Friday, April 24, 2020

बंदिवासातील रोजनिशी अर्थात लॉक डाउन डायरी -3

आजीच्या वडिलांच्या नावाचा शोध

जसा हा बंदिवासाचा काळ वाढत चाललाय तसा  वेळ कसा काढावा ? या जटील  प्रश्नांवर इतके उपाय आले कि काही विचारू नका. आवडीचे छंद जोपासा , वाचन करा ,जुनी नाटके बघा , संगीत ऐका , यासारखे अनेक. काहींनी काही प्रयोग केले देखील.
पण परत कंटाळा आला आणि व्हाट्स ऍप काही नवीन सांगताय का ? याच्या शोधात नाहीतर फेसबुक ते इंस्टाग्राम आहेच. या सर्वातून मला एक असा विचार सुचला कि , आपण -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान '  याचा शोध घ्यावा.

आता तुम्ही म्हणाल हे काय एखाद्या पी. एच डी च्या प्रबंधा  सारखा विषय मांडला आहे  अगदी खरे आहे पण या द्वारे आज मी तुम्हाला एक अवघड परंतु खूप दिवस पुरेल असा एक उपक्रम सांगत आहे . प्रयोग करून तर पहा. आता या विषयाचे महत्व समजावे म्हणून मी आपलयाला  प्रथम एक छोटासा प्रयोग करायला सांगतो.

घरातील शाळेत जात असणारा आणि सर्वात लहान सदस्य याची निवड करा आणि त्याला एक प्रश्न विचारायचा  ? तुझ्या आजीच्या वडिलांचे संपूर्ण नाव काय ? यात दादी ( वडिलांची आई ) किंवा नानी ( आईची आई ) कोणीही चालेल.

किती जण याचे अचूक उत्तर देतात पाहायचे . आता तुम्ही म्हणाल याचा आणि वर मांडलेल्या विषयाचा संबंधच काय ?

तर तो संबंध खूपच जवळचा आणि नाजूक आहे. एकत्र कुटुंब ते  चौकोनी कुटूंब पासून ते मी माझा किंवा मी माझी या व्याख्येत आलेले एक खांबी कुटुंब यात आपण अक्षरशः फरफटत तर नाही ना ? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत . आणि जे प्रश्न प्रथम कुटुंबाचे असतात तेच वाढत वाढत नंतर समाजाचे बनतात.
म्हणूनच आपण आपल्या कुटुंबाचा शोध घेण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.

यासाठी सध्या तुम्ही उपलब्ध असलेला वेळ असा वापरा कि ज्यातून आपणच आपल्यासमोरून हरवत चाललेली माहिती  जतन  करून ठेवू शकाल. त्यासाठी काय करायचे तर एक माहितीचा तक्ता  तयार करू या. त्यात संपूर्ण नाव ,जन्मदिनांक , जन्म ठिकाण , नोकरी /व्यवसायाचे स्वरूप आणि कालावधी अशी प्राथमिक माहिती प्रथम पूर्ण करावी.
त्यानंतर घर ,शेती वाडी, जमीन जुमला याची माहिती घ्यावी. सदर मिळकत कशी वाढली किंवा कशी कमी झाली याची माहिती घ्यावी.. तुम्ही म्हणाल आज इतका खटाटोप करून काय साधणार ? तर इथेच -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान ' या विषयाची सांगड बसणार आहे कशी ते पहा.

आज तुमच्या घरातील सर्वात लहान सदस्याला त्याच्या पंजोबांचे संपूर्ण नाव  सांगता आले नाही तर तो त्याचा पराभव नसून आपला पराभव आहे असे समजून त्याकडे पाहणे जरुरीचे आहे . आपला आपल्या आधीच्या पिढीशी तुटत चाललेल्या संवादाचे ते प्रतीक आहे. आज निर्धार करणे जरुरीचे आहे कि, नाही हि माहिती मी मिळवीन . माझ्या मुला  बाळांना माझ्या कुटूंबाचे जे लागेबांधे आहेत त्याची माहिती देईन.
एकदा आपण हा निर्धार केलात कि त्याची सुरवात प्रथम घरात करा. घरातील जे जेष्ठ आहेत त्यांना वेळ द्या. सहज गप्पा मारत त्यांना बोलते करा . त्यांच्या धडपडीचा काळाची माहिती घ्या. यातून काय होईल तर त्यांना त्यांची दखल घेतल्याचा आनंद मिळेल. त्यांनी केलेल्या कष्टाची किंमत आपल्याला आज घर बसल्या समजेल. त्यांच्या आयुष्याच्या चढउतारांवरून त्यांच्या बरोबर तुम्हाला प्रवास करायला मिळेल
यातून तुम्ही जे तयार कराल ते असे पुस्तक असेल कि, काही प्राथमिक माहिती तुम्ही कुलवृत्तांत म्हणून जतन कराल पण त्याच्या अनुभवाच्या शिदोरीतून तुम्हाला असे एखादे कथाबीज सापडेल कि त्याची गोष्ट होईल किंवा अगदी एखादे सनसनाटी कथानक होईल. कुणी सांगावे त्या वरून  एखादी चित्रपट कथा आज तुम्हाला नव्या वाटेवर उभे राहण्यास मदत करेल.
या प्रेरणेतून  -' मी आणि माझ्या कुटुंबाचे समाजातील स्थान ' हा विषय तुम्ही काल  आज आणि येणाऱ्या पिढीसाठी म्हणून उद्या असा त्रिमिती मधून त्रिकालाबाधित म्हणून बघण्या इतके सक्षम व्हाल. कारण शेवटी समाज म्हणजे कोण तर आपण आणि आपले कुटूंबच ना !
तर मग आता आले ना लक्षात कि लॉक  डाउन  आज ना उद्या नक्कीच संपेल जीवनाचे रहाटगाडगे सुरु होईल.  पण तरीही मला आता वेळच पुरणार नाही कारण मला देखील माझ्या आजीच्या/आजोबांच्या  वडिलांचे संपूर्ण नाव नाही तर संपूर्ण कर्तृत्व जाणून घ्यायचे आहे

काय मग घेणार ना आपल्याच भोवती असून हि आपल्या पासून कोसो दूर चाललेल्या या कुटूंब विश्वाचा शोध.

No comments:

Post a Comment