Saturday, February 15, 2014

'अब तक पचपन ' -च्या निमित्ताने

 तसा माझा आणि 'चेहरे पुस्तका 'चा परिचय थोडा कमीच. आणि त्यावर व्यक्त होताना एकूणच मला जरा मर्यादाच येतात.
पण जेंव्हा कोणी वाढ दिवस लक्षात ठेवून शुभेच्छा  देते तेंव्हा मात्र मन सुखावते. पाश्चिमात्य जगात जर कोणी जन्म तारीख विचारली तर एक जानेवारी किंवा सात मार्च अशीच सांगतात. का तर वय किती झाले ?या प्रश्नाला उत्तर देण्याचे धाडस नसणे असेच मला वाटते.

मीही आत्ता पर्यंत जन्म तारीख वर्ष वगळूनच सांगत असे, पण त्या मागे वय लपवणे हा हेतू कधीच नव्हता. पण मनात नेहमीच एक भीती वाटत असे कि समोरून येणाऱ्या शुभेच्छा जश्या प्रामाणिक असतात तश्या जर….अश्याही आल्यातर काय ? आणि अश्याही म्हणजे काय तर ….

आज कितवा वाढदिवस ? या प्रश्नाला …
जेंव्हा मी अठरा असे उत्तर दिले होते तेंव्हा जसे अरे वा आता मतदानाचा हक्क मिळाला अभिनंदन ! हे जसे ऐकायला मिळाले तसेच अठरा वर्षाचा घोडा झाला पण अजून बसून खातो असा आवाज देखील आला होता .

जेंव्हा मी पंचवीस असे उत्तर दिले होते तेंव्हा जसे अरे वा म्हणजे आता संसारात पडायला हरकत नाही हा जसा सूर होता तसेच नुसतीच गद्धे पंचविशी  झाली स्वतःचे स्वतः बघायला शिकणार म्हणून नाही हा सूर देखील ऐकला होता .
जेंव्हा तीस असे उत्तर दिले होते तेंव्हा खरे कि काय बघून वाटत नाही अशी प्रतिक्रिया असे तसेच अजून मुलगी पसंत नाही का ? या सरळ प्रश्ना मागे याला कोण पसंत करणार ! हे हि दडलेले असे.

अशीच वर्ष मागून वर्षे जात होती कधी चांगल्या, कधी उत्स्फूर्त, कधी कडवट अश्या अनेक अनेक प्रतिक्रियांची शिदोरी बरोबर घेत प्रवास सुरूच होता मग लक्षात आले वर्षा मागून वर्षे जातच  असतात, तुम्ही जगात जगता, कारण मरण आपल्या हातात नाही म्हणून पण जर तुम्ही थोडे जरी इतरांसाठी जगलात तर तुमचे जगणे इतरांसाठी नोंद घेण्या  जोगे असते. नाहीतर मग तुम्हाला नेहमीच संमिश्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागेल याची जाण  ठेवून जगणे महत्वाचे.
अशी " अब तक पचपन  " संपली आहेत जर ईश्वर कृपेने अंकी काही वर्षे जगलो तर निदान लोकांनी "साठी बुद्घी नाठी " असे म्हणू नये इतपत जाण ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना श्री चरणी करून ज्यांनी आज शुभेच्छा दिल्या त्या सर्व हितचिंतकांचे मनपूर्वक आभार मानतो!

No comments:

Post a Comment