Wednesday, March 6, 2013

जागतिक महिला दिन.....अजून चालतोची वाट ...


आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी ते मलाला युसुफझाई ,माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे अजूनही वाट बिकटच आहे.
८ मार्च १९०८ साली मतदान ह्क्कासाठीचे न्यू यॉर्क मधील आंदोलन असो किंवा दोन दिवसांपूर्वीचे तरन  तारण येथील एका पिडीत महिलेचे एकाकी आंदोलन असो,जगण्याच्या प्राथमिक हक्काची लढाई स्त्री ला अजूनही लढावीच लागत आहे.
आणि हाच आपला सर्वात मोठा पराभव आहे.
तू अमला अविनाशी कीर्ती 
तू अवघ्या आशांची पूर्ती 
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा  ते नेई ....
अशी प्रार्थना माय भवानीस करताना आपण स्त्रीला परिपूर्ण आदिमायेच्या स्वरुपात पाहतो ते खरे कि, 
झेंडू बाम ते शीला कि जवानी या आयटेम सॉंग मधून पाहताना आपण जे हीन होतो ते खरे.... 
या प्रश्नांच्या गर्तेतून मला बाहेर पडायचे आहे.
बंदिनी स्त्री हि बंदिनी 
हृदयी पान्हा नयनी पाणी 
जन्मो जन्मीची कहाणी ...
बंदिनी स्त्री हि बंदिनी 
या ऐवजी ...
सत्यता शोधण्या घेउनी लेखणी 
जाहली दामिनी मूर्त सौदामिनी 
दामिनी ...दामिनी 
या रुपात मला स्त्री कडे पहायचे आहे.
शेतावर राबणारी कष्टकरी ते कार्यालयातील सहचरी यापैकी  मला कोठेही भेटणाऱ्या स्त्रीचा संधी असून देखील मी गैरफायदा घेणार नाही.किंवा तिला अगतिक वाटेल असे वर्तन चुकून हि मी करणार नाही अशी प्रतिज्ञा जेंव्हा प्रत्येकजण स्वतःशी करेल 
तो खरा जागतिक महिला दिवस असेल.
..........आणि असा आंतरिक बदल जेव्हा घडेल तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी असा एखादा दिवस साजरा करण्याची गरजच उरणार नाही