Friday, April 10, 2020

बंदिवासातील रोजनिशी - अर्थात लॉक डाऊन डायरी -2

नाते संबंधातील लॉक डाउन -
आज आपण सगळे बंदिवासात आहोत पण त्यात देखील स्वार्थ दडलेला आहे , आज बंदिवासात राहिलो, तर उद्या स्वछंद भटकता येईल हा . आजचा शारीरिक बंदिवास काही काळानंतर नक्की संपून जाईल आपण मोकळा श्वास घेऊ. जीवन नव्याने सुरु होईल आणि आपण पुन्हा एकदा रहाटगाडग्याला जुंपले जाऊ.
म्हणजे आपण शारिरिक पातळीवर बंदिवास संपवण्यात नक्कीच यशस्वी झालेले असू .

माझा प्रश्नआहे तो त्या लॉक डाउनचा  नाही तर आपल्या मनातील लॉक  डाउनचा आहे. एखादा मित्र , नातेवाईक यांचे येणे जाणे, गप्पा ज्या सहजतेने झाल्या पाहिजेत त्या होत नाहीत. कधी  वेळ आडवा येतो तर  कधी अहंम !
फेसबुक,  व्हाट्स  अप पासून  ते फोन इंटरनेट पर्यंत सर्व हाताशी असून आपण दुरावत आहोत. एखाद्याने त्याचे आनंदाचे क्षण फेसबुक वर शेअर केले तर त्यात माझी आठवण  नाही असा विचार करत अभिनंदन करण्या ऐवजी दूरच राहतो . मीच का आधी बोलू ? मीच का पडते घेऊ ? या चक्रात आपण दुरावातच जात नाही का ?
या प्रकारात काय होते माहित आहे कि वेळ निघून जाते पुलाखालून नुसतेच पाणी वाहून जाते असे नाही तर कधी कधी पुलच  वाहून जातात . आज हे तळमळीने लिहण्याचे  कारण कि , जर असे काही मागे पडलेले संवाद असतील तर ते जरूर पूर्ण करा.
मला भारत सोडून  बघता बघता १५ वर्षे झाली त्यावेळच्या अनेक मित्र , नातेवाईक  यांच्या संपर्कात बराचसा आहे पण तरीही कधी कधी मन विषण्ण होते. चार सुख दुःखाच्या गोष्टी हक्काने मांडाव्यात अशी ठिकाणे कमी होताना त्याच्या यातना मनास त्रास देतात .

परवाचीच गोष्ट, असेच एक परिचित . खूप दिवसात बोलणे नाही म्हणून फोन लावला. फोन त्यांच्या  मिसेसनी उचलला. मी प्रथम कोण बोलतोय हे सांगून फोन मित्राला देण्याची विनंती केली. तर त्या म्हणाल्या , " फोन करायला खूप उशीर केलात ." मला आधी वाटले वेळेचा अंदाज चुकला ,आणि  आपण  अवेळी बोलतोय कि काय ? आणि पुढील शब्दांनी मन सुन्न केले. " त्यांना जाऊन चार वर्षे झाली . अधून मधून तुमची आठवण काढायचे, पण तुमचा फोन नंबर हाताशी नव्हता . त्यामुळे बोलणे झाले नाही " 
या घटनेने मला खूपच अंतर्मुख केले. का नाही आपण पूर्वीच फोन केला ? तर या निमित्ताने आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे , आपल्या परिचित नातेसंबंधातील असे मागे पडलेले संपर्क जरूर करून आपल्या सहज संवादातील लॉक डाउन लगेचच तोडा.

No comments:

Post a Comment