Sunday, December 2, 2012

‘देव अजब गारुडी’-आदरांजली बहिणाबाई चौधरी यांना.

अचानक एखादा  गुप्त धनाचा साठा समोर यावा आणि त्यातल्या रत्नजडीत दागदागिन्यांनी डोळे दिपून जावेत तशी अवस्था एकदा आचर्य प्रल्हाद केशव अत्रे यांची झाली होती.त्याला कारणही तसेच होते. आपल्या अशिक्षित आईच्या तोंडून ऐकलेल्या काव्य रचनांच्या हस्तलिखिताची वही भीतभीतच अभिप्रायासाठी सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या समोर ठेवली होती.
त्यातील निसर्ग, पाऊस, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांवरील रचना पाहून अत्रे सोपनदेवांना उत्स्फूर्तपणे म्हणाले होते -"अरे हे तर बावन्न कशी सोने आहे, का इतके दिवस आपण ते दडवून ठेवलेत?"त्या रचनांमधून जीवन विषयक अर्थगर्भ तत्वज्ञान इतक्या सहज-सोप्या शब्दात मांडलेले होते कि अत्रेंचे भारलेपण संपायलाच तयार नव्हते. खरेतर प्र.के.अत्रे यांच्या सारख्या जाणत्या माणसाच्या हाती आले म्हणुन तर हे साहित्य अवघ्या जगाचे झाले.
अत्र्यांना भारावून टाकणाऱ्या त्या रचना होत्या,खानदेशच्या कवयित्री  बहिणाबाई चौधरी यांच्या.लौकिकार्थाने अशिक्षित असलेल्या या कवयित्रीच्या प्रत्येक रचनेमधून त्यांची अफाट निरीक्षण  क्षमता, बहुश्रुतता आणि जीवनाबद्दलच्या निर्मळ, सकारात्मक आणि स्पष्ट दृष्टीकोनाचा प्रत्यय येतो.
१९६१ च्या 'मानिनी' ह्या चित्रपटाने रसिकांवर घातलेली मोहिनी आजही तशीच आहे ती कर्णमधुर संगीत आणि थेट मनाला भिडणाऱ्या बहिणाबाईंच्या गीत रचनांमुळे! "अरे संसार संसार,जसा तवा चुल्ह्यावर,आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर" या गीताने 'बहिणाबाई' या मुळच्या  अहिराणी/मराठी भाषेतील थोर कवयित्री सर्वदूर पोहचल्या. 
बहिणाबाई नथुजी चौधरी ह्यांचा जन्म जळगावातल्या असोदे इथे १८८० साली  महाजन घराण्यात झाला.वयाच्या ५व्या वर्षी विवाह,९व्या वर्षी कौटुंबिक अडचणीतून स्थलांतर,आणि वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी वैधव्य असा काहीसा अस्थिर जीवनप्रवास असूनही त्यांनी त्या  खडतर वाटचालीकडे नेहमीच सकारात्मक वृत्तीने पहिले.
बहिणाबाई अशा उत्स्फूर्तपणे बोलत कि त्यांच्या रचना हमखास मनाचा ठाव घेत. जगाच्या बिन भिंतीच्या शाळेतील अनुभव त्यांच्या काव्यातून उतरत. त्यामुळे शब्दोचार,नातेसंबंध,मन,निसर्ग इथपासून समाजनीती सारख्या विविध विषयांवरील त्यांच्या रचना अजरामर झाल्या आहेत.  त्यांच्या या सहज काव्य वृतीने चकित होवून त्यांच्या ओळखीच्या बायकांनी त्यांना विचारत "तुंम्हाला हे सारे सुचते कसे?" तेव्हा त्यांचे उत्तर काव्यमयच असे त्या उत्तरादाखल म्हणत -
"माझी माय सरसोती, माले शिकविते बोली,  लेक बहिणाचे मनी किती गुपिते पेरली."
सासरी आणि माहेरी शेती हेच प्रमुख उपजीविकेचे साधन.त्यामुळे काम करताना भोवतालचा निसर्ग, पक्षी त्यांच्याशी संवाद साधत. निसर्गाच्या प्रत्येक रुपात, शेतात, पिकात, पावसात, तसेच समोरच्या माणसात आणि स्वतःत त्यांना देव दिसे. नजरेस दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्यांना काव्य दिसे. मग शेतकऱ्याला आपल्या कष्टाचे मोल उमजावे म्हणून त्या प्रेमाने सांगतात-
काया काया शेतामंदी घाम जीरवं जीरवं, तवा उगलं उगलं कायामधून हिरवं.” 
मात्र शेतातून धान्य रुपात येणारी समृद्धी ही दैवी देणगीच आहे म्हणून त्याचे ऋण मानतात -
कशी वाऱ्याने डोलती, दाने आले गाडी गाडी, दैव गेले रे उघडी, देव अजब गारुडी.”
शेतकरी आणि निसर्गचक्र यांचे अतूट नाते, त्यातील नजाकत त्यांनी सहजतेने टिपली आहे.ऋतुचक्र आणि जीवन ह्यावरील त्यांचे भाष्य थक्क करून सोडते.पहिलेपणाचा आनंद,त्यातील भारलेपण अदभुत असते. पण बहिणाबाईंना पहिल्या पावसाच्या थेंबात मायेचा गहिवर दिसतो.तापलेल्या भूमीवर पहिल्या शिडकाव्याने पसरणारा मृदगंध मनात साठवताना त्या म्हणतात -
"आला पहिला पाऊस, शिपडली  भुई सारी, धरित्रीचा परमय, माझं मन गेलं भरी.
सहज सुंदर सोपी भाषा वापरताना उपमा,अतिशोयोक्ती या सारखे अलंकार वापरताना किंवा मोजक्या शब्दात व्यक्तीचित्र रेखाटताना त्यांची शब्दावरील अफलातून पकड दिसते. सासर  माहेरच्या अनेक नात्यातील नाजूक पदर उलघडत त्यातील चांगुलपणा टिपताना आई बाबत म्हणतात-
"माय भिमाई माउली, जशी आंब्याची सावली, आम्हा इले केले गार, स्वतः उन्हात  तावली".
तितक्याच सहजतेने सासू बाबत -
"नावे ठेवे  अवघ्याला करी सर्वांची नक्कल, हसविता हसविता शिकविते रे अक्कल" 
असे प्रांजळपणे काबुल करतात. 
जीवन जगताना त्यांनी देव आणि दैव ह्यातील मात्रेचा फरक अक्षर ओळख नसून देखील पुरेपूर जाणला होता.वयाच्या ३०व्या वर्षी वैधव्याची कुऱ्हाड कोसळल्यावर सांत्वनास आलेल्या बायकांची समजूत काढताना त्यांचा डोळसपणा थक्क करून सोडतो – “माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं,माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं. खरी सौभाग्य लेणी कोणती हे सांगताना, त्या म्हणतात -"कुकू पुसलं तरी गोंदण शाबूत आहे. बांगड्या फुटल्या तरी मनगटात ताकद आहे. मंगळसूत्र गेले तरी त्याची शपथ स्मरते आहे" 
भागवत धर्माची शिकवण जगताना त्यांनी सकारात्मक वृत्ती जोपासली. जीवनात अनेक घाव जिव्हारी बसले,पण काव्यातला जिव्हाळा थोडाही घटला नाही.कधी इतरांच्या वागण्याचे वैषम्य वाटलेच तर त्यावर उपहासात्मक टीका करताना सहज म्हणतात – 
'पाहीसनी रे लोकांचे व्यवहार खोटेनाटे, तेंव्हा बोरी बाभळीच्या आले अंगावर काटे.”
रोजच्या दिनचर्येतून त्यांना काव्यरचनेचे विषय सापडत. कधी सकाळी जात्यावर पीठ दळताना त्या  गुणगुणत -
"देवा घरोट घरोट, तुझ्या मनातील गोट. अरे घरोटा,घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी"
कशाला काय म्हणू नये यातील आदर्शवादातून त्यांनी माणसाला सन्मार्गाची कास आणि जगण्याची आस दिली –
आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये,
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नये.
अरे वाटेच्या दोरीला कधी साप म्हणू नये,
इले पोटच्या पोरीला, त्याले बाप म्हणू नये"
माणसाच्या मनाचे वर्णन करताना उपमा अलंकाराचा चपखल वापर करून बहिणाबाई म्हणतात-
'मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात'
मग शेवटी या अगम्य मनाच्या रचनेचे श्रेय अज्ञात शक्तीला देत म्हणतात -
"देवा, असं कसं मन असं कसं रे घडलं, कुढे जागेपणी तुले असं सपान पडलं." 
वाट्याला आलेले दैव बिन-तक्रार स्वीकारून प्रत्येक क्षणी "डोळसपणे"जगणाऱ्या बहिणाबाई त्यांचे सारेआयुष्य खडतर,कष्टप्रद असून देखील जीवनाच्या क्षणभंगुरतेचे त्रिकालाबाधित सत्य पुरेपूर ओळखून होत्या.त्यामुळेच हि अनिश्चितता काव्यात उतरवताना त्या सहजतेने म्हणतात-
"आला सास, गेला सास, देवा तुझं रे तंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर"म्हणूनच की काय, दिनांक ३डिसेंबर १९५१ या दिवशी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. आज त्यांना आपल्यातून जावून एकसष्ठ  वर्षे झाली तरी त्यांच्या रचनांचे गारुड जराही कमी झालेले नाही. म्हणून त्यांच्याच शब्दांचा आधार घेत म्हणावे वाटते-
" दैव गेल रे उघडी 
 देव अजब गारुडी."

1 comment: