Wednesday, April 29, 2015

असा हा प्रतिभावंत संगीतकार - श्रीनिवास खळे

 सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..तालुक्याच्या गावी पदवी पर्यंतचा शिक्षणाचा  टप्पा अंतिम पर्वात आला होता . पदवी परीक्षा काही दिवसांवर आली होती . महाविद्यालयास कायमचे सोडून जाण्याचे दिवस अगदी जवळ आले होते.
                            आसपासचे अस्सल ग्रामीण वातावरण, पदवीनंतर स्वतःच्या शेतीवाडी कडे वळणारा मोठा विद्यार्थी वर्ग असलेला, आमचा वाणिज्य शाखेचा तो वर्ग होता . पण त्यातही कलागुण, भाव भावना यांची जपणूक करणारा शिक्षक वर्ग होता, त्यांच्या  कृपेने आमचा निरोप समारंभ नक्की झाला होता.
                        त्या अखेच्या दिवशी आमच्या वर्गातील एका सुरेल गळा लाभलेल्या मित्राने आमच्या कार्यक्रमास साजेसे एक भावगीत सादर केले, त्या गीताचे शब्द होते ...
       वेगवेगळी फुले उमलली रचुनि त्यांचे झेले
       एकमेकांवरी उधळले
       गेले, ते दिन गेले !
                     त्या दिवशी त्या गाण्यानी मला इतके अंतर्मुख केले कि ,ते स्वर आणि ते सूर मी पुढे कधीच विसरू शकलो नाही.माझी आणि श्रीनिवास खळे ( खळे काकांची ) यांची हीच पहिली  ओळख. आणि त्यानंतर माझी आणि खळे काकांची मैत्री दृढ झाली ती त्यानंतर आजतागायत
                     अगदी काका आपल्यातून जावून सुद्धा, माझी आणि खळे काकांची मैत्री तशीच टिकून आहे.कारण हि मैत्री निर्गुणी निर्मोही अशी आहे.
                     अहो आमची मैत्री म्हणजे जगाला सांगण्यासाठी किंवा फोटो, सत्कार या प्रकारातील नव्हतीच, मुळातच ती मैत्री म्हणजे कलाकार आणि रसिक यांच्यातील मैत्र होते. हे मैत्र म्हणजे नात्याचा वीण जो सुरांनी गुंफलेला  एक घट्ट पीळ आहे. आणि त्यामुळेच तो त्यांच्या जाण्याने पण संपलेला नाही.
                      खरेतर खळे यांनी दिलेली प्रत्येक रचना, त्या गीतातील शब्द सामर्थ्य, सुरांच्या संगतीने अनेक पटीने सहजतेने वाढविते. आणि मग ते गीत प्रत्येक रसिकास अगदी आपलेच वाटू लागते.आणि हा आपलेपणा देणाऱ्या संगीतकारास मी माझा मित्र मानले ते त्यांच्यावरील अपरंपार भक्तीतून.
                      आज 30 एप्रिल श्रीनिवास विनायक खळे या संगीतकाराची जयंती. खळे काका आपल्यात नाहीत त्याला आता चार वर्षे झाली .पण त्यांच्या संगीत रचनेने त्यांना दिलेले अमरत्व हे त्यांच्या संगीत सुरातील अमृताच्या गोडीत दडलेले आहे. मला खळे हे सहानभूतीने शब्दांना सूर देणारे संगीतकार आहेत असे नेहमीच वाटते
                      या ठिकाणी मी वापरलेला सहानभूती हा शब्द सह + अनुभूती  या अर्थाने म्हणजेच आपल्या मनातील अनुभूती सह स्वरांना सूर देणारा संगीतकार म्हणून मी त्यांच्या रचनांकडे पाहतो.त्यांच्या रचनांमधील भक्ती गीते आणि भाव गीते ऐकतांना नेहमीच मला असे वाटते कि, त्यांच्या प्रत्येक भक्ती गीतात भाव आहे आणि प्रत्येक भाव गीतात भक्ती आहे.
                        प्रेम भाव हा प्रत्येक मानवी मनाचा ठाव घेणारे  एक न उलगडलेले कोडे आहे. प्रियकर आणि प्रेयसी  यांच्या भाव भावना शब्द बद्ध करणाऱ्या अनेक रचना आज मराठीत आहेतच, पण त्या रचनेला जर खळे टच मिळाला तर शब्दा मागचे भाव वेगळाच भाव खावून जातात.
                       श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले कि प्रेम गीते हि केवळ दोघांचीच उरतात.त्यांचे स्वरूप हे जणू एकांत गीते असे होते. युगल गीतात एकाच कडव्यातील पहिल्या दोन ओळी एकाने आणि तिसरी ओळ एकाने म्हणत जणू हे विश्वच फक्त दोघांचे आहे असे वातावरण त्यांचे संगीत निर्माण करते. प्रियकर आपल्या प्रेयसीस आर्ततेने म्हणतो -
हात तुझा हातातुन धुंद ही हवा ....
त्यावर उत्तर देत प्रेयसी म्हणते -
रोजचाच चंद्र आज भासतो नवा...
                            मग या भारल्या वातावरणात  प्रेयसी भानावर येत आपल्या प्रियकरास विचारते, आज जरी हे सर्व तुला धुंद नवे नवे आणि हवे हवे असे वाटत आहे तरी जर आपण दुरावलो भेटी गाठी अशक्य झाल्या तर तेंव्हा-
तू जिथे कुठे असशील
स्वप्‍नांत मला दिसशील
तुज कळेल पण हे का रे ?
विसरशील तू सारे
                            प्रेयसीची हि मनातील अनामिक भीती किंवा वास्तव परिस्थितीतील दुरावा जेंव्हा वरील शब्दात येतो, तेंव्हा प्रियकर जे काही घडलेय ते एकाच बाजूने नाही, आज निर्माण झालेला दुरावा आणि हि परिस्थिती आपल्यातील अंतर यावर तो म्हणतो -
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?
हा जो शब्दातील सल आहे तो खळे यांनी त्याच्या संगीतातून नेमका आत पोहचवला आहे.
                             श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असतात, त्यामुळे खळे  यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?
                             त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून  गाऊन घेतल्या.
'अभंग तुक्याचे ' यासाठी लता मंगेशकर आणि 'अभंगवाणी ' यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला .याशिवाय या दोघांना एकत्रित गायला लावून ' राम श्याम गुण गान ' साठी त्यांनी संगीत दिले.
त्यांनी संगीत दिलेल्या,
पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील - 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
                                                       रविशशिकळा लोपलिया ॥१॥'
आणि ,लताजींच्या आवाजातील - 'सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
                                              कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ '
या दोन रचना  अशा आहेत कि त्यातील स्वरांची  आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही
                                           श्रीनिवास खळे यांच्या वाट्याला उमेदवारीच्या काळात कलाकारांच्या वाट्याला येणारे भोग त्यांच्याही वाट्यास आले. बडोदा सोडून नशीब अजमावण्यासाठी मायानगरीचा रस्ता धरला.
                                          ओळखी ओळखीतून राहण्याची तात्पुरती व्यवस्था, नवीन म्हणून होणारी उपेक्षा , यासारख्या अडचणी त्यातून आलेले नैराश्य, यामुळे काही काळ ते इतके हतबल  झाले  होते कि स्वतःची हार्मोनियम विकून परतीचा रस्ता धरावा असा निर्णय पण घेतला होता.
                                          पण या कठीण प्रसंगी त्यांना त्याच्या पत्नीने मानसिक बळ  देत  या निर्णयापासून परावृत्त केले.सौ खळे यांनी त्यावेळी दाखवलेल्या धैर्या मुळे संगीत क्षेत्राचे होणारे अपरिमित नुकसान टळले , त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र आजही त्यांचे ऋणी आहे.
                                          त्यानंतर एका चित्रपटासाठी म्हणून तयार झालेली दोन गीते ऐनवेळी त्या चित्रपटाचा संगीत रचनाकार खळे यांच्या ऐवजी दुसराच कोणीतरी ठरल्याने त्या चित्रपटात घेतलीच नाहीत. पण ह्या दोन गीतांची रेकॉर्ड एच.  एम . व्ही . कडून तयार करून घेण्याची समयसूचकता गदिमांनी दर्शवली.
                                        गदिमांचा हा निर्णय हा खळे यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला . कारण या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रेकॉर्डवर गीते होती  ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ….
यावरील दोन गीतांपैकी एका तळ्यात होती मधील -
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक

या कडव्या प्रमाणे त्यांना स्वः प्रतिभेची जाण  तेंव्हाच झाली होती. बाकी जगाला ती येण्यास बराच काळ जावा लागला. पुढे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले . त्यांच्या प्रमुख पुरस्कारांची यादी अशी आहे
सूर सिंगार पुरस्कार (इ.स. १९७०)
लता मंगेशकर पुरस्कार (इ.स. १९९३)
जीवन गौरव पुरस्कार (इ.स. २००६)
संगीत रत्न पुरस्कार (इ.स. २००७)
पद्मभूषण (इ.स. २०१०)
स्वरयात्री समाजगौरव पुरस्कार
सुधीर फडके पुरस्कार,
बालगंधर्व पुरस्कार
स्वररत्न पुरस्कार
दत्ता डावजेकर पुरस्कार
अर्थात त्या पुरस्कारांमुळे खरे तर सन्मान पुरस्कारांचा झाला. यासर्व पुरस्कारानंतर इ.स. २०१० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

आपल्या स्वतः च्या या यशो मालिकेकडे पाहताना त्याची वृत्ती मात्र त्यांनीच स्वरबध्द केलेल्या -
 'देवा, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला ! ' या गीता प्रमाणे राहिली असेल असेच वाटते .
खळे यांनी प्रेम गीत , भाव गीत, भक्ती गीत , चित्रपट गीत या  बरोबरच बाल गीत हा प्रकार देखील लीलया हाताळला . १९५२ साली 'गोरी गोरी पान' ने
सुरु झालेला हा प्रवास नंतर -
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?
एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला
गमाडि गंमत जमाडि जंमत, ये ग ये सांगते कानात
चांदोमामा, चांदोमामा ..... भागलास काय ?
नको ताई रुसू, कोपर्यात बसू
या सारख्या वैविध्य पूर्ण बालगीतांनी बहरतच राहिला.

                                                         स्वतः परिस्थितीशी झगडत ध्रुव ताऱ्याचे अढळ पद मिळवताना त्यांनी इतरांना पण नेहमीच ' दीपगृहा ' ची भूमिका घेत समर्थ मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे संगीत क्षेत्राला शंकर महादेवन सारखा चमकता तारा लाभला. जो खळे काकांचा शिष्य म्हणून नावारूपास आला .
                                                        अरुण दाते यांना मराठी भाव गीत गायनाची प्रथम संधी श्रीनिवास खळे यांनी दिली.  मी मुळचा मराठी भाषिक नाही, त्यामुळे मराठी भावगीत हा प्रकार मला जमणार नाही, असे अरुण दाते यांचे मत श्रीनिवास खळे यांनी पूर्णतः चूक ठरवत त्यांना गायनाची संधी दिली .
                                                      या खळे यांच्या निर्णयामुळे गायन क्षेत्रात अरुण दाते हे नाव चमकले, आणि तेही शुक्राच्या ताऱ्या प्रमाणे . कारण अरुण दाते यांचे खळे यांनी संगीत बद्ध केलेले गीत होते …
'शुक्र तारा मंद वारा' हे होय.
या गीताने अरुण दाते यांना मिळालेले यश मागे वळून पाहताना त्यांना याच गाण्यातील -
शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी याच ओळी आठवत असतील.
                                                   असा हा  प्रतिभावंत संगीतकार , यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, अल्प आजाराने २  सप्टेंबर  २०११ रोजी आपल्यातून गेला. त्या अखेरच्या दिवसात देखील, आपल्या भावना  ईश्वरास सांगताना, स्वतःची संगीत रचना वापरून,आपली मनोकामना त्याच्या चरणी मांडली असेल आणि त्यांच्या ओठी -
हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
हि संत तुकारामांची रचना आली असेल असेच वाटत राहते.
                                              ज्या दिवशी त्यांच्या जाण्याची बातमी धडकली तेंव्हा एक रसिक आणि एक अनामिक मित्र म्हणून माझी भावना मात्र -
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे ? या त्यांच्याच  एका संगीत रचने  सारखीच झाली होती . त्यामुळे आता अधिक काय लिहणार ?

No comments:

Post a Comment