Sunday, June 9, 2013

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून….
'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत.
अशी परिस्थिती म्हणजे त्या प्रज्ञावंतांची मती कुंठलेली असते असे नाही पण त्या क्षणी व्यक्त होण्यासाठी त्यांना शब्द सुचत नाहीत. पण परिस्थिती कशी हि असो,कधी शब्दांशी हसत खेळत, कधी शब्दांवर स्वार होत, कधी काव्यातून सुरेख व्यक्त होत आपल्याला भाव भावनांची सहज सुंदर सफर घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत होती त्या मराठी साहित्यातील मात्तबर ' वागीश्वरीस ' आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
दिनांक १९ ऑक्टोबर १९२२ रोजी इंदापूर,पुणे जिल्हा येथे जनार्दन शेळके यांच्या कुटुंबात कन्यारत्न जन्मास आले,कन्या रत्न असूनही अपत्य प्राप्ती मुळे मनास शांती लाभली म्हणूच कि काय त्यांनी मुलीचे नाव शान्ता ठेवले,आणि एका पर्वाची नांदी झाली. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली हीच मुलगी जगासमोर 'शान्ता शेळके' या नावाने अक्षरशः अजरामर झाली.
सामान्य कुटुंब, घरची बेताची परिस्थिती, या सर्व विपरीत स्थितीत जगरीत सांभाळत हि मुलगी शिकली. इंदापूर सारख्या ग्रामीण वातावरणातून थेट पुण्यनगरी गाठत शालेय शिक्षण हुजूरपागा व महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून पूर्ण केले. अर्थात पदवीधर होणे यात जरी नाविन्य नसले तरी मराठी आणि देव भाषा संस्कृत हे विषय घेत संपूर्ण विश्वविद्यालयात सर्वप्रथम येणे यात नाविन्य होते. आणि हे करताना 'न चि केळकर' आणि 'चिपळूणकर' हि दोन मानाची सुवर्णपदके या कर्तृत्वाला जणू सुवर्ण झळाळीच आणत होती .
इतके सारे कलागुण अंगी असूनही घर संसार या आघाडीवर वाट्यास आलेली वंचना त्यांनी आयुष्यभर अंतरंगात अक्षरशः तळाशी गाढून टाकली. आणि मग स्वतःचे व्यक्त होणे उरले ते काव्यातून …।
मात्र हे व्यक्त होणे देखील एक स्वतःशीच साधलेला संवाद होता त्यातुनच त्या म्हणतात -
विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन ,क्षण क्षण झुरति नयन
कोणा सांगू?
पण हे कोणा सांगू ? हे काही उद्वेगातून नसावे, कारण त्यांनी फक्त असाह्यताच व्यक्त केली असे नाही, तर मनोव्यापारातील सर्व व्यवहार त्यांनी नेहमीच सहजतेने शब्द बद्ध केले. शब्द बद्ध कसले, शब्द त्यांच्या समोर नेहमीच हात जोडून उभे असत,मनास कोणतीही भावना स्पर्श करुदे, त्यांना शब्द रूप देणे हा त्यांच्या लेखणीचा सहज खेळ होता.सहा दशके मराठी साहित्य क्षेत्राची अविरत सेवा करताना त्यांनी कविता संग्रह, कथा, कादंबरी, अनुवाद, ललित लेखन स्तंभ लेखन बालसाहित्य अश्या अनेक विभागात लीलया संचार केला आणि त्यामुळेच असेल कदाचित हे शब्द सामर्थ्य सदोदित टिकून राहावे म्हणून, शारदेचे वंदन जितक्या नम्रतेने त्या करतात तितक्याच तन्मयतेने त्या विद्येच्या देवतेस वंदन करताना म्हणतात -
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा ,अवघी विघ्ने नेसी विलया….
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!
रचना भक्तीस्वरूप असो किंवा भावरूप असो प्रेम ,विरह ,सलज्जता असो किंवा अविष्कार शब्दरूप होताना काय घडते तेदेखील त्यांच्या कडून काव्यात उतरताना त्या म्हणतात -
फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार
जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार
आज मी आळविते केदार!
स्त्री मन हे अतिशय भावूक असते,आपल्या मनातील राजकुमार आणि त्याची आराधना यात गुंतलेले स्त्रीमन जळी स्थळी आपल्याच प्रियकरास कसे पाहत राहते हे तिच्याच शब्दात सांगताना त्या म्हणतात -
भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतील गर्द झुला
जाईन विचारीत रान फुला
भेटेल तिथे ग सजण मला !
अशी जीवनाकडे सजगतेने पाहण्याची वृत्ती असताना' प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील विवाहाचा मंगल क्षण आपल्या समोर चित्रबद्ध करताना त्या म्हणतात -
चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटुपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशीम धागे ओढिती मागे व्याकूळ जीव हा झाला
साजणी बाई येणार साजण माझा!
थोडक्यात काय तर भावगीत हा त्यांचा हातखंडाच होता.
शांताबाई शेळके यांची प्रथमची आठवण तशी थोडी धूसरच आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आमच्या शाळेत त्या स्नेह संमेलनास प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. सफेद साडी डोक्यावरून पदर ठसठसीत कुंक आणि त्यावर चष्मा असे पटकन नजरेत भरणारे भरदार व्यक्तिमत्व,त्या व्यासपीठावर आल्या आणि समोर असलेला आठशे ते हजार विद्यार्थ्यांचा समुदाय अक्षरशः मंत्रमुग्ध झाला.
त्या आल्या त्यांनी पहिले आणि खरोखरच त्यांनी काही सांगण्या अगोदरच आम्हा सर्वांना जिंकले. सुरवातीची दहा पंधरा मिनटे अगदी नेहमीच्या सोपस्कारात गेली,आजच्या प्रमुख पाहुण्याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही असे सांगत आमच्या मराठीच्या मास्तरांनी बहुमोल पंधरा मिनटे खाल्ली पण काय करणार पुढील वर्षी पुन्हा तेच मास्तर वर्गावर येणार असल्या मुळे गुपचूप त्यांचे भाषण ऐकले.
त्यानंतर शान्ताबाई बोलण्यास उभ्या राहिल्या , पुढील अर्धा तास आम्ही शाळेत येवून काय करावे, म्हणजे क्रमिक अभ्यासक्रमाबाहेरचे काय शिकावे, याचा कानमंत्र त्यांच्या कडून घेत होतो."आशीर्वाद घ्यावा वाटेल असे गुरुजन आणि अशी शाळा तुमच्या वाट्यास आली हेच तुमचे भाग्य" हे एकच वाक्य अजून जसेच्या तसे मनावर कोरले गेले.त्याकाळी अशी भाषणे ध्वनिमुद्रित करून जपण्याची सोय ग्रामीण भागातील शाळेत नसल्याने, आज ते भाषण जसेच्या तसे उपलब्ध नाही. पण जर ते असते तर पु लंच्या 'हे जग मी सुंदर करून जाईन' या अजरामर भाषणा सारखे ते सर्वश्रुत झाले असते आणि आता मागे वळून पाहताना वाटते, कि आम्ही खरोखरच भाग्यवान म्हणून त्या आम्हास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.
शान्ताबाई यांनी हिस्लॉप महाविद्यालय ,नागपूर रुईया आणि दयानंद महाविद्यालय मुंबई येथे मराठीच्या अध्यापनाचे काम केले. माझ्या उभ्या आयुष्यात मी त्यांना एका स्नेह संमेलनाच्या निमित्ताने ऐकले,त्या अनुभवातून मला वाटते कि,खरोखर त्या तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परम भाग्य म्हणून त्या त्यांना शिक्षिका म्हणून लाभल्या.
एक नामांकित प्राध्यापक असल्या तरी त्या सर्वाधिक व्यक्त झाल्या काव्य रचनेतून. त्यांना चित्रपट क्षेत्राकडे परिस्थिती मुळे वळावे लागले, जेंव्हा त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरवले तेंव्हा स्वतः गदिमा त्यांना म्हणाले होते , "अहो याहून मोठे कार्य तुमच्या हातून घडेल, नका तुम्ही इकडे येवू " पण निरुपाय म्हणून या सल्ल्याकडे पाठ फिरवत त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली. त्यांना यश मिळाले,पण बहुदा त्यांचे मन मात्र त्यांना नेहमीच म्हणत राहिले-
ईश्वरेच्छा हीच किंवा संचिताचा शाप का
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते?
मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
एक गीतकार म्हणून शान्ता शेळके यांचे नाव नावारूपास आले त्याची पूर्ण कल्पना त्यांना स्वतःला देखील होती. आपली हि ओळख त्यांना मान्य देखील होती. आपली हि ओळख कायम राहावी म्हणून त्या म्हणतात -
असेन मी नसेन मी ,तरी असेल गीत हे
फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे
असे असले तरी एक प्राध्यापक, वृतपत्र संपादक, लेखिका,स्तंभ लेखिका, अनुवाद्कार, ललित लेखक, बाल साहित्य लेखिका, अश्या अनेक क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार होता. समाजाने इतका मान सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली तरी कुटुंबाकडून झालेली परवड त्या आयुष्यभर विसरू शकल्या नाहीत. कोष्टी समाजातील जन्म त्यांना कबीराची बुद्धी देवून गेला,शब्द वीण हि कला त्यांच्या हाती अशी होती कि, रेशमाच्या रेघांनी त्यांनी अनेक कशिदे त्यांनी सहजतेने विणले. पण तरीही त्या म्हणतात -
हा स्नेह, वंचना कि, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फुल हि रुतावे हा दैवयोग आहे …

No comments:

Post a Comment