Friday, February 11, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग दोन

आज तुमच्या समोर माझ्या बाबांची डायरी ठेवताना त्यांच्या हस्तलिखित डायरीतील शब्द रचना जरासुद्धा बदललेली नाही,त्यामुळे त्यात काही ठिकाणी कवितेच्या ओळी, काही ठिकाणी इंग्लिश वाक्ये आलेली आहेत. यापुढील भागात "डायरीतील नोंद- असलेली" म्हणजे माझ्या बाबांची मुळ डायरी आहे. तर या डायरीच्या वाचनातून ते मला कसे वाटले किंवा कसे उगडत गेले त्याविषयी माझ्या भावना म्हणजे "डायरीतील नोंद-मला समजलेली" हा भाग आहे.
डायरीतील नोंद-- असलेली-

कुण्या एका कलंदराची भ्रमण गाथा.
पुणे गाठले ....
सुमारे ३६ वर्षापूर्वी या पुण्यनगरीत पडलेले जाणतेपणाचे पहिले पाऊल ...
ग्रीष्म ऋतू चंड प्रतापी रविराजाच्या सहस्त्र सहस्त्र किरणांनी पृथ्वी भाजून निघत होती.अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. घशाला तहनेचा शोष जाणवत होता.आणि माझ्या आसऱ्याकरिता मी व माझे वडील तथाकथित सज्जनांचे उंबऱ्या मागून उंबरे झिजवत होतो. कोणी नावाचेच "महाजन" होते.उंची आदर सत्काराची सवय असलेल्या माझ्या वडिलांकडे मी पाय भाजत असतानाही रोखून पाहत होतो.कारण त्यातील उंची कमी झाली होती.त्याचा परिस्थितीमुळे आलेला अगतिकपणा, या कोवळ्या अंकुराचे भवितव्य काय? या व्यथेने आलेली व्याकुळता, दारिद्र्यात मरण बरे व दारिद्र्यता खोटी, म्हणतच फिरणारा चारुदत्त तर काही ठिकाणी नाकारल्या जाणाऱ्या वधूच्या भावनेशी समरस होऊन अधीर उत्सुकपणाचा शेवट जाणून घेणेच नको.आणि आता पेटत्या भूकेनेही थैमान घातले होते.
अवेळी आलेल्यांनाही आमच्या आईने रांधून वाढले होते,परंतु असे सज्जन जेवायचे वेळीही जेवून जा म्हणावयास तयार नसलेले. कवडी कफल्लक निष्कांचनाला आता हो म्हटले तर न जाणो हि ब्याद आपल्याला कायमच चिकटायची या गृहिणीच्या व्यवहारी सल्ल्याची
पकड बसलेले ते महाभाग, व खमंग पदार्थांचा मध्यान्हीला सुवास दरवळत असताही अभूक्तपणे "येतो आता" म्हणणारे व तोंड देखले या या म्हणणारे यजमान यांचा निरोप आमची पावले ज्या घरच्या आतीथ्याने केवळ त्याच दिवशी नव्हे तर जीवनात कायमची स्थिरावली त्या घरी मी आता पुणे सोडताना जाऊ कि नको ? हे घर माझ्या चुलत चुलत चुलत्यांचे. इथे भर दुपारी बारा वाजता व रात्री बेरात्री हि जाण्यास मला प्रत्यवाय नव्हता. कारण इथेच माझे लालन पालन पोषण झालेले.चुली कोसळून पडल्या होत्या आणि एकतेचे अकृत्रिम बंध निर्माण झाले असताही आज मी या घरी जाणार नव्हतो. उदास असता मुक्त्तपणे खळाळून हास्याचा निर्झर वाहवा अशी जादू, वेदनांवर फुंकर घालण्याची शक्ती असलेले हे घर ,त्यातील चालते बोलते घराला घरपण देणारे यांचा मी आज मूकपणेच निरोप घेणार होतो व घेतलाही.बस स्वारगेटकडे याच घरावरून पुढे गेली आणि पुढे साताऱ्याच्या वाटेला लागलीही. पार्वती नजरेआड झाली आणि अशा तऱ्हेने जल स्थळ काष्ठ पाहन आदी तदंगभूत वस्तू सुद्धा मी पुण्याचा निरोप घेतला. जाताना एक मोठ्या अक्षरातली जाहिरात Lead असा संदेश देत होती. त्या आशय गर्भ शब्दांनी मनाची पकड घेतली आणि अंतर्मुख झालो. मी,माझे वडील, आजोबा पणजोबाजा आणखी किती मागे जाता येईल तितका जा. शिवाजी,चंद्रगुप्त, कृष्ण राम काळाच्या विशाल उदरातले आठवणारे टप्पे. ऋषीचे कुळ आणि नदीचे मुळ . तुझे गोत्र वसिष्ठ प्रवर तीन पण कोणते माहित नाही. तुझी परंपरा कुठे भिडते आहे, आहे माहित? रामगुरु वासिष्ठापर्यंत आणि मग राजर्षी आणि ब्रम्हर्षी यांचा झगडा. वसिष्ठ विश्वामित्र असा थोर परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी आहे का? पात्रते शिवाय नेतृत्व करणारे आजचे पुढारी ज्यांना नक्की कुठे जावयाचे आहे ते हे त्यांचे त्यानंच माहित नाही त्यात आणि तुझ्यात काही फरक आहे का ?
डायरीतील नोंद-मला समजलेली-
वरील नोंदीने ज्या रोजनिशीची सुरवात झाली आहे ती रोजनिशी माझ्या बाबांनी लिहिली आहे सन १९७१ च्या वर्षारंभी. सन १९६८ मध्ये नोकरीवर आरिष्ट, कोल्हापुरातील हलाखीत जेंव्हा तीन मुले व पत्नी यांची रोजची पोटाची खळगी कशी भरावी या प्रश्नांनी मन उद्विग्न तेंव्हा पर्याय म्हणून पुण्यास मुक्काम हलवलेला, पुढील वर्षभरात कुटुंब स्वास्थ्याची कोणतीही निशाणी समोर दिसत नाही, त्यावेळी माझ्या बाबांच्या मनाने अचानक परमार्थाकडे ओढ घेतली. राम कृष्ण परमहंस हाच त्यांचा जगण्याचा मार्ग ठरला. कोथरूडहून डेक्कन पर्यंत येण्यासाठी खिशात पैसे नसताना त्यांचा ' देवाचा शोध' घेण्याचा निश्चित ध्येयाचा पण अनिश्चित मार्गाने जाण्याचा प्रवास सुरु झाला. आणि या प्रवासाची सुरवात करताना प्रथम त्यांच्या मनाने मागे जावून ३५ वर्षापूर्वीचा पुण्यातील प्रथम दिवसापासूनचा प्रवास केला.
माझ्या वडिलांना त्यांच्या आईचे छत्र लहानपणीच गमवावे लागले. माझ्या आजोबांचा परंपरागत सराफीचा व्यवसाय खरे तर माझे आजोबा हे प्रतिथ यश रत्नपारखी. चांगले भविष्याचे जाणकार. त्यामुळे व्यवसाय भरभराटीस आलेला. पण रत्नांची पारख करणारे डोळे जवळची माणसे ओळखण्यात निरुपयोगी ठरले भागीदार गोत्यात आणेल हे स्वतःचे भविष्य ते पाहू शकले नाहीत. व्यवसाय आणि घरदार देशोधडीला लागले. पदरात चार मुले,पत्नीने नैराश्याच्या झटक्यात मृत्यूला आपलेसे केलेले.
या पार्श्वभूमीवर अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी माझे आजोबा पुण्यातील नातेवाईकांचे उंबरे झिजवत होते. पण पदरी येत होता तो अनुभव म्हणजे गदिमांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ... लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई .. असा होता आणि त्यांचा उल्लेखच प्रथमच्या नोंदीत आढळतो. पण अशी कटू आठवण देणारे अनुभव असूनही त्यांनी फक्त त्याच आठवणी जपल्यात असेहि नाही, तर त्यावेळी आसरा देणाऱ्या घराबाबतची त्यांची जाण देखील तितकीच भावूक असल्याचे दिसते.
फक्त संदर्भासाठी ते घर ' चुलत चुलत चुलत्यांचे ' पण त्याच्या गतस्मृतींसाठी ते मायेची शाल पांघरणारे सख्खेच घर होते. आणि अशी उदारता माझ्या ज्या आजोबांच्या घराने दाखवली ते घर म्हणजे गणित तज्ञ प्रा. नी. वा. किंकर यांचे लिमयेवाडी, सदाशिव पेठ पुणे.येथील पेरुगेट भावे हायस्कूलच्या पाठीमागचे घर.जे माझ्या बाबांच्या पाठीशी गडकोट किल्याप्रमाणे उभे राहिले.

स्वतःची दोन मुले व एक मुलगी यात आणखी एका मुलाची भर पडली आहे असे अगदी सहजतेने मानून त्यांनी माझ्या वडिलांना घरात आसरा दिला,खरे तर आसरा दिला असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल कारण आपल्याच मुलातील एक समजून त्यांनी वडिलांना सामावून घेतले. माझे हे चुलत आजोबा हे पेरुगेट भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक. त्यामुळेच की काय पण सतत मुलांच्यात राहून आतून एक बाल्यच त्यांनी जपले असावे आणि म्हणूनच घरात नव्याने आलेला एक मुलगा त्यांनी सहजतेने ठेवून घेतला. त्याची निरागसता जपली. वडिलांना फक्त ठेवून घेण्याची जबाबदारी त्यांनी पार पडली असे नाही तर त्यांना आधार,संस्कार आणि आकार दिला.
ज्या भावंडात राहून माझ्या वडिलांचे बालपण बहरले त्या भावंडांमध्ये निर्माण झालेली आपुलकी आमच्या पिढीने देखील तितक्याच सहजतेने अनुभवली. वडिलांनी घर सोडून देवदर्शनाच्या ओढीने प्रयाण केल्यावर त्यांच्या शोधासाठी केलेली धडपड असो किंवा माझ्या वडिलांचे अखेरचे आजारपण असो किंवा त्यांच्या मृत्युनंतर दिलेला मदतीचा हात असो.या घराची सावली कधीच आकसली नाही याचे कारण म्हणजे त्या आजोबांचे संस्कार आणि आमचे भाग्य होय. मला आठवतय हे माझे आजोबा श्री. नीलकंठ वासुदेव किंकर उर्फ नी. वा. किंकर प्रसिद्ध गणित तज्ञ म्हणून पुण्यात नामवंत होते पण आम्हाला ते आमच्या घरचे वडिलधारे म्हणूनच माहित. शाळेमध्ये धोतर ,काळा कोट डोक्यावर काळी गोल टोपी आणि खांद्यावर उपरणे या वेशात शाळेत प्रवेश करते झाले कि विद्यार्थ्यांसाठी दरारा व सहकाऱ्यांसाठी आधार निर्माण होत असे. पेरुगेट भावे हायस्कूल या नामवंत शाळेसाठी त्यांनी मुख्याधापक पद सांभाळून शाळेचे नाव आणि परंपरा नक्कीच उज्वल केली आणि त्याचा आम्हाला आज हि सार्थ अभिमान आहे. आणि यामुळेच स्वारगेटकडे बस जाताना बसने घर ओलांडले आणि माझ्या वडिलांच्या मनात त्यांच्या घर सोडून जाण्याविषयी निर्माण झालेल्या वादळाची चाहूल त्या डायरीत उमटली.पुढे जावून ते लिहतात ... (क्रमशः)

No comments:

Post a Comment