Monday, December 30, 2013

"मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !"

नवीन वर्षाची पूर्वसंध्या .  नियोजन ,संकल्प,परामर्श आणि आत्मचिंतन अश्या हिंदोळ्यावर मनातील विचार आणि त्याला पूरक स्वसंवाद सुरु असणारी कातरवेळ . आणि त्याच वेळी …  " फार झाले, मी आता माझ्या पुरते पाहणार आहे ! " असे वाक्य त्या दोघांच्या संवादातून कानावर पडले, आणि मन अनेक वर्षे मागे गेले.
त्यावेळी मी शिक्षणा साठी घरापासून दूर मामाकडे तालुक्याच्या ठिकाणी राहत असे. तेंव्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी नक्की काय करावे हेच सुचत नसले कि, मी माझ्या एका मित्राच्या घरी जावून बसत असे.  खरे तर दारी जावून बसत असे. मी असे का म्हणतोय हे सांगण्यासाठी प्रथम मी त्या घराची रचना आणि स्थल वैशिष्ठ्य सांगणे जरुरीचे आहे. 

माझ्या मित्राचे घर तसे छोट्या गल्लीत ( बोळात ) होते घराचा मुख्य दरवाजा त्या गल्लीत उघडणारा होता. दारातून आत आले कि थोडी मोकळी जागा आणि लगेच तीन पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांवर बसले कि दारासमोरील रस्ता दिसत असे. तो रस्ता  एकावेळी दोन किंवा तीन माणसे समांतर चालू शकतील इतकाच रुंद होता आणि दारासमोर मोठी भिंत असल्याने समोरील वर्दळ पायी जाणाऱ्यांची असे.

ती गल्ली जरी अरुंद असली तरी त्या तालुक्याच्या बस स्थानकाकडून गावाच्या मध्यवर्ती बाजारपेठे कडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने सतत ये जा सुरु असे.
त्या गल्लीतून जाणाऱ्या येणाऱ्यास, त्या भिंतीला समांतर चालताना बरोबर असणाऱ्या व्यक्तीशी चाललेला संवाद कोणाच्या कानी सहज पडत असेल  याचे भान नसे, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात मनमोकळेपणा असे. त्यामुळे माझ्या मित्राच्या घरात थोड्याश्या आतल्या बाजूस पायरीवर बसले कि ,अश्या संवादाचे छोटे छोटे तुकडे सहजच कानी पडत आणि मग वेळ इतका छान जात असे  कि जणू काही आपण नाट्य छटाच ऐकतो आहोत. 
सगळा मिळून सवांद दीड ते दोन मिनिटां पुरताच एकू येत असे, पण त्यातील विविधता, सुख दुख वाटून घेण्याची तळमळ, राग लोभ हेवे दावे परस्पर मदतीची इच्छा अशी विविध रूपे समोर येत असत. 
आज त्या संवादाचा परामर्श घेतला तर जो कोणी अगदी पोट तिडकीने बोलत असेल तो आपल्या वागण्याचे समर्थन करताना मी,  मला , माझे या 'म ' च्या बाराखडीतच फिरत असे. 
" मी त्याला पैसे दिले पण त्याने जाण  ठेवली नाही "
" मी त्याला धोक्याची सूचना दिली होती पण त्याने ऐकले  नाही"
" मला विचारून त्याने लग्न केले नाही, आता माझी आठवण झाली?"
" मला सांगून त्याने व्यवसायात उडी घेतली नाही मग आता अडचणीत  आलास तर भोग आपल्या कर्माची फळे "
" माझे एकले असते तर आज त्याच्यावर हि वेळ आली नसती "
या संवादात कोणी बबन,  कोणी बाळू, कोणी काका, कुठली आत्या, किंवा कधी एखादा रावसाहेब किंवा एखादा पंत पाटील असा शेजारी, गावकरी असे. 
त्यांच्या संवादाचे दीड दोन मिनिटाचे साक्षीदार या पलीकडे तेंव्हा काहीच गम्य नसे 
पण त्यावेळी वरील संवादातील विविध नाते संबंधात बरेचदा ऐकलेले वाक्य होते, ते म्हणजे-  " फार झाले,मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !"
आणि आज जवळजवळ तीस वर्षांनतर पुन्हा - " फार झाले,मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !" हे  वाक्य जसेच्या तसे कानावर आले आणि मन इतिहासात गेले. आणि गेल्या तीस वर्षात काहीच बदलेले नाही असेच वाटले. 
मग मनाशी विचार केला खरेच येवू घातलेल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने हीच "म" ची बाराखडी आपण बदलू शकू का? 

जर वरील विविध संवादाचा एक भाग म्हणून…  मी असेन तर … 

" तो तसा वागला म्हणून मी पण तसेच वागले पाहिजे का ?"

" लग्नाला बोलवले नाही असेल काही अडचण,त्यावेळी  मलाच  समजून घेता आले नाही"

"त्याची व्यवसायिक अडचण परिस्थितून आलेली आहे माझे कर्तव्य आहे त्याला आधार देण्याची "

असे  मी वागू शकेन का ? मला असा बदल स्वतः मध्ये करता येईल का?माझे वागणे देखील चुकू शकते ? असा विचार मी करीन का ?

या स्वसंवादाने मला अंतर्मुख केले आणि माझे मन मलाच म्हणाले जर तू सकारात्मक विचारच करणार नसशील तर आता मीच म्हणेन … 

" फार झाले,मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !"

No comments:

Post a Comment