Sunday, June 16, 2013

पितयापरी त्वां सांभाळिले ।

आजच्या रविवारी सकाळी नेहमीच कानावर पडणारे आणि बरेचदा म्हटले जाणारे व्यंकटेश स्तोत्र ऐकत होतो. पण एका ओळीवर मन एकदम अंतर्मुख झाले. कारण त्या ओळी होत्या -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
अनेक वर्ष नियमित म्हटले जाणारे स्तोत्र आणि त्यातील हे सुमधुर कडवे आज मला एक वेगळाच अर्थ समजावून सांगत होते.अर्थात या अंतर्मुखते मागे दोन घटनांची एकत्र गुंफण झाली होती. आज पितृ दिन जो निम्म्यापेक्षा अधिक जगात वडिलांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तो आजचा रविवार आणि आजची तिथी हि माझ्या आईची प्रथम पुण्यतिथी.
नक्की काय बोलावे ? कसे व्यक्त व्हावे काहीच सुचतच नाही. कारण तसे पितृ छत्र वयाच्या चौदाव्या वर्षी हरपले. आणि वयाच्या नवव्या वर्षापासून शिक्षणाकरिता घरापासून दूर रहावे लागल्यामुळे वडिलांचा सहवास कमी काळ लाभला. अल्प आजाराने त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अकस्मात निधन झाले.पण बालपणातील ज्या काही थोड्या धूसर काळाच्या पडद्याआड वडिलांच्या रेंगाळणाऱ्या आठवणी आहेत, त्यातील सर्वात महत्वाची आठवण म्हणजे," स्वाभिमानाने जगा ! " हा त्यांनी कृतीतून दिलेला संदेश. आणि जीवापाड केलेले प्रेम. अर्थात त्यावेळी लहान वयामुळे त्या कृती मागील भावना अर्थ हे तेंव्हा नक्कीच उमजले नाहीत पण आजच्या पितृदिनी त्या आठवणींनी मन सदगतीत नक्कीच होत आहे.
सन १९६८/६९ च्या दरम्यान वडिलांची नोकरी गेली आणि आमच्या घराची अवस्था व्यंकटेश स्तोत्रातील 'अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा ' यासारखी झाली. पण मला आठवतेय कि परिस्थीची खंत न बाळगता कष्टाने पण स्वाभिमानाने जगावे याचा पहिला धडा त्यांनी कृतीतून आम्हाला दिला. कोल्हापूर आणि रंकाळा यांचे नाते अतूट आहे. पण आमच्या आठवणीतील रंकाळा हा जेंव्हा शालिनी पॅलेस हे हॉटेल झाले नव्हते आणि रंकाळ्याचा काठ गावाबाहेर मोकळी हवा खाण्यासाठी फिरावयास जाण्याचे ठिकाण होते तो काळ. त्यावेळी 'रंकाळा चौपाटी' अस्तित्वात आलेली नव्हती पण हे ठिकाण एक दिवस नक्कीच चौपाटी होणार याची मनात खात्री होती बाबांच्या मनात पक्की खात्री होती. कारण तेथे फिरावयास येणाऱ्या लोकांना चिवडा पाकीट विकण्याचा पहिला प्रयोग माहे मे १९६८ मध्ये माझ्या बाबांनी केला.
त्या अर्थार्जनाचे प्रयोगास मी सक्रीय मदत केल्याचे मला आजही आठवते.इतकेच काय पण रु३.५०चे चिवडा सामान पोहे,शेगदाणे,खोबरे, तेल व छोट्या प्लास्टिक पिशव्या आणयचे मग आई त्याचा चिवडा बनवून देत असे. तर बाबा त्याची ५० पाकिटे तयार करीत असत. मग ती पाकिटे घेवून सायंकाळी ४.००ते ७.३० या वेळेत ती मी रंकाळ्यावर फिरावयास येणाऱ्या मंडळींना ती विकत असे. पन्नासावे पाकीट विकले गेले कि कोण आनंद होत असे मग ते ५.०० रुपये घेवून घरी गेले कि, त्यातून रु.३.५०चे चिवडा सामान व रु. १.५०चे किराणा सामान आणून त्या दिवशीची चूल पेटत असे.पण हे करताना कधी लाज बाळगण्याचे कारण नाही, आपण मिळवत आहे तो पैसा कष्ट करून मिळवत आहोत हे बाबांचे सांगणे असे. मला आठवते आहे कि, प्रथम हा धाडसी वाटलेला बाबांचा विचार पुढे किमान सहा महिने घर चालवण्यास उपयोगी ठरला.
प्रथम हा प्रयोग करताना परिचित नातेवाईक यांनी केलेली थट्टा आजही आठवते,पण आज “ रंकाळा चौपाटी”चे बदलते रूप पहिले तर मला मात्र बाबांची दूर दृष्टीच जाणवते. या चिवडा विक्रीतील एक किस्सा मला आजही आठवतो माझा थोरला भाऊ शेखर यास हा उद्योग फारसा आवडत नसे त्यामुळे तो स्वतः चिवडा विक्रीस जाण्यास राजी नसे. एके दिवशी बाबांनी थोडेसे सक्त्तीनेच माझ्या ऐवजी भावास चिवडा विक्रीस पाठवले.
तर तो गेला पण तासाभरातच परत आला आल्यावर घरी सर्वच आश्चर्य चकित झाले व त्यास विचारले अरे वा तू तर लवकर काम संपवलेस किती पाकिटे संपली? तर तो म्हणाला एक! आणि त्याचे पैसे कुठायत विचारल्यावर तो म्हणाला एक पाकीट पेरुवाल्यास दिले आणि आणि त्याचे कडून पेरू घेतला आणि तो खाल्ला. त्यानंतर बाबांनी कधी त्याला चिवडा विक्रीस पाठवले नाही.
खरे तर मला अण्णांचा सहवास तसा अल्पच लाभला. मी दहावीत गेलो आणि अण्णा गेले म्हणजे मी जेम तेम १४ वर्षांचा होतो आणि त्या चवदा वर्षांपैकी अखेरची पाच वर्षे मी त्यांचे पासून दूर मामाकडेच काढली. कारण मी चवथीपर्यंत घरीच असल्याने पहिली, भगवंताचे मंदिर- बार्शी, दुसरी ते चौथी, भक्ती सेवा विद्यापीठ - कोल्हापूर या ठिकाणी शिकलो.आणि त्यामुळेच माझ्या वडिलांबाबतच्या आठवणी तश्या थोड्या धूसरच आहेत पण त्या आठवणींचा चलचित्रपट आणि माझ्या मध्ये एक अदृश्य असा धुक्याचा पडदा आहे. कधी कधी एखादीच आठवणींची झुळूक येते आणि तो पडदा क्षणभरासाठी दूर होतो आणि अण्णा येवून समोर उभे राहिलेत असे वाटून तो काळ मी आजही पुन्हा एकदा तसाच अनुभवतो.
त्यामुळे जगाने जसे माझ्या बाबांना कधी ओळखले नाही तसे, जगास असे वाटते कि आम्हा मुलांना आमचे बाबा आठवतच नाहीत. पण त्याचा दोष मी माझ्या बाबांच्या आसपास वावरणाऱ्या परिचितांना देणार नाही कारण त्यांनी पहिले ते त्यांचे बाह्य रूप.अर्थात जवळचे नातेवाईक सुद्धा बाबांच्या वागणुकीवरून त्यांना तापट , हट्टी, दुराग्रही, हेकेखोर, तऱ्हेवाईक इतकेच काय पण माथेफिरू, वेडसर, मनोरुग्ण इत्यादी विशेषणे लावून मोकळे होत.
या नातेवाईकांना मी जवळचे नातेवाईक अश्यासाठी म्हटले आहे कि ज्या काळी दोन वेळची चूल घरात पेटणे हि चैन होती त्याकाळी त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची न कळती अपेक्षा होती. अर्थात काहींनी मदतीचा हात दिला तर काहींनी स्वतःचे पायावर उभे राहायला शिका असे पायात बळ येण्यापुर्वीच सांगितले
.
जसा जसा काळ मागे पडू लागला तसे तसे ज्या माझ्या वडिलांना इतकी विशेषणे न मागताच मिळाली ते माझे बाबा खरेच कसे होते याचा मला वरचेवर प्रश्न पडू लागला. कारण माझ्या आठवणीतील बाबा हे त्यांना मिळालेल्या कोणत्याच विशेषणात बसत नाहीत असा माझा पक्का समज होता पण न कळते वय आणि मन मोकळे करावे असे कोणी मैत्र नाही त्यामुळे माझे बाबा हे फक्त माझेच राहिले. त्यांचे मला भावलेले रूप इतके दिवस माझ्यापाशीच राहिले.
पुढे मी माझी पुण्यातील नोकरी संपवून चाकोरीतून बाहेर पडण्याचे ठरवले तेंव्हा मला बँकेतील मनेजर पद, भविष्यात बढती, पत्नी उच्च विद्या विभूषित, स्वतःचे चार खोल्यांचे अपार्टमेंट असताना हे स्थैर्य सोडून अनोळखी ठिकाणी जावून पुन्हा एकदा नवा डाव कशासाठी मांडायचा? असा प्रश्न केला ? फक्त हाच प्रश्न विचारून जर माझे हितचिंतक थांबले असते तरी ठीक होते. पण,का तू हि वडिलांसारखा वेडेपणा करायचे नक्की केले आहेस ? असा प्रश्न केला. आणि या प्रश्नाने मला खरोखर अंतर्मुख केले आणि ते मी वडिलांसारखा वेडेपणा करतोय का ? या विचारलेल्या प्रश्ना मुळे नाही तर माझे वडील या जगाला समजलेच नाहीत या दुःखाने.
पण त्यांनी आमच्या वर केलेली माया म्हणजेच वर नमूद केलेल्या श्लोकातीतील पुर्वाध होता तो म्हणजे -
जननीपरि त्वा पाळिले । वडील असून आईची माया दिली आणि जगण्यासाठी स्वाभिमानाचा मंत्र दिला.
आजही मित्रमंडळ, नातेवाईक किंवा परिचित यांची गप्पांची बैठक जमते आणि चर्चा वडिलार्जित मिळकत त्यामुळे होणारे वितंडवाद यावर येते तेंव्हा अतिशय अभिमन्ने मी नेहमीच सांगतो कि आमच्या वडिलांनी आमच्या साठी काय केले तर एक पैशाचे कर्ज अथवा उधार उसनवारीचे ओझे त्यांनी आमच्या शिरावर ठेवले नाही .आणि तोच आमचा सर्वात मोठा ठेवा आहे.
आता आज पितृ दिन असताना वडिलांच्या बरोबरीने आईच्या आठवण येण्यामागे, आज तिची प्रथम पुण्यतिथी इतकेच कारण नाही तर, वडिलांचे त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या आकस्मिक निधन झाल्यावर, पदरात असलेली तीन मुले संभालण्यासाठी तिने जे काही कष्ट घेतले होते त्याची किंमत शब्दात सांगता येणे कठीण आहे.
वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी वैधव्य पदरात पंधरा ते सहा वयोगटातील तीन मुले या परीस्थितीत तिने लेथ मशीनवर मशिनीस्ट म्हणून कष्टाची नोकरी स्वीकारून आम्हा तीन भावंडाना वाढवले. त्याकाळी आठ बाय दहाच्या चाळीतील खोली हेच आमचे विसाव्याचे ठिकाण होते. घरच्या गरिबीत नातेवाईक येत नसत, पुढे परिस्थिती सुधारल्यावर जेंव्हा नातेवाईकांपैकी कोणाकडून जेंव्हा पहिली साडी आईला घेतली गेली तेंव्हा आई म्हणाली होती कि," हा सन्मान माझा नसून सुधारलेल्या परिस्थितीचा आहे."
आणि पैशाशिवाय जगात किंमत नसली तरी, तो मिळवताना कधीही गैरमार्गाचा वापर करू नका, हे तिचे सांगणे होते. तिचा तो खंबीरपणाच आम्हा भावंडांना जगण्याचा मंत्र देवून गेला. त्यामुळे माझी आई म्हणजे वर उल्लेख केलेल्या श्लोकातील उत्तरार्ध आहे. कारण आईने आम्हाला कसे वाढविले हे सांगयचे झाले तर - पितयापरि त्वा सांभाळले | हेच खरे आहे.
म्हणूनच आजच्या पितृदिनी माझे अकाली गेलेल्या वडिलांना आणि त्यांच्या माघारी आमचे वडील झालेल्या आईस नतमस्तक होत वंदन करताना मी पुन्हा एकदा म्हणेन -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
आणि असे छत्र देणाऱ्या माझ्या बाबा आणि आई यांना आजच्या या पितृ दिनी माझे लाख लाख प्रणाम.

No comments:

Post a Comment