Friday, April 15, 2011

थडग्यातून पुन्हा बाहेर आलेला कलाकार......

डोक्यावर टोपी, हातात काठी,
ढगळी विजार आणि तंगकोट,
असा पेहराव देहाशी
बोलके डोळे आणि नाकाखाली छोटीशी मिशी.
ओळखले का कोण बरे हि स्वारी खाशी
हि तर व्यक्ती दिसते विदुषकी
पण बुद्धी, प्रसिद्धी आणि पैसा चालत आला याच्या पायाशी ......
ओळखलेत न हे वर्णन आहे एका अति प्रसिद्ध विनोद वीर, कलासक्त अभिनेत्याचे.
ज्याचे नाव घेताच, तुम्ही कितीही काळजीत, तणावात असलात तरी खुदकन हसाल असा अभिनेता ...चार्ली चॅप्लीन.
या थोर कलाकाराचा आज जन्म दिवस. आपले आयुष्य लोकांना हसवत ठेण्यासाठी खर्ची घालणारा हा कलंदर माणूस
आपल्या वडिलांचे बोट धरून याने चित्रपट सृष्टीत प्रवेश करत - "The Eight Lancashire Lads," या चित्रपटापासून कामास सुरवात केली.
जगाला हसवणाऱ्या या कलाकाराने वास्तव जीवनात हर तऱ्हेचे भोग भोगले. मुलगा आणि कुटुंबीय याची देखभाल नीट
न केल्याच्या आरोपावरून चार्लीच्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला. अति मद्यपानामुळे वयाच्या ३७ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी चार्लीचे वय होते फक्त बारा वर्षे.
चार्लीवर सर्वाधिक प्रभाव होता त्याची आई हॅना हिचा. गायिका आणि विनोदी अभिनेत्री म्हणून काम करणारी त्याची आई ही त्याचे श्रद्धास्थान होते. पण आजारपणामुळे आवाजावर परिणाम झाल्याने,चार्ली वयाच्या पाचव्या वर्ष पासून काम करू लागला. आईचे आजारपण मात्र वाढत जावून शेवटी त्याची परिणीती ती मानसिक रुग्ण होण्यात झाली. पण चार्लीने आईस कधीच अंतर दिले नाही.
याप्रकारे कौटुंबिक ताण तणावा नंतर नाते संबंधात देखील या महान कलाकारास अनंत अडचणी सोसाव्या लागल्या. काही वर्षांसाठी टिकलेली 'भातुकलीच्या खेळामधली ' अर्ध्यावर डाव मोडणारी तीन अयशस्वी लग्ने पदरी घेत केलेले त्याचे चौथे लग्न अखेर पर्यंत टिकले. हे लग्न झाले तेंव्हा चार्लीचे वय होते फक्त त्रेपन्न वर्षे. आणि वधु ओना-ओ-नील हि होती अठरा वर्षांची. या दाम्पत्यास आठ मुले झाली.
इतक्या हेलकावणाऱ्या नौकेतून प्रवास करणाऱ्या, या अस्थिर आयुष्य जगणाऱ्या कलाकाराने चित्रपट माध्यमातुन जगाला दिला तो फक्त निखळ आनंदच.
अर्थात या महान कलाकाराचे चित्रपट हसवणारे असले,तरी त्यातून जीवनातील विसंगती,दुखः, यावरील भाष्य पुरेपूर हादरवणारे होते.
आयुष्यभर असे अनंत चटके सोसत जगलेल्या कलाकाराचा अंत,स्विझर्लंड या सर्वात शांतताप्रिय देशात झाला. सन १९७७ च्या नाताळच्या पवित्र दिवशी चिरनिद्रा घेतलेल्या कलाकाराच्या नशिबी मृत्यू नंतर देखील शांत आयुष्य नसावे म्हणूनच कि काय पण १ मार्च १९७८ या दिवशी,त्याच्या मृतदेहाची चोरी झाली. मृतदेहाची शवपेटी परत करण्यासाठी पैशाची मागणी चोरांनी केली.
अर्थात स्विस सरकारने ११ आठवड्यात सदर शवपेटी परत मिळवून.ती अधिक सुरक्षित पणे दफन करून या प्रकरणावर पडदा टाकला. मी मात्र या घटना क्रमाकडे पाहताना असे म्हणतो कि, सतत ताण  तणावाच्या दुष्ट चक्रातून,जगाला  विनोद बुद्धी आणि विनोदी वृत्ती यांनी ज्याने जन्मभर फक्त हसवत ठेवले,तो परम प्रिय चार्ली त्याच्या मृत्युनंतर आता कोणी रडत नाही ना याची खात्री करण्यासाठीच जणू थडग्यातून पुन्हा बाहेर आला. आणि जणू त्याला समजले कि, मी गेलो तरी माझे चित्रपट लोकांना नेहमीच हसत ठेवतील. या खात्रीनंतर जणू त्याने खरी खुरी चिरनिद्रा घेतली. तर शेवटी इतकेच म्हणेन कि...
Simplicity is a difficult thing to achieve. हे एकच वाक्य प्रत्यक्षात अमलात आणणाऱ्या या कलाकारास त्याच्या जन्म दिनी केवळ सलाम !

No comments:

Post a Comment