळ  देत  या निर्णयापासून परावृत्त केले.सौ खळे यांनी त्यावेळी दाखवलेल्या धैर्या मुळे संगीत क्षेत्राचे होणारे अपरिमित नुकसान टळले , त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र आजही त्यांचे ऋणी आहे.
                                          त्यानंतर एका चित्रपटासाठी म्हणून तयार झालेली दोन गीते ऐनवेळी त्या चित्रपटाचा संगीत रचनाकार खळे यांच्या ऐवजी दुसराच कोणीतरी ठरल्याने त्या चित्रपटात घेतलीच नाहीत. पण ह्या दोन गीतांची रेकॉर्ड एच.  एम . व्ही . कडून तयार करून घेण्याची समयसूचकता गदिमांनी दर्शवली.
                                        गदिमांचा हा निर्णय हा खळे यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला . कारण या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रेकॉर्डवर गीते होती  ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ….
यावरील दोन गीतांपैकी एका तळ्यात होती मधील -
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक

या कडव्या प्रमाणे त्यांना स्वः प्रतिभेची जाण  तेंव्हाच झाली होती. बाकी जगाला ती येण्यास बराच काळ जावा लागला. पुढे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले . त्यांच्या प्रमुख पुरस्कारांची यादी अशी आहे
सूर सिंगार पुरस्कार (इ.स. १९७०)
लता मंगेशकर पुरस्कार (इ.स. १९९३)
जीवन गौरव पुरस्कार (इ.स. २००६)
संगीत रत्न पुरस्कार (इ.स. २००७)
पद्मभूषण (इ.स. २०१०)
स्वरयात्री समाजगौरव पुरस्कार
सुधीर फडके पुरस्कार,
बालगंधर्व पुरस्कार
स्वररत्न पुरस्कार
दत्ता डावजेकर पुरस्कार
अर्थात त्या पुरस्कारांमुळे खरे तर सन्मान पुरस्कारांचा झाला. यासर्व पुरस्कारानंतर इ.स. २०१० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

आपल्या स्वतः च्या या यशो मालिकेकडे पाहताना त्याची वृत्ती मात्र त्यांनीच स्वरबध्द केलेल्या -
 'देवा, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला ! ' या गीता प्रमाणे राहिली असेल असेच वाटते .
खळे यांनी प्रेम गीत , भाव गीत, भक्ती गीत , चित्रपट गीत या  बरोबरच बाल गीत हा प्रकार देखील लीलया हाताळला . १९५२ साली 'गोरी गोरी पान' ने
सुरु झालेला हा प्रवास नंतर -
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?
एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला
गमाडि गंमत जमाडि जंमत, ये ग ये सांगते कानात
चांदोमामा, चांदोमामा ..... भागलास काय ?
नको ताई रुसू, कोपर्यात बसू
या सारख्या वैविध्य पूर्ण बालगीतांनी बहरतच राहिला.

                                                         स्वतः परिस्थितीशी झगडत ध्रुव ताऱ्याचे अढळ पद मिळवताना त्यांनी इतरांना पण नेहमीच ' दीपगृहा ' ची भूमिका घेत समर्थ मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे संगीत क्षेत्राला शंकर महादेवन सारखा चमकता तारा लाभला. जो खळे काकांचा शिष्य म्हणून नावारूपास आला .
                                                        अरुण दाते यांना मराठी भाव गीत गायनाची प्रथम संधी श्रीनिवास खळे यांनी दिली.  मी मुळचा मराठी भाषिक नाही, त्यामुळे मराठी भावगीत हा प्रकार मला जमणार नाही, असे अरुण दाते यांचे मत श्रीनिवास खळे यांनी पूर्णतः चूक ठरवत त्यांना गायनाची संधी दिली .
                                                      या खळे यांच्या निर्णयामुळे गायन क्षेत्रात अरुण दाते हे नाव चमकले, आणि तेही शुक्राच्या ताऱ्या प्रमाणे . कारण अरुण दाते यांचे खळे यांनी संगीत बद्ध केलेले गीत होते …
'शुक्र तारा मंद वारा' हे होय.
या गीताने अरुण दाते यांना मिळालेले यश मागे वळून पाहताना त्यांना याच गाण्यातील -
शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी याच ओळी आठवत असतील.
                                                   असा हा  प्रतिभावंत संगीतकार , यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, अल्प आजाराने २  सप्टेंबर  २०११ रोजी आपल्यातून गेला. त्या अखेरच्या दिवसात देखील, आपल्या भावना  ईश्वरास सांगताना, स्वतःची संगीत रचना वापरून,आपली मनोकामना त्याच्या चरणी मांडली असेल आणि त्यांच्या ओठी -
हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
हि संत तुकारामांची रचना आली असेल असेच वाटत राहते.
                                              ज्या दिवशी त्यांच्या जाण्याची बातमी धडकली तेंव्हा एक रसिक आणि एक अनामिक मित्र म्हणून माझी भावना मात्र -
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे ? या त्यांच्याच  एका संगीत रचने  सारखीच झाली होती . त्यामुळे आता अधिक काय लिहणार ?

Monday, January 5, 2015

परसदारीचा चाफा -

रोजनिशी त्याची आणि तिची -
खरच एक नाणे आणि दोन बाजू . वर्षानु वर्षे आपण ऐकत आलो आहोत. मग काय घटना तीच,पण तगमग किती वेगळी . भिन्न दृष्टीकोन. सरळ समोरासमोर नजरेला नजर देत जेंव्हा बोलता येत नाही तेंव्हा आडमार्गाने नजर फिरवत किंवा समक्ष न बोलता माघारी मांडलेली बाजू म्हणजे दृष्टीकोन ?
बरेचदा असे प्रश्न सतावतात, एकदा असेच तिला म्हटले, ज्याचा त्याचा दृष्टीकोन ! तर मला म्हणाली,तुझे आपले काही तरीच म्हणे दृष्टीकोन ! आणि मग त्यावरच बोलत राहिली, म्हणाली कोन म्हटले कि दोन बाजू आणि एक कंगोरा . आणि अगदी ३६० अंशात पहायचे म्हटले तर सगळे जग उलटे पालटे होवून जाते. पण आपण तेंव्हा सम पातळीत येतो आणि कंगोरा पण उरत नाही खरे ना ?
आज किती बरे दिवस झाले ? गावाशेजारील या नदीवर येवून. एका बाजूला डोह, तर थोडा वळसा घेत खड्काळीतून धावताना झालेले विस्तीर्ण पात्र, त्या वरील तो छत्तीस कमानींचा पूल , आणि त्या पुलाच्या मध्यावर आपले येवून बसणे?
आजही अशीच नेहमी सारखी त्याची पावले वळली, चालू लागला
डावीकडे डोह वरून शांत खोलीचा अंदाज नसलेला- त्याचा सारखा
उजवीकडे खडकातून अल्लडपणे धावणारा फेसाळता प्रवाह -तिच्या सारखा
कोणीतरी त्याला पहिले पण दखल घेतली नाही कशी घेतील तो होता पण स्वतः पुरता .
इतरांसाठी अलविया, वल्ली आणि असाच कोणीतरी.
पुलाचा मध्य आला त्याची पावले मंदावली हेच ते ठिकाण ! किती वर्षे झाली ? मोजलीत कुठे ? आणि का मोजायची ? कुठल्या मापाने ? त्याचा हात शबनम मध्ये गेला त्याची पोतडी बाहेर आली. पाने विस्कळीत झाली होती पण आठवणी आजही तशाच घट्ट अगदी पक्क्या बांधणीत राहून गेल्या होत्या. त्याचा हात पाने चाळू लागला आणि नजर प्रवाहाकडे .......
परसदारीचा चाफा -
त्याचा - आजीच्या सुप्रभाती चालणाऱ्या साग्रसंगीत पुजेची फुले परसदारी जावून परडीतून आणणे हे रोजचे काम. कधी कधी कंटाळा येतो पण चुकवावे मात्र नाही वाटत . परडी भरून होता होता आजीची अंघोळ झालेली असे आणि कधी कधी रेडिओवर लागणारे ते ठेक्यातील सुप्रभातम आजीच्या खड्या सुरात सुरु झालेले असे , आणि त्या सुरातील खडेपणा आणि आजीच्या भक्तीतील खरेपणा माझी सकाळ चैतन्यमय करीत असे .
त्याही दिवशी परडी घेवून मागील दारातून बाहेर आलो आणि समोर ती चाफ्याच्या झाडाखाली उभी. निशब्द ! आता जवळ पास कोणी नाही तर ती काय थोडेच बोलत असणार. का न बोलायला काय झाले ? बोलायला काय माणसेच लागतात का ? मी नाही का रोज त्या चाफ्याशी बोलत ? मग हि का नाही बरे बोलत ? जावू दे मला काय ? मी आपला आजीची पुजेची फुले गोळा करतो आणि पळतो आत.
जरा पुढे होत मी फुल उचलायला वाकलो आणि ती अय्या करत पाळली. आणि मागून आजीची हाक," अरे सुंभा !अजून एक पण फुल वेचले नाहीस कुठे लक्ष आहे तुझे ?"
आणि मी काय सांगणार आजीला माझे आज सगळे लक्ष चाफ्याकडे आहे म्हणून!
परसदारीचा चाफा -
तिचा - मुंबईच्या आलिशान घरात कितीही लवकर झोपले तरी पहाट अशी कधी नसतेच. पण इकडे गावाकडे झुंजूमुंजू होताच कसे अनेक आवाज आपल्याला गुदगुल्या करीत जागे करतात. आजही जाग आली अशाच किलबिलाटाने . पण पाठोपाठ एक मंद सुगंध
अक्षरशः हलवून आणि झपाटून गेला.मला लवकर उठायचा कंटाळा कधीच नाही . पण एखादी पहाट चुकवून लोळत पडायला पण नक्कीच आवडते.
घरात शांतता होती पण एक प्रसन्न गंध दाटला होता. मागील दाराचा चाफा मला बोलवत होता. मी त्याच्यापाशी पोचले आणि किती म्हणून बोलत होता तो. मला बोलूच देत नव्हता. मागे तो उभा आहे हे पण त्यांनीच सांगितले. त्याच्या डोळ्यातील चमक मला आपोआप जाणवली. म्हटले बघू तरी काय करतो ते ? मी चाफ्याखाली उभी राहून चाफ्याशी भरभरून बोलतेय आणि याचा पुतळा.
आणि अचानक येवून तो माझ्या पुढे वाकला जणू सोनचाफा होत.बोलला काहीच नाही.
चाफ्याच्या झाडाने फांदी हलवत मला त्याचा निरोप दिला . मी स्वतःशीच बोलत पळाले आणि तो चाफा माझ्याकडे पहात नुसताच उभा होता सुंभा सारखा !
पण त्या चाफ्याकडे माझे लक्ष होतेच कुठे ?

Monday, March 31, 2014

गुढी पाडवा-आठवण एका सृजनशील कुंभाराची !

आज गुढी पाडवा. जय नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शक १९३६ या वर्षारंभी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !

ब्रह्मदेवानी निर्मिलेल्या सृष्टीच्या प्रारंभ दिनाची नोंद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवून वनवास संपवून अयोध्या नगरीत प्रवेश केला तो हा दिवस.

भारतीय संस्कृतीस कालगणना चंद्र सूर्य यांचे परिभ्रमण यांचे अचूक ज्ञान खूप पूर्वीपासून आहे. दिन दर्शिका, शून्य यांची जगाला देणगी हे आपल्या भारतीयांचे कर्तृत्व.
अशा अनेक कथा असल्या तरी आजच्या दिवसाशी जोडलेली शालिवाहन याची कथा मला सर्वाधिक भावते.

शालिवाहन नावाच्या कुंभाराने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यात प्राण भरले. या सैनिकांच्या मदतीने शकांचा पराभव केला तो दिवस म्हणजे आजचा गुढी पाडवा !

आता या घटनेची सत्यता शास्त्रीय आधारावर पडताळून पाहण्याची गरज जरासुद्धा वाटत नाही. कारण शालिवाहन हा कुंभार नव्हता तो होता सृजनशील नवनिर्मितीचा जनक.
त्याने मातीच्या सैनिकाच्या मूर्तीत प्राण भरले,म्हणजे ओल्या माती प्रमाणे स्वतःची ओळख  नसलेल्या अनेकांना अस्मितेची जाण करून दिली. ,सत्वा'ची ओळख पटवून दिली.ज्यामुळे त्या सैनिकात रणनीती ची निर्मिती झाली. आणि त्यामुळे त्यांनी शकांचा पराभव केला.

थोडक्यात काय तर ओल्या मातीत कोणताही आकार घेण्याची क्षमता असते,फक्त गरज असते वेळेवर त्यावरून कलात्मक बोटे फिरण्याची.हि बोटे कधी कुरवाळीत काम करतात तर कधी जरुरी प्रमाणे ताडतात. आणि त्याची जाण असलेला सृजन कलाकार म्हणजे कुंभार.
शालिवाहन हा असा सृजनशील कुंभार होता. त्याने प्राण फुंकून जिवंत केले ते सहा हजार सैनिक हा प्रातिनिधिक आकडा आहे.सैनिकांना त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची जाणीव करून दिली. त्याने असे अनेक कार्यकर्ते तयार केले.

ज्यांना स्वतःची ओळख नव्हती ती त्यांना मिळवून दिली. ज्या मधून त्या सैनिकांनी आपल्या देशसेवेची कार्याची गुढी उभारली. आणि या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्या दिवसापासून सुरु झालेली कालगणना शालिवाहनाच्या नावाने ओळखली जाते.

शालिवाहनाने जे काम केले त्याची अल्पशी पोहच म्हणून काळ गणनेस त्याचे नाव दिले गेले. कामातून त्याने जी स्वतःची ओळख निर्मिली तीच खरी गुढी उभारणी.त्यामुळेच गेली जवळ जवळ दोन हजार वर्षे या दिवशी आपण गुढी पाडवा शालीवाहनाच्या
नावे साजरा करीत आहोत.
आता वेळ आली आहे प्रत्येकाने कुंभार होण्याची, अगदी सहा हजार नाही पण किमान स्वतःला  ओळखून सत्वाचा आकार घेत काही नव निर्मिती करण्याची. सत असत मधील फरक ओळखून योग्य बाजूने निर्णय घेण्याची.जर हे मनापासून करता आले तर त्यातून उभी राहणारी गुढी अशी काही उंची गाठेल कि तेच खरे स्वर्गारोहण ठरेल.