Monday, March 31, 2014

गुढी पाडवा-आठवण एका सृजनशील कुंभाराची !

आज गुढी पाडवा. जय नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शक १९३६ या वर्षारंभी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !

ब्रह्मदेवानी निर्मिलेल्या सृष्टीच्या प्रारंभ दिनाची नोंद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवून वनवास संपवून अयोध्या नगरीत प्रवेश केला तो हा दिवस.

भारतीय संस्कृतीस कालगणना चंद्र सूर्य यांचे परिभ्रमण यांचे अचूक ज्ञान खूप पूर्वीपासून आहे. दिन दर्शिका, शून्य यांची जगाला देणगी हे आपल्या भारतीयांचे कर्तृत्व.
अशा अनेक कथा असल्या तरी आजच्या दिवसाशी जोडलेली शालिवाहन याची कथा मला सर्वाधिक भावते.

शालिवाहन नावाच्या कुंभाराने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यात प्राण भरले. या सैनिकांच्या मदतीने शकांचा पराभव केला तो दिवस म्हणजे आजचा गुढी पाडवा !

आता या घटनेची सत्यता शास्त्रीय आधारावर पडताळून पाहण्याची गरज जरासुद्धा वाटत नाही. कारण शालिवाहन हा कुंभार नव्हता तो होता सृजनशील नवनिर्मितीचा जनक.
त्याने मातीच्या सैनिकाच्या मूर्तीत प्राण भरले,म्हणजे ओल्या माती प्रमाणे स्वतःची ओळख  नसलेल्या अनेकांना अस्मितेची जाण करून दिली. ,सत्वा'ची ओळख पटवून दिली.ज्यामुळे त्या सैनिकात रणनीती ची निर्मिती झाली. आणि त्यामुळे त्यांनी शकांचा पराभव केला.

थोडक्यात काय तर ओल्या मातीत कोणताही आकार घेण्याची क्षमता असते,फक्त गरज असते वेळेवर त्यावरून कलात्मक बोटे फिरण्याची.हि बोटे कधी कुरवाळीत काम करतात तर कधी जरुरी प्रमाणे ताडतात. आणि त्याची जाण असलेला सृजन कलाकार म्हणजे कुंभार.
शालिवाहन हा असा सृजनशील कुंभार होता. त्याने प्राण फुंकून जिवंत केले ते सहा हजार सैनिक हा प्रातिनिधिक आकडा आहे.सैनिकांना त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची जाणीव करून दिली. त्याने असे अनेक कार्यकर्ते तयार केले.

ज्यांना स्वतःची ओळख नव्हती ती त्यांना मिळवून दिली. ज्या मधून त्या सैनिकांनी आपल्या देशसेवेची कार्याची गुढी उभारली. आणि या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्या दिवसापासून सुरु झालेली कालगणना शालिवाहनाच्या नावाने ओळखली जाते.

शालिवाहनाने जे काम केले त्याची अल्पशी पोहच म्हणून काळ गणनेस त्याचे नाव दिले गेले. कामातून त्याने जी स्वतःची ओळख निर्मिली तीच खरी गुढी उभारणी.त्यामुळेच गेली जवळ जवळ दोन हजार वर्षे या दिवशी आपण गुढी पाडवा शालीवाहनाच्या
नावे साजरा करीत आहोत.
आता वेळ आली आहे प्रत्येकाने कुंभार होण्याची, अगदी सहा हजार नाही पण किमान स्वतःला  ओळखून सत्वाचा आकार घेत काही नव निर्मिती करण्याची. सत असत मधील फरक ओळखून योग्य बाजूने निर्णय घेण्याची.जर हे मनापासून करता आले तर त्यातून उभी राहणारी गुढी अशी काही उंची गाठेल कि तेच खरे स्वर्गारोहण ठरेल.
   

No comments:

Post a Comment