Tuesday, September 13, 2011

" आजीची गोधडी "

गेले बरेच दिवस ब्लॉगपासून दूर होतो. १० सप्टेंबर रोजी मी मराठी. नेट या संकेत स्थळाने त्यांच्या कविता स्पर्धेचा निकाल जाहीर केला. सर्व कविता www.mimarathi.net  येथे वाचता येतीलच. या स्पर्धेसाठी मी एक कविता पाठवली होती. ती कविता आता आपल्या वाचनासाठी देत आहे.
कविता बक्षीस पात्र ठरली नाही, पण आपणास आवडते  का पहा.
कवितेचे नाव आहे " आजीची गोधडी "
परवा बसलो होतो गुरफटून, घेवून आजीची गोधडी
आठवणींच्या थंडीने, भरली होती हुड हुडी.
मन रेंगाळले, अन आठवल्या……
गोधडी शिवता शिवता आजीने सांगितलेल्या गोष्टी,
कधी रामायण-महाभारत, कधी पंचतंत्र-इसापनीती
कधी परोपकारी गोपाळ, तर कधी राजा गोष्टी वेल्हाळ
तर कधी भेटला तिच्या गोष्टीतून विक्रम आणि वेताळ.
तेंव्हाच्या तिच्या गोष्टी आजही स्मरतात ......
अन रामायणातील भांडणे, जीव गुदमरवून टाकतात
आजही महाभारतातील राजकारणाने, मने कातवतात.
आत जाणाऱ्या पावलांच्या खुणा असणाऱ्या सिहांच्या गुहा,
अन पंचतंत्रातील कोल्हे, माणसांच्या जंगलात ठायीठायी भेटतात.
हरवलो होतो या विचारात ....
इतक्यात, धावत आली लेक माझी धाकटी, अन दिला फटका
आणि म्हणाली, "इथे येवून लपलात तरी, आज नाही गोष्टीतून सुटका".
सरसावून बसत म्हटले,"सांग, काय सांगू आज तुला?
हवे रामायण कि हवे महाभारत, का आवडेल पंचतंत्र
का हवाय तुला 'तिळा तिळा दार उघड' चा जादुई मंत्र".
तर म्हणाली," मला नकोत माणसांची भांडणे,
पक्ष्यांचे चिडणे आणि प्राण्यांचे लढणे
त्यापेक्षा गोष्ट सांगा तुम्ही, छोटीशीच पण छानशी
झोपताना नेवून ती सोडेल मला, परीकथेतील स्वप्नांपाशी
नाहीतर मला चालेल, तुमचीच आवडती, गोपाळ अथवा इसापची
तुम्हीच म्हणता ना! यातच लढाई असते, खऱ्या खुऱ्या जगण्याची
शेवटी परीचीच गोष्ट सांगून झोपवले तिला
वास्तवातल्या चटक्यांपासून लपविले तिला
"केवढी वाढलीय थंडी," म्हणत....
मी गुरफटली गोधडी अंगभर,
तरीही थरथर जाईना मनातून, बोचरी लाटच घरभर
मग, मन म्हणाले, बोल रे! आज का वाटतीय भीती
दिले नाहीस लक्ष जेंव्हा आजीने शिकवली नीती
आजीची गोधडी आता, खरे तर खुपच उसवली आहे
पण त्यातल्या ऊबेने, जगण्याची आस मात्र टिकवली आहे.