Tuesday, April 14, 2020

मोतियांचा हार

साथ संपली  हात निसटला, आज कसा काळ थांबला
काल पर्यंत गुंफलेला धागा आज कसा कचकन तुटला

क्षणोक्षणी वाट पाहणारे डोळे, आज म्हणाले ,"तू कोण कुठला ?"
या प्रश्नाच्या भडिमाराने पापण्यांच्या बांध फुटला

प्रथम भेटीतील ओढ, एकमेकांना सांभाळण्याची धडपड
ना कसल्या आणाभाका, ना कसले वचन
न बोलताही वाहिलेली अनासक्त प्रेमाची कावड

अनेकदा भेटलो ,आवेगात वेढलो ,एकमेकात गुंतलो
फुलपाखराच्या नाजूकतेने एकमेकात मिटलो

असे असूनही आज ओळख का टाळलीस !

प्रश्न आहे ओळख टाळून आठवणी टाळशील का ?
जे विसरु पाहते आहेस तेच पुन्हा आठवशील का ?

जा एखाद्या सागरतीरी आरक्त सायंकाळी
विसरून जाण्या गत आठवाची मांदियाळी
साठव स्मृतींचे शिंपले तूच तुझ्या ओंजळी !

त्यातील मोतियांचा बनव तू हार
हीच माझी अखेरची भेट ....
आज तुला साभार !

No comments:

Post a Comment