Wednesday, January 11, 2012

निर्गुण भजनांचे तरंग, अंतरंगात पोचवणारा फकीर - पं. कुमार गंधर्व

मी पुणेकर आहे. पुण्याच्या बारा पंधरा वर्षांच्या वास्तव्व्यात नियमितपणे सवाई गंधर्व मैफिल जागवणारा.  जेंव्हा पुण्याच्या गुलाबी थंडीत रथी-महारथींच्या स्वर्गीय सुरावटींच्या सागरात अक्षरशः डुंबत मैफिल जागवणे हेच त्या मैफिलीचे वैशिष्ट्य होते, तो काळ अनुभवला आहे. असे असूनही मी मोकळेपणाने सांगतो की, शास्त्रीय संगीतात मला काही कळत नाही. पण मैफिलीत दाद देण्याची जी जागा असते ना, ती मात्र कधीच चुकली नाही. आणि ते का झाले सांगू? जेंव्हा गाणे ऐकायला जायचे, तेंव्हा ते कानात पंचप्राण एकवटून ऐकायचे इतकेच माहित होते. त्यामुळे तान, लय, सूर याचे अचूक ज्ञान जरी नसले तरी परमोच्च आनंदाचे क्षण हेरण्याची सवय आतून लागली होती. थोडक्यात काय, तर आमचे हिंदुस्थानी संगीत अनुभवणारे 'कानसेन' घराणे. तसे आम्ही घराणेशाही न मानणारे. त्यामुळे राजकारणापासून तर दूरच. पण संगीतात घराणी असतात, त्यांच्या परंपरा असतात याची माहिती आमच्या घराण्यात देखील कोणाला नाही. त्यामुळे कानाला जे गोड लागते ते उच्च घराण्यातील संगीत हा आमचा एक समज. आणि तो आम्ही अभिमानाने जपला.

एका तपाहून अधिक काळ दिगज्ज कलाकारांना ऐकण्याचा अनुपम योग आला तरी एक रुखरुख मात्र कायमची मनात राहिली आणि ती म्हणजे त्या व्यासपीठावरून पंडित कुमार गंधर्व या महान कलाकारास ऐकण्याचा योग आला नाही. त्यामुळे त्यांच्या बाबत नेहमीच 'दुधाची तहान ताकावर' भागवत त्यांना रेडीओ, सी.डी या माध्यमातूनच ऐकले. सुप्रसिद्ध आणि मनाच्या अशा ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेमध्ये त्यांनी शास्त्रीय संगीताची उपासना सुरु केली. पण पुढे जाऊन त्यांनी स्वतःची अशी खास गायकी निर्माण केली. घराणेशाहीच्या काही परंपरा झुगारून देत, आपल्याच तंत्राने संगीत-सेवा करीत जगलेला हा महान कलाकार मला नेहमीच वंदनीय वाटला.

एकूणच या महान गायकाचा जीवनपट उलगडून पाहिल्यास आपण त्यातील चढ उताराने अक्षरशः हतबुद्ध होवून जातो. वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःची मैफिल कलकत्ता येथे गाजवली. त्या मैफिलीतील त्यांचे गायन इतके पराकोटीचे सुंदर होते की जमलेल्या श्रोतावृंदाने उत्स्फूर्तपणे शाली, दागिने, घड्याळे, रोख रक्कम अशा अनेकविध भेटवस्तूंचा मारा केला. गायनामध्ये परिपक्वता असणाऱ्या या बालगायकाने, त्या भेटवस्तू मात्र बालसुलभ वृत्तीने सहजतेने गोळा केल्या. मात्र या किशोरवयीन काळातील गायनाच्या उंचीनेच त्यांना 'कुमार गंधर्व' हि चिरतरुण पदवी बहाल केली.

त्यांच्या निवडक मराठी गाण्यांपैकी, मला स्वतःला कायमची स्मरणात राहिलेली दोन गाणी आहेत. त्यातील पहिले म्हणजे - 'ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी'... ह्या गाण्यातील-

`त्या कातरवेळा थरथरती कधी अधिरी,त्या तिन्ही सांजांच्या आठवणी त्या प्रहरी'

या ओळी नेहमीच मला सद्गतीत करतात. कधी कधी वाटते की, वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी जेंव्हा डॉक्टरांनी, यापुढे त्यांना कधीच गाता येणार नाही असे सांगितले, तेंव्हाची मनाची कातर अवस्थाच त्या दोन ओळी सांगतात का? आणि त्यांचे दुसरे गाणे - `कोणा कशी कळावी वेडात काय गोडी` म्हणजे तर त्यांच्या संगीत प्रवासाचा आरसाच वाटतो.

श्री.शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ या सुलेभावी, बेळगाव कर्नाटक येथे जन्मलेल्या या गायकाने अहमदाबाद मुंबई मार्गे आपली कारकीर्द बहरास आणली. तेव्हा त्यांना शास्त्रीय संगीतातील नवोदित अग्रणी गायक म्हणून यश-प्रसिद्धी मिळण्यास नुकतीच सुरवात झाली होती. जीवनाच्या मैफिलीने रंग भरण्यास सुरवात केली होती. पण अचानक उदभवलेल्या आजाराने सर्व परिस्थिती बदलून गेली. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. शस्त्र क्रियेद्वारे एक फुफ्फुस काढून टाकावे लागले. यापुढे गाणे बंद ह्या डॉक्टरांच्या शब्दांनी त्यांना पुरते घायाळ केले. शेवटी आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी त्यांना स्वच्छ मोकळ्या हवेच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. समोर आलेल्या या वळणावर कुमारजींची पावले देवास या मध्य प्रदेशातील ठिकाणाकडे वळली. हिंदी ही प्रमुख भाषा असलेले हे देवास (देव का वास -जिथे देवाचेच वास्तव्य आहे). हे ठिकाण इंदूर उज्जैन या रम्य परिसरातील एक शहर. आजारपणातून बरे होणे यासाठी स्थलांतर झाले होते.

गायन थांबले,पण पुढे काय, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरीत होता. स्वच्छ हवा, मोकळे वातावरण या उद्देशाने झालेले स्थलांतर कुमारजींचे आयुष्य बदलून टाकणारे ठरले. कारण त्यानंतर त्यांचे संगीत अमुलाग्रपणे बदलले. माळवा येथील लोकगीते, कवी कालिदासाचे या परिसराशी जोडलेले एक अदृश्य नाते... यापैकी कशाने ते प्रभावित झाले असेल? आजारपणानंतर जवळजवळ पाच वर्षे कुमारजी संगीत-मैफिली या पासून दूर होते. त्या काळात त्यांचे स्वर मुके झाले असले तरी संगीताशी त्यांचा मूक संवाद सुरूच होता. हा पाच वर्षांचा काळ त्यांना आत्मसंवादातून बरेच काही शिकवून गेला.

प्रत्यक्ष गायन थांबले तरी त्याचा अभ्यास सुरूच होता. सप्तसुराची आळवणी थांबली तरी सप्तसुरांची सेवा श्राव्य मार्गाने सुरु ठेवली. कुमारजींनी त्या काळात देवास परिसरात गायली जाणारी लोकगीते विविध मंदिरात जाऊन कानात अक्षरशः साठवली. रात्री उशिरा सुरु होणाऱ्या या जागरास हा थोर गायक अंगावर कांबळं घेवून जाऊन बसत असे. लोकगीतांची ही मैफिल उत्तर रात्री संपत येण्यापूर्वी थोडावेळ आधी ते त्या मैफिलीतून उठून घरी जात असत.

याच काळात या गायकाचे मन आणखी एका असामान्य साहित्य प्रकाराकडे ओढले गेले. घराच्या दारासमोरून ये - जा करणाऱ्या फकिरांच्या कडून त्यांनी संत कबीरांच्या अद्वितीय पराभक्तिच्या अलौकिक रचना ऐकल्या. त्या निर्गुण-निराकार अद्वैताबरोबर संवाद साधणाऱ्या आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या भजनांनी त्यांना अगदी झपाटले. त्यांनी संत कबीर यांच्या 'निर्गुणी भजनांचा' अभ्यास सुरु केला.जणू त्या रचनांनी त्यांना त्यांच्या संगीत साधनेचे साद्ध्यच दाखवून दिले. पुढे १९७० च्या आसपास जेंव्हा प्रथम त्यांनी या निर्गुणी भजनांना शास्त्रीय संगीताचे व्यासपीठ खुले केले तेंव्हा ते त्यांनी संत कबीराला केलेले वंदनच होते. जणू त्या निर्गुणी भजनांनी कुमारजींना निर्गुण स्वरभक्तीचे व्यासपीठच मिळवून दिले असेच म्हणावे लागेल.

कुमारजी यांचे थांबलेले गायन पुढे सुरु झाले तेंव्हा त्यांनी निर्गुणी भजने आणि लोकगीते यांचा सुरेख संगम दमदार शास्त्रीय संगीताशी घातला. जर त्यांची निर्गुणी भजने ऐकली तर रचनेतील आर्तता, सात्विकता आणि भक्ती आणि गायकीच्या नजाकतीतून साकारलेली 'सगुणता' मनास भिडते. जे निर्गुण निराकार आहे ते स्वरांच्या चढ-उतारातून त्यांनी असे साकारले की सामान्य श्रोत्यांसाठी ते निराकार राहतच नाही.

आपल्या आजारावर मात करीत त्यांनी संगीत क्षेत्रात पुनःपदार्पण केले. या मैफिलीच्या दुसऱ्या टप्प्यात जरा स्थिरावू लागतात तोच त्यांच्यावर आणखी एक आघात झाला. त्यांची प्रथम पत्नी भानुमती यांचे १९५७ साली निधन झाले. त्यांचे हे दुखः त्यांनी गायलेल्या “कोई नाही अपना, समझ मना ..... “ या निर्गुणी भजनातून पुरेपूर प्रतीत होताना जाणवते.काळ पुढे जात होता.कुमारजींचे गुरु श्री. बी.आर. देवधर यांच्या शिष्या वसुंधरा यांनी पुढे काही शिक्षण कुमारजींकडे घेतले. त्या कुमारजींच्या जीवनात सहचारिणी म्हणून प्रविष्ट झाल्या. मग त्यांनी उर्वरित आयुष्यात त्यांची व्यक्तिगत मदतनीस ही भूमिकाही पार पाडली.

कुमारजींचे गायन बहरत होते. पण त्यांना घराणा गायकीचे सर्वच नियम-मर्यादा बंधनकारक आहेत असे वाटले नाही. हे बंधन न मानता त्यांनी स्वतःची खास शैली निर्माण केली. उदाहरण द्यायचे म्हटले तर रागदारी गायनामध्ये परंपरेनुसार सुरुवातीला होणाऱ्या आलापींना महत्त्व आहे. त्यांना राग प्रस्तुतीमध्ये स्वतंत्र स्थान आणि अस्तित्त्व आहे. पण कुमारजींनी त्यांना एवढे महत्त्व दिले नाही. जणू त्या आलापींचा वापर ते आपली साधनांची जुळवाजुळव करण्यापुरताच करीत,आणि सर्व काही जागच्या जागी आहे अशी खात्री झाली, की लगेच मुख्य रागाकडे वळत.

अर्थात त्यांच्या या प्रयत्नांकडे सर्वांनीच सकारात्मक दृष्टीने पाहिले, असे पण झाले नाही.उलट त्यांच्या या शैलीमुळे त्यांचे संगीत वादग्रस्त ठरले. प्रसिद्ध गायिका श्रीमती मोगुबाई कुर्डीकर यांनी कुमारजींच्या गायन शैलीस जाहीरपणे नाकारले, पण त्यांची टीका सभ्यतेस धरून राहिली. मात्र गायनाची पुरेशी समाज नसणारे देखील आपली मते मांडण्यात आघाडीवर राहिले. जेंव्हा १९७० च्या दशकात त्यांनी संत कबीर यांच्या निर्गुणी भजनांना आणि लोकगीतांना व्यासपीठ दिले, तेंव्हा एका सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांनी "हे कसले भिकाऱ्याचे गाणे" अशी उथळ टीकाही केली. मला तर संत कबीर यांच्या रचना, त्यातील निर्गुण, निराकार ईश्वररूप कसे आहे हे समजावून न घेताच टीका करणाऱ्या त्या साहित्यिकास दरिद्री म्हणावेसे वाटते. अर्थात जेंव्हा एखाद्या गायकाच्या उत्तुंग प्रतिभेमुळे त्याचे स्वतःचे असे साम्राज्य निर्माण होऊ लागते, तेंव्हा त्या साम्राज्याच्या विस्तार भयाने असा काही विरोध होणे हे अनपेक्षित नाही.

स्वतः कुमारजी मात्र अगदी पद्मविभूषण मिळाले तेंव्हा सुद्धा नम्रच राहिले. आपल्या खास कानडी ढंगात मराठी बोलताना ते नेहमी म्हणत, "एका खेडेगावातून प्रवास सुरु केलेला हा मुलगा कुठून कुठे येवून पोहचला बघा की! शाळेत जाऊन नाही शिकलो तरी माझ्या मित्रांनी माझ्या गाण्यावर प्रेम करत खूप शिकवून सोडले बघा".

एकूण काय, तर लौकिकार्थाने शालेय शिक्षण न झालेला हा गायक संगीतातील तज्ञ होता. सूर ताल यांच्या अनुभूती पलीकडे जाऊन त्यांनी संगीतात ओतप्रोत भरून राहिलेली भक्ती, आणि तिच्या साधनेतून प्राप्त होणारे निर्गुणतत्वातील गुणत्व आपल्यासमोर उलघडून ठेवले. स्वतःच्याच अचंबित करणाऱ्या असामान्य जीवन प्रवासाकडे पाहताना देखील त्यांना संत कबीर यांच्या “उड जायेगा हंस अकेला” या भजनातील “....जैसे पात गिरे तरुवर के, मिलना बहुत दुहेला, ना जानू किधर गिरेगा, लायेगा पवन का रेला...” याच ओळी आठवत असतील.

आज कुमारजींना आपल्यातून जावून २० वर्षे होत आहेत. कलंदर वृत्तीने जगलेल्या या फकिराने, जगाची फिकीर न करता, लोककला, लोक संगीत आणि संत कबीर यांच्या निर्गुणी रचना, अशा काही प्रकारे समाजा समोर आणल्या, कि त्यातून त्या रचनांना आणि कुमारजींच्या गायकीला एकाच व्यासपीठावर न्याय मिळला. काळ कोणासाठीच थांबत नाही. आज पत्नी वसुंधराताई, पुत्र मुकुल, कन्या कलापिनी आणि इतर शिष्यवृंद कुमारजींच्या गायकीचा वारसा तितक्याच आत्मीयतेने आणि तन्मयतेने जपत आहेत.’ आम्ही चालवू हा पुढे वारसा‘ असे म्हणत त्यांचा नातू भुवनेश कोमकली जेंव्हा सवाईच्या मंचावर विराजमान झाला, तेंव्हा कुमारजींच्या आठवणीने मन भरून गेले. आज हा क्षण अनुभवण्यासाठी कुमारजी आपल्यात असते तर कदाचित आपोआप त्यांच्या ओठी त्यांनी गायलेले शब्दच आले असते ..

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा,
ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण

No comments:

Post a Comment