Wednesday, April 24, 2019

मला समजलेले तुकाराम -४

संत तुकारामांच्या कालखंडाचा विचार केला तर उच्च नीच , ब्राह्मण ब्राह्मणेतर , या गोष्टी किंवा बलुतेदारी पद्धतीचा पगडा असणारा कालखंड . त्यामुळे धर्मपरायणतेच्या नावाखाली विधी,  संस्कार  याचे स्तोम कुलधर्म कुळाचार यांचे अवाजवी महत्व असणारा असा तो काळ होता.

त्यामुळे भक्ती मार्गात येणाऱ्या अडचणी व त्यांचा सर्व सामान्यांना होणार उपसर्ग याबाबत तुकाराम महाराज सर्व परिस्थिती जाणून होते . या अनंत अडचणींवर मात करीत विठ्ठल भक्ती करताना तुकोबा म्हणतात -

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ।।१।।

विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारुं ।उरतील पारू भवनदीचा ।।ध्रु ।।

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ।।२।।

विठ्ठल हे जन विठ्ठल माझे मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ।।३।।

तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरीत गांवा जाइन त्याच्या ।।४।।

जर या रचनेकडे आपण काळजीपूर्वक बघितले तर असे लक्षात  येते कि , भक्तिसारखी एखादी गोष्ट मनापासुन करताना ती विधिवत षोडोपचार पद्धतीने पूर्ण करणे प्रत्येकास जरी शक्य नसले तरी ती गोष्ट जीवा भावाची मानून करणे जरुरीचे आहे.म्हणजे कुळाचार कुळधर्म यांचे अवडंबर न करता देखील विठ्ठल भक्तीत रममाण होता येईल. खरेतर अवडंबराची गरज नसते आणि खरी भक्ती मनःशांती देते हेच तुकोबा नमूद करतात.

जेंव्हा महाराज अशा सहज सोप्या दाखल्यातून जनसामान्यांना भक्ती आणि नीती यांचे नाते दृढ करून सांगत तेंव्हा समाजातील दांभिक त्यांच्यावर  सातत्याने टीकेचा भडीमार करत असत , त्याबाबत त्यांना गुरु नाही स्वतःला शहाणे समजणारे असा टीकेचा सूर असे . घरी लक्ष देत नाही म्हणून धर्मपत्नी इतर नातलग यांची नाराजी असे . तर समाजातील उच्च पदस्थ ते जनरीत पाळत  नाहीत या कारणास्तव   त्यांना सत्याने घालून पडून जिव्हारी लागेल अशी टीका करीत

या सर्वच परिस्थितीत नाउमेद न होता या टीकेला उत्तर देताना या सर्वावर माझी माउली आणि  तिची भक्ती हाच सर्वोत्तम तोडगा आहे हे सांगताना त्यांनी -

विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारुं ।उरतील पारू भवनदीचा ।।ध्रु ।।

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ।।२।।

विठ्ठल हे जन विठ्ठल माझे मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ।।३।।

इतक्या सहज सोप्या शब्दात टीकाकारांना निरुत्तर केले आणि भक्तांना प्रोत्साहित केले आहे आणि या रचने  शेवट करताना -

तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरीत गांवा जाइन त्याच्या ।।४।।

या शब्दात त्यांचे विसाव्याचे ठिकाण देखील विठ्ठलच आहे आणि माझे सर्वस्व पणाला लावून त्याच्या प्राप्तीसाठी मी धडपडत राहीन हेच सांगितले आहे.

विठ्ठल हाच त्यांच्या समाज प्रबोधनातील गुरु कसा होता याचेच प्रत्यन्तर आपणास या रचनेतून मिळते असे मला वाटते

Saturday, March 31, 2018

मला समजलेले तुकाराम -३

संत तुकाराम यांनी भागवत धर्म आणि त्याचे आचरण यांचे महत्व सांगताना, सामान्य वारकरी सतत डोळ्यासमोर ठेवला होता. आणि नामस्मरण, एकाग्र चित्त याद्वारे आपला दिनक्रम पार पडताना विठ्ठल भक्तीतून सरळ मार्गी जीवन आणि त्यामुळे मिळणारे सात्विक समाधान याचे महत्व सातत्याने नमूद केले आहे . त्यामुळे आपल्यात विठ्ठल किंवा विठ्ठल भक्त्तीत आपण कसे मग्न झाले पाहिजे हे सांगताना ते म्हणतात -

विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती । विठ्ठल विश्रांती भोग जया ।।१।।
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनी । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ।।ध्रु ।।
विठ्ठल जागृतीस्वप्नी सुषुप्ति । आन दुजे नेणती विठ्ठलेंविण ।।२।।
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरा ।।३।।
तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुरालें दुजेपणें ।।४।।

या अभंग रचनेतून आपण ज्याची भक्त्ती करतो तो ईश्वर चराचरात आहे हा मुद्दा पटवून देण्यासाठी जणू त्यांनी ठायी ठायी विठ्ठलाचे भान ठेवा असा आग्रहाचा सल्ला दिला आहे .त्याचे स्मरण गाण्यात असुदे ,मनात असुदे , आयुष्याचा  उपभोग घेताना विठ्ठलाची आठवण विसावा घेताना राहूदे .
उठता बसता ,झोपेत जागेपणी खाता पिता या सर्व जाणिवेच्या क्रिया करताना विठ्ठल आठवा हे ते सांगतात . पण त्या पलीकडे जाऊन नेणिवेत देखील विठ्ठल हवाच हे सांगताना त्यांनी सुषुप्ती या शब्दाचा केलेला वापर खरोखर स्तंभित करणारा आहे .
कारण सुषुप्ती या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ संपूर्ण निसर्ग रचने आत्मभान ठेवत जाणीव जपणारी परिपूर्ण अवस्था असा आहे तर या अवस्थेत देखील त्याची आठवण ठेवणे म्हणजेच जाणिवेतून नेणिवेकडे जाणे आहे हे त्यांनी समजावून दिले आहे .
माणूस जसा आभूषणे अलंकार यांनी नटला कि सुखावतो तसे तुम्ही विठ्ठल भक्तीत भरून जाता . आणि या विठ्ठल भक्त्तीचे असामान्यत्व अधोरेखित करताना ते म्हणतात , अशी मनपूर्वक जे त्याचे स्मरण ठेवतात ते माझ्या साठी विठ्ठलच आहेत . आणि दुसऱ्या कोणत्या विठ्ठलाची आस उरलीच नाही .

अर्थात हे मला भावलेले मी आपणासमोर मांडले , आणि हेच माझे तुकोबाच्या नजरेतील विठ्ठल दर्शन आहे .

Wednesday, February 28, 2018

मला समजलेले तुकाराम -२          संत तुकाराम म्हटले कि भागवत धर्म आणि त्यांनी केलेला लोकजागर या दोन गोष्टी आपण विसरूच शकत नाही . पंढरीचा विठुराया हे जनसामान्यांचे आराध्य दैवत आहे ,आणि जनजागृतीसाठी विठलचरणी लिन होण्यासारखे प्रभावी साधन नाही याची जाण तुकाराम महाराजांना पुरेपूर होती . मात्र या विठ्ठल भक्तीचा त्यांनी जनजागृतीसाठी वापर केला असे न म्हणता मी म्हणेन कि त्यांनी लोकांच्या विठ्ठल भक्तीचा आदर केला .

          विठ्ठल महात्म्य जनसामान्यांना समजावण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक अभंगाबाबत आपण अभ्यास करू शकतो.. पण तुकारामांनी आपले विठ्ठलाशी असलेले नाते समजावून सांगताना विठ्ठलास इतक्या विविध रूपात पहिले आहे कि , तुकाराम आणि विठ्ठल यांना आपण वेगळे करूच शकत नाही .
त्यांच्या एका रचनेत ते म्हणतात -

विठ्ठल टाळ  विठ्ठल दिंडी !विठ्ठल तोंडी उच्चारा !!१!!
विठ्ठल अवघ्या भांडवला ! विठ्ठल बोला विठ्ठल !! ध्रु !!
विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद  विठ्ठल !! २!!
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा ! तुकया मुखा  विठ्ठल !! ३!!

         याठिकाणी टाळातील लय त्यांना विठ्ठलात दिसते, आणि दिंडीतील भान हरपून समरसणे त्यांना अचूक टिपता येते . वारीतील सहभाग त्यांना अशारीरिक पातळीवर अभिप्रेत असावा असे मला वाटते. म्हणून तोंडी विठोबाचे नाव असावे असे सांगता सांगता त्यांनी विठ्ठल भक्तीची  पुढची पायरी नाद पार करून तुम्ही
या भक्तीच्या छंदात रममाण होण्याचा सल्ला ते सहजतेने देतात.

        कधीकधी एखादे लहान मुल भवताल विसरून जेंव्हा स्वतः मध्ये रममाण होते आणि आपलेच भान विसरून जाते आणि त्याच्या त्या कृतीला त्या बाळाची आई सहजतेने म्हणते ,"नादिष्ट आहे अगदी ! " तो नाद तुकोबांना विठ्ठल भक्तीत हवा आहे . आणि वाढत्या वयानंतर माणसाला आपल्या उपजीविकेच्या पलीकडे कुठेतरी स्वानंद देणाऱ्या आणि समाजप्रिय कार्यात गुंतवून घेण्याच्या वृत्तीस छंद म्हणवून घेता आले पाहिजे असे काहीतरी तुकोबांना वाटले आणि म्हणून त्यांनी -विठ्ठल नाद विठ्ठल भेद ! विठ्ठल छंद  विठ्ठल ! असे सांगितले असावे असे वाटत राहते.

        कारण शेवटी जगण्याच्या धडपडीत सुख आणि दुःख हे व्यक्तिसापेक्ष आणि  बदलते असले तरी ते प्रत्येकास अनुभवावे लागतेच . मात्र हा जीवनानुभव घेताना त्यास सामोरे जाताना तुमच्या जगण्यात सहजता यावी म्हणून विठ्ठलाचे स्मरण ठेवा हे सांगताना आधी केले मग सांगितले या तत्वा नुसार या रचणे सांगता करताना तुकोबा म्हणतात -  तुकया मुखा  विठ्ठल !! ३!!

       म्हणजेच तुम्हाला कोणी नादिष्ट कोणी छंदिष्ट म्हटले तरी स्वानंद घेण्यासाठी समाजहित साधने हीच खरी साधना हाच अर्थ मला या रचनेत दिसला .