Thursday, January 13, 2011

चित्रावरून साकारलेले शब्दचित्र.

निसर्गातील हालचाल, स्थैर्य, त्यातील कलाविष्कार नजरेने टिपत कागदावर उतरवणे म्हणजे कलासक्त मनाची आंदोलने चित्रित करणे. त्यासाठी मनाची एकाग्रता, कुंचल्याची सहजता हवीच आणि त्या पलीकडे जावून असावे लागते ईश्वरी वरदान. त्यातून तयार होतात कलाकृती ज्या चित्रित करतात कलामनाची आसक्ती.
मुळात सुंदर चित्र खूप काही रंग रेषेतून सांगून जाते. तर सुंदर कथा, लेख, शब्दातून चित्र निर्माण करतात.
 ' चिन्ह ' या ब्लॉगच्या वाचनाने चित्र,शिल्प, यांचा थोडा फार अर्थ समजू लागला.नुकताच श्री. मिलिंद मुळीक ( Milind Mulick) यांचा ब्लॉग पाहण्याचा योग आला. त्यावरील कलाकृती मानस भावल्या. पण प्रत्येक चित्र कलाकाराच्या मनाची आंदोलने कागदावर जशीच्या तशी चित्रित करत असेल का ? या प्रश्नाने मन हैराण झाले. हितगुज या दिवाळी अंकात चित्रकला आणि चित्रकार यांच्यासाठी वाहिलेला एक स्वतंत्र विभाग आपल्या चित्र आणि चित्रकार याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन समृद्ध होण्यास कारणीभूत ठरेल इतका सुंदर सजला आहे.
चित्र रेखाटताना चित्रकाराचे मन समोरील दृश्य डोळ्यांनी पाहतो,त्याच वेळी मनानी त्याविषयी एक प्रतिमा साकारून भावनांची आंदोलने मनात रेखाटत असेल का? जे त्या चित्रकाराने रंग रेषेच्या त्याच्या हुकमी आयुधांनी मांडले,त्याविषयी त्याचे मन तेच म्हणत असेल का ? असे प्रश्न मानस सतावू लागतात. सोबत मी आपणास श्री. मिलिंद मुळीकजींचे चित्र जे त्यांच्या ब्लॉग वरून घेतले आहे, ते देत आहे.
खरे तर हे चित्र पाहताना मी अक्षरशःहरखून गेलो.तो  वळणदार रस्ता, धुक्याने वेढलेला परिसर, याबरोबर माझा प्रवास सुरु झाला.चित्रातील रंग संगती इतकीच प्रकाश रेषा आणि त्यांचा वापर मनास भावला. त्या चित्रात मी इतका समरस झालो कि,चित्रातील त्या परतीच्या वाटेवर माझी पाऊले त्यांच्या बरोबरीने पडू लागली, आणि मनात साकारल्या या चार ओळी...
चालती पाऊले अवघड घाट
पहा कशी आहे चढणीची वाट
संपता संपेना असुनी वहिवाट
ओझ्याच्या गाढवांचा गाढवांसंगे थाट....
 म्हणजे एका चित्राने माणसाचे जगणे, रोजचा तोच तो दिनक्रम इथपासून ते कितीही अडचणी आल्या, आव्हानांचे डोंगर जरी  समोर आले तरी आम्ही पुढे जाताच राहणार,असे विविध कल्पना मनात उभ्या राहिल्या. आता प्रत्यक्षात मिलीन्द्जींना या चित्राचे निर्मितीच्या वेळी कोणता भावनांना सामोरे जावे लागले असेल ? का केवळ एक निसर्ग चित्र म्हणून हि निर्मिती असेल ? हे प्रश्न मनात तसेच राहिले. जर कधी योग आला तर मिलीन्द्जींनी 'माझ्या चित्र निर्मितीमागील प्रेरणा ' अशा नावाने आपला कलाविष्कार आणि मन चित्र यांचा नातेसंबंध उलगडून सांगणारा कार्यक्रम त्यांच्या आवडीची काही चित्रे घेवून करावा असे वाटते.
कसे वाटले चित्रावरून साकारलेले शब्दचित्र.

No comments:

Post a Comment