Saturday, December 1, 2012

एकवीस दिवस राहिले का जगबुडीला ?


आज एक डिसेंबर .आणखी एक महिना संपला आणि नवीन सुरु झाला. तसा सगळा नेहमीचाच खेळ. अगदी लाडक्या किशोरकुमारचे ते रेडिओ सिलोनने अजरामर केलेले गाणे 'खुश है जमाना आज पहिली तारीख है' प्रथम गुणगुणून मग ऐकून झाले. बघता बघता शेवटचा महिना आला देखील असे स्वतः ला बजावून झाले. आता आज काहीतरी कागदावर उतरवावे म्हणजे मग मनास थोडे बरे वाटेल असा स्वसंवाद झाला.
पण आज काहीतरी चित्ररुपात मांडावे म्हणून रंग ब्रश कॅनव्हास उलगडून बसावे आणि मनातील कल्पनाच धूसर व्हावी तसेच काहीसे झाले.विचार चक्राची मालिका दृष्यमान न होताच वेगाने उलगडत जाणाऱ्या चित्रफीती प्रमाणे सरकत गेली.आणि मग आठवण झाली एकवीस डिसेंबरची. अरे खरच एकवीस दिवस राहिले का जगबुडीला ? असा प्रश्नही डोळ्या समोर आला.आंतरजालावर एक फेरफटका मारून एकवीस डिसेंबर बाबत काय चाललेय ते पाहावे म्हणून चक्कर टाकली तर एकूण सगळे पाहून चक्करच आली, कारण राहिलेल्या एकवीस दिवसात वाचून, विचार करून,काही ठरवणे केवळ अशक्य होते.
अर्थात या येवू घातलेल्या जगबुडीचा  फायदा घेत काहीजणांनी केलेला धंदा मात्र खरोखर जगाला बुडवेल असा वाटला. खरोखर काही दुर्दैवी घडणार असेल तर या व्यवसायातून मिळवलेला फायदा उपभोगायला ते संधी साधू तरी वाचतील का ? पण तरीही मृत्युच्या भीतीपोटी आपण धावाधाव करणार हेच खरे. संपूर्ण पृथ्वीतलावर तुकड्यां मध्ये विखरून पडणारी  'अंतरीक्ष प्रयोगशाळा' (sky lab)असो किंवा स्वाइन फ्लू सारखी साथ असो आपली धावपळ सुरूच राहते. 
मग माझे मलाच जाणवले कि आपण कसे जगावे ? कशात आनंद घ्यावा ? आपल्या उदासीनतेची करणे काय ? या स्वतःच सोडवायच्या प्रश्नांची उकल आपण स्वतः न करता दुसऱ्यावर त्याची जबाबदारी ढकलली कि  त्यातून जगबुडीची भीती घालत आपल्याला बुडवणारे धंदे करणाऱ्या मंडळीचे फावणारच. दुसरे काय ? 
मायन  संस्कृती द्वारे तयार झालेली दिनदर्शिका २१.१२ .२०१२ ला संपत आहे म्हणजेच  त्या दिवशी जग संपत आहे असे नक्कीच नाही. आपले गणिती ज्ञान पणास लावून  ती दिन दर्शिका बनवणाऱ्या त्या गणित तज्ञाची किंमत त्या काळातील पुढारी लोकांनी न ठेवल्यानेच  ( अर्थात संस्कृती कोणतीही असो किंवा कितीही जुनी असो, पुढारी सगळीकडे सारखेच हे त्या गणित तज्ञाला न सुटलेले कोडे असेल ) त्याने ते दिन दर्शिकेचे काम थांबविले असेल असे मला नेहमी वाटते.
म्हणजेच पुढील कित्येक शतके उपयुक्त ठरणारी दिन दर्शिका बनवून देखील, त्या कामाचा उचित सन्मान होत नाही हे जेंव्हा त्या दिन दर्शिका कर्त्याच्या लक्षात आले, तेंव्हाच त्याच्या दृष्टीने जगबुडी झाली होती, त्याने काम थांबवले तो संपला त्याबरोबरच त्याचे साठी जगच  संपले हेच खरे.थोडक्यात काय तर मायन संस्कृतीत दिन दर्शिकेचे काम २१.१२.२०१२ पर्यंत येवून थांबले, जग नाही थांबले, हे जग या विश्वाच्या अफाट पसाऱ्याचा भाग म्हणून अव्याहतपणे, अनंत काळ पर्यंत टिकून राहणार आहे, फक्त तुमचे किंवा तुमच्या जगण्याचे प्रयोजन संपले कि ती तुमची खरी जगबुडी आहे हे मात्र तुम्ही अगदी २१.१२.२०१२ पर्यंत नव्हे तर नेहमीच लक्षात ठेवा.   

No comments:

Post a Comment